जागत्या स्वप्नाचा प्रवास (पुस्तक)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
जागत्या स्वप्नाचा प्रवास हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मैदानावरील कामगिरीचा आणि विक्रमांचा सांगोपांग तपशील देणारे डॉ. आनंद बोबडे यांनी लिहिलेले पुस्तक आहे. [१]
जागत्या स्वप्नाचा प्रवास | |
लेखक | डॉ. आनंद बोबडे |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | क्रीडाकोश |
प्रकाशन संस्था | पूजा प्रकाशन, ठाणे |
प्रथमावृत्ती | २०१० |
विषय | सचिन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द |
अर्पणपत्रिका
संपादनलेखकाने हे पुस्तक "वास्तवनी स्वप्नभूमीला सांधणारा सेतू उभारणाऱ्या तमाम डोळियाआंतील आसवांना -" अर्पण केले आहे. ऋणनिर्देशात मात्र लेखकाने आपल्याला "ह्या शब्दप्रपंचाचा 'निमित्त-निर्मिक' म्हणवून घेणे आवडेल" असे म्हणले आहे.
परिचय
संपादनसचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून या पुस्तकाचा प्रारंभ होतो. कॅलेंडर वर्षांनुसार या पुस्तकात एकेक प्रकरण आहे. प्रकरणांची रचना मालिकानिहाय केलेली आहे. प्रत्येक मालिकेतील सचिनच्या कामगिरीच्या तपशीलवार नोंदी देणाऱ्या तालिकेने प्रकरण सुरू होते. मग प्रत्येक सामन्याबद्दल लेखकाने सचिनला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेला गोषवारा येतो. सचिनच्या कामगिरीसोबतच त्या सामन्यातील इतर लक्षवेधी घडामोडींचीही लेखकाने यथाशक्ति दखल घेतल्याने पुस्तक अधिक रंजक झाले आहे.
या पुस्तकामधील तपशीलाबद्दल एकच गोष्टीचा उल्लेख पुरेसा ठरेल : सचिनचे झेल ज्यांनी घेतले त्यांचा तपशील धावफलकांमध्ये सर्वत्र मिळतोच; पण केवळ कसोट्या आणि एकदिवसीय सामन्यांमध्येच नव्हे तर इतर प्रथमश्रेणी आणि यादी 'अ'मधील सामन्यांमध्ये ज्यांचे झेल सचिनने टिपले त्यांच्याही नावांचा उल्लेख या पुस्तकात मिळतो.
"आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीचा सचिन" हे प्रकरण सचिनच्या जडणघडणीचा थोडक्यात मागोवा घेते. ते विस्तृत असायला हवे होते. कसोट्यांव्यतिरिक्त इतर प्रथम श्रेणी सामने आणि एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त मर्यादित षटकांचे इतर सामने यांच्यावर या पुस्तकात खास प्रकरणे आहेत. या सामन्यांचाही तपशीलवार सांख्यिकीय तपशील या पुस्तकात आहे.
वर्षवार कामगिरी आणि विक्रमांचे तपशील देण्याबरोबरच कर्णधार सचिनचे विश्लेषण (सांख्यिकीसह), प्रा. रमेश तेंडुलकर (सह-अनुभूतीचे किमयागार), माईक डेनेस प्रकरण, फेरारीच्या शुल्काची चर्चा, धनुर्धर कफोणि ( टेनिस एल्बो ) अशी माहितीपूर्ण उप-प्रकरणे या पुस्तकात आहेत.
सांख्यिकी
संपादनसुमारे ३७० पृष्ठांमध्ये सचिनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द मांडल्यानंतर लेखकाने सचिनच्या कामगिरीचा संख्याशास्त्रीय लेखाजोखा मांडलेला आहे. 'विशेष बाद-तुलना', 'पदार्पणाच्या सामन्यांमध्ये सचिनला बाद करणारे गोलंदाज' अशी काही खास प्रकरणे या विभागात आहेत.
मराठी प्रतिशब्द
संपादनया संकलनात विवेचनाच्या ओघात काही अर्थवाही प्रतिशब्द लेखकाने वापरलेले आहेत. सोलापूरच्या दैनिक संचारमधून आणि नंतर मराठीसृष्टी.कॉमवर स्तंभलेखन करताना त्याने ते पूर्वीही वापरले आहेत. स्ट्राईकला सुकाणू, नॉन-स्ट्रायकरला बिनटोल्या, स्विंगला डूल, हॅट्रिकला त्रिक्रम, टी२०ला विसविशीत सामना, नाईट वॉचमनला संध्यारक्षक असे काही मासलेवाईक प्रतिशब्द पुस्तकात आहेत.
स्वागत
संपादन'पुस्तकाचे पान' या तत्कालीन साप्ताहिक सदरात दैनिक लोकसत्ताने या पुस्तकाबद्दल "सचिनच्या कारकिर्दीचा सखोल वेध" या मथळ्याखाली माहिती प्रकाशित केली होती. [२]
"सचिनविषयी ५००१ प्रश्न काढले तर त्यांची उत्तरं एकाच पुस्तकात किंवा एकाच वेबसाईटवर मिळतील का हे सांगता येणार नाही; मात्र डॉ. आनंद आत्माराम बोबडे या क्रिकेटवेड्या असामीने संकलित केलेल्या ‘जागत्या स्वप्नाचा प्रवास’ या पुस्तकात सचिनच्या कारकिर्दीचा इतक्या सखोलपणे वेध घेतलेला आहे की त्याला तोडच नसावी. सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यापासून अगदी नुकत्याच संपलेल्या न्यू झीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांपर्यंत अक्षरशः सावलीसारखा माग काढत या संकलकाने सचिनच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा वेध घेतलाय. सचिनच्या विश्वविक्रमांपासून ते मदानावरच्या अगदी अगदी छोट्या-मोठ्या घडामोडी आणि घटनांचाही मागोवा या पुस्तकात आहे. १९८९ पासून २०१० पर्यंतच्या सचिनचा सहभाग असलेल्या प्रत्येक मालिका आणि सामन्याची नोंद या पुस्तकात आहे.
हे एक आगळेवेगळे पुस्तक आहे. एखाद्या क्रिकेटवीराचा मदानावरील असा प्रदीर्घ प्रवास टिपणारे अशा प्रकारचे हे पहिलेच आणि एकमेव पुस्तक असावे. कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर इंग्रजीत किंवा दुसऱ्या एखाद्या भाषेत असेल, पण भारतीयावर तरी कुठे असल्याचे ऐकीवात नाही. एखाद्या मराठी क्रिकेटपटूवर इतक्या सखोलपणे अभ्यास करून लिहिलेलं हे मराठीतलंही एकमेव पुस्तक असेल. पुस्तकाचा केंद्रबिंदू अर्थातच सचिन तेंडुलकर आहे. पुस्तकाचा मुख्य गाभा हा सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर बेतलेला आहे. मात्र हे करताना सचिनच्या देशांतर्गत कामगिरीवर नजर टाकून त्यातल्या वेचक-वेधक घटना वाचकांपर्यंत पोहचवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखकाने केला आहे. सचिनवर लिहिताना लेखकानं वेगवेगळ्या सामन्यातल्या इतरही खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीवर आणि घटनांवर नजर टाकलेली आहे. त्यामुळे वाचकांना बरीच मनोरंजक माहिती मिळते. राहुल द्रविड आणि गांगुलीचं पदार्पण सचिननंतर जवळपास ४० सामन्यांनंतर झालं मात्र गांगुली रिटायर्ड आणि द्रविडही त्याच मार्गानं जातोय पण सचिन अजूनही ऐन भरात खेळतोय यासारख्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधलं जातं. रणजी, इराणी आणि दुलीप करंडक या भारतातल्या तिन्ही प्रथमश्रेणी देशांतर्गत स्पर्धामधील पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकवणारा एकमेव खेळाडू सचिनच आहे हे किती जणांना माहीत असेल?"
"संगणन कितीही पुढे सरकले तरी मानवी बुद्धीचे महत्त्व कमी होणार नाही याचा पुरावाच हवा असल्यास या पुस्तकाच्या सांख्यिकी सूचीवर एक ओझरती नजर टाकावी. सचिनने वैयक्तिक पहिले षटक टाकले आणि सामना निकाली निघाला; सचिनच्या एकदिवसीय आणि कसोटी शतकांमधील सामने आणि डावांची अंतरे; कोणत्या पदार्पणवीरांकडून तो बाद झाला ह्याच्या नोंदी इतरत्र कुठेही नजरेत आलेल्या नाहीत. ... सचिनला स्थानिक स्पर्धांमध्ये बाद करणाऱ्या किंवा त्याचा झेल घेणाऱ्या मुंबई, महाराष्ट्र आणि भारतभरातील कितीतरी खेळाडूंना या पुस्तकातील तपशिलामधील आपले नाव वाचून ‘त्या’ दिवसाची आठवण होईल !"