१५९०९/१५९१० अवध आसाम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी आसाम राज्याच्या दिब्रुगढ शहराला राजस्थानमधील लालगढ ह्या गावासोबत जोडते. उत्तर पूर्व सीमा रेल्वे विभागाद्वारे चालवली जाणारी ही गाडी रोज धावते व ३,०३७ किमी अंतर ६७ तास व १५ मिनिटात पार करते.

आजच्या घडीला अवध आसाम एक्सप्रेस भारतामधील सर्वाधिक अंतर कापणारी दैनंदिन सेवा आहे. ही गाडी आसाम, नागालॅंड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, पंजाब, आणि राजस्थान या ९ राज्यांमधून धावते.[१] उत्तर प्रदेशाच्या अवध भागातून ही गाडी धावत असल्यामुळे तिला अवध आसाम एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे.

या ट्रेनला १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ११ शयन यान, ४ सामान्य अनारक्षित, २ आसन व सामान व्यवस्था आणि १ खानपान व्यवस्था तसेच वाढीव घनतेच्या माल वाहतूक व्यवस्थेसाठी ४ बोगी अश्या एकूण २६ बोगी असतात. भारतीय रेल्वे ग्राहक सेवा नजरेसमोर ठेवून स्वतःच्या अधिकारात प्रवाश्यांचे व इतर मागणी नुसार त्या त्या वेळी बोगी वाढ करते.

ही गाडी दिब्रुगढ स्थानक आणि लालगढ स्थानकांमधील ३,०७३ किमी अंतरात एकूण ८७ थांबे घेते.[२] या ट्रेनचा सरासरी वेग ताशी ५५ किमी पेक्षा कमी असल्याने रेल्वे नियमाप्रमाणे प्रवाशी भाड्यावर सेवा कर लागत नाहीत.

मार्ग

संपादन

ही गाडी दिब्रुगढ, न्यू तिनसुकिया, दिमापूर, लुमडिंग जंक्शन, गुवाहाटी रेल्वे स्थानक, न्यू बॉंगाइगांव, न्यू अलिपूरद्वार, न्यू कूच बिहार, न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक, किशनगंज, कटिहार, बरौनी, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, छपरा, गोरखपूर रेल्वे स्थानक, गोंडा, लखनौ चारबाग रेल्वे स्थानक, बरेली, मोरादाबाद, जुनी दिल्ली, रोहतक, भटिंडा, सूरतगढलालगढ ह्या मार्गावरून धावते.[३]

इंजिन

संपादन

या गाडीच्या बव्हंश मार्गाचे विद्युतीकरण अद्याप झालेले नसल्याने ही ट्रेन सध्या सिलिगुडी येथील डब्ल्यूडीपी ४बी प्रकारच्या इंजिनाच्या मदतीने धावते.

संदर्भ

संपादन
  1. ^ "अवध आसाम एक्सप्रेस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "अवध आसाम एक्सप्रेस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "अवध आसाम एक्सप्रेस १५९१० मार्ग" (इंग्लिश भाषेत). 2016-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-09 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)