राजस्थान

भारतातील एक राज्य.

राजस्थान (जुने नाव राजपुताना) हे पश्चिम भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे व लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. हिंदीराजस्थानी या येथील प्रमुख बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत. राजस्थानची साक्षरता ६७.०६ टक्के एवढी आहे.

  ?राजस्थान

भारत
—  राज्य  —
Map

२६° ३४′ २२″ N, ७३° ५०′ २०″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३,४२,२३६ चौ. किमी
राजधानी जयपुर
मोठे शहर जयपुर
जिल्हे ३३
लोकसंख्या
घनता
६,८६,२१,०१२ (८वी) (२००१)
• २०१/किमी
भाषा हिंदी, राजस्थानी
गुजराती
राज्यपाल कलराज मिश्रा
मुख्यमंत्री भजन लाल शर्मा
उपमुख्यमंत्री दीया कुमारी,
प्रेमचंद बैरवा
स्थापित १ नोव्हेंबर, १९६०
विधानसभा (जागा) राजस्थान विधानसभा (२००)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-RJ
संकेतस्थळ: राजस्थान सरकारचे संकेतस्थळ
राजस्थान चिन्ह
राजस्थान चिन्ह

उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे येथे शेतीचे प्रमाण कमी आहे. ज्वारी, मका, हरबरागहू ही येथील प्रमुख धान्य पिके, तर ऊस, तेलतंबाखू ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत. या भागातून बनास, लुनी, घग्गरचंबळ या नद्या वाहतात. राजस्थानचे मारवाडमेवाड असे दोन विभाग आहेत.

इतिहास

संपादन
 
महाराणा प्रताप
 
मेहराणगढचा किल्ला
 
हवा महल जयपूर

राजस्थान हे राज्य प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. पुरातन सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झाली होती. सिंधू संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया समजली जाते. या संस्कृतीतील काही महत्त्वाची शहरे राजस्थानमध्ये होती. सिंधू नदीची लुप्त झालेली प्रमुख उपनदी सरस्वती राजस्थानच्या मधोमध वाहत होती. आजही अनेक पुरातत्त्वीय खुणा राजस्थानच्या या भागात सापडतात.[] डांगी, बिश्नोई, रजपूत, यादव, जाट, भील, गुर्जर, मीना व अनेक आदिवासी समूह हे राजस्थानमधील निवासी आहेत. त्यांचा आजच्या राजस्थानच्या जडणघडणीत मोठा सहभाग आहे. राजस्थानचा इतिहास हा राजेरजवाडे, लढाया, वीरस्त्रिया, धार्मिक संत महात्मे यांनी अजरामर केला आहे.[]

राजस्थानच्या नावातच राजांची भूमी असा अर्थ आहे. आजच्या राजस्थानात इंग्रजकालीन राजपुतानाचा मोठा भाग येतो. यात रजपूत राज्ये, दोन जाट संस्थाने व मुस्लिम संस्थाने येतात. जोधपूर, बिकानेर, उदयपूरजयपूर ही प्रमुख रजपूत राज्ये होती. भरतपूर व धोलपूर ही जाटांची संस्थाने होती. टोंक हे मुस्लिम राज्यकर्त्यांचे संस्थान होते. राजपुतांचा इतिहास हा इस्लामी आक्रमणाला प्रखर विरोधक म्हणून नावाजलेला आहे. राजपुतांचा उदय साधारणपणे ६ व्या शतकात गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर झाला. यास प्रतिहाऱ्यांचे राज्य म्हणून ओळखले जाई. हे प्रतिहाऱ्यांचे राज्य उत्तर गुजरात-सौराष्ट्रापासून ते दक्षिण पंजाबपर्यंत होते; अरवली पर्वतापासून ते सिंधू नदीपर्यंत या राज्याचा पसारा होता. भारतावरील पहिले इस्लामी आक्रमण ८ व्या शतकात झाले, ते प्रतिहारी रजपुतांनी परतवून लावले. त्याला राजस्थानची लढाई असे म्हणतात. या लढाईत प्रतिहाऱ्यांनी इस्लामी आक्रमकांचा इतका जबरदस्त पराभव केला की त्यामुळे इस्लामचा प्रभाव पूर्वेकडे इराणपुरताच मर्यादित राहिला. पुढील ५०० वर्षे राजपुतांनी अनेक इस्लामी आक्रमणांचा सामना केला. दिल्लीचा शेवटचा प्रमुख हिंदू राजा पृथ्वीराज चौहान हा होता.

अल्लाउद्दीन खिलजीने मेवाडवर आक्रमण केल्यानंतरची रजपूत स्त्रियांनी केलेला जोहार रजपूत शौर्य व त्यागाची सीमा दर्शवतात. राजपुतांनी मोगल आक्रमणालाही जरी प्रखर विरोध केला, तरी अंतर्गत दुही आणि राजकारण व मुत्सद्देगिरीचा अभाव यामुळे मोगलांनी नंतर रजपुतांचीच मदत घेऊन संपूर्ण उत्तर भारतावर पकड मिळवण्यात यश प्राप्त केले. महाराणा प्रताप या चित्तोडगडच्या राज्यकर्त्याने मोगाल आक्रमणाला प्रखर विरोध केला. महाराणा प्रतापचे आजही शौर्याचे प्रतीक म्हणून जनमानसात स्थान आहे.मोगल सम्राट अकबर व महाराणा प्रताप यांच्यात झालेली हळदीघाटीच्या लढाईत १०,००० राजपुतांनी १ लाखाहून अधिक असलेल्या मोगल सेनेचा मोठ्या धैर्याने सामना केला. मोगल राजवटीत, बहुतेक रजपूत राजांनी मोगल साम्राज्याचे मांडलिकत्व पत्करले होते. जयपूरच्या राजपुतांनी तर या साम्राज्याचे विस्तारकर्तेच म्हणून मोठी कामगिरी बजावली. त्या काळात रजपूत राजांनी राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती आणली व त्याचा उपयोग महाले व किल्ले उभारण्यात केला. त्यामुळेच राजस्थानात चांगल्या स्थितीतील महालांची संख्या जास्त आहे. मोगाल साम्राज्याच्या उतरणीनंतर अनेक संस्थानानी स्वतंत्रपणे कारभारास सुरुवात केली परंतु त्यांना मराठ्यांच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. शिंदे व होळकरांनी अनेक रजपूत संस्थाने मांडलिक बनवली. ब्रिटिशांच्या आगमनामध्ये अनेक रजपूत संस्थांनानी ब्रिटिशांशी समझोत्याचे राजकारण केले. काही वेळा आपल्या विरोधक राज्यास शह देण्यात, तर काही वेळा त्यांनी आपली लष्करी ताकद वाढवण्यात ब्रिटिशांची मदत घेतली. यामुळे ब्रिटिशांना त्यांचे राज्य भारतभर पसरण्यास चांगलेच फावले. ब्रिटिश राज्यकाळात रजपूत राज्ये स्वतंत्र राहिली.

भूगोल

संपादन
 
अरवली पर्वतरांगेतील जैव विविधता.
 
थरचे वाळवंट
 
जयपूर परिसरातील टेकड्या

राजस्थान हे भौगोलिक दृष्ट्या अतिशय वैविध्यपूर्ण आहे. थरचे वाळवंटअरवली पर्वत हे राजस्थानच्या भूभागाचे वैशिष्ट्य. अरवली पर्वत राज्याच्या अाग्नेय ते नैर्ऋत्य दिशांना पसरलेला आहे व त्याची एकूण लांबी ८५० किमी इतकी आहे. अबू डोंगरावर गुरू शिखर हे अरवली पर्वताचे राजस्थानमधील सर्वात उंच शिखर आहे. अरवलीने राजस्थानचे पूर्व राजस्थान व पश्चिम राजस्थान असे दोन भाग केलेले आहेत.

पूर्व राजस्थानात व पश्चिम राजस्थानात हवामानाचा मोठा फरक असून पश्चिम राजस्थान हा अतिशय कोरडा रेताळ प्रांत आहे. पश्चिम भाग हा प्रामुख्याने थर वाळवंटात मोडतो. थर वाळवंट पाकिस्तानात देखील शेकडो किमी पर्यंत आहे. अरवलीपर्वत मोसमी वाऱ्यांचे विभाजन न करता त्यांना फक्त दिशा देतो. मोसमी वाऱ्याची दिशा अरवलीला समांतर असल्याने हे वारे अरवली ओलांडण्याचे कष्ट घेत नाहीत. परिणामी पश्चिम भागात कमी पाऊस पडल्याने या भागात सातत्याने शुष्क हवामान राहते. त्यामुळे थर वाळवंटात मानवी वस्ती अतिशय तुरळक आहे. बिकानेर हे सर्वाधिक लोकवस्तीचे शहर आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडे कमी कमी होत जाते. सरासरी फक्त ४० सेमी इतका वार्षिक पाऊस या भागात पडतो. तापमान वर्षभर उच्च असते. उन्हाळ्यात तापमान ४५ अंशापेक्षाही जास्त जाते, तर हिवाळ्यात तापमान शून्याच्याही खाली जाते. गंगानगर हे भारतातील सर्वाधिक उष्ण शहर उत्तर राजस्थानात आहे.

राजस्थानातील गोंदवाडमारवाड या प्रांतांत प्रामुख्याने शुष्क काटेरी वने आहेत. जोधपूर शहर याच प्रांतात मोडत असतात. लुनी नदी ही या भागातील प्रमुख नदी असून अरवलीच्या पश्चिम उतारावरून कच्छच्या दिशेने वाहते. ही नदी खारी नदी असून फक्त बारमेर जिल्ह्यातील बालाटोरा इथवरच गोडी आहे. हरियाणात उगम पावणारी घग्गर नदी ही हरियाणातील शुष्क भागातून येते व थरच्या वाळवंटात लुप्त पावते. ही नदी प्राचीन सरस्वती नदी असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

अरवलीच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण उत्तर भारताच्या सरासरी इतके असल्याने हा भाग बऱ्यापैकी सुपीक व सिंचित आहे. ह्या भागात काठेवाडी प्रकारची शुष्क वने आढळतात. ह्या प्रकारच्या वनांमध्ये अतिशय वैशिट्यपूर्ण जैववैविविधता आढळते. तसेच या भागातील जनमानसांत असलेल्या पशुपक्ष्यांविषयी असलेल्या आस्थेमुळे वन्यजीवन सहज पहावयास मिळते. मेवाड प्रांतात राजस्थानचे सर्वाधिक जंगल आहे. येथे केवळ शुष्क जंगल नसून मध्य भारतात आढळणाऱ्या मोठ्या पानांची सागाची वनेदेखील या भागात आढळतात. राजस्थानचा सर्वात पूर्वेकडचा भाग मेवात म्हणून ओळखला जातो. हा भाग उत्तरप्रदेश व हरियाणा या राज्यांच्या सीमेलगत आहे. बिनासचंबळ ह्या गंगेच्या प्रसिद्ध उपनद्या या भागातून वाहतात. चंबळचे खोरे हे एक भौगोलिक आश्चर्य मानले जाते.

पर्यटन

संपादन
चित्र:UmaidBhawan Exterior 1.jpg
जोधपूरचे उम्मेद भवन पॅलेस.
 
राणकपूरचे जैन मंदिर.

भौगोलिक विविधता, रोमांचक इतिहास व ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य व विविधरंगी संस्कृती यामुळे राजस्थान पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षिक करते. पर्यटकांमध्ये देशी तसेच विदेशी पर्यटकांचा मोठा समावेश असतो. भारतात येणाऱ्या दर तीन विदेशी पर्यटकांपैकी एक पर्यटक हा राजस्थानात जाण्यास उत्सुक असतो. जयपूर, उदयपूर, जोधपूर, जेसलमेर, अजमेर, बिकानेर ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहे. जयपूर Archived 2020-10-09 at the Wayback Machine. हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडते शहर आहे. जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगांमुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांमध्ये जंतर-मंतर, हवा महल, नियोजित जयपूर शहर व अंबरचा किल्ला ही प्रसिद्ध स्थळे आहेत. उदयपूर येथील तळ्यातील महाल जगप्रसिद्ध आहे. उदयपूर शहराजवळील चित्तोडगडचा किल्ला पहाण्याजोगा आहे. हा किल्ला क्षेत्रफळाने अशियातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो.

जोधपूर शहरातील मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेस ही पहाण्याजोगी स्थळे आहेत. जोधपूर जवळील मंढोर येथे पूर्व मध्ययुगीन देवळे आहेत. जेसलमेर हे वाळवंटातील एक ऐतिहासिक शहर आहे. जेसलमेरचा किल्ला, थरचे वाळवंट व येथील मध्ययुगीन हवेल्या पर्यटकांना आकर्षित करतात. राजस्थानमध्ये जैन धर्मीयांची अनेक भक्तिस्थळे आहेत. राणकपूर, भिलवाडा, जेसलमेर, जोधपूर, माउंट अबू येथील दिलवाडा मंदिर तसेच सिरोही जिल्ह्यातील अनेक मंदिरांना दरवर्षी हजारो पार्यटक भेट देतात. अजमेर येथील दर्ग्यास भेट देण्यास केवळ मुसलमानच नव्हे तर हिंदू धर्मीयही भेट देतात. तसेच अजमेरजवळील पुष्कर या ठिकाणचा पुष्कर मेळा पाहण्यास देश-विदेशातून अनेक लोक येतात.पुष्करमधील ब्रह्मामंदिर हे जगप्रसिद्ध आहे. राजस्थानमध्ये जैववैविध्य तर आहेच व स्थानिकांच्या सहकार्याने अजूनही वन्यजीवन भयमुक्त आहे. रणथंबोर, सारिस्का, चित्तोडगड, ही अरवलीच्या सानिध्यातील अभयारण्यांना भेट देण्यास पर्यटक उत्सुक असतात. भरतपूर येथील राष्ट्रीय उद्यान हे जागतिक दर्जाचे पक्षी अभयारण्य आहे.

जिल्हे

संपादन

यावरील विस्तृत लेख पहा - राजस्थानमधील जिल्हे

राजस्थान राज्यात ३३ जिल्हे आहेत जे सात विभागात विभागले आहेत

जैववैविध्य

संपादन
 
चिंकारा
 
माळढोक

राजस्थानात शुष्क हवामानाचे प्रमाण जास्त आहे तसेच दाट जंगलाचे कव्हरही अतिशय कमी आहे तरीपण राजस्थानमध्ये जैववैविध्य जबरदस्त आहे. जैववैविध्य हे प्रामुख्याने भौगोलिक वैविध्यतेमुळे आहे. कोरडे वाळवंट, शुष्क काटेरी जंगल, गवताळ वाखर, शुष्क जंगल अशी विविध प्रकारची वने आढळतात तसेच राजस्थानमध्ये सामान्य जन साधारणपणे वने व वन्यजीवांच्या बद्द्ल आस्था आहे. राजस्थानमध्ये शुष्क वातावरण असल्याने नैसर्गिक साधन संपत्ती कमी आहे त्यामुळेच येथे निसर्ग संवर्धनाला जास्त महत्त्व देतात.

राजस्थानमध्ये प्रामुख्याने शुष्क वातावरणाला सरावणारे वन्यजीव दिसून येतात. त्यात चिंकारा, काळवीट, रानगाढव व भारतीय लांडगा हे प्राणी आहेत. माळढोक हा राजस्थानचा राज्यपक्षी असून अतिशय दुर्मिळ आहे. रानगाढव हे फक्त राजस्थानच्या वाळवंटी भागात व कच्छच्या रणात दिसून येते. जैसलमेर मधील मरु राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आकाराने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे व वाळवंटी हॅबिटॅटचे एक उत्कृष्ट उदाहरण. इतर प्राण्यांमध्ये वाळवंटी मांजर, वाळवंटी खोकड, हे प्राणी येथे आढळतात. या राष्ट्रीय उद्यानात लाखो वर्षांपूर्वीच्या वृक्षांचे फॉसिल्स आहेत जे एक पर्यटन आकर्षण बनले आहे.

अरवलीच्या सानिध्यात अनेक अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प म्हणून गणले जाते. सारिस्का हे अजून एक व्याघ्रप्रकल्प अल्वार जिल्ह्यात आहे. अलिकडेच चोरीच्या शिकरींमुळे सारिस्का प्रकाशात आले असून तेथील वाघ लुप्त झाल्यची भीती आहे.

ताल छप्पर अभयराण हे सुजनगढ जवळील अभयारण्य काळवीटांसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानमधील सर्वात प्रसिद्ध अभयारण्य हे भरतपूर मधील केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान हे असून हिवाळ्यातील महिन्यात येथे येणारे स्थलांतरित पक्षी हे प्रमुख आकर्षण आहे व जागतिक वारसा स्थान म्हणूण दर्जा मिळालेला आहे.उंट हा रोजच्या जीवनात वापरला जाणारा प्राणी आहे.

अर्थतंत्र

संपादन

राजस्थानची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीआधारित आहे. गहू हे प्रमुख पीक घेतले जाते. तेल बीयांच्या व वनस्पती तेल उत्पादनात राजस्थानचा भारतात पहिला क्रमांक आहे. तसेच कापूस व तंबाखू ही राजस्थानम्धील आर्थिक पिके आहे. देशातील अफूचे सर्वाधिक उत्पादन व वापर राजस्थानमध्येच होतो. वर्षातून दोन पिके घेतली जातात. पाण्याचा स्रोत प्रामुख्याने बंधारे व विहीरींमधून येतो. राज्यातील वायव्य प्रांतात इंदिरा गांधी कॅनाल ने पाण्याचा पुरवठा केलेला आहे.

राजस्थानची मुख्य औद्योगिकीकरण खाणकामावर व कृषीआधारित आहे. पॉलिएस्टर उत्पादनात राजस्थानचा देशात दुसरा क्रंमांक लागतो. भीलवाडा जिल्हयात कापड व पॉलिएस्टरचे उद्योग आहेत. कोटा परिसरात राजस्थानमधील अवजड कारखाने असून अनेक मोठ्या केमिकल कंपन्यांचे कारखाने आहेत. पश्चिम राजस्थानात पाण्याअभावी औद्योगिक क्षेत्र विकसित झालेले नाही परंतु अनेक प्रसिद्ध खाणी या भागात आहेत्. मखराणा येथील संगमरवराची खाण जगप्रसिद्ध आहे. येथील खाणीतूनच ताजमहालचा संगमरवर वापरला गेल्याची नोंद आहे. सिमेंट उप्तादनातही राजस्थानचा देशात दुसरा क्रमांक आहे. तसेच इतर अनेक महत्त्वपूर्ण धातूंची खाणी आहेत. सांभर सरोवर येथील मीठाची खाण तसेच झिंक तांब्याचीही अनेक ठिकाणी खाणी राजस्थानात आहे. राजस्थानातील चित्तर पत्थर हा आजकाल भारतात सर्वत्र ठिकाणी घर बांधकामाला वापरला जातो.

अलिकडेच राजस्थानने माहिती तंत्रज्ञान उद्योगातही भरारी घेतली असून जयपूरमध्ये उत्तर भारतातील सर्वात मोठे आय.टी पार्क विकसित झाले आहे.

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "404ERROR.CFM Articles". www.amazines.com.
  2. ^ Thakur Deshraj, Jat Itihas (Hindi), Maharaja Suraj Mal Smarak Shiksha Sansthan, Delhi, 1934, 2nd edition 1992 pp 587-588.