सचिन तेंडुलकर
विशेष लेख |
---|
या लेखातील मार्च १९, इ.स. २०१२ च्या रात्री ११.३३ (ग्रीनीच प्रमाणवेळ) वाजता केला गेलेला बदल हा मराठी विकिपीडियावरील १०,००,०००वा बदल होता. |
सचिन रमेश तेंडुलकर ( २४ एप्रिल, इ.स. १९७३, मुंबई) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. इ.स. २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती.[१] २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. इ.स. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेट खेळाडू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते.[ संदर्भ हवा ]
सचिन तेंडुलकर | ||||
भारत | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
पूर्ण नाव | सचिन रमेश तेंडुलकर | |||
उपाख्य | मास्टर ब्लास्टर, तेंडल्या, सच्चू [२] | |||
जन्म | २४ एप्रिल, १९७३ | |||
भारत | ||||
उंची | ५ फु ५ इं (१.६५ मी) | |||
विशेषता | फलंदाज | |||
फलंदाजीची पद्धत | उजखोरा | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने लेग ब्रेक/ऑफ ब्रेक/मध्यमगती | |||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
एकदिवसीय शर्ट क्र. | १० | |||
राष्ट्रीय स्पर्धा माहिती | ||||
वर्ष | संघ | |||
१९८८ | सीसीआय | |||
१९९२ | यॉर्कशायर | |||
१९८८ | मुंबई | |||
२००८ | मुंबई इंडियन्स | |||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | ए.सा. | प्र.श्रे. | लि.अ. | |
सामने | २०० | ४६३ | ३०७ | ५५१ |
धावा | १५,९२१ | १८४२६ | २५२२८ | २१९९९ |
फलंदाजीची सरासरी | ५३.७९ | ४४.८३ | ५७.८६ | ४५.५४ |
शतके/अर्धशतके | ५१/६८ | ४९/९६ | ८१/११४ | ६०/११४ |
सर्वोच्च धावसंख्या | २४८* | २००* | २४८* | २००* |
चेंडू | ४२१० | ८०५४ | ७५६३ | १०२३० |
बळी | ४५ | १५४ | ७० | २०१ |
गोलंदाजीची सरासरी | ५४.६८ | ४४.४८ | ६२.१८ | ४२.१७ |
एका डावात ५ बळी | ० | २ | ० | २ |
एका सामन्यात १० बळी | ० | n/a | ० | n/a |
सर्वोत्तम गोलंदाजी | ३/१० | ५/३२ | ३/१० | ५/३२ |
झेल/यष्टीचीत | ११५/– | १४०/– | १८६/– | १७५/– |
१५ जून, इ.स. २०१३ |
पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय वायुसेना दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला ते पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिन यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला. तेंडुलकर हे राज्यसभेचे खासदारही होते.[ संदर्भ हवा ]
सुरुवातीचे दिवस
संपादनसचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८/ १९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.[ संदर्भ हवा ]
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
संपादनसचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादीर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. डिसेंबर १८ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. वरील मालिकेनंतर न्यू झीलंडच्या दौऱ्यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात (नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या) जॉन राईटने सचिनचा झेल पकडला ज्यायोगे सचिन जगातला सर्वात तरुण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या इंग्लंडच्या दौऱ्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकवले. परंतु ह्या काळात त्याच्याकडून फारश्या लाक्षणिक खेळ्या झाल्या नाहीत. तेंडुलकरला खरा सुर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो (बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलिया) मालिकावीर राहिला आहे.[ संदर्भ हवा ]
सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर ९, इ.स. १९९४ साली कोलंबो, श्रीलंका येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली. सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले.[ संदर्भ हवा ]
१९९७ साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेट खेळाडू घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा १००० कसोटी धावा केल्या. ह्याची सचिनने १९९९, २००१ आणि २००२ साली पुनरावृत्ती केली.[ संदर्भ हवा ]
तेंडुलकरच्या नावे एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे. हा पराक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे (१९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३). १९९८ साली त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही.त्याने कसोटी मध्ये ४९ शतके तर वन -डे मध्ये ५१ शतकाचा विक्रम अजून कोणी मोडू शकला नाही. सचिनने वयाच्या अकराव्या वर्षी क्रिकेट स्वीकारले आणि १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध कराची येथे सोळाव्या वर्षी कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि जवळजवळ चोवीस वर्षे आंतरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईचे प्रतिनिधित्व केले. २००२ मध्ये, कारकिर्दीच्या अर्ध्या पलीकडे, विस्डेन क्रिकेट खेळाडू्सच्या अॅलमॅनॅकने त्याला डॉन ब्रॅडमन आणि व्हिव्ह रिचर्ड्सच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वनडे फलंदाज म्हणून स्थान दिले. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी, सचिनने २०११ वल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होता, सहा वर्ल्डकपमध्ये भारतासाठी केलेला हा पहिला विजय. २००३ च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेच्या आवृत्तीत त्याला यापूर्वी “प्लेयर ऑफ द टूर्नामेंट” म्हणून गौरविण्यात आले होते.[ संदर्भ हवा ]
सचिनने १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, १९९९ आणि २००० मध्ये अनुक्रमे पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार, भारताचा चौथा आणि दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार. १६ नोहेंबर२०१३ रोजी झालेल्या अंतिम सामन्याच्या काही तासांनंतर पंतप्रधान कार्यालयाने त्यांना भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर केला. तो आत्तापर्यंतचा सर्वात तरुण प्राप्तकर्ता आणि पुरस्कार मिळविणारा प्रथम खेळाडू आहे. त्याने आयसीसी पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडूसाठी सर गारफिल्ड सोबर्स करंडकही जिंकले. २०१२ मध्ये तेंडुलकर यांना भारतीय संसदेच्या वरील सभागृहात राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली. भारतीय वायुसेनेद्वारे ग्रुप कॅप्टनचा मानद रँक मिळवून देणारा तो पहिला खेळपटू आणि विमानचालन पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस होता. २०१२ मध्ये त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा मानद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
२०१० मध्ये, टाईम मासिकाने सचिनला “जगातील सर्वाधिक प्रभावशाली लोक” म्हणून निवडले जाणाऱ्या वार्षिक टाईम १०० च्या यादीमध्ये समाविष्ट केले. डिसेंबर २०१२ मध्ये सचिनने वनडेमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑक्टोबर २०१३ मध्ये ट्वेन्टी -२० क्रिकेटमधून निवृत्त झाले आणि त्यानंतर वेस्ट इंडीज विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वे कसोटी सामना खेळल्यानंतर १६ नोव्हेंबर २०१३ रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या.[३]
गोलंदाजी
संपादनतेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येत असे. आणि बऱ्याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरत असे. जरी त्याची गोलंदाजीची सरासरी ५० च्या वर असली, त्याला 'जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज' समजण्यात येते.[४][५]
अनेक वेळा[६] सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. खालील सामन्यांमध्ये तेंडुलकरची गोलंदाजी प्रभावी ठरली -
- १९९७-९८ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या[७] मालिकेत कोची येथे ५ बळींची कामगिरी. २६९ धावांचे लक्ष्य समोर असताना ३१ व्या षटकात ऑस्ट्रेलियाची २०३/३ अशी मजबूत स्थिती होती. सचिनने १० षटकात केवळ ३२ धावा देऊन मायकेल बेव्हन, स्टीव वॉ, डी.एस.लेमन, टॉम मूडी आणि डीन मार्टिन ह्यांना बाद करून सामना भारताच्या बाजूने वळवला.
- १९९३ सालचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील हिरो कप उपांत्य सामन्यामधील शेवटचे षटक. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी एक षटक शिल्लक असताना ६ धावांची गरज होती. सचिनने त्या सामन्यात एकही धाव न देता तीन चेंडू टाकले व संपूर्ण षटकात केवळ तीन धावा देऊन भारताला सामना जिंकून अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत केली.[८]
- शारजामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध[९] १० षटकांत ४/३४ची कामगिरी केली. त्यामुळे विंडीजचा डाव १४५ धावांत आटोपला.
- आय सी सी १९९८ मधील उपांत्यपूर्व फेरीमध्ये ढाक्कामध्ये त्याने १२८ चेंडूंत १४१ धावा केल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ बळी मिळवून भारताचा उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा मार्ग.
प्रसिद्ध खेळी
संपादनकसोटी क्रिकेट
संपादनधावा | प्रतिस्पर्धी | ठिकाण (वर्ष) | निकाल |
---|---|---|---|
११९ नाबाद | इंग्लंड | मॅंचेस्टर (१९९०) | अनिर्णित |
१४८ | ऑस्ट्रेलिया | सिडनी (१९९१-९२) | अनिर्णित |
११४* | ऑस्ट्रेलिया | पर्थ (१९९१-९२) | ऑस्ट्रेलिया |
१२२ | इंग्लंड | बर्मिंगहॅम (१९९६) | इंग्लंड |
१६९ | दक्षिण आफ्रिका | केप टाऊन (१९९६-९७) | दक्षिण आफ्रिका |
१५५ नाबाद | ऑस्ट्रेलिया | चेन्नई (१९९७-९८) | भारत |
१३६ | पाकिस्तान | चेन्नई (१९९८-९९) | पाकिस्तान |
१५५ | दक्षिण आफ्रिका | ब्लूमफॉॅंटेन (२००१-०२) | दक्षिण आफ्रिका |
१७६ | वेस्ट इंडीज | कोलकाता (२००२-०३) | अनिर्णित |
२४१ नाबाद | ऑस्ट्रेलिया | सिडनी (२००४) | अनिर्णित |
१५४ नाबाद | ऑस्ट्रेलिया | सिडनी (२००८) | ऑस्ट्रेलिया |
* १८ वर्षाचा असताना वाकाच्या उसळत्या खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या या खेळीला स्वतः तेंडुलकर आपली सर्वोत्त्कृष्ट खेळी मानतो.
एकदिवसीय क्रिकेटचा देव
संपादनधावा | प्रतिस्पर्धी | ठिकाण (वर्ष) | निकाल |
---|---|---|---|
९० [१०] | ऑस्ट्रेलिया | मुंबई (१९९६ वि.च.+) | ऑस्ट्रेलिया |
१०४ | झिम्बाब्वे | बेनोनी (१९९७) | भारत |
१४३ | ऑस्ट्रेलिया | शारजाह (१९९८) | ऑस्ट्रेलिया |
१३४ | ऑस्ट्रेलिया | शारजाह (१९९८) | भारत |
१२४ | झिम्बाब्वे | शारजाह (१९९८) | भारत |
१८६ नाबाद | न्यू झीलंड | हैदराबाद (१९९९) | भारत |
९८ | पाकिस्तान | सेंच्युरीयन (२००३ वि.च.) | भारत |
१४१ | पाकिस्तान | रावळपिंडी (२००४) | पाकिस्तान |
१२३ | पाकिस्तान | अमदावाद (२००५) | पाकिस्तान |
९३ | श्रीलंका | नागपूर (२००५) | भारत |
२०० नाबाद | दक्षिण आफ्रिका | ग्वाल्हेर (२०१०) | भारत |
११४ | बांगलादेश | मिरपूर (२०१२)** | भारत |
+वि.च.-विश्वचषक **आंतरराष्ट्रीय सामन्यांतील १००वे शतक
कामगिरी
संपादनकसोटी क्रिकेट
संपादनतेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतील ठळक कामगिरी,
- विस्डेनतर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या (डॉन ब्रॅडमननंतरच्या) सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान [१][११]
- सर्वाधिक कसोटी शतकांचा (३५) विक्रम, जो आधी सुनील गावसकरच्या नावे होता (३४ शतके). हा विक्रम सचिनने दिल्लीमध्ये २००५ साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना नोंदवला.
- सर्वाधिक क्रिकेट मैदानांवर खेळाचा विक्रम: सचिन आत्तापर्यंत ५२ मैदानांवर कसोटी क्रिकेट खेळलेला आहे. हा आकडा मोहम्मद अझहरुद्दीन (४८), कपिल देव (४७), इंजमाम उल-हक (४६) आणि वसिम अक्रम (४५) पेक्षा जास्त आहे.
- सर्वात जलद १०००० धावा कसोटी सामन्यांमध्ये करण्याचा विक्रम: हा विक्रम ब्रायन लारा आणि सचिन ह्या दोघांच्या नावे आहे. दोघांनीही हा विक्रम १९५ डावांमध्ये केला.
- एकूण कसोटी धावांमध्ये पहिला क्रमांक .
- सर्वोच्च फलंदाजीची सरासरी: ५३.७९. ही सरासरी कोणत्याही ११,००० धावा केलेल्या फलंदाजापेक्षा जास्त आहे.
- सचिन हा १०,००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे.
- त्याच्या नावे ३७ कसोटी बळी आहेत (डिसेंबर १४, २००५).
- दुसऱ्या क्रमांकाचा जलद ९,००० धावा करणारा फलंदाज. (ब्रायन लाराने ९००० धावा १७७ डावांमध्ये केल्या, सचिनने १७९ डावांमध्ये ती कामगिरी केली).
- नोव्हेंबर १६, इ.स. २०१३ रोजी, आपली कारकीर्द सुरू केल्याच्या २४ वर्षे १ दिवसांनी तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
एकदिवसीय क्रिकेट
संपादनतेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ठळक कामगिरी:
- सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम.
- सर्वाधिक (५०) वेळा सामनावीर बनण्याचा विक्रम.
- सर्वाधिक (८९ वेगवेगळ्या) मैदानांवर खेळण्याचा विक्रम.
- सर्वाधिक धावा (१८४२६ धावा).
- सर्वाधिक शतके (४९).
- पुढील संघांविरुद्ध सर्वाधिक शतके: ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यू झीलंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वे.
- १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,०००, १५,०००, १६,०००, १७,०००, १८,००० धावांचे लक्ष्य प्रथम आणि सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज.
- एकदिवसीय सामन्यांमध्ये १५,००० धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज.
- १०० डांवांमध्ये ५० अथवा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज.
- १००हून अधिक बळी (मार्च २४, २०११ पर्यंत १५४ बळी).
- ज्या फलंदाजांनी सर्वाधिक वनडे (९६) अर्धशतक केले [१२]
- भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम (१९९९ साली न्यू झीलंडविरुद्ध केलेल्या १८६ धावा)
- एका वर्षात १,००० अथवा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम. ही कामगिरी त्याने आत्तापर्यंत सहा वेळा केलेली आहे - १९९४, १९९६, १९९७, १९९८, २००० आणि २००३.
- १९९८ साली त्याने १,८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम आत्तापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही.
- १९९८ साली त्याने ९ एकदिवसीय शतके झळकवली. इतकी शतके आत्तापर्यंत कोणत्याही फलंदाजाने व कोणत्याही एका वर्षात केलेली नाहीत.
- फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच २०० धावा फटकावण्याचा विक्रम.
- १०,००० पेक्षा अधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक फलंदाजीची सरासरी (मार्च २४, २०११ पर्यंत).
विश्वचषक
- विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक धावा (५९.७२ च्या सरासरीने १७३२ धावा).
- २००३ सालच्या विश्वचषकामध्ये मालिकावीर.
- २००३ सालच्या विश्वचषकामध्ये ६७३ धावा. ह्या कोणीही कोणत्याही एका विश्वचषकामध्ये केलेल्या धावांपेक्षा अधिक आहेत.
२३ डिसेंबर २०१२मध्ये तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली.
आय.पी.एल.
संपादनतेंडुलकर इंडियन प्रीमियर लीगI.P.L.च्या मुंबई इंडियन्स संघाकडून त्यांचा आयकॉन प्लेयर म्हणून खेळतो. २००८ च्या आय.पी.एल. मोसमात पहिल्या तीन सामन्यात त्याला दुखापतीमुळे खेळता आले नाही. मे २६, २०१३ रोजी त्याने आय.पी.एल.मधून निवृत्ती जाहीर केली.
इतर
संपादन- सचिन तेंडुलकर हा तिसऱ्या पंचाकडून धावचीत केला गेलेला पहिला फलंदाज आहे. हा निर्णय १९९२ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना देण्यात आला.
- सचिन हा (१९९२ साली) यॉर्कशायर क्रिकेट काउंटी क्लबमध्ये खेळणारा पहिला परदेशी फलंदाज आहे.
- विशेष म्हणजे, विस्डेनने सचिनच्या एकाही कामगिरीची नोंद सर्वोच्च १०० फलंदाजीच्या खेळ्यांमध्ये केलेली नाही.
- लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड २०२०[१३]
- सचिनच्या नावावर अनेक न मोडता येणारे विक्रम आहेत.
छायाचित्रे
संपादनसामनावीर पारितोषिके
संपादनकसोटी क्रिकेटमध्ये १० पुरस्कार
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५२ पुरस्कार
संपादन# दिनांक विरुद्ध स्थळ १ १९९०-९१ श्रीलंका पुणे २ १९९१-९२ वेस्ट इंडीज शारजा ३ १९९१-९२ दक्षिण आफ्रिका कोलकाता ४ १९९१-९२ वेस्ट इंडीज मेलबोर्न ५ १९९१-९२ पाकिस्तान सिडनी ६ १९९१-९२ झिम्बाब्वे हॅमिल्टन, न्यू झीलंड ७ १९९३-९४ न्यू झीलंड ऑकलंड ८ १९९४ ऑस्ट्रेलिया कोलंबो ५० मार्च १६ २००४ पाकिस्तान रावळपिंडी ५१ जुलै २१ २००४ बांगलादेश सिंहली स्पोर्टस क्लब मैदान ५२ सप्टेंबर १४ २००६ वेस्ट इंडीज कुआलालंपूर[१४]
पाकिस्तानविरुद्धची कामगिरी
संपादनभारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सचिनची कामगिरी हा नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंवर नेहमीच दडपण असते आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात खेळाडू आपल्या खेळाचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करतात असे समजले जाते.
तेंडुलकर आत्तापर्यंत पाकिस्तानशी १६ कसोटी सामने खेळला आहे. ह्या सामन्यांमध्ये त्याने ३९.९१ च्या सरासरीने ९१८ धावा केल्या आहेत. त्याच्या एकूण सरासरीपेक्षा (५५.३९) ही सरासरी कमी आहे. पाकिस्तानविरुद्धचा त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या १९४; ही सुद्धा त्याच्या एकंदरीत सर्वोच्च धावसंख्येपेक्षा (२४८) कमी आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनची कामगिरी त्यामानाने चांगली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या ६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.५८ च्या सरासरीने २१२२ धावा केल्या आहेत. त्याच्या एकंदरीत एकदिवसीय सामन्यांची सरासरी ४४.२० आहे.
टीका आणि अलीकडील कामगिरी
संपादनविस्डेनने आपल्या २००५ सालच्या अंकात सचिनबद्दल पुढील वक्तव्य केले, मुंबईच्या खेळपट्टीवरील सचिनची ५५ धावांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी सोडली, तर सचिनची २००३ नंतरची फलंदाजी पाहणे हा तितकासा उत्कंठावर्धक अनुभव नव्हता. २००३ सालानंतर सचिनच्या फलंदाजीत राजेशाही, आक्रमक व जोशपूर्णवरून यांत्रिक व बचावात्मक असे स्थित्यंतर येत गेले.
वरील टीका सचिनच्या आत्ताच्या कामगिरीची तुलना त्याच्या १९९४-९९ काळाच्या कामगिरीशी करून (ज्यावेळेस सचिन खेळाच्या दृष्टीने ऐन तारुण्यात म्हणजे २० ते २५ वर्षे वयाचा होता अशावेळी) झालेली दिसते. तेंडुलकरला १९९४ साली ऑकलंड येथे न्यू झीलंडविरुद्ध फलंदाजीसाठी सलामीला पाठवण्यात आले [१५]. त्यावेळी त्याने ४९ चेंडूंत ८२ धावा केल्या. ही सचिनच्या सुवर्णयुगाची नांदी होती. तिची परिणती १९९८-९९ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धडाकेबाज खेळामध्ये झाली. ह्या सचिनच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न गमतीत म्हणाला होता की सचिननामक फलंदाजीच्या झंझावाताची मला भयानक स्वप्ने पडतात.[१६].
भारताच्या १९९९ सालच्या पाकिस्तान दौऱ्यात सचिनचे पाठदुखीचे दुखणे उफाळून आले. ह्यात भारताला चेपॉकमधील सामन्यात सचिनने शतक झळकवले असतानाही ऐतिहासिक पराभव स्वीकारावा लागला. ह्यातच भरीस भर म्हणजे, १९९९ चे क्रिकेट विश्वकपचे सामने चालू असताना सचिनचे वडील, प्राध्यापक रमेश तेंडुलकर ह्यांचे निधन झाले. त्यानंतर मोहम्मद अझहरुद्दीनकडून कप्तानपद स्वीकारलेल्या सचिनचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. तिथे त्याच्या संघाला नुकतेच विश्वविजेतेपद पटकावलेल्या यजमान संघाकडून ३-० असा दारुण पराभव स्वीकारावा लागला[१७]. त्यानंतर तेंडुलकरने कप्तानपदाचा राजीनामा दिला आणि सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या कप्तानपदाची धुरा सांभाळली.
२००३ सालच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सचिनने ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा केल्या. ह्या खेळीमुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत झाली. ऑस्ट्रेलियाने ह्या मालिकेत विश्वचषकावर आपली मक्तेदारी कायम ठेवली असली तरी तेंडुलकरला मालिकावीरचा सन्मान मिळाला.
२००३-२००४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानची मालिका अनिर्णित राहिली. ह्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात तेंडुलकरने सिडनीमध्ये द्विशतक झळकावले. १-१ अशाप्रकारे अनिर्णित राहिलेल्या ह्या मालिकेमध्ये राहुल द्रविडला मालिकावीराचा बहुमान मिळाला.
२००४ साली ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केला. त्यावेळी सचिनचे कोपराच्या हाडाचे (tennis elbow) दुखणे वाढले आणि त्याला पहिल्यांदाच पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले. मुंबईमधल्या कसोटी सामन्यात सचिनच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून आपली प्रतिष्ठा राखली. कारण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने चेन्नईमधील कसोटी सामना अनिर्णित ठेवून मालिका २-१ अशी खिशात घातली होती. हल्लीच तेंडुलकरला आपल्या दुखापत झालेल्या खांद्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. त्यामुळे त्याला २००६ मधील वेस्ट इंडीझ दौऱ्यापासून सक्तीने दूर राहावे लागले.
सध्याच्या काळात, विस्डेनने म्हटल्याप्रमाणे, सचिनच्या खेळात पूर्वीसारखी आक्रमकता राहिली नाही. ह्याला सचिनचे वाढते वय कारणीभूत आहे का हा सचिनच्या सततच्या १७ वर्षे खेळाच्या दुखापतींचा परिणाम आहे, ह्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. १० डिसेंबर २००५ रोजी फेरोज शाह कोटला मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आपले उच्चांकी ३५वे कसोटी शतक झळकवून त्याने आपल्या चाहत्यांना खूष केले. परंतु त्यानंतरच्या भारताच्या पाकिस्तान दौऱ्यामध्ये त्याने तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ २१ च्या सरासरीने धावा जमवल्यावर सचिनच्या अलीकडच्या कामगिरीवर अनेकांनी शंका घेतली.
फेब्रुवारी ६ २००६ रोजी तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये आपले ३९ वे एकदिवशीय शतक झळकवले. सध्या तेंडुलकर सर्वोच्च एकदिवशीय शतके झळकवणाऱ्यांपैकी दुसऱ्या स्थानावर असलेल्या सौरव गांगुलीपेक्षा १६ शतकांनी पुढे आहे. ह्या कामगिरीनंतर ११ फेब्रुवारीला त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात जलद ४१ धावा जमवल्या आणि त्यानंतर १३ फेब्रुवारी २००६ला लाहोरमध्ये प्रतिकूल परिस्थितीत सचिनने ९५ धावा केल्या. हा एक नेत्रसुखद फलंदाजीचा अनुभव होता.
मार्च १९ इ.स. २००६ रोजी आपल्या घरच्या वानखेडे खेळपट्टीवर इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २२ चेंडूंत केवळ १ धाव करून बाद झाल्यावर, प्रेक्षकातल्या एका गटाकडून तेंडुलकरविरुद्ध हुल्लडबाजी करण्यात आली[१८]. असा अपमान सचिनला त्याच्या खेळाबद्दल पहिल्यांदा बघावा लागला. अलबत, त्याच कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी येताना सचिनचे प्रेक्षकांनी स्वागत केले. परंतु ह्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सचिनला एकही अर्धशतक करता आले नाही. शिवाय त्याच्या खांद्याच्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेमुळे त्याच्या भविष्यातील फलंदाजीच्या कामगिरीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जेफरी बॉयकॉटने (Geoffrey Boycott) सचिनच्या कामगिरीविषयी अतिशय परखड अशी प्रतिक्रिया दिली: "सचिन तेंडुलकर हा सध्या त्याच्या सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे...आता तो अजून दोन महिने संघाबाहेर बसणार असेल, तर मला असे वाटते की तो त्याच्या पूर्वीच्या दैदीप्यमान कामगिरीला साजेसा खेळ करणे अशक्य आहे."[१९]
मे २३ इ.स. २००६ रोजी प्रायोजित तंदुरुस्तीची चाचणी न घेण्याचा निर्णय घेतल्यावर, सचिनने असे घोषित केले की तो कॅरिबियन बेटांच्या टूरला जाणार नाही. परंतु ऑगस्टमधील पुनरागमनाच्या दृष्टीने त्याने लॅशिंगस XI तर्फे पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्या पाच सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे १५५, १४७ (रिटायर्ड), ९८, १०१ (रिटायर्ड) आणि १०५ अशा १०० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आणि ह्या सर्व सामन्यांमध्ये त्याची धावसंख्या सर्वोच्च होती.
शेवटी जुलै २००६ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडुन (BCCI) असे घोषित करण्यात आले की, शिबिरात सामील झाल्यानंतर सचिनने आपल्या दुखापतींवर मात केली आहे आणि तो संघाच्या निवडीसाठी पात्र आहे.
सप्टेंबर १४ २००६ मधील सचिनच्या पुनरागमनाच्या सामन्यामध्ये त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध ४० वी शतकी खेळी करून त्याच्या टीकाकारांची वाचा बंद केली. ह्या सामन्यात त्याने १४८ चेंडूंत १४१ धावा जरी केल्या असल्या तरी पावसामुळे व्यत्यय आल्यामुळे वेस्ट इंडीजने हा सामना ड-लु (डकवर्थ लुईस) नियमानुसार जिंकला. जानेवारी २००७ मध्ये सचिनने आपले ४१ वे शतक ७६ चेंडुंमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पूर्ण केले. तेंडुलकर आता सर्वोच्च एकदिवसीय शतकवीरांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा (सनथ जयसूर्या) १८ शतकांनी पुढे आहे. आहे[२०].
वेस्ट इंडीजमधील २००७ सालच्या क्रिकेट विश्वचषकामध्ये द्रविडच्या नेतृत्वाखाली तेंडुलकर आणि भारतीय संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. प्रशिक्षक ग्रेग चॅपेलनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविल्यावर सचिनने अनुक्रमे ७(बांगलादेश), ५७* (बर्म्युडा) आणि ० (श्रीलंका) अशा धावा केल्या. ह्याचा परिणाम म्हणून माजी ऑस्ट्रेलियन कप्तान व तत्कालिन भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेल्या ग्रेगचा भाऊ इयान चॅपेलने मुंबईच्या मीडडे वर्तमानपत्राच्या आपल्या स्तंभातून तेंडुलकरला निवृत्ति घेण्याचा सल्ला दिला[२१].
लगेचच त्यानंतरच्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमध्ये सचिनला मालिकावीर म्हणून बहुमान मिळाला. सध्या तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये १४००० व १५,००० धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. कसोटी सामन्यांत ५० शतके करणारा तेंडुलकर एकमेव फलंदाज आहे.
१६ मार्च २०१२ रोजी बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके पूर्ण केली. शंभरावे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला १ वर्ष आणि चार दिवस वाट पाहावी लागली. तेंडुलकरने नोव्हेंबर १४, इ.स. २०१३ रोजी आपला २००वा कसोटी सामना खेळून झाल्यावर क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.
वैयक्तिक जीवन
संपादनकाही वर्षापूर्वी मित्रांनी एकमेकांची ओळख करून दिल्यावर १९९५ साली सचिनचा विवाह आनंद मेहता ह्या गुजराती उद्योगपतींच्या अंजली (व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असलेल्या) यांच्याशी झाला. त्यांना सारा (ऑक्टोबर १९९७) आणि अर्जुन (२३ सप्टेंवर २०००) अशी दोन मुले आहेत. सचिन आपल्या सासूतर्फे चालवल्या जाणाऱ्या अपनालय नामक मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत दरवर्षी २०० गरजू मुलांना आर्थिक अथवा इतर मदत करतो. प्रसारमाध्यमांमध्ये सचिनच्या ह्या कार्याविषयी पराकोटीची उत्सुकता असली तरी सचिन आपल्या ह्या कामांविषयी गोपनीयता बाळगणेच पसंत करतो. तेंडुलकर बरेचदा आपली फेरारी ३६० मॉडेना मुंबईमध्ये फिरण्यासाठी काढताना दिसला आहे. (ही गाडी त्याला फियाट कंपनीतर्फे मायकल शूमाकरच्या हस्ते भेट देण्यात आली. कस्टमने ह्या गाडीवरील करावर सूट दिल्यामुळे ह्या गाडीचे प्रकरण सचिनसाठी डोकेदुखी ठरले होते. शेवटी फियाटने कर भरून हे प्रकरण मिटवले.)
राजकीय कारकीर्द
संपादनसचिन यांची राज्यसभा सदस्य म्हणून २०१२ मध्ये नियुक्ती झाली. २१ डिसेंबर २०१७ रोजी प्रथमच संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत सचिन तेंडुलकर भाषण करणार होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी करणाऱ्या खासदारांच्या गोंधळामुळे सदर भाषण सचिन तेंडुलकर ह्यांना करता आले नव्हते.[२२] शेवटी त्यांनी आपले भाषण त्याच दिवशी फेसबुकावरून चित्रफितीच्या स्वरूपात प्रसिद्ध केले.[२३]
सन्मान
संपादन- भारतरत्न पुरस्कार
- २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये तेंडुलकर सातव्या क्रमांकावर होते.[२४]
- 1994 मध्ये सचिन तेंडुलकरांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला.
- 1997 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणारे सचिन हे पहिले क्रिकेट खेळाडू बनले.
- 1999 मध्ये यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
- 2001 मध्ये महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्यात आला.
- 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
- 2010 मध्ये एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड प्राप्त झाला.
- 2011 मध्ये क्रिकेट खेळाडू ऑफ द इअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याची चर्चा कौतुकास्पद होती.
पुस्तके
संपादन- इंद्रनील राय यांनी सचिन तेंडुलकरांवर एक त्यांच्याच नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे.
- चिरंजीव सचिन (द्वारकानाथ संझगिरी)
चित्रपट
संपादनसचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ नावाचा माहितीपटवजा चित्रपट निघाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स अर्सकिन यांचे आहे. मूळ इंग्रजीत असलेला हा चित्रपट अनेक भारतीय भाषांत डब झाला आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b "The Tribune, Chandigarh, India - Sport". www.tribuneindia.com. 2018-03-18 रोजी पाहिले.
- ^ "Sachin Tendulkar: Bio, Facts". 2017-05-30 रोजी पाहिले.
- ^ "वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा". 4 मार्च 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 मार्च 2021 रोजी पाहिले.
- ^ "Injury-hit India take on Zimbabwe in crucial encounter". Cricinfo (इंग्रजी भाषेत). 2018-03-18 रोजी पाहिले.
- ^ "Hosts toast guests to snatch Asia Cup". 2004-09-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३ मे २०२१ रोजी पाहिले.
- ^ "1st ODI, Pakistan tour of India at Kochi, Apr 2 2005 | Match Summary | ESPNCricinfo". ESPNcricinfo. 2018-03-18 रोजी पाहिले.
- ^ "1st Match, Pepsi Triangular Series at Kochi, Apr 1 1998 | Match Summary | ESPNCricinfo". ESPNcricinfo. 2018-03-18 रोजी पाहिले.
- ^ http://usa.cricinfo.com/db/ARCHIVE/1993-94/OD_TOURNEYS/CAB/IND_RSA_CAB_ODI-SEMI1_24NOV1993_MR
- ^ "5th Match, Wills Trophy at Sharjah, Oct 22 1991 | Match Summary | ESPNCricinfo". ESPNcricinfo. 2018-03-18 रोजी पाहिले.
- ^ Cricinfo match report. World Cup, 1995/96, India v Australia 27 Feb 1996 http://www.cricinfo.com/link_to_database/ARCHIVE/WORLD_CUPS/WC96/WC96-MATCHES/GROUP-A/AUS_IND_WC96_ODI19_27FEB1996.html
- ^ "Tendulkar second-best ever: Wisden". www.rediff.com. 2018-03-18 रोजी पाहिले.
- ^ "एकदिवसीय क्रिकेट : सबसे ज्यादा अर्धशतक बनाने वाले 5 बल्लेबाज" (इंग्रजी भाषेत). 2021-05-02 रोजी पाहिले.
- ^ "Indian Icon Sachin Tendulkar wins Laureus World Sports Awards 2020". Highonstudy.com (इंग्रजी भाषेत). 2020-03-06 रोजी पाहिले.
- ^ "2nd Match: India v West Indies at Kuala Lumpur, Sep 14, 2006". 2012-08-10 रोजी पाहिले.
- ^ Cricinfo Ind v NZ Mar 27, 1994 match report http://www.cricinfo.com/link_to_database/ARCHIVE/1993-94/IND_IN_NZ/IND_NZ_ODI2_27MAR1994.html
- ^ SportNetwork.net http://www.sportnetwork.net/main/s119/st62164.htm. Down Memory Lane - Shane Warne's nightmare. Nov 29, 2004
- ^ "2nd Test, India tour of Australia at Melbourne, Dec 26-30 1999 | Match Summary | ESPNCricinfo". ESPNcricinfo. 2018-03-18 रोजी पाहिले.
- ^ "sachin tendulkar booed by wankhede crowd |". www.indiadaily.org (इंग्रजी भाषेत). 2006-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-18 रोजी पाहिले.
- ^ "Playing five bowlers weakens the batting". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2006-03-23. ISSN 0971-751X. 2018-03-18 रोजी पाहिले.
- ^ "Records | One-Day Internationals | Batting records | Most hundreds in a career | ESPN Cricinfo". 2012-08-10 रोजी पाहिले.
- ^ "BBC SPORT | Cricket | Tendulkar faces calls to retire". 2007-03-30. 2012-08-10 रोजी पाहिले.
- ^ "राज्यसभा पीचवर सचिनचे खाते उघडलेच नाही; खा. सचिन भाषणासाठी प्रथमच उभारला, पण गोंधळात शब्दही नाही". २७ जानेवारी २०१८ रोजी पाहिले.
- ^ "भारतातील खेळाचे भवितव्य आणि खेळण्याचा अधिकार ह्या विषयावरील सचिन तेंडुलकर ह्यांच्या भाषणाची त्यांच्या फेसबुक पानावरील चित्रफीत". २७ जानेवारी २०१८ रोजी पाहिले.
- ^ https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949
बाह्य दुवे
संपादन- सचिन तेंडुलकर ट्विटरवर
- फेसबुकवरील अधिकृत पेज - सचिन तेंडुलकर
- क्रिकइन्फो प्रोफाइल
BBC's article on Tendulkar after 2000-01 Border-Gavaskar Trophy