भारतीय रेल्वे

भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा.

भारतीय रेल्वे (संक्षेप: भा. रे.) ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. ही रेल्वे जगातील सर्वांत मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ६३,१४० कि.मी. (३९,२३३ मैल) इतकी आहे. २००३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार[१] भारतीय रेल्वे दररोज १ कोटी ६० लाख प्रवाशांची, तसेच १४ लाख टन मालाची वाहतूक करते.

भारतीय रेल्वे
ब्रीदवाक्य देशाची जीवनवाहिनी
प्रकार भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाधीन कंपनी (सार्वजनिक क्षेत्र)
उद्योग क्षेत्र दळणवळण
स्थापना एप्रिल १६, इ.स. १८५३, १९५१मध्ये राष्ट्रीयीकरण
मुख्यालय Flag of India.svg नवी दिल्ली, भारत
सेवांतर्गत प्रदेश भारत
महत्त्वाच्या व्यक्ती भारतीय रेल्वे मंत्री - पियुष गोयल , मनोज सिन्हा , राजन गोहैन , अश्विन लोहाणी(रेल्वे बोर्ड अध्यक्ष)
उत्पादने रेल्वे इंजिने, डबे व संलग्न वस्तू
सेवा रेल्वे प्रवासी, मालवाहतूक व संलग्न सेवा
महसूली उत्पन्न ७२६ अब्ज ५५ कोटी भारतीय रुपये (२००८)
मालक भारत सरकार
कर्मचारी अंदाजे २५,००,०००
पालक कंपनी रेल्वे मंत्रालय (भारत)
विभाग १६ रेल्वे विभाग आणि कोंकण रेल्वे
पोटकंपनी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, [[इंडियन रेल्वेझ केटरिंग ॲंड टुरिझ]म कॉर्पोरेशन|इंडियन रेल्वे केटरिंग ॲंड टुरिझम कॉर्पोरेशन]]
संकेतस्थळ भारतीय रेल्वेचे संकेतस्थळ

रेल्वे विभाग हा भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातील विभाग, भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्याचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे बोर्ड करते.

आत्तापर्यंत, रेल्वे वाहतुकीवर भारतीय रेल्वेचा एकाधिकार होता.[२] भारतीय रेल्वेची गणना जगातील सर्वांत मोठ्या रेल्वेंमध्ये केली जाते. २५ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, जगातील सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे, जी कर्मचारीसंख्येत फक्त चिनी लष्करापेक्षा लहान आहे.[३]इ.स. २००२च्या गणतीनुसार, भारतीय रेल्वेच्या मालकीत २,१६,७१७ वाघिणी (मालवाहू डबे), ३०,२६३ प्रवासी डबे आणि ७,७३९ इंजिने आहेत आणि रोज ८,७०२ प्रवासी गाड्यांसहित एकूण १४,४४४ गाड्या धावतात.[१]

इतिहाससंपादन करा

भारतात रेल्वे वाहतुकीचा प्रथम आराखडा इ.स. १८३२ सालीच मांडण्यात आला होता. भारतातील पहिली रेल्वे इ.स. १८३७ मध्ये रेड हिल्स चिंतड्रिपेट पुलावरून चिंतड्रिपेट पुलावरून धावली. तिला रेड हिल रेल्वे असे नाव देण्यात आले आणि विल्यम एवरीने उत्पादित रोटरी स्टीम लोकोमोटिव्हचा वापर केला. हे रेल्वे सर आर्थर कॉटन बांधले होते आणि मुख्यत्वे मद्रास मधील रस्ते-बांधकाम कामासाठी ग्रेनाइट दगडांचे परिवहन करण्यासाठी वापरले जात असे. इ.स. १८४४ साली, भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळीना रेल्वे व्यवस्था चालू करण्यासाठी परवानगी दिली. दोन नवीन रेल्वे कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला त्यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आले. १८४५मध्ये कॉटन राजहमुंदरी मधील डॉलेश्वरम येथे गोदावरी बांध बांधकाम बांधला, गोदावरी वर बांध बांधण्यासाठी दगड पुरवतो. पुढील काही वर्षात, इंग्लंडमधील गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या व्यावसायिक औत्सुक्याचा भारताची रेल्वे व्यवस्था वृद्धिंगत होण्यात हातभार लागला. १८५१मध्ये सोलानी ॲक्वाडक्ट रेल्वे रुरकीमध्ये बांधण्यात आली, ज्याला ब्रिटिश अधिकारी नंतर नाव "थॉमसन" नावाच्या स्टीम लोकोमोटिव्हने आणले. सोलनी नदीवर ॲक्क्वाडक्ट बांधकाम साहित्याचा वापर करण्यासाठी हे वापरण्यात आले होते].

एप्रिल 18, इ.स. १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस, व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते, आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर १८५४मध्ये बंगाल मध्ये हावडा ते हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. कोलकाता ते अलाहाबाद दिल्ली असा लोहमार्गही १८६४ मध्ये पूर्ण केला गेला. मुंबई ते कोलकाता हा ६४०० किलोमीटरचा रेल्वेमार्ग पूर्ण झाला १८७०मध्ये त्यावरून गाडी धावली. १८८५मध्ये भारतीय बनावटीचे रेल्वे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली. इ.स. १९४७पर्यंत भारतात ४२ रेल्वे कंपन्या होत्या. इ.स. १९५१मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. ही जगातील सर्वांत मोठ्या संस्थांपैकी एक आहे. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

रेल्वेचे विभागसंपादन करा

रेल्वे बोर्डाने ठरवल्याप्रमाणे १९५० मध्ये देशातील खासगी रेल्वे कंपन्यांचे अस्तित्व संपुष्टात आले. भारतातील सर्व रेल्वे सेवेची सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) विभागणी करण्याचे झाली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला.

"बॉम्बे बरोडा अ‍ॅन्ड सेंट्रल इंडिया रेल्वे" (बीबी अ‍ॅन्ड सीआय), सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला. उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहूत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) स्थापन झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि "ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी" यांचा समावेश होता.

 
भारतीय रेल्वे जाळ्याचा नकाशा

व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे १८ विभाग करण्यात आले आहेत.

क्र. नाव सांकेतिक नाव मुख्यालय स्थापना दिनांक
१. उत्तर रेल्वे उ.रे. दिल्ली एप्रिल १४, इ.स. १९५२
२. उत्तर पूर्व रेल्वे उ.पु.रे. गोरखपूर १९५२
३. उत्तर पूर्व सीमा रेल्वे NFR मालिगाव(गौहाटी) १९५८
४. पूर्व रेल्वे पू.रे. कोलकाता एप्रिल, १९५२
५. दक्षिण पूर्व रेल्वे द.पू.रे. कोलकाता इ.स. १९५५,
६. दक्षिण मध्य रेल्वे द.म.रे. सिकंदराबाद ऑक्टोबर २, इ.स. १९६६
७. दक्षिण रेल्वे द.रे. चेन्नई एप्रिल १४, इ.स. १९५१
८. मध्य रेल्वे म.रे. मुंबई नोव्हेंबर ५, इ.स. १९५१
९. पश्चिम रेल्वे प.रे. मुंबई नोव्हेंबर ५, इ.स. १९५१
१०. दक्षिण पश्चिम रेल्वे द.प.रे. हुबळी एप्रिल १, इ.स. २००३
११. उत्तर पश्चिम रेल्वे उ.प.रे. जोधपूर ऑक्टोबर १, इ.स. २००२
१२. पश्चिम मध्य रेल्वे प.म.रे. जबलपूर एप्रिल १, इ.स. २००३
१३. उत्तर मध्य रेल्वे उ.म.रे. अलाहाबाद एप्रिल १, इ.स. २००३
१४. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे द.पू.म.रे. बिलासपूर, छत्तिसगढ एप्रिल १, इ.स. २००३
१५. पूर्व तटीय रेल्वे ECoR भुवनेश्वर एप्रिल १, इ.स. २००३
16. पूर्व मध्य रेल्वे पू.म.रे. हाजीपूर ऑक्टोबर १, इ.स. २००२
17. कोकण रेल्वे को.रे. नवी मुंबई जानेवारी २६, इ.स. १९९८
18. दार्जीलिंग हिमालयन रेल्वे डीएचआर Elysia Place, ‎Kurseong इ.स. १८७९

कोंकण रेल्वे ही भारतीय रेल्वे बोर्डाच्या नियंत्रणाखालील वेगळी संस्था आहे. याचे मुख्यालय बेलापूर, नवी मुंबई येथे आहे.

कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा आहे. प्रत्येक रेल्वे विभागाचे देखील प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात एक प्रभागीय कार्यालय असते. असे एकूण ६७ प्रभाग आहेत.

विभागीय रेल्वे प्रभाग
उत्तर रेल्वे दिल्ली, अंबाला, फिरोजपूर, लखनऊ, मोरादाबाद
उत्तर पूर्व रेल्वे इज्जतनगर, लखनऊ, वाराणसी
उत्तर पूर्व सीमा रेल्वे अलिपूरद्वार, कटिहार, लुमडिंग, रंगिया, तिन्सुकिया
पूर्व रेल्वे हावरा, सियालदाह, आसनसोल, माल्दा
दक्षिण पूर्व रेल्वे अद्रा, चक्रधरपूर, खड़गपूर, रांची
दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद, हैदराबाद, गुंटकल, गुंटूर, नांदेड, विजयवाडा
दक्षिण रेल्वे चेन्नई, मदुरई, पालघाट, तिरुचिरापल्ली, तिरुवनन्तपुरम, सेलम
मध्य रेल्वे मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर
पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल, वडोदरा, रतलाम, अमदावाद, राजकोट, भावनगर
दक्षिण पश्चिम रेल्वे हुबळी, बंगळूर, म्हैसूर
उत्तर पश्चिम रेल्वे जयपूर, अजमेर, बिकानेर, जोधपूर
पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर, भोपाळ, कोटा
उत्तर मध्य रेल्वे अलाहाबाद, आग्रा, झांसी
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर, रायपूर, नागपूर
पूर्व तटीय रेल्वे खुर्दा रोड, संबलपूर, विशाखापट्टनम
पूर्व मध्य रेल्वे दानापूर, धनबाद, मुगलसराई, समस्तीपूर, सोनपूर

रेल्वेगाड्यांचे प्रकारसंपादन करा

 1. उपनगरीय - ईएम्‌यू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट)
 2. मेमू (मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट)
 3. डीएम्‌यू (डिझेल मल्टिपल युनिट)
 4. डोंगरी रेल्वे
 5. पॅसेंजर
 6. जलद (एक्सप्रेस)
 7. अतिजलद (सुपरफास्ट एक्सप्रेस)
 8. वातानुकूलित एक्स्प्रेस
 9. वातानुकूलित सुपरफास्ट एक्सप्रेस
 10. जनशताब्दी एक्सप्रेस
 11. शताब्दी एक्सप्रेस
 12. संपर्क क्रांती एक्सप्रेस
 13. गरीब रथ एक्सप्रेस
 14. राजधानी एक्सप्रेस
 15. दुरांतो एक्सप्रेस
 16. दुमजली (डबल डेकर) एक्सप्रेस
 17. अंत्योदय एक्सप्रेस
 18. उदय एक्सप्रेस
 19. हमसफर एक्सप्रेस
 20. तेजस एक्सप्रेस

रेल्वे डब्यांचे वर्गसंपादन करा

भारतीय रेल्वेमध्ये निरनिराळ्या वर्गाचे डबे आहेत.

अनारक्षित वर्गसंपादन करा

 1. द्वितीय वर्ग खुर्ची यान
 2. प्रथम वर्ग खुर्ची यान

आरक्षित वर्गसंपादन करा

बैठक व्यवस्था प्रकारातील

 1. द्वितीय वर्ग खुर्ची यान
 2. प्रथम वर्ग खुर्ची यान
 3. द्वितीय वर्ग वातानुकूलित खुर्ची यान
 4. प्रथम वर्ग वातानुकूलित खुर्ची यान

बैठक/शयन व्यवस्था प्रकारातील

 1. शयनयान
 2. तृतीय वर्ग वातानुकूलित शयनयान
 3. द्वितीय वर्ग वातानुकूलित शयनयान
 4. प्रथम वर्ग वातानुकूलित शयनयान

रेल्वे प्रवासी सेवासंपादन करा

 
लांब पल्ल्याची एक्सप्रेस गाडी

दरवर्षी भारतीय रेल्वेच्या ८,७०२ प्रवासी गाड्यांमधून ५ अब्ज प्रवासी 27 राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांत प्रवास करतात. सिक्किम आणि मेघालय या दोन राज्यात रेल्वे जात नाही.

बहुतांशी, रेल्वे ही भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठीचा प्रथम पर्याय म्हणून स्वीकारली जातो.

सर्वसाधारण प्रवासी गाडीमध्ये १८ डबे असतात. जास्त प्रवासी संख्या असलेला मार्गांवरील काही गाड्यांमध्ये डब्यांची संख्या २४पर्यंत देखील अढळते. एका डब्याची क्षमता १८ पासून ७२ प्रवासी वाहून नेण्याची असते. परंतु सुट्टीच्या दिवसात अथवा अतिव्यस्त मार्गांवर ही क्षमता नियमितपणे ओलांडलेली अढळते. साधारणपणे डबे जोडमार्गिका वापरून एक मेकांना जोडलेले असतात, ज्यामुळे चालत्या गाडीत प्रावाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येते. काही तांत्रिक कारणांसाठी गाड्यांमध्ये न जोडलेले डबे देखील असतात.

प्रत्येक डब्याची रचना एका वर्गाच्या प्रवासासाठी केलेली असते. भारतातील रेल्वे प्रवासाची अंतरे खूप लांब असल्याने शयनयान (रात्री आडवे झोपून प्रवास करण्याची सोय असलेले डबे) जास्त वापरात आहेत. सामान्य गाडीत ३ ते ५ वातानुकूलित डबे असतात.

माहितीजालाच्या साहायाने आरक्षणाची सोय इ.स. २००४ साली सुरू करण्यात आली. २००९ सालापर्यंत तिचा वापर प्रतिदिन १ लक्ष आरक्षणे इतका होण्याची अपेक्षा आहे. ए.टी.एम. यंत्रांद्वारे लांब पल्यांच्या प्रवासाचे आरक्षण करण्याची सोय बऱ्याच स्थानकांवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

रेल्वे उत्पादन सेवासंपादन करा

 
WAP5 श्रेणीचे लोकोमोटिव्ह

मुख्यत्वे ऐतिहासिक कारणांसाठी, वहनसाहित्य आणि भारी तांत्रिक घटकांचे उत्पादन भारतीय रेल्वे स्वतः करते. महाग तंत्रज्ञानावर आधारित सामुग्री आयात न करता स्वदेशी पर्यायी उत्पादने वापरून खर्च कमी करणे हाच प्रमुख उद्देश बऱ्याच विकसनशील अर्थव्यवस्थांचा असतो.

भारतीय रेल्वेच्या उत्पादन संस्था केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. या संस्थांचे मुख्य व्यवस्थापक रेल्वे बोर्डाच्या नियंत्रणाखाली असतात. भारतीय रेल्वेच्या उत्पादन संस्था आहेत:

उपनगरीय रेल्वेसंपादन करा

उपनागरीय प्रवासी वाहतुकीसाठी अनेक शहरांमध्ये स्वतंत्र रेल्वे प्रणाली चालवली जाते. सध्या अशी उपनगरीय प्रवासी सेवा मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, हैदराबाद आणि पुणे येते कार्यरत आहे. हैदराबाद आणि पुणे या दोन शहरांमध्ये स्वतंत्र उपनगरीय रेल्वे मार्ग नसल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतूकीच्या रेल्वे मार्गांवर ही सेवा चालवली जाते. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये मेट्रो सेवा कार्यरत आहे – मुंबईत मुंबई मेट्रो, नवी दिल्लीत नवी दिल्ली मेट्रो, चेन्नईत चेन्नई मेट्रो आणि कोलकाता मध्ये कोलकाता मेट्रो. चेन्नईतील मेट्रो सेवेत, मुंबई, कोलकाताच्या उपनगरीय वाहतूकीच्या गाड्या स्वतंत्र उड्डाण पुलांसारख्या मार्गावरून चालवल्या जातात.

प्रवासी वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपनगरीय गाड्या ई.एम.यु. या तत्त्वावर आधारीत असतात. या गाड्यांमध्ये साधारणपणे ९ डबे असतात. गर्दीच्या मार्गांवर/वेळेत १२ डब्याच्या गाड्या चालवल्या जातात. सध्या मुंबईतील तीन्ही उपनगरीय मार्गांवरील ९ डब्याच्या गाड्या ३ अतिरिक्त डबे जोडून १२ डब्यांच्या गाड्यांमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहेत. यासाठी फलाटांची लांबी वाढवून झालेली आहे. चेन्नई मेट्रोवर ३ ते ६ डब्यांच्या गाड्या तर हैदराबाद मेट्रो वर ६ डब्यांच्या गाड्या चालवल्या जातात.

ई.एम.यु. गाडीच्या एका एककात एक कर्षण डबा तर दोन साधे डबे असतात. सहसा मधला डबा कर्षक असतो. म्हणजे नऊ डब्यांची गाडी ही तीन एककांची असते तर बारा डब्यांची चार एककांची. ई.एम.यु. गाड्यांमध्ये ए.सी. विद्युप्रवाह वापरला जातो.[४] साधारणतः एका डब्यात ९६ प्रवाशांना बसण्याची सोय असते पर वस्तुतः प्रत्येक डब्यात गर्दीच्या वेळी ३०० ते ४०० प्रवासी सहज असतात.

इतर उपगनरीय वाहतुकीच्या तुलनेत मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्या खूपच जास्त प्रवासी संख्या हाताळतात. या प्रणालीमध्ये ३ मार्ग आहेत – पश्चिम, मध्य आणि हार्बर. दैनंदिन व्यवहारासाठी मुंबईकर या उपनगरीय सेवेवर अवलंबून असल्याने ही सेवा मुंबईची नस मानली जाते. ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील रेल्वे गाड्यांमध्ये दहशतवाद्यानी ६ स्फोट घडवून आणले होते. परंतु मुंबईकरांची सहनशीलता व रेल्वे विभागाच्या तत्पर उपाययोजनांमुळे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ही सेवा पुन्हा सुरळीत कार्यरत झाली होती.

रेल्वे माल वाहतूकसंपादन करा

 
एकेरी मार्गिका असलेला रेल्वे पूल

भारतीय रेल्वेवर अनेकविध मालाची मोठा प्रमाणावर वाहतूक होते – खनिजे, खते आणि खनिजतेल, शेती उत्पन्ने, लोखंड आणि पोलाद, मिश्रवहन वाहतूक, इत्यादी. मोठी बंदरे आणि मोठ्या शहरांमध्ये मालवाहतूकी साठी आणि मालगाडीत माल चढवण्या उतरवण्यासाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग, गोदाम, फलाट आणि यार्डांची सोय असते.

भारतीय रेल्वे चा ७०% महसूल आणि बहुतांश नफा माल वाहतुकीतून उत्पन्न होतो आणि यातूनच‍ तोट्यात चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीला अनुदानित आर्थिक साहाय्य दिले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून, रेल्वेच्या तुलनेत ट्रक ने स्वस्त दरात होणाऱ्या माल वाहतुकीमुळे रेल्वेच्या मालवाहतूक उद्योगाला स्पर्धा जाणवू लागली आहे. म्हणून १९९० पासून, मध्यम क्षमतेच्या वाघिणीं हळू हळू बाद करून मोठ्या आणि आधुनिक वाघिणींच्या उपयोगावर भर द्यायला सुरुवात केली आहे. या नवीन वाघिणी‍चा उपयोग मुख्यत्वे कोळसा, सिमेंट, धान्ये, खनिजे या सारखा ठोक माल वाहून नेण्यासाठी उपयोग केला जातो.

या व्यतिरिक्त, वाहनांची देखील वाहतूक भारतीय रेल्वे वर केली जाते. अशा मालगाड्यांवर मालवाहू ट्रक चढवून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर पोहोचवले जातात. तिथून पुढे मालाच्या वाहतुकीचा शेवटचा टप्पा त्याच ट्रकने होतो. असे मालवाहू ट्रक चढवण्या उतरवण्यासाठी सुरूवातीच्या व गंतव्यस्थानकात खास फलाट बांधण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या मिश्रवहन पद्धतीने इंधनाची बचत, माल एका वाहनातून दुसऱ्यात चढवावा उतरावा लागत नाही म्हणून मनुष्यबळ व पैसा यांची बचत व या सगळ्या मुळे वेळेची बचत मोठ्या प्रमाणावर होते. नाशवंत माल वाहतुकीमध्ये याचा सर्वांत जास्त फायदा होतो. नाशवंत माल वाहून नेण्यासाठी वातानुकुलीत वाघिणी वापरल्या जातात. ग्रीन व्हॅन प्रकारच्या वाघिणी ताजी फळे व भाज्यांसाठी वापरल्या जातात. आता अतिमहत्त्वाचा माल पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वे वर कंटेनर राजधानी अर्थात कॉनराज गाड्याही आहेत. आता पर्यंत मालगाड्यांनी गाठलेला उच्चतम वेग, ४,७०० मेट्रिक टनासाठी ताशी १०० कि.मी. (६२ मैल) इतका नोंदवला गेला आहे.

महसूलात वाढ या दृष्टीने भारतीय रेल्वे हे सारे बदल करत आहे. याच उद्देशाने, अलीकडे खाजगी मालगाड्यांनाही परवानगी देण्यात आली आहे. आता नियमांची पूर्तता झाली तर खाजगी कंपन्या स्वतःच्या मालगाड्या भारतीय रेल्वेच्या मार्गांवर चालवू शकतात. मालवाहू गाड्या चालवण्यासाठी मुख्य शहरांना जोडणाऱ्या ११,००० कि.मी. लांबीच्या स्वतंत्र रेल्वे मार्गाच्या उभारणीला संमती मिळाली आहे. आत्ता पर्यंत नियमितपणे क्षमते पेक्षा जास्त माल भरला जात होता. २,२२,००० वाघिणींची क्षमता ११% वाढवून या बेकायदेशीर कृतीला कायद्याच्या चौकटी आणले आहे. उत्पादन शुल्कात व इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रेल्वे वाहतूक आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरू लागली आहे. प्रतिवर्तन कालात बचत केल्याने महसूलात २४% स्पष्ट वाढ दिसून आली आहे.

नावाजलेल्या गाड्या, स्थानके, मार्ग इ.संपादन करा

दार्जीलिंग हिमालयीन रेल्वे या नॅरो गेज, वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या रेल्वेला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळालेले आहे. ही रेल्वे जुन्या सिलिगुडी स्थानकावरून तर सध्या जलपाइगुडी स्थानकावरून सुटते. पश्चिम बंगाल मधून सुटणारी ही रेल्वे चहाच्या मळ्यांमधून प्रवास करून दार्जीलिंग ला पोहोचते. दार्जिलिंग हे २१३४ मी. उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. या रेल्वे मार्गावरील सर्वांत उंचीचे स्थानक घूम आहे.

दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतरांगेत चालणारी निलगिरी माउंटन रेल्वेसुद्धा जागतिक वारसा स्थानांमध्ये आहे.[५] ही भारतातील एकमेव रॅक रेल्वे आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनससुद्धा भारतीय रेल्वे द्वारा संचलित जागतिक वारसा स्थानांमध्ये आहे.

 
राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय इथे असणारे बेयर गॅरेट ६५९४ इंजिन

पॅलेस ऑन व्हील्स ही विशेष रेल्वेगाडी आहे. वाफेच्या इंजिनाने ओढली जाणारी ही गाडी राजस्थान सरकारने पर्यटन वाढवण्यासाठी सुरू केली. महाराष्ट्रातही डेक्कन ऑडिसी नावाची गाडी आहे. ही गाडी कोकणासह महाराष्ट्रातून फिरते. समझौता एक्सप्रेस ही भारतपाकिस्तानच्या दरम्यान धावणारी गाडी होती. इ.स. २००१मधील युद्धसदृश परिस्थितीनंतर ती रद्द करण्यात आली व २००४मध्ये परत सुरू झाली. थार एक्सप्रेस ही भारतातील मुनाबाओ व पाकिस्तानमधील खोखरापार शहरांना जोडणारी गाडी १९६५च्या भारत-पाक युद्धानंतर बंद करण्यात आली होती व २००४मध्ये परत सुरू झाली. कालका शिमला रेल्वे ही जगातील सगळ्यात अवघड चढणीच्या लोहमार्गांपैकी एक आहे.[६] लाइफलाईन एक्सप्रेस ही विशेष गाडी पोचण्यास कठीण अशा अनागरी वस्त्यांमध्ये स्वास्थ्यसेवा पुरवते. फिरता दवाखाना या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या गाडीचा एक डबा शल्यचिकित्सा खोलीच असतो. याशिवाय दोन डब्यांतून रुग्णांना राहण्याची सोय असते. एका स्थानकात दीड-दोन महिने थांबत ही गाडी देशभर प्रवास करीत राहते.

 
अहमदाबाद स्थानकात उभी असलेली शताब्दी एक्सप्रेस

फेरी क्वीन हे जगातील सगळ्यात जुने चालू स्थितीतील इंजिन आहे. खरगपूर रेल्वे स्थानक जगातील सगळ्यात जास्त लांबीचे रेल्वे स्थानक आहे. याची लांबी १,०७२ मीटर (३,५१७ फूट) आहे. दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे मार्गावरील घूम हे स्थानक वाफेच्या इंजिनाची सेवा असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचीवरील स्थानक आहे.[७] हिमसागर एक्सप्रेस या गाडीची धाव ३,७४५ कि.मी. आहे. भारतीय रेल्वेवरील सगळ्यात मोठा पल्ला ही गाडी ७४ तास ५५ मिनिटांत तोडते. त्रिवेन्द्रम राजधानी एक्सप्रेस वडोदरा आणि कोटा हे ५२८ कि.मी.चे अंतर साडे सहा तास न थांबता धावते. भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेतील सगळ्यात वेगवान गाडी असून याचा महत्तम वेग ताशी १४० कि.मी. आहे. भारतीय रेल्वेमध्ये ७,५६६ इंजिने, ३७,८४० प्रवासी डबे आणि २,२२,१४७ वाघिणी आहेत. ही इंजिने व डबे ६,८५३ स्थानकांतून फिरतात. भारतीय रेल्वेची ३०० यार्डे, २,३०० मालधक्के, ७०० दुरुस्ती केंद्रे आहेत. यांमधून १५,४०,००० कर्मचारी काम करतात.[८]

ईब (Ib) हे सगळ्यात छोटे नाव असलेले स्थानक आहे तर वेंकटनरसिंहराजुवारिपेटा हे सगळ्यात मोठ्या नावाचे स्थानक आहे.

भारतातील विचित्र नावाची काही रेल्वे स्टेशनेसंपादन करा

 • ईब (ओरिसा)
 • ओडानिया चाचा (Odhaniya Chacha) : राजस्थान
 • काला बकरा (KKL) : भोगोूर तालुका-जालंदर जिल्हा-पंजाब. उत्तर रेल्वे.
 • कुत्ता : कर्नाटक-केरळ सीमेवर
 • घूम : पश्चिम बंगाल, दार्जिलिंग क्षेत्रात, दार्जिलिंग-हिमालय रेल्वे.
 • दीवाना : फानिपतजवळ-हरियाणा.
 • नाना : राजस्थान.
 • पनौती (Panauti) : चित्रकूट जिल्हा-उत्तर प्रदेश.
 • पातालपानी PTP) : इंदूर-मध्य प्रदेश.
 • बाप : राजस्थान.
 • बिल्ली (BXLL) : ओब्रा-सोनभद्र-उत्तर प्रदेश.
 • बीबीनगर : तेलंगण.
 • भैसा : आग्ऱ्याजवळ.
 • सहेली : मध्य प्रदेश.
 • साली : जयपूर-राजस्थान.
 • सिंगापूर रोड जंक्शन : ओरिसा; कोरापुट-रायगडा मार्गावर. ईस्ट कोस्ट रेल्वे.
 • सुअर : रामपूर जिल्हा-उत्तर प्रदेश.

रेल्वे विभागीय रचनासंपादन करा

 
दिल्लीमधील भारतीय रेल्वेचे मुख्यालय

भारतीय रेल्वेची मालकी रेल्वे मंत्रालयाद्वारे भारत सरकारकडे आहे. भारतीय रेल्वे ही कंपनी नसून भारत सरकारचाच एक विभाग आहे. सुरेश प्रभू सध्याचे (इ.स. २०१५) रेल्वेमंत्री आहेत. याशिवाय आर. वेलूनारणभाई जे. राठवा हे दोघे उपमंत्री आहेत. भारतीय रेल्वेचा दैनंदिन कारभार भारतीय रेल्वे बोर्ड चालवते. यात सहा सदस्य व एक अध्यक्ष असतात.

भारतीय रेल्वेचे सोळा विभाग मुख्याधिकाऱ्यांच्या (जी.एम.) नियंत्रणाखाली असून ते भारतीय रेल्वे बोर्डाला जबाबदार असतात. प्रत्येक विभाग मंडलांमध्ये विभागलेले असतात व त्यांचे आधिपत्य मंडल अधिकाऱ्यांकडे (डी.आर.एम.) असते. मंडल अधिकारी प्रत्येक मंडलाच्या अभियांत्रिकी, विद्युत, दळणवळण, लेखा, वैयक्तिक, व्यापारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात. यांखाली प्रत्येस स्थानकाचे स्थानकप्रमुख (स्टेशन मास्टर) असतात जे त्यांच्या स्थानकांतून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची सुरक्षा व व्यवस्था बघतात. या सोळा विभागांशिवाय भारतीय रेल्वेचे सहा उत्पादन केंद्रे आहेत. त्यांचे मुख्याधिकारीही रेल्वे बोर्डाला जबाबदार असतात.

याव्यतिरिक्त रेल्वे विद्युतीकरण केंद्रिय संस्था (कोर), कोलकाता मेट्रो रेल्वे आणि उत्तर पूर्व सीमा रेल्वेचा बांधकाम विभागांनी हा त्यांचेत्यांचे मुख्याधिकारी असतात.

यांशिवाय इतर जाहीर क्षेत्रातील कंपन्याही रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणाखील आहेत. यांपैकी काही:

 1. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
 2. इंडियन रेल्वेझ केटरिंग ॲंड टुरिझम कॉर्पोरेशन
 3. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
 4. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन
 5. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन
 6. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
 7. राइट्स लिमिटेड
 8. इर्कॉन इंटरनॅशनल लिमिटेड
 9. रेल विकास निगम लिमिटेड
 10. कंटेनर कॉर्पोरेशन लिमिटेड

सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम्स ही रेल्वे बोर्डाच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र संस्था आहे. ही संस्था भारतीय रेल्वेसाठी संगणक प्रणालींचा विकास करते.

रेल्वे अंदाजपत्रक आणि पैसाअडकासंपादन करा

 
रेल्वेचे प्रवासी तिकिट

रेल्वेचे अंदाजपत्रक भारतातील रेल्वे वाहतूकीची निगा राखण्याची, अद्ययावतीकरणाची आणि विकासासाठीची कामे करण्याचा प्रस्ताव असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यात पुढील वर्षाचे आर्थिक प्रस्ताव असतात, जेणेकरून रेल्वेचे प्रवासी व मालवाहतूकीचे भाडे ठरवण्यात येते. या अंदाजपत्रकावर भारतीय संसद चर्चा करते व बदल सुचवते. हे अंदाजपत्रक लोकसभेत साध्या बहुमताने संमत होणे आवश्यक असते. राज्यसभेला यावर टिप्पणी करण्याचा हक्क असतो पण तो रेल्वे मंत्रालयावर बांधिल नसतो.

भारत सरकारच्या इतर विभागांप्रमाणे रेल्वेला ही लेखापरीक्षणाचे नियम लागू होतात. अंदाजपत्रकातील आवक-जावकीच्या आकड्यांवरून रेल्वेच्या भांडवली आणि महसुली खर्चाची तरतूद केली जाते. यातील महसुली खर्च रेल्वेची जबाबदारी असते तर भांडवली तुटवडा भारत सरकार भरून काढते किंवा रेल्वे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनकडून उसने घेतले जातात. सरकारने घातलेल्या भांडवलावर रेल्वे सरकारला लाभ देते.

१९२४च्या ऍकवर्थ समितीच्या सल्ल्यानुसार रेल्वेचे अंदाजपत्रक भारत सरकारच्या अंदाजपत्रकाच्या दोन दिवस आधी (साधारण फेब्रुवारी २६च्या सुमारास) संसदेत सादर केले जाते. रेल्वेच्या अंदाजपत्रकातील फायदा किंवा तुटवडा सरकारच्या अंदाजपत्रकात दाखवला जातो. २००६च्या अंदाजपत्रकानुसार भारतीय रेल्वेने ५४६ अब्ज रुपये (१२.३ अब्ज अमेरिकन डॉलर) कमावले. प्रवासी भाडे, इतर भाडे व अवांतर उत्पन्नात अनुक्रमे ७%, १९% आणि ५६% वाढ झाली. भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांत ७.५% वाढ झाली.[९] २००७च्या सुरुवातीस रेल्वेकडे ११२ अब्ज रुपये (२.५४ अब्ज अमेरिकन डॉलर) असणे अपेक्षित होते.[१०]

प्रवासी उत्पन्नाच्या अंदाजे २०% रक्कम वरच्या वर्गांतील (वातानुकूलित) प्रवाशांकडून मिळते. कमी किंमतीत विमानप्रवास शक्य झाला असल्यामुळे भारतीय रेल्वे आता नको असलेले मार्ग व गाड्या बंद करून या प्रवाशांना अधिक सुविधा पुरवण्याच्या मागे आहे.

रेल्वे अडचणी व अडसरसंपादन करा

 
अशा लेव्हल क्रॉसिंग वर अनेक अपघात घडतात

सुरुवातीपासूनच भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. याचे मुख्य कारण भांडवलाचा अभाव आहे. गेली काही वर्षे सोडता रेल्वेला भारत सरकारशिवाय कोणीही वित्तपुरवठा करू शकत नसे. याशिवाय अनेक अपघात (वर्षाला सुमारे ३००)[११] सुद्धा काही अंशी रेल्वेसमोरील अडचणींत भर घालतात. हळूहळू सुधारण्याऱ्या लोहमार्ग, संकेतप्रणालीं मुळे रुळांवरून घसरणे, गाड्यांची टक्कर, इ. अपघात कमी झाले असले तरी रेल्वे व इतर वाहनांतील अपघात व गाडीखाली माणसे चिरडली जाण्याचे अपघात वाढले आहेत. या अपघातांत मानवी चूक ८३% कारणीभूत असते.[१२] कोंकण रेल्वेवर दरडी कोसळून अनेक अपघात होतात.

शेकडो वर्षे जुने पूल आणि लोहमार्गांना नियमित देखभाल आणि निगा लागते. अजूनही काही ठिकाणी चालू असलेल्या ब्रिटिश राजवटीतील संदेशवहन, संकेत आणि सुरक्षाप्रणालीही रेल्वेसमोरील अडसर आहेत. अनेकदा अशा हाताने चालविल्या जाणाऱ्या संकेतप्रणालींमुळे अपघात होतात. वर्षागणिक रेल्वे गाड्यांच्या वेगात होणारी वाढ लक्षात घेता या प्रणाली अद्ययावत करणे अतिआवश्यक आहे पण त्यासाठी लागणाऱ्या प्रंचड प्रमाणातील भांडवलामुळे हे काम होत नाही आहे. काही अंशी यात सुधार होत आहे.[१३] पण भारतीय रेल्वेचा पसारा लक्षात घेता हे नगण्य आहे.

असे असताही गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने आपली आर्थिक स्थिती सुधारणे सुरू केले आहे. २००६ साली रेल्वेला आपला नफा ८३.७% वाढणे अपेक्षित होते.[१४] माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी याचे श्रेय आपल्याकडे घेतले आहे.[१५]

राजधानी एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेस या भारतीय रेल्वेवरील सर्वांत वेगवान व आरामदायक प्रवासी सेवा आहे, पण यांवरील वाहतुकीवर स्वस्त विमानप्रवासाचे सावट आहे. अनेकदा व्यावसायिक प्रवासी ताशी १००-११० कि.मी. वेगाने धावणाऱ्या या गाड्यांपेक्षा विमानप्रवास जास्त पसंत करतात.[१६] संपूर्ण रेल्वेचे अद्ययावतीकरण करून जागतिक दर्जाची सेवा पुरवण्यासाठी जवळजवळ ५०-१०० अब्ज अमेरिकन डॉलर लागतील असा एक अंदाज आहे.[१७][१८]

रेल्वे डब्यांतील अस्वच्छता टाळण्यासाठीचे उपाय करण्यात कुचराई हा रेल्वेसमोरील मोठा अडसर आहे. प्रवासी अजूनही आपला कचरा खिडकीबाहेर भिरकावतात लोहमार्गांवर जमणारा हा कचरा वर्षांनुवर्षे तसाच पडून असतो.

भारतीय सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवण्यासाठीच्या सहाव्या वेतनसमितीचा अहवाल २००८च्या अखेरीस अपेक्षित आहे. या समितीने ठरवून दिलेले वेतन भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना २००६च्या सुरुवातीपासून दिले जाईल. मागच्या समित्यांचे सल्ले निकष म्हणून घेतले असता ही वाढ कमीतकमी ५०% असेल व हे थकलेले वेतन दिल्यावर रेल्वेला प्रचंड मोठा आर्थिक फटका बसेल व गेल्या काही वर्षांची मेहनत वाया जाईल अशी भीती आहे.

भारतीय रेल्वेविषयी मजेदार माहितीसंपादन करा

 • देशातील १४,३०० रेल्वे गाड्यांद्वारे दररोज कापले जाणारे अंतर पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराच्या साडेतीन पट आहे.
 • देशातील पहिली रेल्वे – मुंबई आणि ठाणेदरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. भारतीय रेल्वेच्या मार्गाची एकूण लांबी – ६३,०२८ किमी.
 • एकूण कर्मचारी संख्या (रोजगार उपलब्ध) – १५.५ लाख दररोज १३० लाख प्रवासी आणि १३ लाख टन मालाची ने-आण; स्टेशनांची संख्या – सुमारे ७०००
 • जगातील सर्वात मोठा फलाट – खरगपूर – २७३३ फूट लांब. सोन नदी वरील नेहरू सेतू सर्वात मोठा रेल्वे पूल
 • स्वातंत्र्यपूर्व काळात देशात ४२ वेगवेगळ्या रेल्वे कंपन्या कार्यरत होत्या.
 • चित्तरंजन येथे विद्युतशक्तीवर चालणारी इंजिने निर्मितीचा कारखाना. चेन्नई, कपूरथळा आणि बंगळुरू येथे डबे बनवण्याचे कारखाने
 • नवी दिल्ली येथे १९७७ साली राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाची स्थापना. तिन्ही गेजच्या रेल्वे असणारे देशातील एकमेव स्टेशन – सिलिगुडी
 • पहिला रेल्वे पूल – दापुरी व्हायाडक्ट मुंबई-ठाणे मार्गावरील. पहिला बोगदा – पारसिक बोगदा
 • पहिला रेल्वे घाट रस्ता – थळ आणि बोर घाट. पहिली भूमिगत रेल्वे – कोलकाता मेट्रो
 • पहिली संगणकीकृत आरक्षण प्रणाली – नवी दिल्ली – १९८६ साली सुरुवात. पहिली विद्युत रेल्वे- ३ फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबई व्हीटी ते कुर्ला दरम्यान धावली.
 • प्रसाधनगृहांची सुविधा – १८९१ मध्ये प्रथम दर्जाच्या डब्यांत, १९०७ साली खालच्या वर्गाच्या डब्यांत
 • स्थानकाचे सर्वात लहान नाव – IB (ओरिसा). – सर्वात मोठ्या नावाचे स्थानक – श्री वेंकट नरसिंह राजू वरिपेटा (Venkatanarasimharajuvaripeta) (आंध्र प्रदेशात, तामिळनाडू राज्याच्या सरहद्दीवर)
 • सर्वात व्यस्त (बिझी) स्टेशन – लखनौ – रोज ६४ गाड्या. सर्वात कमी लांबीचा मार्ग – नागपूर ते अजनी – ३ किमी
 • दररोज चालणारी सर्वात लांब मार्गावरील रेल्वे – केरळ एक्स्प्रेस – ४२.५ तासांत ३०५४ किमी.
 • विनाथांबा सर्वात जास्त कापले जाणारे अंतर – त्रिवेंद्रम राजधानी – ६.५ तासांत ५२८ किमी
 • सर्वात लांब बोगदा – रत्नागिरीजवळ असलेला ६.५ किमीचा करबुडे बोगदा
 • सर्वात जुने जतन केलेले इंजिन – फेरी क्वीन १८५५ – अद्याप वापरता येण्याजोगे.
 • देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे – भोपाळ शताब्दी – ताशी १४० किमी.
 • सर्वाधिक थांबे असलेली रेल्वे – हावडा – अमृतसर एक्स्प्रेस – ११५ थांबे

हेसुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. a b Salient Features of Indian Railways. Figures as of 2002.
 2. ^ Indian Railways Plans 3 Trillion Rupees of Investment by 2012
 3. ^ Guinness Book of World Records-2005, pg 93
 4. ^ [१]
 5. ^ The Hindu newspaper online
 6. ^ Article in The Tribune
 7. ^ भारतीय रेल्वे संकेतस्थळ
 8. ^ Indian Railways stats
 9. ^ Times of India
 10. ^ रेल्वे अंदाजपत्रक २००६-०७.
 11. ^ Rail Budget 2005
 12. ^ फ्रंटलाईन मॅगेझिन ऑनलाईन, अमूल्य गोपालक्रिश्नन
 13. ^ भारतीय रेल्वेवरील संकेतप्रणाली, भारतीय रेल्वेवरील संकेतप्रणाली
 14. ^ [२]
 15. ^ [३]
 16. ^ [४]
 17. ^ [५]
 18. ^ भारतीय रेल्वे मध्ये PNR महत्त्व [६]

बाह्य दुवेसंपादन करा

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ७, २०१२ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जानेवारी ११, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जून १६, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जुलै २९, २०१२ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर २७, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

Part 2

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर २७, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती ऑक्टोबर २७, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती ऑक्टोबर २७, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जून १९, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)