साम्राज्यवाद
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
साम्राज्यवाद (इंग्लिश : Imperialism (इंपेरिॲलिझम)) हा शब्द Imperium (इंपेरियम) या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. हा शब्द साम्राज्य प्रस्थापित करण्याचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक वसाहती स्थापन करणे याला साम्राज्यवाद असे म्हणतात. साम्राज्यवादात एखादा बलाढ्य देश किंवा राष्ट्र दुसऱ्या कमकुवत देशाच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य प्रस्थापित करून तो भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणतो. साम्राज्यवादासाठी बहुधा लष्करी बळाचा वापर केला जातो. नव्या भूभागांवर वसाहती स्थापन करणे हे देखील साम्राज्यवादाचेच उदाहरण आहे. अनेक विचारवंत लेखक व राज्यकर्त्यांनी साम्राज्यवादी विचारसरणीचा पुरस्कार केला डार्विनने माईट इस राईट हा सिद्धांत मांडून बलवाना दुर्बला वर राज्य करण्याचा अधिकार आहे असे सांगितले बिस्मार्क ब्लड अँड ऐरण पॉलिसी स्वीकारून युद्ध हे पुरुषार्थाचे लक्षण आहे असे स्पष्ट केले कैसर विल्यम, अल्फ्रेड नोबेल यांनी साम्राज्यवाद हे सर्व श्रेष्ठत्वाचे लक्षण आहे असे म्हणले जर्मनी, इटली, जपान या राष्ट्रांनी श्रेष्ठत्वाचा पुरस्कार करून साम्राज्यवादाचा पाठपुरावा केला साम्राज्यवादाला वैचारिक पार्श्वभूमी मिळाल्यामुळे त्यात कमालीची वाढ होत गेली
रोमन साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, फ्रेंच वसाहती साम्राज्य, जपानी साम्राज्य, जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य इत्यादी साम्राज्य ही जगातील एकेकाळची आघाडीची साम्राज्ये होती.
आशियातील साम्राज्यवाद
संपादनयुरोपीय राष्ट्रांनी आशिया खंडातील भारत, चीन, जपान, म्यानमार, इंडोनेशिया, मलाया, फिलिपाईन्स, थायलंड या देशांवर विविध प्रकारे आपला साम्राज्यावाद लादला होता. त्यातून आशिया खंडात साम्राज्यवादास सुरुवात झाली.
भारतामधील साम्राज्यवाद
संपादनपोर्तुगीज
संपादनइ.स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरावर पोहचला. तेथील झामोरिन राजाकडून त्याने व्यापारी सवलती मिळवल्या.
प्रारंभीच्या काळात भारताच्या राजकारणात पोर्तुगीजांना विशेष महत्त्व होते. पण एकाच वेळी धर्मप्रसार, सत्ताविस्तार आणि व्यापार या गोष्टी करण्याचा पोर्तुगीजांनी प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना भारतात प्रबळ साम्राज्य निर्माण करता आले नाही. त्यांना केवळ गोवा, दमण आणि दीव या प्रदेशावरच समाधान मानावे लागले.
डच
संपादनपोर्तुगीजांच्या नंतर डच भारतात व्यापार करण्याकरिता इ.स. १५९५ मध्ये आले. डचांनीसुद्धा भारतात येऊन व्यापाराला सुरुवात केली. पण व्यापाराच्या दृष्टीने त्यांनी आपले लक्ष आग्नेय आशियातील बेटांवरच केंद्रित केले.
फ्रेंच
संपादनइ.स. १६२५ पासून फ्रेंचांनी भारतात व्यापार सुरू केला. पण फ्रेंचांना केवळ चंद्रनगर, पॉन्डिचेरी, कराईकल, यानम व माहे हे प्रदेशच हस्तगत करण्यात यश मिळाले.
इंग्रज
संपादनइंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मोगलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ.स. १६१५ मध्ये मोगल बादशहा जहांगीरकडून सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतात फक्त व्यापार करण्याचे धोरण अवलंबिले. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर मुघल सरदारांच्या आपापसातील मतभेदांमुळे मोगल सत्ता कमकुवत झाली. या काळात भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने इंग्रजांनी भारताच्या राजकारणात लक्ष द्यायला सुरुवात केली.
इंग्रजांचा दक्षिण भारत व बंगालमध्ये सत्ता विस्तार
संपादनइ.स. १७५७ मधील प्लासीची लढाई व इ.स. १७६४ मधील बक्सारच्या युद्धातील इंग्रजांच्या विजयामुळे त्यांचा बंगालमधील सत्तेचा पाया मजबूत झाला.
१८व्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण भारतात निजाम, हैदरअली व मराठा या तीन बलाढ्य सत्ता होत्या. इंग्रजांनी निजाम व मराठ्यांची मदत घेऊन हैदरअली व त्याचा मुलगा टिपू सुलतान यांचा पराभव केला. त्यानंतर इ.स. १७७५ पासून इ.स. १८१८ पर्यंत इंग्रज व मराठे यांच्यात तीन युद्धे झाली. पहिल्या युद्धात महादजी शिंदे यांनी इंग्रजांचा पराभव केला. दुसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. नंतर आष्टी येथे झालेल्या तिसऱ्या युद्धात, इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करून मराठी सत्तेवर विजय मिळवला.
त्यानंतर निजामाच्या तैनाती फौजेच्या माध्यमातून इंग्रजांनी भारतात अनेक ठिकाणी साम्राज्यविस्तार केला.
इंग्रजांचा पंजाबमधील सत्ता विस्तार
संपादनमराठ्यांच्या पराभवानंतर संपूर्ण भारतात शिखांची सत्ता सोडल्यास कोणतीही स्थानिक सत्ता उरली नव्हती. पंजाबमध्ये महाराजा रणजीतसिंहांच्या प्रयत्नांतून शिखांचे संघटन झाले होते. महाराजा रणजीतसिंह सत्तेवर असेपर्यंत इंग्रजांना शिखांवर वर्चस्व निर्माण करता आले नाही. पंजाब, सिंध, काश्मीर व आजच्या पाकिस्तानच्या परिसरात शिखांचे बलाढ्य राज्य होते. इ.स. १८३९ मध्ये महाराजा रणजीतसिंहाच्या मृत्यूनंतर शीख सत्ताधारी आणि सरदारातील तंटे व दुही इंग्रजांच्या पथ्यावर पडली. इ.स. १८४५ ते इ.स. १८४९ या कालखंडात शीख सत्ता नेस्तनाबूत करून इंग्रजांनी शिखांच्या ताब्यातील विशाल प्रदेश आपल्या ताब्यात मिळविला.
इंग्रजांचा भारतावर एकछत्री अंमल
संपादनइंग्रजांनी झाशी, नागपूर, सातारा, संबळपूर, उदयपूर इत्यादी संस्थाने खालसा करून ती ब्रिटिश साम्राज्यास जोडली. तसेच अयोद्धेचे संस्थान अनागोंदी राज्यकारभाराच्या नावाखाली खालसा केले. तर काही संस्थानिकांचे तनखे देणे बंद केले व तेथे आपली सत्ता स्थापन केली. अशा प्रकारे इ.स. १७५७ ते इ.स. १८५७ या शंभर वर्षांच्या कालखंडात बहुतांश भारत आपल्या वर्चस्वाखाली आणून इंग्रजांनी भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला.
चीनमधील साम्राज्यवाद
संपादनचीनसारखा महाकाय देश युरोपीयांच्या वर्चस्वाखाली जाण्यास तेथील मांचू राजवट (इ.स. १६४४ ते इ.स. १९११) मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली. इ.स. १५१७ मध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज व्यापारी समुद्रमार्गे चीनच्या कॅन्टन बंदरात उतरले. त्यानंतर पोर्तुगीजांनी मकाव बेट ताब्यात घेतले. पोर्तुगीजानंतर फ्रान्स, इंग्लंड, हॅालंड, बेल्जियम, रशिया यांनीही चिन्यांकडून व्यापारी सवलती मिळवल्या. परंतु दोनशे वर्षे चीनने युरोपीयांना आपल्या अंतर्गत प्रदेशात ढवळाढवळ करू दिली नाही. चीनने जाहीर केलेल्या आठ कलमी नियमावलीनुसार युरोपीयांवर अनेक बंधने घालण्यात आली. चीनमध्ये प्रवेश करणाऱ्या युरोपीयांना चिनी सम्राटाला कुर्निसात (नमस्कार) करावा लागत असे. तरी देखील इंग्लंडने चीनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला.
अफूचे पहिले युद्ध
संपादनया सुमारास ब्रिटिश व्यापारी भारतातून अफू आणून चीनमध्ये विकत होते. चिनी सरकारचा अफूच्या व्यापारास विरोध होता. तरी युरोपीय व्यापारी अफूचा चोरटा व्यापार करीतच राहिले. चिनी लोक चांदीच्या मोबदल्यात अफू विकत घेऊ लागले. त्यामुळे चांदीचा ओघ इंग्लंडकडे जाऊ लागला. अफूच्या व्यापारातून चीन व इंग्लंड यांच्यामध्ये इ.स. १८४० मध्ये युद्ध सुरू झाले. त्याला अफूचे पहिले युद्ध म्हणतात. या युद्धात चीनचा पराभव होउन मांचू राज्यसत्तेला इंग्रजांशी तह करावा लागला. इ.स. १८४२ मध्ये चीन व इंग्रज यांच्यातील तहाला नानकिंगचा तह म्हणतात. त्या तहानुसार इंग्लंडला कॅन्टन बंदराशिवाय इतर चार बंदरे व्यापारासाठी खुली करण्यात आली. पुढे हॅांगकॅांग बेटही इंग्रजांना मिळाले. त्याचाच फायदा घेऊन पुढील दहा वर्षात अमेरिका, फ्रान्स, बेल्जियम, हॅालंड, पोर्तुगाल, रशिया इत्यादी देशांनी चीनकडून व्यापारासाठी सवलती मिळवल्या.
अफूचे दुसरे युद्ध
संपादनइ.स. १८५६ मध्ये इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांनी चीनबरोबर युद्ध केले. त्याला अफूचे दुसरे युद्ध म्हणतात. चीनच्या मांचू सम्राटाचा पराभव होउन अफूचे दुसरे युद्ध पेकिंगच्या तहाने समाप्त झाले. या तहानुसार परकीय व्यापाऱ्यांना आणखी सहा बंदरे चीनने खुली केली. अफूच्या व्यापाराला परवानगी दिली. तसेच चीनमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांना धर्मप्रसार करण्याची परवानगी देऊन त्यांच्या संरक्षणाचे आश्वासन दिले.
इ.स. १८६० मध्ये रशियाने चीनवर आक्रमण करून चीनकडून अमूरचा किनारा मिळवला. जपाननेही इ.स. १८९४-९५ मध्ये चीनवर आक्रमण करून चीनचा पराभव केला. तसेच जपानने चीनमधील काही प्रदेशही मिळविला.
मुक्त व्यापार विषयक धोरण
संपादनचीनचे प्रत्यक्ष राजकीय विभाजन टाळण्यासाठी आणि आर्थिक लाभ उठविण्यासाठी इ.स. १८९९ साली अमेरिकेने मुक्त व्यापाराविषयक धोरणांची घोषणा केली. चीनच्या कोणत्याही भागात व्यापार करण्यासाठी सर्व देशांना समान हक्क असावेत, असे ते धोरण होते. सर्व साम्राज्यवादी राष्ट्रांनी अमेरिकेच्या या धोरणाला मान्यता दिली. परंतु रशियाने याला मान्यता न दिल्याने चीनचे विभाजन झाले नाही. परंतु पुढील काळात साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनचे मोठ्या प्रमाणात शोषण केले.
जपानमधील साम्राज्यवाद
संपादनआशिया खंडाच्या अतिपूर्व टोकावरील जपान या देशाशी पोर्तुगीज, स्पॅनिश, डच हे युरोपियन लोक व्यापार करत होते. व्यापाराबरोबर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्याचेही प्रयत्न केल्याने जपानी लोकांनी त्यांना हाकलून लावले व युरोपशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले. त्यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांच्या तुलनेत जपान हे एक मागासलेले सामंतशाही राष्ट्र होते.
इ.स. १८५०च्या दरम्यान अमेरिकेचे जपानकडे विशेष लक्ष गेले. अमेरिकेला आपला व्यापार करण्यासाठी जपान हे चांगले क्षेत्र आहे असे वाटत होते. त्यासाठी जपानशी संबंध प्रस्थापित करणे अमेरिकेला आवश्यक वाटत होते. त्यामुळे इ.स. १८५२ मध्ये अमेरिकन नाविक मोहिमेचा प्रमुख म्हणून कमोडोर मॅथ्यू पेरी याची नेमणूक करण्यात आली. इ.स. १८५३ मध्ये त्याने प्रथम जपानमधील येडो आखातात प्रवेश केला. त्याने अमेरिकन जहाजांना जपानी समुद्रात संरक्षण व व्यापारी सवलती मिळाव्यात म्हणून जपानी सरकारला विनंती केली.
कनागावा करार
संपादनमॅथ्यू पेरीच्या नौदलाचा आकार व सामर्थ्य लक्षात घेऊन जपानी सम्राटाचा पंतप्रधान तोकुगावा शोगुन याने अमेरिकेशी ३१ मार्च १८५४ रोजी कनागावा येथे व्यापारी करार केला. या करारानुसार जपानने अमेरिकेच्या १) लाकूड, कोळसा व पाणी घेण्यासाठी शिमोदा व हाकोदेत ही दोन बंदरे अमेरिकेला खुला करावीत. २) अमेरिकेचा दूत जपानमध्ये राहावा. ३)अपघातात सापडलेल्या अमेरिकन खलाशांना जपानकडून मदत मिळावी. ह्या मागण्या मान्य केल्या. या करारामुळे जपानचे अलिप्ततेचे धोरण संपुष्टात येऊन तोकुगावा शोगुनशाहीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली.
मेईजी क्रांती
संपादनअमेरिकेप्रमाणे इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि हॅालंड या देशांनीही जपानकडे व्यापारी सवलतींची मागणी केली. जपानने त्यांच्याशी करार करून त्यांना व्यापारी सवलती दिल्या. अनेक सवलतींच्या बळावर साम्राज्यवादी राष्ट्रे पुढे सरसावली. साम्राज्यवादी सत्तांनी आपल्या आधुनिक सामर्थ्यांच्या बळावर जपानकडून व्यापारी सवलती मिळवल्या. त्यामुळे जपानला आपला दुबळेपणा समजून आला. त्यानंतर जपानने साम्राज्यवादी सत्तांच्या बरोबर टिकण्यासाठी आपल्या धोरणात बदल केला. अशाप्रकारे शोगुनांच्या अनिर्बंध सत्तेला शह देणारी मेईजी क्रांती या काळात घडली.
जपानचे आधुनिकीकरण
संपादनज्या विज्ञान कलांच्या साहाय्याने साम्राज्यवादी राष्ट्रांनी जपानला नमविले त्या राष्ट्रातील बदलांचा स्वीकार करून जपानने आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल केले. आपल्या देशाचे आधुनिकीकरण घडवून आणले. आधुनिकीकरणानंतर जपानने साम्राज्यवादी धोरणाचा स्वीकार केला. जपान सारख्या चिमुकल्या राष्ट्राने आशियात साम्राज्यविस्ताराची धोरणे स्वीकारून चीन व रशियासारख्या बलाढ्य राष्ट्रांचा पराभव केला. त्याने चीनच्या ताब्यातील बराचसा प्रदेश बळकावला. तसेच कोरिया व फोर्मोसावर प्रभुत्व प्रस्थापित केले. साम्राज्यवादाचा बळी ठरलेले जपान नंतर स्वतःच आशिया खंडातील एक बलशाली साम्राज्यवादी राष्ट्र म्हणून उदयास आला.
आफ्रिकेतील साम्राज्यवाद
संपादनएकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आफ्रिकेचा अंतर्गत भाग पाश्चिमात्यांना फारसा माहित नव्हता. आफ्रिका खंडामध्ये घनदाट जंगले, विस्तीर्ण सरोवरे, बारामाही वाहणाऱ्या विशाल नद्या, मोठी वाळवंटे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे आफ्रिकेच्या अंतर्गत भागाचा शोध घेण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. म्हणून १८व्या शतकापर्यंत आफ्रिका खंड अज्ञात खंड म्हणून ओळखले जात असे.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर मात्र युरोपातील धाडसी प्रवासी मंगोपार्क, कॅप्टन स्पेक, सर सॅम्युअल बेकर, डेव्हिड लिव्हिंस्टन, स्टॅन्ले यांनी भगीरथ प्रयत्न केले व आफ्रिकेतील नाईल, नायजर, कांगो, झांबेझी इत्यादी नद्यांची खोरे प्रकाशात आणली.
त्यानंतर अमेरिकन पत्रकार स्टॅन्लेने लिहिलेल्या प्रवासवर्णनाने युरोपियन लोकांच्या मनात आफ्रिकेविषयी आकर्षण निर्माण झाले. युरोपमध्ये आफ्रिकेत वसाहती स्थापन करण्यास अनुकूल लोकमत तयार झाले. पुढील काळात आफ्रिकेतील उत्तमोत्तम प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी युरोपीय राष्ट्रांमध्ये स्पर्धा सुरू झाली. यातून आफ्रिकेत साम्राज्यवादाचा उगम झाला.
आफ्रिकेचे विभाजन व साम्राज्यविस्तार
संपादनएकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिका खंडात केलेला साम्राज्यविस्तार जगाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. इ.स. १८७० पर्यंत इंग्लंडने केप कॅालनी, नाताळ, लागोस, गोल्ड कोस्ट, झांबिया, फ्रान्सने अल्जीरिया, फ्रेंच गिनी, आयव्हरी कोस्ट, तर पोर्तुगीजांनी मोझांबिक, अँगोला या किनारी प्रदेशात आपल्या वसाहती स्थापन केल्या.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेत वसाहत निर्माण करण्याचा पहिला मान बेल्जियमने पटकाविला. बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्डच्या प्रयत्नातून कांगो नदीच्या खोऱ्यात बेल्जियमचे राज्य निर्माण झाले. बेल्जियमनंतर इंग्लंड, जर्मनी, फ्रांस, इटली, पोर्तुगाल, हॅालंड या युरोपीय राष्ट्रांनी सुद्धा आफ्रिकेतील वेगवेगळ्या प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
इंग्लंड
संपादनइंग्लंडने आफ्रिकेच्या नायजर नदीच्या खोऱ्यात आपल्या वसाहती स्थापन केल्या. तसेच केप कॅालनी, सुदान, युगांडा, ऱ्होडेशिया, ब्रिटिश पूर्व आफ्रिका, झांबिया, नायजेरिया इत्यादी प्रदेशावरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तसेच सुवेझ कालव्याच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून इंग्लंडने इजिप्तचा ताबा घेतला.
डच
संपादनडचांनी केप कॅालनी, नाताल, ऑरेंज फ्री स्टेट, ट्रान्सवाल या भागात आपल्या वसाहती स्थापन केल्या.
फ्रान्स
संपादनफ्रान्सने सेनेगल नदीच्या वरच्या दिशेने पुढे सरकण्यास सुरुवात केली. त्यांनी सहारा वाळवंटाचा प्रदेश, अल्जीरिया, कांगो, मादागास्कर बेट तसेच मोरोक्को या प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
जर्मनी
संपादनजर्मनीने नेर्ऋत्य आफ्रिका, कॅमेरून, पूर्व आफ्रिका या प्रदेशांवर आपल्या वसाहती स्थापन केल्या.
स्पेन
संपादनस्पेनने रिओ-डी-ओरो या प्रदेशावर तसेच मोरोक्कोच्या उत्तर भागावर व गिनीकोस्ट मधील काही बेटांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
पोर्तुगीज
संपादनपोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेश, अंगोला प्रांत, मोझांबिक येथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
इटली
संपादनइतर युरोपीयन देशांप्रमाणेच इटली या देशाने सुद्धा आफ्रिकेचा काही प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. इटलीने इरिट्रिया व सोमालिया तसेच त्रिपोली व सायरेनिका या प्रदेशांवर आपला ताबा मिळवला.
अशाप्रकारे इथियोपिया व लायबेरिया वगळता संपूर्ण आफ्रिका खंडावर युरोपीयन राष्ट्रांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. युरोपीय राष्ट्रांनी या वसाहतींची सर्व दृष्टीने पिळवणूक केली त्यामुळे युरोपातील राष्ट्रे श्रीमंत बनली.
साम्राज्यवादाचे परिणाम
संपादनइतरांच्या प्रदेशावर वर्चस्व निर्माण करण्याची आधुनिक काळातील साम्राज्यलालसा जगाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारी ठरली. या साम्राज्यवादाचे जगावर इष्ट आणि अनिष्ट असे दोन्ही प्रकारचे परिणाम घडून आले.
साम्राज्यवादाचे इष्ट परिणाम
संपादनभौतिक सुधारणा
संपादनयुरोपियांनी वसाहतींवर आपला अंमल राखण्यासाठी काही सुधारणा केल्या. सैन्याच्या जलद हालचालींसाठी व अंतर्गत दळणवळासाठी रस्ते, रेल्वे, पोस्ट, तारयंत्रे, विमाने, कालवे इ. सोयी उपलब्ध केल्या. या भौतिक सुधारणांचा जसा पाश्चाच्यांना फायदा झाला तसा तेथील जनतेला झाला. तसेच लोक एकमेकांच्या जवळ येऊन त्यांच्यात वैचारिक देवाण-घेणाव सुरू झाली.
शिक्षणाचा प्रसार
संपादनसाम्राज्यवादी राष्ट्रांनी आपल्या व्यापाराच्या भरभराटीसाठी व धर्मप्रसारासाठी काही ठिकाणी मानवतावादी दृष्टीने शिक्षणाला चालना दिली. पाश्चात्य राष्ट्रातील शिक्षणाचे वारे वसाहतीतही वाहू लागले. वसाहतीतील कारभार पाहण्यासाठी आपल्या देशातून लोकांना आणण्यापेक्षा स्थानिक लोकांनाच शिक्षण देऊन कारकून बनविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यातूनच वसाहतींत शिक्षणाचा प्रसार होत गेला.
वैचारिक परिवर्तन
संपादनजगाच्या कानाकोपऱ्यातील विचार साम्राज्यवादामुळे एकमेकांना समजू लागले. वसाहतीतील लोक युरोपियांच्या संपर्कात आल्यानंतर पाश्चात्यांच्या नवीन विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. पाश्चात्य राष्ट्रांनीच नव्या कल्पना, शास्त्र, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कायदा, राज्यपद्धती यांची ओळख वसाहतीतील लोकांना करून दिली. त्यांच्यामुळेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद, समाजवाद, साम्यवाद, लोकशाही या प्रगत विचारांची ओळख वसाहतवाल्यांना झाली. त्यामुळे समाजसुधारक, धर्मसुधारक, विचारवंत यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा नाहीसे करून पुरोगामी विचार रुजविण्याचा प्रयत्न केला.
नवनेतृत्वाचा उदय
संपादनयुरोपियन राष्ट्रांनी आफ्रिका, आशिया खंडावर आपले प्रभुत्व निर्माण केले होते. वसाहतीमधील राजसत्ता, सरंजांमदार यांचा त्यानी बिमोड केला आणि एकछत्री अंमल निर्माण केला. पाश्चात्य शिक्षणाने जागृत झालेल्या मध्यमवर्गाने पाश्चात्यांचा साम्राज्यवादास विरोध सुरू केला. अशाप्रकारे मध्यमवर्गामधून पुढे आलेल्या लोकांनी नेतृत्व करून स्वातंत्र्यलढे यशस्वी केले.
साम्राज्यवादाचे अनिष्ट परिणाम
संपादनगुलामांचा व्यापार
संपादनसाम्राज्यवादाचा सर्वात मोठा अनिष्ट परिणाम म्हणजे आफ्रिका खंडात गुलामांचा व्यापार मोठ्या प्रमाणात फोफावणे होय. साम्राज्यवादी राष्ट्र वसाहतीतील लोकांना अमानुष वागणुक देत होते. त्यांनी स्वस्त दरात मजूर मिळावेत म्हणून गुलामांचा व्यापार सुरू केला. त्यामुळे वसाहतीतील लोकांचा जीवन हलाखीचे व कष्टाचे झाले.
नीतीमूल्यांचा ऱ्हास
संपादनआपले राज्य टिकावे याकरिता राज्यकर्तांनी फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबिले. त्यांनी वसाहतीतील वेगवेगळ्या जमातीत भाडणे लावून त्यांच्यात द्वेष भावना निर्माण केली. द्वेष, हिंसा, स्वार्थीपणा, भोगविलासी वृत्ती यामुळे सुखी जीवन जगणाऱ्या वसाहतीत नीतीमूल्यांची पायमल्ली होत राहिली. त्यामुळे वसाहतीतील वातावरण द्वेषाचे झाले.
आर्थिक पिळवणूक
संपादनआपल्या कारखानदारीकरीता कच्चा माल मिळवणे व पक्क्या मालाची बाजारपेठ मिळवणे यासाठी युरोपीय राष्ट्रांत स्पर्धा सुरू झाली. त्यांनी मागास प्रदेशावर ताबा मिळवून वसाहतींची आर्थिक पिळवणूक केली. त्यामुळे एकेकाळी समृद्ध असलेली ही राष्ट्रे दरिद्री बनली.
मागासलेली राष्ट्रे पारतंत्र्यात
संपादनआपल्या राष्ट्राच्या विकासासाठी साम्राज्यवादी राष्ट्रांनी मागासलेल्या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित केले. तेथील लोकांवर आपल्या मर्जीप्रमाणे राज्यकारभार केला. साम्राज्यवादाने जगातील अनेक राष्ट्रे पारतंत्र्यात जखडली गेली. साम्राज्यवादी राष्ट्रांच्या प्रभावाखाली दडपलेल्या राष्ट्रांना मुक्ती मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.
शस्त्रास्त्र स्पर्धा
संपादनयुरोपीय राष्ट्रातील साम्राज्यस्पर्धेमुळे जागतिक राजकारणातील तणाव वाढत गेले. प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या धोरणाविषयी साशंक बनले. प्रत्येक राष्ट्र आत्मरक्षणासाठी लष्कर तयार करू लागले. शस्त्रास्त्र निर्मितीत स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक साम्राज्यवादी राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राकडे संशयाने पाहू लागले. इतरांवर राज्य करण्याची आसुरी वृत्ती साम्राज्यवादाने उदयास आली. छोट्या-मोठ्या संघर्षाचे मोठे रूप निर्माण होवू लागले. त्यामुळे साम्राज्यवादातूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडून इ.स. १९१४ साली पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला.
साम्राज्यवादाची कारणे
संपादनप्रबोधन चळवळीतून आकारास आलेल्या युरोपीय राष्ट्रांमध्ये साम्राज्यवादाची लालसा निर्माण झाली होती. १७व्या शतकापासून सुरू झालेल्या या साम्राज्यवादाला अनेक घटक कारणीभूत ठरले.
वैज्ञानिक शोध
संपादन
|
|
जॅान के पासून राईट बंधूंपर्यंतच्या संशोधकांनी लावलेल्या अद्भुत शोधांमुळे मानवी जीवन गतिमान झाले. बाष्पशक्ती, विद्युतशक्ती, कोळसा, लोखंड यांच्या शोधांमुळे वाहतूक व दळणवळण क्षेत्रात प्रचंड गतिमानता आली. विज्ञानाने आधुनिक शस्त्रांचीही निर्मिती केली. विज्ञानामुळे मानवातील अतिमहत्त्वाकांक्षा जागी झाली. त्यामुळे अनेक राष्ट्रांमध्ये साम्राज्यवाद वाढीस लागला.
औद्योगिक क्रांती
संपादनऔद्योगिक क्रांतीमुळे आधुनिक साम्राज्यवादाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. यंत्रामुळे उत्पादनाचा वेग वाढला. मालाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे तयार झालेल्या मालाची देशांतर्गत विक्री होणे अशक्य झाले. त्यातून नवीन बाजारपेठांचा शोध सुरू झाला. यातून साम्राज्यवाद वाढीस लागला.
कच्च्या मालाची आवश्यकता
संपादनऔद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. कच्चा माल कमी पडू लागला. युरोपीय राष्ट्रांमध्ये स्वतःचा माल विकण्याची स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर आपला माल स्वस्त किंमतीत विकणे आवश्यक होते. त्याकरिता उत्पादनखर्च कमी करणे आणि कच्चा माल स्वस्त दरात मिळविणे या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. कच्चा माल मिळविण्याकरीता वसाहत हेच चांगले साधन होते. यासाठी युरोपीय राष्ट्रे अशिया व आफ्रिका खंडाकडे वळली.
आशिया व आफ्रिका खंडाची संपन्नता
संपादनआशिया व आफ्रिका खंडातील राष्ट्रे नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न होती. सोने-चांदी, हिरे, लोखंड, कोळसा, या खनिज पदार्थांचे साठे आफ्रिका खंडात विपुल प्रमाणात होते. आशिया खंडात मसाल्याच्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते. या भूभागातील वसाहती आपल्या ताब्यात असल्यास तेथील खनिज संपत्ती आपल्या मालकीची होईल. त्यातून आपणास प्रचंड फायदा मिळवता येईल आणि आपला देश अधिक संपन्न होईल. या भूमिकेतून युरोपीय राष्ट्रे आशिया व आफ्रिका खंडाकडे वळाली.
युरोपातील नवोदित राष्ट्रे
संपादनएकोणिसाव्या शतकात जर्मनी आणि इटली यांचे एकीकरण होऊन ही नवीन राष्ट्रे उदयास आली. इंग्लंडसारख्या राष्ट्राचे प्रचंड साम्राज्य असावे व आपल्याकडे साध्या वसाहती नसाव्यात याची खंत नवोदित राष्ट्रांना वाटू लागली. ही राष्ट्रे वसाहती मिळवण्यासाठी प्रयत्नशील झाली. त्यांनी आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. जर्मनी, इटलीच्या साम्राज्यवादी स्पर्धेमुळे जगात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. युरोपात नव्याने उदयास आलेल्या राष्ट्रांमुळे साम्राज्यवाद वाढीस लागला.
राजकीय वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा
संपादनवसाहती जिंकून घेणे आणि त्या दीर्घकाळ आपल्या ताब्यात ठेवणे यासाठी त्या वसाहतींचे संरक्षण करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी सागरातील व जमिनीवरील लष्करी ठाणी जिंकून घेण्याची स्पर्धा युरोपीय राष्ट्रांमध्ये सुरू झाली. आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा वाढावी यासाठी युरोपीय राष्ट्रे साम्राज्यविस्तार करू लागली. एखाद्या देशाचे मोठेपण त्याच्या ताब्यात असलेल्या वसाहतींवरून ठरू लागले. या साम्राज्यवादाच्या विकासातून युरोपीय राष्ट्रांमध्ये परस्परांविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक राष्ट्र आपल्या रक्षणाची जय्यत तयारी करू लागले. त्यातून राष्ट्रांमध्ये वसाहती मिळवण्यासाठी स्पर्धा वाढतच गेली.
धर्मप्रसार
संपादनख्रिस्ती धर्माचा प्रसार जगभर व्हावा अशी युरोपीयांची इच्छा होती. त्यांचा धर्म व संस्कृती जगात सर्वांत श्रेष्ठ आहे अशी त्यांची समजूत होती. इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवले ते हाती 'तराजू व बायबल' घेऊन. यातील तराजू हे व्यापाराचे व बायबल हे धर्म प्रसाराचे प्रतीक होते. वसाहती स्थापन केल्यानंतर अनेक धर्मप्रसारक तेथे पोहोचले. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी अनेक मिशनरीज स्थापन झाल्या. त्यातून साम्राज्यवाद वाढीस लागला.
आशिया व आफ्रिका खंडातील राष्ट्रांचा दुबळेपणा
संपादनज्या काळात आधुनिक साम्राज्यवादाचा विकास होत होता त्या काळात आशिया व आफ्रिका ही खंडे विस्ताराने मोठी होती. परंतु मध्ययुगातील अनेक आक्रमणे, सरंजामशाही, शेती, व्यापार उद्योगाचा ऱ्हास यांमुळे राजकीय व आर्थिकदृष्ट्या मागासलेली होती. धर्म, पंथ, भाषा यांच्यामध्ये समाज विभागला होता. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असलेल्या युरोपीय राष्ट्रांनी या दुबळेपणाचा फायदा साम्राज्यविस्तारातून घेतला.
आर्थिक साम्राज्यवाद
संपादनअप्रगत राष्ट्रावर आर्थिक व राजकीय वर्चस्व मिळवून तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग आपल्या देशासाठी करणे हे नव्या साम्राज्यवादाचे प्रमुख उद्दिष्ट होते. अशा प्रकारच्या साम्राज्यवादाला आर्थिक साम्राज्यवाद असे म्हणतात.
अठराव्या शतकात [औद्योगिक क्रांती] प्रथम इंग्लंडमध्ये झाली, म्हणून इंग्लंडला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर म्हणले जाते. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा प्रसार युरोपीय राष्ट्रांमध्ये झाला. या औद्योगिक क्रांतीने भांडवलशाहीला जन्म दिला. व्यापारी कंपन्यांमुळे युरोपातील देशांची आर्थिक भरभराट होत होती. आर्थिक भरभराटीतून इंग्लंटमधील धनसंचय वाढीस लागला. त्यातून युरोपात भांडवलशाही अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली.
भांडवलशाहीच्या विस्तारातून नव्या प्रकारचा साम्राज्यवाद अस्तित्वात आला. औद्योगिकीकरण झालेल्या युरोपीय राष्ट्रांनी व्यापार वाढीसाठी साम्राज्य विस्ताराचे धोरण स्वीकारले. अशा प्रकारे जगात आर्थिक साम्राज्यवाद वाढीस लागला.
एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आर्थिक वर्चस्व प्रस्तापित करणे यालाच आर्थिक साम्राज्यवाद म्हणतात
साम्राज्यवादाची विविध रूपे
संपादनयुरोपीय राष्ट्रांनी साम्राज्यवादी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपापल्या गरजेनुसार आशिया आणि आफ्रिका खंडावर वेगवेगळ्या प्रकारे आपले वर्चस्व प्रस्थापित केेले. राजकीय गुलामगिरी लादणे, एखाद्या देशाला संरक्षण देउ करणे, व्यापारी करार परक्या देशांच्या गळी उतरवणे, स्वतःची व्यापारी मक्तेदारी निर्माण करणे आणि जेथे शक्य असेल तेथे फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करणे यांचा समावेश होता.
साम्राज्यविस्तार केलेल्या प्रदेशांत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून साम्राज्यवादी राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडावर आपली संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात आर्थिक साम्राज्यवादाचे स्वरूप अधिक व्यापक बनले. कच्चा मालासाठी वसाहती काबीज करणे आणि त्याच प्रदेशात पक्क्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठा उपलब्ध करणे, लष्करीदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे आपल्या ताब्यात घेणे, आपल्या ताब्यातील वसाहतींची आर्थिक लूट करणे आणि स्वतःच्या देशाची अर्थव्यवस्था संपन्न करणे, त्यासाठी त्यांनी वसाहतींवर वेगवेगळे निर्बंध लादले आणि आपल्या देशासाठी अनेक सवलती मिळविल्या.