सरस्वती नदी

सरस्वती ही भारतातील एक प्राचीन महानदी असल्याचे समजले जाते.[१]

प्राचीन संदर्भसंपादन करा

ऋग्वेदात सरस्वती सूक्त आहे. यामध्ये सरस्वती नदीचे वर्णन केलेले आहे आणि तिची स्तुती केलेली आहे. [२] वेदोत्तर काळात सरस्वती नदी कुरुक्षेत्रात एका जागी गुप्त झाली असल्याचे समजले जाते. त्या स्थानाला विनशन म्हणतात.त्याचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथात आढळतो. महाभारतात विनशन आणि चमसोदभेद या दोन तीर्थांचा उल्लेख आढळतो.सरस्वती नदी विनशन स्थानी लुप्त झाली आणि चमसोदभेद येथे पुन्हा प्रकट झाली व तेथे तिला अनेक नद्या मिळाल्या असे म्हटले आहे.पुराणात सरस्वती नदीला देवी मानून तिचे स्तवन केले आहे आणि तिच्याविषयी अनेक काल्पनिक कथा रचलेल्या आहेत.[३] शिवाने ब्रह्महत्या केल्याने त्याला जे पातक लागले त्याच्या क्षालनासाठी तो सरस्वती नदीत स्नान करू लागताच ती गुप्त झाली असे वामन पुराणात सांगितले आहे.(३.८) लक्ष्मी, गंगा,सरस्वती या श्रीविष्णूच्या पत्नी होत्या. एकदा गंगा व सरस्वती यांच्यास्त भांडण होवून त्यांनी एकमेकींना शाप दिला त्यामुळे त्या नदी होवून पृथ्वीवर अवतरल्या.[४] महाभारत या ग्रंथातही सरस्वती नदीचा उल्लेख सापडतो.[५]

भौगोलिक महत्वसंपादन करा

पृष्ठीय बदलांमुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त पावली. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इ.स.पूर्व ३००० सुमारास ही नदी लुप्त पावली.प्राचीन सरस्वती 'आदि बद्री' पासून निघून हरियाणा, राजस्थान, व गुजरात या प्रांतातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. हिमालयातील हिमनगांमुळे तिला पाण्याचा संतत पुरवठा होत होता. त्या काळी गंगा नदीला प्रयाग येथे जाऊन मिळणारी यमुना नदी सरस्वती नदीला मिळत होती. तिचे नाव द्रशद्वती नदी होते. शतद्रु म्हणजे सतलज नदीही सरस्वतीला मिळत होती. यमुना व सतलज यांचे प्रचंड प्रवाह सरस्वतीला मिळत होते. व तिन्ही नद्यांना हिमनग पाण्याचा पुरवठा करत होते.

लुप्त सरस्वती नदी शोधकार्य व सर्वेक्षण[६]संपादन करा

सरस्वती नदी शोध प्रकल्प जनरल सर कनिंगहेम , ऑर्थर ए. मेकडोनल, मी.किथ यासारख्या अभ्यासकानी केला आहे.भारतीय इतिहास संकलन समितीने उपग्रहांद्वारे प्राप्त झालेल्या वैदिक सरस्वतीच्या शुष्क प्रावासाचे विश्वासार्ह नकाशे वापरले आहेत.[७]वैदिक सरस्वती नदी शोध केंद्राची स्थापना करून त्यानंतर चर्चासत्रे,अभियान समिती यांच्याद्वारे हे काम पुढे नेले गेले.पद्मश्री डॉ. वी.श्री. वाकणकर , श्री.मोरोपंत पिंगळे अशा विविध अभ्यासक मंडळींनी या शोधात महत्वाचे योगदान दिले आहे. [८]वैदिक आणि नंतरच्या काळात साहित्यात ज्या सरस्वती नदीचे उल्लेख विपुल संख्येने आढळतात पण जी भारताच्या आजच्या मानचित्रात दर्शविता येत नाही त्या 'लुप्त वैदिक सरस्वती नदीचा शोध' घेणे आवश्यक ठरले.[९]

सद्य:स्थिती- भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे हरियानातल्या यमुनानगर जिल्ह्यातल्या आदी-बद्रीपासून ते राजस्थानमधल्या कच्छ जिल्ह्यातल्या खिरसरापर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात उत्खनन करण्यात आलं असून, घग्गरच्या प्राचीन प्रवाहाचा (Palaeo channel ) शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.[१०] सन २००२ ते २००४ आणि सन २००९ ते २०१४ या काळात पुरातत्व विभागातर्फे हरियानातल्या आदी-बद्री, कुरुक्षेत्र, फतेहबाद, हिस्सार, राजस्थानातल्या गंगानगर, हनुमानगड, करणपुरा आणि गुजरातमधल्या खिरसारा, आणि कच्छ या ठिकाणी स्वतंत्रपणे उत्खनन करण्यात आलं.[११] सरस्वती नदी नक्कीच अस्तित्वात असावी, असं सिद्ध करणारे पुरावे या उत्खननातून आढळून आले आहेत.[१२] प्रख्यात शास्त्रज्ञ के. एस. वालदिया यांच्या म्हणण्यानुसार, सरस्वतीला पूर्वेकडं आणि पश्‍चिमेकडं अशा दोन उपनद्या असाव्यात आणि ही नदी हरियाना, राजस्थान व उत्तर गुजरातमधून वाहत असावी. जैसलमेरच्या आजूबाजूला संशोधन करताना तिथल्या स्थानिकांकडून कळलं, की रानाऊ या जवळच्या गावात कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. एवढंच नव्हे तर, तिथं खोदण्यात आलेल्या कूपनलिकेतून नेहमीच गोड पाणी मिळतं. बाकीच्या गावांमध्ये मिळतं तसं खारट पाणी इथं मिळत नाही. इथल्या गावकऱ्यांच्या धारणेनुसार, ‘या गावांखालून सरस्वती नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहतोय’! रानाऊपासून साधारणपणे २२ किलोमीटर दूर असलेल्या; पण रानाऊच्याच रेषेत असलेल्या घंटियाली आणि टनोट या गावांतही हीच परिस्थिती आहे. सरस्वतीचा उगम उत्तराखंडमधल्या बंदरपूंछ या गढवाल-हिमालयातल्या शिवालिक पर्वतरांगांमधल्या हिमनदीतून झाला असावा. ‘ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार’चा वापर करून घग्गर नदीपात्रातल्या लुप्त प्रवाहाचा मार्ग निश्‍चित करण्याचा प्रयत्नही आता सुरू झाला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) संशोधनानुसार, ‘सरस्वतीच्या प्राचीन प्रवाहरेषेवरून आज घग्गर नदी वाहते आणि तोच खरा प्राचीन सरस्वती नदीचा मार्ग आहे.’ या नदीच्या आजूबाजूच्या एकूण १४ विहिरींमधल्या पाण्याच्या ‘कार्बन डेटिंग’ पद्धतीनं केलेल्या कालनिर्णयानुसार, हे पाणी आठ हजार ते १४ हजार वर्षं जुनं असावं. इथली पाण्याची प्रतही खूप चांगली आहे. या प्रवाहमार्गाच्या नजीक असलेल्या वनस्पतीही वर्षभर आणि तीव्र उन्हाळ्यातही टिकून राहत असल्याचं आढळून आलं आहे. नदीकाठची गावं गेली ४० वर्षं या विहिरींचं पाणी वापरत आहेत. असं असूनही एकदासुद्धा पाण्याची कमतरता जाणवली नाही, असं गावकरी सांगतात. उपग्रह-प्रतिमांचा अभ्यास आणि प्रदेशाला देण्यात आलेल्या प्रत्यक्ष भेटींवरून, या भागातल्या सरस्वती नदीच्या परित्यक्त (Abandoned) प्रवाहाच्या अस्तित्वाचा अंदाज येऊ शकतो. रैनी आणि वहिंदा या नद्या सरस्वती नदीत समाविष्ट होण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात असाव्यात आणि त्यांनी नदीखोऱ्यात भरपूर गाळसंचयन केलं असावं, असंही या अभ्यासातून सूचित होत आहे. पंजाब, हरियाना आणि उत्तर राजस्थानातून वाहत सरस्वती नदीचा प्रवाह खंबातच्या आखातात समुद्राला जाऊन मिळत असावा. राजस्थानमधे प्रवाह कोरडा होऊन पुढं हनुमानगड, पिलिबंगन, अनुपगडच्या दिशेनं जात असावा. भूशास्त्रज्ञांना या खोऱ्यातल्या प्रचंड गाळसंचयनाबद्दल आणि दरवर्षी १५ सेंटिमीटरपेक्षाही कमी पाऊस पडणाऱ्या थर वाळवंटाच्या पश्‍चिम भागात आढळणारी पाण्याची विपुलता याबद्दल नेहमीच उत्सुकता लागून राहिली आहे. सरस्वती नदीचा नेमका मार्ग सापडणं कठीण झाल्यामुळं आणि तिच्या अस्तित्वाबद्दल अजूनही ठोस पुरावे न सापडल्यामुळं ‘सरस्वती नदी ही एक कपोलकल्पित गोष्ट असावी,’ असं अनेकांना अजूनही वाटतं. गेली दोन दशकं या नदीचं अस्तित्व सिद्ध करण्यात गेली आहेत. जोधपूरच्या ‘केंद्रीय रुक्ष प्रदेश संशोधन संस्थे’नं भरपूर आणि नेमकं संशोधन करून ‘सरस्वती नदी अस्तित्वात होती’ असं मत मांडलं आहे. उपग्रह-प्रतिमांच्या अभ्यासातूनही काही गोष्टींचा उलगडा होऊ शकला आहे. नदीमार्गातल्या ‘क्षत्रना’च्या ईशान्येला सरस्वतीचा एक प्रवाह ‘मार्कंडा नदी’ म्हणून वाहत असावा. आजची छाऊतांग नदी आणि तिचा सुरतगडजवळ घग्गर नदीशी होणारा संगम यावरूनही जुन्या, कोरड्या पडलेल्या प्रवाहाची कल्पना येऊ शकते. उपग्रह-प्रतिमांवरून असाही तर्क करता येतो, की जुन्या घग्गर नदीचे अनुपगडजवळ दोन प्रवाह झाले असावेत. त्यातला एक मारोटजवळ व दुसरा बैरिनाजवळ लुप्त झाला असावा. म्हणजेच प्राचीन नदी इतकी रुंद असावी. लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा नव्यानं घेतला जाणारा पुनर्शोध हा वायव्य भारतातल्या प्राचीन नद्या आणि त्यांच्या काठी बहरलेल्या वस्त्यांचा इतिहास आणि संस्कृती आपल्यासमोर नेमकेपणानं आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणार आहे, यात शंका नाही.[१३]

भूसर्वेक्षण आणि त्याचा निष्कर्षसंपादन करा

महाभारत काळापूर्वीच भूगर्भातील घडामोडींमुळे (टेक्टॉनिक मूव्हमेंट्स) यमुनेने पात्र बदलले. ती एकदम पूर्व वाहिनी होऊन गंगेला जाऊन मिळाली. सतलजच्या पात्राचीही दिशा बदलली. ती पश्चिमेकडे वळून सिंधू नदीत जाऊन मिळाली. त्याचवेळी या प्रचंड उलथापालथीमुळे सरस्वतीच्या उगमापाशी पाण्याचा पुरवठा करणार्‍या हिमनद्या व सरस्वती यांच्यामधे पर्वतांचे अडथळे उभे राहिले. त्यामुळे सरस्वतीचे पात्र सुकत गेले. लंडसेटने दिलेल्या माहितीनुसार प्राचीन सरस्वती नदी पूर्व राजस्थानातून अधिक पूर्वेच्या बाजूने वाहत असावी.डॉ.वाकणकर,डॉ.आर्य आणि इंगळे या अभ्यासकांना ओल्डहेम (१८९३),वाडिया(१९३८) अमलघोष ( १९६०) यांनी केलेल्या भू सर्वेक्षणाची मदत नक्की झाली. ही सर्वेक्षणे व्यक्तिगत स्वरूपाची होती.या सर्व विस्तृत सर्वेक्षणातून एक विषय स्पष्ट झाला की इ.स.पू.२००० वर्षांच्या मागे एक प्रचंड नदी,स्वत:ची पात्रे सतत बदलत ,राजस्थान,बहावलपूर, उत्तर सिंध किंवा कच्छच्या रणातून अरबी समुद्राला निरनिराळ्या मुखातून मिळत असावी. सरस्वती नदी अरबी समुद्राला मिळण्यापूर्वी जी स्थित्यंतरे झाली ती पण ध्यानात घ्यावी लागतात. बिकानेर जवळची वाळू आणि मुरमाची उत्पत्ती पूर्व आद्याश्म युगातील असावी असे भू-शास्त्रज्ञ समजतात. नंतर सरस्वती अंगावर येणा-या वाळवंटाला टाळीत वाहू लागली. कालांतराने सरस्वती कच्छच्या रणात वाहू लागली. नंतर बापपोखरणमार्गे ती उत्तर चौथ्या काळात (Late Quarternary period)अनेक लहान नद्यांना सामावून घेवू लागली.यावेळी हिमालय व शिवालिक पर्वतांच्या रंगात भू-उद्रेक चालू होता.त्यावेळी सतलज ने मार्ग बदलला. परिणामत: सर्स्व्तेच्या जलाचा पुरवठा कमी झाला. अशा भू-उत्थानाचा परिणाम वैदिक लोकवस्त्यावर अधिकच झाले. त्यांना आपला प्रदेश सोडून गंगा व सदामीरा नद्यांच्या पाणथळ प्रदेशाकडे स्थलांतर करावे लागले.

प्रख्यात भू-शास्त्रज्ञ डॉ. एम.ए. कृष्णन (१९६८) यांनी नोंदविले आहे की सरस्वती अंबाला जिल्ह्याच्या सीमेवर सिरमूर पर्वत रांगांच्या शिवालिक डोंगरातून बाहेर पडते.ती आदिबद्री येथे समतल भूमीवर वाहू लागते आणि पुढे पत्थर प्रदेशात भवानीपूर आणि बलछापानंतर ती नाहीशी होते.परंतु ती थोड्या अंतरानंतर पुन्हा भूपृष्ठावर येवून कर्नाल जवळ प्रकट होते. याच परिसरात घग्गर (दृषद्वती) या नावाने ती उगम पावते.[१४]

सरस्वती नदीच्या विषयावरील पुस्तकेसंपादन करा

  • आणि सरस्वती नदी लुप्त झाली...गुप्त झाली (लेखक - शरश्चंद्र लिमये); पुस्तक प्रकाशन दिनांक - १२ मे २०१६
  • सरस्वती नदीचा शोध-भारतीय इतिहास संकलन समिती प्रकाशन
  • लुप्त सरस्वती नदी शोध (संक्षिप्त वृत्तांत) वाकणकर ल.श्री.,डॉ. परचुरे चिं. ना
  • सरस्वती शोध वाकणकर वी.श्री (श्री. बाबासाहेब आपटे स्मारक समिती प्रकाशन )

बाह्य दुवेसंपादन करा

  1. उपक्रम संकेतस्थळावरील चर्चा-सरस्वती नदी
  2. ऋग्वेदातील सरस्वती/पाण्यावरून तंटा?!


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.