कोकण रेल्वे
कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील रोहा येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे.

इतिहाससंपादन करा
मुंबई व मंगळूर ह्या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने (पुणे-सोलापूर-बंगळूर) चालू होती. तसेच उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे चालू करण्यात अनेक अडथळे येत होते. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मधू दंडवते, जॉर्ज फर्नान्डिस इत्यादी कोकणी नेत्यांनी केंद्रीय पातळीवर कोकण रेल्वे बांधण्याची मागणी चालू ठेवली. १९६६ साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला. १९९० साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नान्डिसांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमधील सी.बी.डी. बेलापूर येथे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले अध्यक्ष होते. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला.
७४० किमी लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी ह्या प्रत्येकी १०० किमी लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन ॲंड टूब्रो, गॅमन इंडिया ह्या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणाऱ्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक रखडले. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी ह्या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ७ वर्षां ३ महिन्याचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले.कोकण रेल्वेच्या निर्मितीमध्ये अनेक अडचणी आल्या.जवळपास ४७ हजार कुटुंब विस्थापित झाले .
मार्गसंपादन करा
- एकूण लांबी: ७४० किमी (४६० मैल)
- स्थानके: ५९
- वळणे: ३२०
- मोठे पूल: १७९
- सर्वाधिक लांबीचा पूल: २,०६५.८ मी (६,७७८ फूट) (होन्नावर येथे शरावती नदीवर)
प्रमुख रेल्वेगाड्यासंपादन करा
- हजरत निजामुद्दीन-त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस
- हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस
- छत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-त्रिवेंद्रम नेत्रावती एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
- पुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस (पनवेल मार्गे)
दादर मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस