हडप्पा संस्कृती

प्राचीन भारतीय संस्कृती
(सिंधू संस्कृती या पानावरून पुनर्निर्देशित)

हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्रयुगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२०च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्त्वज्ञांनी येथे उत्खनन केले.[] हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणाऱ्या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते. हडप्पापूर्व काळातील 'रावी' अथवा 'हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पंजाब, पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळांच्या उत्खननात मिळाले आहेत. []

हडप्पा सांस्कृतिकालीन शिल्पकला

उत्खननात हडप्पामोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात, कालीबंगन, धोलावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद कुंथासी गिलुंड ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले हडप्पा संस्कृती ही जगाला लाभलेली मोठी देणगी आहे या संस्कृतीच्या उत्खननामुळे जगाला भारतीय संस्कृतीचा योग्य तो परिचय झाला.

नगररचना

संपादन

नगररचना हे सिंधू संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, प्रचंड इमारती, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या प्रमाणे हडप्पामध्ये भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे होती असे काही पुरावे मिळाले आहेत. मोहेंजोदडो व हडप्पा येथे उत्खनन झालेले आहे. त्यावरून या शहरांत निश्चित नियोजन झालेले आहे असे दिसते. मोहेंजोदडो या ठिकाणी जे रस्ते आहेत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे सरळ रेषेत जातात आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे हे रस्ते रुंदीलाही खूप आहेत. नगरातील मुख्य रस्ता हा ३३ फूट रुंद आहे आणि हा रस्ता नगराच्या बरोबर मध्यातून उत्तर दक्षिण जातो. या रस्त्याचा उपयोग गाड्या जाण्यासाठी होत असावा आणि त्यावरून एकाचवेळी एकापेक्षा जास्त गाड्या जात असाव्यात. रस्ते व गल्यांच्या दोन्ही बाजूला घरे होती. या घरांच्या भिंती अद्यापही भग्नावस्थेत आहेत. या भिंती २५ फूट उंचीच्या होत्या. शहरातील सांडपाणी नाल्याद्वारे बाहेर काढण्याची उत्तम सोय होती. सिंधू संस्कृतीच्या नगरांत पाण्याच्या विहिरी अस्तित्वात होत्या. या रुंदीला २ ते ७ फुटापर्यंत होत्या. या विहिरी खाजगी आणि सार्वजनिक स्वरूपाच्या होत्या.

आर्थिक व्यवस्था

संपादन

व्यापार: सुबक मातीची भांडी,सोने, चांदी,तांबे आणि कांसे या धातूंच्या वस्तू,सौंदर्यपूर्ण वस्तू,मूर्ती इत्यादी. उत्पादनाच्या सोईसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तींचा स्वतंत्र विभाग. अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार. शासकीय यंत्रणेच्या साहाय्याने व्यापारावर नियंत्रण असे.

हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती. शहराच्या लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता. नगर बांधणीसाठीच्या विटा ४:२:१(लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत.[]

गृहरचना

संपादन

हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात २० ते ३० घरे असत. ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती. हे घरे पक्‍क्‍या भाजलेल्या विटांनी बांधलेली आहेत. समकालीन इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये पक्‍क्‍या भाजलेल्या विटांचा वापर घरे बांधण्यासाठी केलेला आढळत नाही हे विशेष. सर्व घरे उंच चौथऱ्यावर बांधलेली आहेत प्रत्येक घरामध्ये स्नानगृह(बाथरूम) असे. काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत. घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते तशी ओसरी आहे, घरासमोर अंगण असे.[] घरे एक किंवा दोन मजली असत. फारच क्वचित याहून अधिक मजले असत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी भिंतीतून पायऱ्या किंवा जिना केलेला आहे मोहेंजोदडो व हडप्पा या दोन्ही शहरात दगडांचे बांधकाम आढळले नाही. कोणत्याही घराच्या रस्त्याच्या बाजूला खिडक्या व प्रवेशद्वारे नाहीत. रस्त्यावरील धुळीपासून व चोराचिलटांपासून बचाव व्हावा, हा हेतू त्यामागे दिसतो. प्रत्येक घर शेजारच्या घरापासून अलग असे. रस्त्याच्या बाजूला मोरी व तिला लागून स्नानगृह बांधीत. मोरी व स्नानगृहात कोठे पाणी मुरणार नाही याची काळजी घेत. [] आणि पाणी बदलण्याची सोय केेलेेली होती. येथील उत्खननात सापडलेली घरबांधणी ही पक्या विटांची आहे. या संस्कृतीतील मोहेंजोदडो येथील लहान घरांचा आकार २६×३० असा होता. पण अशी काही घरे होती ती या घरांच्या आकाराच्या दुप्पट होती. बहुदा ही घरे दुमजली असत. वरच्या मजल्यावर जाणाऱ्या शिड्या या बहुदा दगडी किंवा लाकडाच्या असत. या संस्कृतीत चुलीही देखील सापडल्या आहेत. अशा प्रकारच्या आजही आढळतात. स्नानघर हे प्रत्येक घराचे मुख्य अंग होते. या स्नानगृहात पाण्याच्या साठवणीसाठी उपाययोजना केल्या जात असत. याच्यासाठी मातीचे रांजण व माठ वापरला जाई. स्नागृहाजवळच शौचालय असे. त्याचेही अवशेष मिळाले आहेत. स्नानगृहातील जमीन ही पक्क्या विटांनी बनवलेली असे.[]

संरक्षणव्यवस्था

संपादन

हडप्पाकालीन नगरांना संरक्षक तटबंदी असे. तटबंदी रुंद असून तिचे बांधकाम पक्क्या विटांचे असे. तटबंदीला बुरूज होते. यावरून हडप्पा संस्कृतीने नगराच्या संरक्षणाकडे लक्ष दिल्याचे दिसते. या हडप्पा संस्कृतीत नगरांच्या चारी बाजूने तट व खंदक असल्याची ग्वाही उत्खननात सापडलेले भग्नावशेष देतात. सुरक्षेच्या दृष्टीने या नगरांच्या स्वरूप किल्ल्याप्रमाणे असावे. नगरांच्या क्षेत्रफळही बऱ्याच प्रमाणात होते आणि साहजिकच नगरांच्या बाहे अनेक लहान खेडी असली पाहिजेत. या उत्खननात अनेक ठिकाणी दुकानांचेही अवशेष उपलब्ध झाले आहेत .रस्ते व गल्यांच्या दोन्ही बाजूला अस्तित्वात असलेल्या इमारतींचा वापर व्यापारीवर्ग गोदाम किंवा कोठारे म्हणून करित असावेत. []

रस्ते

संपादन

शहराच्या प्रभागाकडून जाणारे रस्ते मुख्य रस्त्यांना जोडलेले असत. रस्ते पुरेसे रुंद असून ते एकमेकांना काटकोनांत छेदणारे होते. रस्त्यांच्या कडेला सापडलेल्या लाकडांच्या अवशेषांवरून रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय असावी असे दिसते.

सांडपाण्याची व्यवस्था

संपादन

हडप्पा संस्कृतीत सांडपाणी व पावसाचे पाणी गावाबाहेर वाहून नेण्यासाठी एक मीटर खोल भुयारी गटारांची व्यवस्था होती. ही गटारे दगड व पक्क्या विटांनी बांधलेली होती. कोणत्याही समकालीन संस्कृतीमध्ये न आढळणारी सांडपाण्याची व्यवस्था हडप्पा संस्कृतीत पाहावयास मिळते.

महास्नानगृह व जहाजाची गोदी

संपादन
 
मोहनजोदडो येथे उत्खननात सापडलेले महास्नानगृह

हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती. मोहनजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. स्नानगृहाचे वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती. यावरून हडप्पा संस्कृतीतील लोक आरोग्याबाबत किती दक्ष होते हे दिसून येते.

लोथल येथील उत्खननामध्ये एका प्रचंड गोदीचे अवशेष सापडले. या गोदीची लांबी २७० मीटर तर रुंदी ३७ मीटर आहे. या गोदीवरून जहाजबांधणी, व्यापार, व्यापारीमार्ग यांची माहिती या संस्कृतीमधील लोकांना होती असे दिसून येते. येथे सापडलेल्या एका मुद्रेवर जहाजाचे चित्र कोरले आहे. तसेच लोथल येथे पक्क्या विटांनी बांधलेली धान्य कोठारे सापडली आहेत. यावरून कृषी व व्यापार क्षेत्रातील त्यांची प्रगती लक्षात येते.

समाजरचना

संपादन

हडप्पा संस्कृतीत कुटुंबसंस्था खूप महत्वाची होती. नगररचनेच्या अवशेषांवरून समाजात राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते. नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झालेली असल्याने शेती हा समाज जीवनाचा कणा होता.

वेशभूषा-केशभूषा

संपादन

हडप्पा संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांवर मिळालेले कापडाचे ठसे, मृण्मयमूर्तीवर दाखवलेले वस्त्र, उत्खननात मिळालेल्या विविध आकारांच्या सुया यावरून लोकांना वेशभूषेचे चांगले ज्ञान असल्याचे दिसते. तसेच तत्कालीन मूर्तींवरून केशभूषेची माहिती मिळते. पुरुष दाढी कोरत, मधोमध भांग पाडत तर स्त्रिया विविध प्रकारची केशरचना करत असत. पुरुष डाव्या खांद्यावरून शाल पांघरीत व उजवा हात मोकळा ठेवत. कमरेच्या खाली ते धोतर घालत. स्त्रिया कमरेपासून गुडघ्यापर्यंत घागरा व वरती ओढणी सारखे एखादे वस्त्र घालत.

सौंदर्यप्रसाधने

संपादन

हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननात एक शृंगारपेटी मिळाली. यामध्ये काशाचे आरसे, हस्तिदंती कंगवे, केसासाठी आकडे, पिना, ओठभुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगांच्या कांड्या मिळाल्या आहेत. हडप्पाकालीन लोकांना सौंदर्यप्रसाधनांप्रमाणेच अलंकाराची आवड होती. उत्खननामध्ये मण्यांचे व सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कमरपट्टा इत्यादी अलंकार मिळाले आहेत तसेच नर्तकीचा ब्राँझचा पुतळा मिळाला आहे. तिच्याही हातात बांगड्या व गळ्यात हार आहे.

करमणुकीची साधने

संपादन

हडप्पाकालीन लोकांची सोंगट्या, फासे ही करमणुकीची साधने होती. नृत्य, गायन, शिकार व प्राण्यांच्या झुंजी इत्यादींमधून करमणूक केली जाई. लहान मुलांसाठी भाजक्या मातीची सुबक खेळणी बनवली जात. डोक्याची पुढेमागे हालचाल करू शकणारा बैल, बैलगाडी, पक्ष्यांच्या आकाराच्या शिट्ट्या, खुळखुळे इत्यादींचा यात समावेश होतो.

धर्मकल्पना

संपादन

हडप्पा संस्कृतीत उत्खननात सापडलेल्या विविध मुद्रा, मूर्ती, अग्निकुंड, मृतांना पुरण्याची पद्धत यावरून त्यांच्या धार्मिक कल्पनेची माहिती मिळते. लोकांची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानत. त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्गशक्तीस महत्त्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत. कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडावरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते. निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती, नाग, वृषभ म्हणजे बैल यांचीही ते पूजा करत होते. लोक मूर्तिपूजक होते, मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत.

तेथील लोक मृतदेहाचे विधिपूर्वक दफन करत. दफन करते वेळी त्यांचे सोबत अलंकार व भांडी ठेवली जात.

अंतविधी संस्कार:पूर्णसमाधी,आंशिकसमाधी,दाहकर्म.

तेथील लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याचबरोबर जवस, तीळ, वाटाणा यासारखी दुय्यम धान्ये सुद्धा पिकवीत असत. खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करीत असत. येथील लोक पशू बाळगीत त्यामुळे दूधदुभत्यांचा पुरवठा त्यांच्याकडे होत असावा. तसेच मांसाहारही केला जात असे.

वजन आणि मापे

संपादन

येथील लोक अनेक प्रकारच्या वजनांचा उपयोग करीत. त्यांत दोराने उचलण्याच्या वजनापासून ते सोनाराने उपयोगात आणलेल्या लहानशा वजनापर्यंतचा समावेश होता.

वजन माप हे १६ च्या पटीत होते.

०.८५६५ हे कमीत कमी वजन होते व २७४.९३८ हे जास्तीत जास्त वजन होते.

घरगुती उपकरणे

संपादन

कुंभाराच्या चाकावर बनवलेली सुंदर मातीची भांडी येथे आढळली. त्यांवर नक्षीकाम केलेले होते. याशिवाय तांबे, ब्रांझ आणि चांदीची भांडी सापडली, परंतु याचे प्रमाण मात्र अत्यल्प होते.

कुटुंब पद्धती

संपादन

कुटुंब पद्धत ही हिंदू धर्माप्रमाणे होती. हिंदू धर्मातील चालीरीतीप्रमाणे पुरूष हा कुटुंब प्रमुख होता.

हडप्पा संस्कृतीचा विनाश

संपादन

या संस्कृतीच्या विनाशाची अनेक कारणे सांगितली जातात.

  • नैसर्गिक संकटामुळे -
  • नदीला आलेला पूर/अतिवृष्टी
  • भूकंप
  • हवामानात होणारा बदल[]
  • जमिनीची सुपिकता घटली
  • थर वाळवंट विस्तारल्याने सरस्वती नदी लुप्त होणे []
  • बाह्य आक्रमणे -
  • आर्यांचे आक्रमण
  • युयुत्सु लोकांचे आक्रमण
  • तंत्रज्ञानावरील मक्तेदारी संपली
  • राजकीय विघटनामुळे नाश
  • आर्थिक विघटनामुळे नाश
  • कायदा व सुव्यवस्था नसावी

अलीकडील संशोधन

संपादन

पुणे डेक्कन कॉलेज, खरगपूर येथील इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी व इतर संस्थांनी २०१६ साली केलेल्या एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती ही ५५०० वर्षांपूर्वीची नसून ८००० वर्षांपूर्वीची असल्याचे निष्कर्ष काढले गेले आहेत.‘नेचर’ या विज्ञानसंशोधनविषयक नियतकालिकाच्या एप्रिल २०१६ च्या अंकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.[१०][११] २०१४ मध्ये तामिळनाडुतील शिवगंगा जिल्‍ह्यातील पल्‍लीसंथाई थिडल या गावात जमिनीखाली गाडले गेलेले हडप्‍पा संस्‍कृतीसारखे अवशेष आढळून आले आहेत. बंगळूरू येथील पुरात्‍तव विभागाच्‍या संशोधकांनी याचा शोध लावला आहे.[१२]

संदर्भ

संपादन
  1. ^ इतिहास अकरावी. पुणे: महाराश्ट्र राज्य अभ्यासक्रम मन्डळ. २०१९. pp. पा.न. ११. ISBN नाही Check |isbn= value: invalid character (सहाय्य).
  2. ^ अत्रे आणि गोहाड (२०१९). इतिहास. पुणे: महाराष्ट्र शासन. pp. ११. ISBN उपलब्ध नाही Check |isbn= value: invalid character (सहाय्य).
  3. ^ ॲकडीमिया.एज्यु
  4. ^ मोहनजोदडो अँड द इन्डस सिव्हिलायझेशन pp. 18-19 (इंग्रजी) (जॉन मार्शल)
  5. ^ गायधनी, रं. ना. (२०१५). प्राचीन भारताच इतिहास. पुणे: अनिरुध्द पब्लिशिंग हाऊस. pp. २५.
  6. ^ प्राचीन भारत. pp. २५८. |first= missing |last= (सहाय्य)
  7. ^ प्राचीन भारत. pp. २५८.
  8. ^ http://www.tarunbharat.com/?p=374767
  9. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/edit/column/dakhal/-/articleshow/18124010.cms[permanent dead link]
  10. ^ "संग्रहित प्रत". 2016-05-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-03 रोजी पाहिले.
  11. ^ "संग्रहित प्रत". 2016-06-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-03 रोजी पाहिले.
  12. ^ http://www.pudhari.com/news/desh/49065.html