बैलगाडी
बैलगाडी ही बैलाचा वापर करून ओढली जाणारी गाडी आहे.स्वयंचलित वाहने येण्यापूर्वी,याचा वापर शेतमाल वाहण्यासाठी सहसा करण्यात येत होता.पूर्वीच्या काळी लग्नाला वऱ्हाड घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर होत असे. अद्यापही बऱ्याच ठिकाणी शेतीमाल वाहण्यासाठी बैलगाडीचा वापर होतो.
बैलगाडीला एक किंवा दोन बैल जुंपलेले असतात. भारतीय जातीच्या बैलाला ज्याच्या पाठीला वशिंड असते असे बैल पारंपारिक गाडीला जोडता येतात. बहुतेकदा बैलगाडी लाकडी असते. बर्फ वाहून नेण्यासाठी जी बैलगाडी वापरतात ती मात्र वेगळ्या प्रकारची असते. त्यासाठी बहुतेकदा कमी उंचीची, कठडा नसणारी लांब रुंद फलाट असणारी, व चाकाला टायर असणारी अशी गाडी वापरतात.
पूर्वीच्या काळी शेतात बैलांचा वापर सुरू झाल्यावर धान्य वाहून नेण्यासाठी, चारा वाहून नेण्यासाठी सुरुवातीच्या काळात दगडी चाके असलेली नंतर लाकडीचाके असलेली संपूर्ण लाकडाची बैलगाडी व आता रबरी टायर असलेली संपूर्ण लोखंडी बैलगाडीचा वापर केला जातो.
त्यापैकी दगडी चाके ही बैलांना अतिशय जड व त्रासदायक होती व आताची रबरी टायर वाली लोखंडी गाडी जरी ओढायला हलकी असली तरी ती बैलांसाठी त्रासदायकच असते. वेग घेतलेली गाडी थांबवण्यासाठी बैलांना खूप त्रास होतो. पण मधल्या काळातील लाकडी बैलगाडी ही अतिशय कोरीव सुबक वजनाने हलकी व ओझे वाहून नेण्यासाठी अतिशय सोपी अशी बैलगाडी होती. पण काळाच्या ओघाने ती आता दुर्मिळ झाली आहे. पूर्वीच्या काळी पाचशे लोकवस्ती असलेल्या चारशे घरी ही बैलगाडी असायची. पण आता एका गावात एखादी बैलगाडी पाहायला मिळाली तरी खूप नवीन पिढीला त्या गाडीची ओळख राहावी व माहिती असावी म्हणून लाकडी बैलगाडीच्या सर्व भागांची सविस्तर माहिती पाठवत आहोत.
विविध भागानुसार जसा भाषेमध्ये बदल होतो. त्याप्रमाणे गाडीच्या विविध भागांच्या नावांमध्ये पण बदल झालेला आहे. सर्वसाधारण पुणे व मराठी भाषिक सोलापूर जिल्हा तसेच सातारा, सांगली, उस्मानाबाद जिल्हातील बऱ्याच भागात आहेत.
जु किंवा जोटे
संपादनबैलगाडी ओढण्यासाठी बैलांच्या खांद्यावर कोरीव नक्षीकाम केलेले नऊवीत मापाचे लाकूड असते त्याला जोटे असे म्हणतात.
झुंपणी
संपादनजोटयाला बैल जोडले राहावेत म्हणून त्यांच्या गळ्या भोवती चामड्याचा पट्टा असतो, त्याला झुंपणी असे म्हणतात.
लाखण
संपादनझुंपणी जोटयात अडकवण्यासाठी झुंपनीच्या दोन्ही बाजूना दोरीचे जाड कडे असते, त्या कड्याना लाखण असे म्हणतात.
मंडपी
संपादनबैलांच्या खांद्यावर जोटयाच्या लाकडाला झुंपण्या एका जागेकर राहाव्यात व दोन्ही बैलांना गाडी ओढण्यासाठी समान ताकद लावता यावी म्हणून जुंपण्या अडकवण्यासाठी जी खाच असते त्याला मंडपी असे म्हणतात.
खिळा
संपादनबैल जोटयाच्या बाहेर जाऊ नये, अडकून रहावा म्हणून जोटयाच्या बाहेरच्या टोकाला उभे होल पाडून त्यात उभे एक नक्षीदार काठी रोवलेली असते. त्याला खिळ असे म्हणतात. बऱ्याच वेळा त्या काठीला पितळी घुंगरे अडकवलेली असतात. एका बैलगाडीला एक जोटे व त्या जोटयाला दोन मंडपी बाहेरच्या टोकाला, दोन होल, दोन खिळा, दोन जुंपणी, त्या जुंपण्याच्या दोन्ही बाजूला मिळून चार लाखाण व जोटयाला दोन मंडपाच्या खाचा असतात व मधोमध दांड्याच्या बाहेर दोन्ही बाजूस लोखंडी गोळे कडे बसवलेले असते.
दांड्या
संपादनबैलगाडीच्या जोटयाला जोडण्यासाठी वापरलेल्या दोन सरळ लाकडांना दांड्या असे म्हणतात.
येटन
संपादनबैलगाडीच्या साठी दांड्याना आवळण्यासाठी साठीच्या खालून व दांड्याच्या वरून एक लाकूड ठेवलेले असते, ते आवळण्यासाठी जी जाड रस्सी वापरली जाते येटन असे म्हणतात.
डोंबाळा
संपादनबैलगाडी आवळण्यासाठी साठीच्या खाली व दांड्यांच्या वर मोठ्या दोराने आवळले जे लाकूड असते त्याला डोंबाळा असे म्हणले जाते
धाव
संपादनबैलगाडीच्या धावताना लाकडाला इजा होऊ नये म्हणून त्यावर एक लोखंडी पट्टी लावलेली असते, त्याला धाव असे म्हणतात. ही धाव दोन इंच किंवा पावणेदोन इंच अश्या दोन वेगवेगळ्या मापाच्या असतात.
पुट्टे
संपादनधावेच्या आत तुकड्यामध्ये जोडलेला जो भाग असतो त्याला पुट्टे असे म्हणतात. एका चाकाला असे सहा पट्टे असतात.
आरे
संपादनपुट्याच्या आत खांबाप्रमाणे उभी लाकडी दांडकी असतात त्याला आरे असे म्हणतात. एका चाकाला असे बारा आरे असतात.
मणी
संपादनलोखंडी चाकाच्या बाहेर आणि आरे जोडण्यासाठी जे भक्कम गोल लाकडी गोळा खाच मारून तयार केलेला असतो त्याला मणी असे म्हणतात. हा मणी खैरांच्या लाकडापासून तयार करतात. तो अखंड लाकडाचा असतो.
चुडे किंवा कडी
संपादनलाकडी मणी ताण येऊन फुटू नये म्हणून आत बाहेर दोन्ही बाजूस लोखंडी गोल कडी बसवलेली असतात, त्याला चुडे किंवा कडी म्हणतात.
आंबवण
संपादनलोखंडी चाक लाकडावर घासल्याने मणी झीजू नये म्हणून मण्याच्या मधोमध जाड लोखंडी पाईप ठोकलेला असतो त्यास आंबवण असे म्हणतात. आताच्या बेअरिंगचे काम पूर्वीच्या वेळी आंबवण करायचे.
आक
संपादनबैलगाडीचे ओझे पेलवण्यासाठी व बैलगाडी चाकांवर मांडण्यासाठी जो आडवा मोठा लोखंडाचा जाड गज असतो त्याला आक असे म्हणतात. हा आक दोन इंच व पावणेदोन इंच अशा वेगवेगळ्या आकाराचा असायचा.
आकरी
संपादनबैलगाडीची साठी ठेवण्यासाठी व आक बांधून ठेवण्यासाठी साठीच्या खाली व आकाच्या वर चौकोनी आयताकार असा एक लाकडी ठोकळा असतो त्याला आकरी असे म्हणतात. त्या आकाराला मधोमध दोन चौकोनी होल पाडलेले असतात. त्यात दांड्यांची एक बाजू जोटयाला व दुसरी बाजू या आकारीच्या पडलेल्या होते मध्ये ठोकलेली असते. बैलगाडीच्या सगळा ताण लोखंडी अंकावर असतो. तर बैलगाडी ओढताना जवळपास सगळा ताण या आकारीवर असतो.
कुण्या आणि बाळ्या
संपादनचालताना बैलगाडीची चाके आकामधून बाहेर निघू नयेत म्हणून आकाच्या बाहेरच्या बाजूला छोटे छिद्र असते. त्यात चंद्रकार लोखंडी पट्टी घातलेली असते तिला कुणी असे म्हणतात. सरळ उभी पट्टी मार लागून तुटते म्हणून तिचा आकार चंद्राकार असतो वरील बाजूस जाड व खालील बाजूस पातळ झालेली ही कुणी प्रत्येक वेळी समान मार घेते. म्हणून ती तुटत नाही, ही कुणी उसळून पडू नये म्हणूं खाली गोल तारेची रिंग बसवलेली असते. तिला बाळी असे म्हणतात.
साठी
संपादनबैलगाडीच्या मुख्य भागाला व गाडीत बसण्याच्या मुख्य ठिकाणाला साठी असे म्हणतात. साठी ही १) घोडके, २) खुंटल, ३) पात, ४) फळ्या ५) करळ्या, ६) तरशे, अशा विविधा भागांनी जोडलेले असते. १) घोडके:- आकरीच्या वर बैलगाडीच्या दोन्ही बाजूला जे मोठे दोन कोरीव लाकडी ओढणी असतात त्याला घोडके असे म्हणतात. २) तरशे:- बैलगाडीत बसण्यासाठी मांडलेल्या असतात त्यांना खालून आधार देण्यासाठी खालून दोन्ही घोडक्यांना खाचा मारून आडवे लाकडी सहा पट्ट्या ठोकलेल्या असतात त्यांना तरशे असे म्हणतात. ३) पात :- बैलगाडीच्या साठीतील शेवटचा भाग घोडक्यांच्या वर समांतर असलेल्या लाकडी ठोकळ्याला पाते असे म्हणतात. एका साठीला अशी दोन पाती लागतात. ४) खुंटल:- घोडके व पाते या दोघाना जोडण्यासाठी व साठीला चौकोनी आकार देण्यासाठी ठोकलेल्या ऊभ्या पात्यांना खुंटले असे म्हणतात. कधी कधी यातली दोन खुंटली लोखंडी गजांची देखील असतात. एका बाजूला आठ, अशी दोन्ही बाजूला मिळून सोळा खुंटली असतात. या खुंटल्यावर सुंदर नक्षीकाम देखील केले जाते. ५) फळ्या :- बैलगाडीत बसण्यासाठी तयार केलेल्या लाकडी पृष्ठ भागाला फळ्या असे म्हणतात. ६) करळ्या :- साथीला चौकोनी आकार येण्यासाठी तसेच साठीचा डायग्राम पूर्ण होण्यासाठी आणि खुंटाळ्याला भक्कम पणा येण्यासाठी व फळ्यांना बांधून ठेवण्यासाठी पुडाच्या व मागच्या बाजूला आडवे दोन खाच मारलेल्या लाकडाला कारळ्या असे म्हणतात.
साठ्याची बैलगाडी भाताचा पेंढा किंवा गवत वाहण्यासाठी वापरली जाते.
ढकली
संपादनसाठीच्या पुढच्या तोंडाला व बैलाच्या मागे जे आडवे लाकूड असते त्याला ढकली असे म्हणतात. बैलगाडी वळवताना एक बैल मागे राहिला असता त्याचा पाय चाकाखाली जाऊ नये म्हणून तो बैल या ढकलीवर टेकतो, त्यामुळे चाक व बैलाचे पाय यामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका ढकली बजावतात.
शिड्या
संपादनबैलगाडीत ओझे भरताना जास्त भार मागे जातो व गाडी उसळून बैलांच्या घशाला फास लागतो म्हणून हे ओझे पुढे भरावे लागते. ढकली व खुंट्याच्या जवळून पुढे जोटयाला दोन गजाची हुक केलेली असतात. तिथपर्यंत दोन बांबू लावलेले असतात व त्याला दोरीने विणून ठेवलेले असते त्याला शिडी असे म्हणतात.
शिपाई
संपादनबैलगाडीत ओझे असल्यावर गाडी समांतर रहावी म्हणून पुढच्या बाजूला जोटे व दांड्या खाली दोन काठ्या साखळी जोडून उभ्या केलेल्या असतात त्याला शिपाई असे म्हणतात.
रिकाम्या
संपादनआक व आकरी दोन्ही एकमेकांना भक्कम पणे जोडलेली राहावीत म्हणून दोन्ही बाजूला दोन भक्कम लोखंडी पट्ट्या ठोकलेल्या असतात त्याला रिकाम्या असे म्हणतात.
घट
संपादनबैलगाडी शिपायांवर उभी केली असता ती चुकून मागे जाऊ नये म्हणून मागील बाजूस एक लाकडाने टेकन दिले जाते, त्याला घट असे म्हणतात. हा घट गाडीलाच साखळीने जोडलेला असतो. बैलगाडी हलताना हा घट साठीच्या मागे अडकवलेला असतो. बैलगाडी चालताना तो एकसंघपणे हलत राहतो.
मुंगा
संपादनसाठीच्या मागच्या बाजूला बैलगाडीत ठेवलेले सामान मागे पडू नये म्हणून दोराने विशिष्ठ प्रकारे बांधले जाते त्याला मुंगा असे म्हणतात.
वंगण
संपादनबैलगाडीची चाके फिरत असताना आक व आंबवण यामध्ये घर्षण होऊन त्याची झीज होऊ नये म्हणून ऑइल लावले जाते त्याला वंगण असे म्हणतात.
वंगारी
संपादनबारीक लोखंडी सळई एका बाजूला गोल कडे व दुसरा भाग थोडा चपटा व त्यास एक लहान छिद्र व था छिद्रात लाकडी पट्टी अडकवलेली असते त्यास वंगारी असे म्हणतात. वंगणात बुडवून ती तार व कापड आंबवान आणि आक यांच्यामध्ये लहान जागेत जाहून वांगं लावता येते.
नळा
संपादनपूर्वीच्या काळी दूरवर जाताना वंगण घेऊन जाण्यासाठी बांबूच्या लाकडाला आतून पोकळ करून त्यात वंगण व वंगारी घेऊन जात असत, त्या बांबूला नळा असे म्हणत.
ओढणी
संपादनउंच ओझे भरून जाताना ते खाली पडू नये म्हणून ओढणी बांधायच्या जाड दोराला ओढणी असे म्हणतात.
तट्ट्या
संपादनसाठीच्या व छपरा प्रमाणे केलेल्या छतास तट्ट्या असे म्हणतात. पूर्वीच्या काळी घरंदाज स्त्रियांना चेहरे झाकून जाण्याची प्रथा होती, त्याच प्रमाणे या घरंदाज स्त्रियांना बैलगाडीतून प्रवास करताना झाकून जात यावे, म्हणून तट्ट्या बांधल्या जायच्या.
अशी आपल्या शेतीप्रधान संस्कृतीला साजेल अशी व पूर्वीच्या काळी दळणवळणाचे प्रमुख साधन असलेली बैलगाडी काळाच्या ओघाने लोप पावत चालली आहे.