नदी

नैसर्गिक जलस्रोत किंवा प्रवाह
(काठ (नदी) या पानावरून पुनर्निर्देशित)

नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक रुंद थंड पाण्याचा प्रवाह. नदीचा उगम हा तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. रचनेच्या दृष्टीने त्या भूप्रदेशातून जल निःसारण करणाऱ्या सर्व जल प्रवाहांची मिळून नदीप्रणाली होते आणि त्या प्रदेशाला त्या नदीचे खोरे म्हणतात.[]

नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते. आणि हे पाणी समुद्राच्या दिशेने किंवा क्वचित एखाद्या जलाशयाच्या दिशेने वाहत जाते. काही नद्या दुसऱ्या नदीला मिळून त्यांची अधिक मोठी नदी बनते. अति प्रचंड नद्यांना नद असे म्हणतात. उदा. ब्रह्मपुत्रा नद. कमी रुंदीच्या जलप्रवाहाला झरा, ओहोळ, नाला, किंवा ओढा म्हणतात. नदी असे म्हणण्यासाठी कोणतेही प्रमाणित नियम नाहीत. जेथे नदी समुद्राला मिळते तिथे तिची रुंदी जास्त असू शकते आणि पाणी खारटसर. नदीच्या या भागाला खाडी म्हणतात. अनेकदा नदी नसून सुद्धा खाडी असू शकते. समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या दंतूर किनाऱ्याच्या भूभागातून थोड्या अंतरासाठी जमिनीत घुसते त्या जलाशयालाही खाडी म्हणतात. समुद्रापासून दूर असलेल्या मोठ्या जलाशयाला, तलाव, तळे किंवा सरोवर म्हणतात.[] जलाशय फारच छोटा आणि फक्त पावसाच्या पाण्याने बनलेला असेल तर त्याला डबके म्हणतात.[]

नदी हा पाण्याच्या चक्राचा एक भाग आहे. नदीतले पाणी हे बहुधा भूपृष्ठावर पडून वाहत येत जमा झालेले असते. काही वेळा हे पाणी बर्फाच्या पठारातून म्हणजेच साठ्यातूनही येते. हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या बहुधा अशा प्रकारच्या असतात. उदा. बियास नदी सतलज. नदी म्हणजे समृद्ध जलस्त्रोत.

नदीचा उगम विविध प्रकारे होतो. त्यामध्ये जलाशय, झरे, प्रचंड मोठ्या दलदलीच्या जागा आणि बर्फाची पठारे यांचा समावेश होतो. बहुतेक सगळ्या नद्यांना उपनद्या, ओढे, नाले येऊन मिळतात. हेच नद्यांचे पाणी वाहते असण्याचे प्रमुख स्रोत असतात. काही वेळा भूगर्भातील पाणीही झऱ्यांद्वारे नदीत येऊ शकते. नदीच्या वाहत्या पाण्यात नदीपात्रातील [खडक], वाळू व सच्छिद्र जमीन यांतील पाणीही सामील असते. अनेकदा दरीतून वाहणारी नदी पात्रावरून लहान दिसली तरी तिच्यात मोठ्या प्रमाणात पाणी असू शकते.

नद्या सर्वसाधारणपणे उगमापासून सुरुवात करून, उताराकडे वाहात जातात व समुद्रास जाऊन मिळतात. काही प्रसंगी सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होऊन नद्या मध्येच संपू शकतात. काही वेळा नदीतील पाणी जमिनीतील भेगांमध्ये झिरपून जाऊ शकते, आणि नंतर भूगर्भातील पाणी बनते. प्राचीन भारतातील सरस्वती नदी भूगर्भात अशीच लुप्त झाली आहे. या शिवाय शेती आणि औद्योगिकीकरणामुळे होणारा नदीच्या पाण्याचा उपसाही नदी आटवू शकतो. धरणे नदी रोखून धरतात, व त्यामुळे धरणाखालील काही भागातले पात्र आटून जाते.

भूसंरचना

संपादन

नदीचे पाणी बहुधा तिच्या ठरलेल्या पात्रातूनच वाहते. मोठ्या नद्यांची पूररेषा मात्र नेहमीच्या पात्रापेक्षा अधिक अंतरापर्यंत विस्तारलेली असू शकते. तरीही सर्वसाधारणपणे नदीचे पात्र व पूर आलेल्या नदीचे पात्र हे बहुधा ठरलेले असते. शहरी भागात, जर नदीपात्राच्या पूररेषेचा विचार केलेला नसेल तर पूर आल्यावर नदीचे पाणी शहरातील काही भागात घुसलेले दिसते. नदीचे वरचे अंग म्हणजे, नदीच्या उगमाजवळील भाग होय. हे कोणत्याही दिशेने वाहत असले तरी याला उगम असेच संबोधले जाते. यामुळे नदीच्या मुख्य अथवा खालच्या भागाच्या वाहण्याच्या प्रवृत्तीनुसार नदीची दिशा ठरवली जाते.

नदीचे पात्र सहसा एकच असते. परंतु काही वेळा नदी एकाच वेळी अनेक पात्रांनीही वाहते. ही पात्रे एकमेकांना जोडलेली अथवा विलगही असू शकतात. अशा नद्या न्यू झीलंडच्या दक्षिण बेटावर आढळतात. वाहणाऱ्या पाण्याच्या ओढीने नदीच्या पात्राची रुंदी आणि आकार बदलू शकतो.

ब्राह्म अथवा आयरच्या नियमानुसार, नदीची वाहून नेण्याची क्षमता ही नदीच्या वेगाच्या साधारण एक षष्ठांश इतकी असते. म्हणजेच जर नदीचा प्रवाह दुप्पट झाला तर तिची वाहून नेण्याची क्षमता चौसष्टपट वाढते.[] पर्वतीय प्रदेशात पाण्याच्या प्रवाहामुळे कठीण खडकांचीही धूप झालेली आढळून येते. त्यामुळे खडकांच्या बारीक तुकड्यांची वाळू बनते. काही वेळा पठारी प्रदेशात प्रवाहाच्या ताकदीमुळे नदी आपला मार्ग बदलते आणि मार्ग छोटा होतो. काही वेळा नद्या काठावरचा गाळ प्रवाहात ओढतात. हा गाळ प्रवाहाच्या मध्य भागात जमत जातो आणि त्याचे बेट तयार होते. या भूभागांना त्रिभुज प्रदेश अशी संज्ञा आहे. हे त्रिभुज प्रदेश अतिशय सुपीक असतात. असे प्रदेश नदीच्या मुखाजवळ तयार होतात. उदा. बांगलादेशमध्ये गंगा नदीतब्रह्मपुत्रा नदीत असे अनेक त्रिभुज प्रदेश बनले आहेत.

वर्गीकरण

संपादन

जरी खालील प्रकारचे वर्गीकरण सर्वसाधारण अंदाज घेण्यासाठी उपयुक्त असले तरी अजून अनेक प्रकारे वर्गीकरण शक्य आहे. नदी या एका संकल्पनेत अनेक घटक समाविष्ट होतात. पाण्याचा प्रवाह हा वातावरणातील बदल, भूपृष्ठाची ठेवण आणि तत्कालीन जीवसृष्टी यावरही अवलंबून असतो.

  • अवखळ नदी : पर्वतावरून वेगाने वहात जाणारा प्रवाह असेल त्याला अवखळ नदीचे पात्र असे संबोधले जाते. या नदीचे पात्र रुंद नसून खोल असते. उदा. ब्राझोस नदी तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील कॅलिफोर्निया येथील त्रिनिटी नदी.
  • संथ नदी : भूपृष्ठाचा उतार कमी झाल्यावर नदीचे पाणी हळू वहायला लागते म्हणून अशा नदीला संथ नदी म्हणतात. तसेच आता अवखळपणा संपून नदीला गंभीरपणा येतो. या पात्रात पाण्याचे प्रमाणही जास्त असते. संथ भागात नदीचे पात्र पसरट होत जाते. उदा. मिसिसिपी नदी, डॅन्यूब नदी आणि पठारी प्रदेशातील गंगा नदी
  • पुनरुज्जीवित नदी : अनेक कारणांनी एखादी नदी कोरडी पडते व भूस्तरीय हालचालींमुळे भूपृष्ठ उचलले गेले असता आणि नदी वाहू लागते अशा नदीला पुनरुज्जीवित नदी म्हणतात.

नदीच्या एकूण अंतराची लांबी व सरळ रेषेत मोजलेली लांबी यांचे गुणोत्तर साधारण ३ असते.[][]

बहुतेक सर्व नद्या भूपृष्ठावरच वाहतात. परंतु काही नद्या भूपृष्ठाखालून गुहांमधून वाहतात. अशा नद्यांमुळे अनेक गुहा मोठ्या झालेल्या असतात. अनेकदा अशा नद्या लवणखडक फोडतात व गुहा बनवत जातात. यामुळे अनेक चमत्कृतिपूर्ण आकार बनलेले दिसून येतात.

काही नद्या तात्पुरत्या असतात. त्या फक्त काही काळ वाहून मग अनेक वर्षांसाठी लुप्त होतात. अशा नद्या अत्यंत कमी अथवा अनियमित पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात आढळतात. भारतात राजस्थानमधील घागरा नदी ही अशाच प्रकारची नदी आहे आणि हिमालयातील बहुतांश नद्या या उन्हाळ्यात वाहत असतात.

उपयोग

संपादन

नद्यांचा प्रमुख उपयोग पाण्याचा स्रोत म्हणून होतो. वाहतुकीसाठीही नदीचा उपयोग होतो. नदीचा उपयोग संरक्षणाची ढाल, वीजनिर्मिती, आणि मोठी यंत्रे चालवण्यासाठीही करून घेतला जातो. औद्योगिकीकरण आणि शहरांची घाण वाहून नेण्यासाठी नद्यांचा वापर सध्या होत आहे. भूभागांची सरहद्द सुनिश्चित करणे, वाहतुकीचे माध्यम व दिशादर्शक म्हणून नदीचा उपयोग शतकानुशतके होत आला आहे. नदीतल्या नौकानयनाचा पहिला पुरावा इ.स. पूर्व ३३०० पासून सिंधू संस्कृतीमध्ये सापडतो. नदीपात्रातली वाहतूक ही अतिशय स्वस्त पडते. आज ही जगातल्या महत्त्वाच्या आणि मोठ्या नद्यांमध्ये अशी वाहतूक केली जाते. उदा. अ‍ॅमेझॉन नदी, गंगा नदी, नाईल नदी, मिसिसिपी नदी आणि सिंधू नदी.

स्कॅंडेनेव्हिया, कॅनडा, ब्रम्हदेश या देशांतील दाट अरण्यांच्या प्रदेशांत तोडलेले वृक्ष वाहून इच्छित ठिकाणी नेण्यासाठीही नद्यांचा उपयोग केला जातो.

अनादी काळापासून अन्न मिळवण्यासाठी नद्यांचा उपयोग होत आला आहे. नद्यांतील जीवसॄष्टीचे एक चक्र असते. यामुळे अनेक प्रकारचे मासे मिळतात. फक्त मासेमारीच नव्हे तर शेतीसाठी व पर्यायाने अन्न उत्पादनासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग होत आला आहे.

गोड्या पाण्याचा उपलब्धीमुळे जगातील बहुतेक सर्व शहरे नदीकाठीच वसलेली आहेत. नद्यामुळे शहर कसे बनणार याचा आराखडाही आपोआप ठरत जातो असे दिसून येते. या शहरांच्या उभारणीमुळे सांडपाणी नदीत सोडले जाते आणि नदीचे प्रदूषण होते.

भारतातील बहुतेक नद्यांच्या काठावर मनोरंजनासाठी व नदीत प्रवेश करण्यासाठी उपयुक्त असे काठ (घाट) बनवले गेले आहेत.

नदीतील वाळूचा उपयोग बांधकामासाठी केला जातो. सुशोभित केलेले नदीचे काठ जास्त पर्यटक आकर्षित करतात, आणि स्थानिक समाजातील लोकांना जलपर्यटनाची सोय करण्याची संधी देतात.

काही वेळा पर्वतीय प्रदेशात वाहणाऱ्या नद्या धबधबे निर्माण करतात. अशी ठिकाणे सहलींचे केंद्र बनतात. काही वेळा खळखळत वाहणाऱ्या पाण्यात कायाकिंग नावाचे वेगवान नौकानयन केले जाते. जोरदार प्रवाह असलेल्या नद्यांपासून वीजनिर्मिती केली जाते.

नद्या या सुरक्षेचे माध्यम म्हणूनही वापरल्या गेल्या आहेत. तसेच राजकीय सीमा म्हणूनही त्यांचा उपयोग झालेला दिसतो. उदा. डॅन्यूब नदी ही रोमन साम्राज्याची सरहद्द मानली गेली होती. ती आजही तशीच बल्गेरिया आणि रोमेनिया दरम्यानची सरहद्द मानली गेली आहे. भारतातील अनेक राज्यांच्या सरहद्दी नदीचे प्रवाह ठरवतात.

अमेरिकेतील मिसिसिपी नदी आणि युरोपातील ऱ्हाईन नदी या खंडाच्या सरहद्दी ठरवणाऱ्या नद्या आहेत. पुरातन ग्रीक इतिहासकार मॅगेस्थेनिस याने त्याच्या इंडिका नावाच्या ग्रंथात गंगा नदी विषयी नोंदवून ठेवले होते की, ही भारतातील अनेक नद्यांपैकी ही एक मोठी नदी आहे. या नदीत नौकानयन करता येते आणि हिचा उगम पर्वतातून होतो. या नदीला अनेक नद्या येऊन मिळतात व ही पुढे समुद्रास जाऊन मिळते. या नदीमुळे गंगारीदाई नावाच्या प्रचंड मोठे हत्तींचे कळप असलेल्या एका राज्याला अतिशय पक्की अशी सरहद्द मिळते व त्याची शक्ती वाढते. या नदीमुळे नद्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटक आकर्षित होत असतात.

जीवसृष्टीचे चक्र

संपादन

नदीतले जीव नदीतील नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या साधनांचा व राहत्या बनलेल्या जागेचाच वापर करतात. यामुळे त्यांचे नदीवर अवलंबून असलेले एक स्वतंत्र जीवसृष्टीचे चक्र अस्तित्वात असते. यामधे अनेक प्रकारचे सजीव, परजीवी सजीव व वनस्पती अंतर्भूत होतात. नदीतील बहुतेक जीव हे गोड्यापाण्यात जगणारेच असतात. परंतु काही मात्र खाऱ्या पाण्यातही जगू शकतात. उदा. सामन नावाचे मासे नदी व समुद्र दोन्हीकडे राहू शकतात. काही मासे समुद्रातून पोहोत नदीत येतात व उगमाकडील बाजूस अंडी घालतात.

पूर येणे ही नदीच्या नैसर्गिक चक्राचा भाग आहे. नदीकाठची धूप व आसपासच्या मैदानात साठणारी गाळवजा माती ही पुरामुळेच होते. माणसाने आपल्या सोयीनुसार बंधारे घालून, काठ बांधून व प्रवाह वळवून पूर येण्यावर निर्बंध घातले आहेत. तरीही अनेकदा शहराची रचना करतांना जलप्रवाहाची दिशा व वेग विचारात न घेतल्याने पूर येतात व मोठी जीवितहानी व वित्तहानी होते. मुंबईमध्ये मिठी नावाच्या नदीच्या पूर रेषेचा विचार न करता त्या भागातही बांधकामे केल्यामुळे नदीचे पाणी शहरातील उपनगरांत शिरले होते व मोठा हाहाकार उडाला होता. बांग्लादेश येथेही उन्हाळ्यात हिमालयातले बर्फ मोठ्या प्रमाणात वितळून गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांना मोठे पूर येतात. अशाने भारतातील व बांग्लादेशातील जनजीवन विसकटते. नदीतील पाण्याची पातळी वाढली की पुर येतो त्याची अनेक कृत्रिम कारणेही आहेत.

नदी नेहमी उताराच्या दिशेने वाहते. नदीचा प्रवाह बऱ्याचदा वळणावळणांचा असतो व असे करताना प्रवाहाची दिशा अष्टदिशांतून बदलते.[][][] मात्र त्यात पर्वताची रचना जशी असेल तसा प्रवाह तयार होतो.

पाण्याचा वेग हा त्याच्या वाहणाऱ्या आकारमानानुसार क्युसेकमध्ये- (क्युबिक मीटर पर सेकंद) एका सेकंदात किती घनमीटर पाणी वाहिले- यावर ठरवला जातो. (क्युसेक =1 m³/s = 35.51 ft³/s) तसेच काही वेळा हे गॅलन मध्येही मोजले जाते. नदीचा वेग नियंत्रित करण्यासाठी बांधलेले काठ उपयोगी पडतात. अशा बांधलेल्या रुंद दगडी काठांना घाट असे म्हणतात. भारतात पवित्र समजल्या जाणाऱ्या सर्व मोठ्या नद्यांना घाट आहेत.

पाण्याचे नियोजन

संपादन

नद्यांच्या पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी बहुतेक वेळा प्रवाहाचे नियमन केले जाते. यामुळे त्यांच्यापासून मानवाला पोहोचणारी हानीही कमी होते.

  • धरणे: वापरासाठी पाणी अडवण्यासाठी अथवा त्याचा प्रवाह योग्य त्या वेगात आणण्यासाठी धरणे बांधली जातात. धरणातून सुयोग्य रीतीने मिळालेल्या प्रवाहाच्या आधारे वीजनिर्मिती आणि माणसाच्या उपयोगासाठीचा पाणीपुरवठा यांसारखी कार्ये साधली जातात.
  • पूर प्रतिबंधक भिंती : या नदीच्या पुराचे पाणी गावात पसरू नये यासाठी बांधल्या जातात.
  • कालवे : नदीला नदी जोडणे अथवा नदीचे पाणी लांबवर खेळवता येणे यासाठी कालवे काढले जातात. यांचा नौकानयनालाही उपयोग होतो.
  • मार्ग बदल : कधीकधी नौकानयनाची सोय होण्यासाठी किंवा नदीच्या प्रवाहातून जास्त ताकद मि़ळवण्यासाठी नदीच्या मार्गात बदल केला जातो.

नदीचे नियोजन ही सातत्याने चालणारी गोष्ट आहे. कारण नदी तिला घातलेल्या बांध-भिंती नष्ट करते. तसेच बांधांमधले घातूचे भाग गंजतात व बदलावे लागतात. धरणाच्या भिंतींना पाण्याच्या धडकांनी तडे जातात व बाहेर पडलेल्या पाण्याने हाहाकार उडतो. याशिवाय अशा प्रकारच्या पाणी नियोजनाने विस्थापित झालेल्या लोकांचे प्रश्न उभे राहतात.

नदीमुळे तयार होणारी भूरूपे

संपादन

नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूपे

संपादन

१. व्ही आकाराची दरी

२. घळई

३. घळ

४. धावत्या

५. धबधबा

६. रांजणखळगे

७. डोंगर बाहु

८. कुंभगर्ता

नदीच्या संचयनामुळे तयार होणारी भूरूपे

संपादन
  1. पूर मैदान
  2. पूर तट
  3. त्रिभुज प्रदेश
  4. पंखाकृती मैदान

नदीच्या खननामुळे आणि संचयनामुळे तयार होणारी भूरूपे

संपादन

१. नागमोडी वळणे

२. नालाकृती सरोवर

दर्जा पद्धती

संपादन
  • नद्यांतून होणाऱ्या वाहतुकीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अडचणी - हे प्रमाण नेव्हिगेशनच्या आव्हानांना, विशेषतः रॅपिड्सच्या आव्हानांना रेटिंग देण्यासाठी वापरले जाते. वर्ग पहिला सर्वात सोपा आहे आणि सहावा वर्ग सर्वात कठीण आहे.
  • स्ट्रालर स्ट्रीम ऑर्डर - स्ट्रालर स्ट्रीम ऑर्डर ही जोड्या आणि सहयोगी उपशाखांच्या श्रेणीबद्धतेवर आधारित नद्यांची श्रेणी मोजते. अ‍ॅमेझॉन नदीची बारावी ऑर्डर असताना हेडवॉटर प्रथम क्रमवारीत आहे. जगातील सुमारे ८०% नद्या आणि प्रवाह पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या आहेत.

जगातील प्रमुख नद्या

संपादन

जगातील सर्वांत जास्त लांबीच्या १० नद्या पुढीलप्रमाणे आहेत.

  1. नाईल नदी ( ६,६९० कि.मी.)
  2. अ‍ॅमेझॉन नदी ( ६,४५२ कि.मी.)
  3. मिसिसिपी नदी-मिसूरी नदी ( ६,२७० कि.मी.)
  4. यांगत्झे नदी (चॅंग जिआंग ) ( ६,२४५ कि.मी.)
  5. येनिसे आंगारा नदी ( ५,५५० कि.मी.)
  6. ह्वांग हो नदी ( ५,५६४ कि.मी.)
  7. ऑब ईर्तीश नदी ( ५,४१० कि.मी.)
  8. आमूर नदी ( ४,४१० कि.मी.)
  9. काँगो नदी ( ४,३८० कि.मी.)
  10. लेना नदी ( ४,२६० कि.मी.)

भारतातील प्रमुख नद्या

संपादन

नद्यांचे भौगोलिक महत्त्व

संपादन

नदी तिच्या दोन्ही तीरांवरील तिच्या पात्रातून सखल भागाकडे वाहत जाते आणि तिच्या मार्गातील भूप्रदेशाची घडामोड करून वेगवेगळी भूरूपे निर्माण करते.[१०] दोन राजकीय भूप्रदेशांच्या सरहद्दी बहुधा नद्या असतात.

सामाजिक महत्त्व

संपादन

नदीच्या काठी संपूर्ण गावाचे जीवन घडत असते. त्यामुळे नदीच्या विषयी जी कृतज्ञता वाटते व्यक्त करण्यासाठी नदीकाठी विविध प्रकारचे उत्सव केले जातात. नदीमध्ये दिवे सोडणे, नदीची ओटी भरणे यासारखे धार्मिक व सामाजिक ऐक्य साधणारे विधी करण्याची जुनी प्रथा दिसून येते. पुण्यातील पवना नदीचा उत्सव, वाई येथील कृष्णामाई हिचा उत्सव ही प्रातिनिधिक उदाहरणे म्हणून सांगता येतील.

नद्यांचे धार्मिक महत्त्व

संपादन

नदीच्या काठावर संस्कृती तयार होते. त्यामुळे लोकांचे दैनदिन व्यवहार हे नदीच्या संपर्कानेच अधिक होतात. त्यामुळे धर्माचरण म्हणजे दैनंदिन आंघोळ, संध्या, जप, तर्पण यासारख्या गोष्टी प्राचीन कालापासून नदीच्या किनारीच होऊ लागल्या. त्यामुळे नदी हे त्या त्या गावाचे प्रमुख सामाजिक आणि धार्मिक केंद्र मानले जाते.

ऋग्वेद या ग्रंथात नन्दीसूक्त आहे. त्यामध्ये भारत वर्षातील प्राचीन नद्यांची नावे आढळतात. गंगा, यमुना, सरस्वती, परुष्णा, वितस्ता, विपाशा, असिक्नी, सुशोमा, त्रिसामा, सिंधू , कुभा, क्रमू अशा त्या नद्या आहेत.(ऋग्वेद १०.७५)[११]

राजकीय महत्त्व

संपादन

काही नद्या एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात, किंवा एका देशातून दुसऱ्या देशात वहात जातात. काहीवेळा अशा दोन प्रातांमध्ये किंवा दोन देशांमध्ये नदीच्या पाणीवापरावरून झगडे सुरू होतात.

नदी ओलांडण्याचे मार्ग

संपादन

नदीमार्गाने जाण्याची वाहतूक साधने

संपादन

चित्रपट

संपादन

नदी या विषयावर दिग्दर्शक संदीप सावंत यांनी 'नदी वाहते' नावाचा मराठी चित्रपट बनवला आहे.

उपयोगी

गद्य पुस्तके

संपादन
  • डॉ. आंबेडकरांची जलनीती (दत्तात्रेय गायकवाड)
  • जलचर प्राणी (शैलजा ग्रब)
  • नद्या आणि जनजीवन (संजय संगवई)
  • नर्मदा परिक्रमा. या विषयावर अनेक पुस्तके आहेत. त्यांची यादी नर्मदा परिक्रमा या पानावर आहेत.
  • नाईल नदीचा शोध (ह.अ. भावे
  • बियॉंड द ब्रिजेस लाइफ ऑन अमेरिकन रिव्हर्स Beyond the Bridges Life on American Rivers told by Riverlorian, Jerry Hay. [१]
  • Luna B. Leopold. A View of the River. — a non-technical primer on the geomorphology and hydraulics of water.
  • शुष्क नद्यांचे आक्रोश (डाॅ. रा.श्री. मोरवंचीकर)
  • संथ वाहते...? (अभिजित घोरपडे)

काव्ये

संपादन
  • इंद्रायणी काठी लागली समाधी (चित्रपट गीत. कवी - ग.दि. माडगूळकर; गायक - भीमसेन जोशी; संगीत दिग्दर्शक - पु.ल. देशपांडे, चित्रपट - गुळाचा गणपती; राग - भीमपलास)
  • कृष्णा मिळाली कोयनेला, तसंच माझं माहेर बाई येऊन मिळालं सासरला (भावगीत. कवी - पी. सावळाराम; संगीतकार - वसंत प्रभू; गायिका - लता मंगेशकर)
  • कैसे आऊॅं जमुना के तीर, पॉंव पडी जंजीर (हिंदी चित्रपट गीत, चित्रपट - देवता; अभिनेत्री - अंजली देवी; गीतकार - [[राजेंद्र कृष्ण; संगीतकार - सी. रामचंद्र; गायिका - लता मंगेशकर; भैरवी रागातली ठुमरी)
  • गंगा-नर्मदा यांच्यावरील स्तोत्रे (उदा० १) गांगं वारि मनोहारि मुरारिचरणच्युतम्। ......, २) देवि सुरेश्वरि भगवति गङ्गे त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे । (३) नर्मदाष्टकम्, ३) यमुनाष्टकम् वगैरे : कवी - आदि शंकराचार्य)
  • गंगास्तोत्रम् - ब्रह्नवैवर्तपुराणांतर्गत.
  • गंगासहस्रनाम स्तोत्राणि (१) स्कन्दपुराणान्तर्गत (२) बृहद्धर्मपुराणान्तर्गत.
  • गङ्गास्तवः (१) कल्की आणि (२) भविष्यपुराण)
  • गंगास्तुति: अर्थात् गङ्गादशहरास्तोत्रम् (स्कन्दपुराण)
  • गंगे गोदे यमुने माझा नोहे, तुझाचि हा बाळ (मोरोपंत)
  • गंगालहरी (संस्कृत, जगन्नाथ पंडित)
  • चंद्रभागेच्या तीराला संतमेळा दंग झाला
  • जमुना के तीर कान्हा आओ (गायिका - संध्या
  • जमुना के तीर मोरी ऊंची हवेली, (अब्दुल करीम खॉं)
  • तू गंगा के मोज में, जमुना का धारा, हो रहेगा मिलन ये हमारा तुम्हारा
  • धीरसमीरे यमुनातीरे वसति वने वनमाली । गोपी-पीनपयोधरमर्दन-चंचलकर-युगशाली (गीतगोविंद काव्यायाली संस्कृत कवी जयदेवाची आर्या)
  • नदी किनारी, नदी किनारी, नदी किनारी गं (जी. एन. जोशी)
  • नदियॉं धीऽरे बहो, धिरे बहो नदीयॉं, मोरे सैयॉंजी उतरेंगे पार हो (हिंदी चित्रपट गीथ, चित्रपट - उडनखटोला; कवी - शकील बदायुनी; संगीतकार - नौशाद, गायिका - लता मंगेशकर)
  • नदी नाले न जाओ, नदी नाले न जाओ, पैयॉं पडूॅं (हिंदी चित्रपट - मुझे जीने दो; गीतकार साहिर लुधियानवी; गायिका आशा भोसले; अभिनेत्री वहीदा रहमान; संगीतकार - जयदेव).
  • नर्मदाष्टक - सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं ..... त्वदीय पादपंकजम् नमामि देवि नर्मदे । ... (आदि शंकराचार्य)
  • बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल, यमुनाकाठी ताजमहाल (भावगीत, कवी - अनिल भारती; गायक/संगीतकार - गजानन वाटवे)
  • यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया, कां लाजतां? (चित्रपट गीत - चित्रपट ब्रह्मचारी (१९३८), कवी - प्र.के. अत्रे; संगीतकार - दादा चांदेकर; गायिका-अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर)
  • यमुनाऽजळी खेऽळूऽऽ खेळ कन्हैऽऽया, कालाजतां? (वेगळी चाल - संगीतकार अशोक पत्की)
  • यमुनासहस्रनामस्तोत्रम् कालिन्दीसहस्रनामम्च (गर्गसंहितातः)
  • यमुनास्तवम् (गर्गसंहितान्तर्गत)
  • ये गं ये गं विठाबाई, माझे पंढरीचे आई । भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा (कवयित्री - जनाबाई)
  • रावी के उस पार सजनवा (हिंदी चित्रपटगीत, चित्रपट - मेरा लडका; गायिका - शांता हुबळीकर) (मूळ गायिका - उमराव झिया बेगम- गुलाम हैदर यांची पत्नी))
  • संथ वाहते कृष्णामाई (भावगीत)

संदर्भ

संपादन
  1. ^ मराठी विश्वकोश खंड आठवा
  2. ^ River[permanent dead link], Wordnet
  3. ^ USGS - U.S. Geological Survey - faqs, #17 What is the difference between mountain, hill, and peak; lake and pond; or river and creek?
  4. ^ Garde, R. J. History of fluvial hydraulics. pp. p. 19.CS1 maint: extra text (link)
  5. ^ Hans-Henrik Stølum: "River Meandering as a Self-Organization Process", Science 271 (5256), 1710
  6. ^ Fermat's last theorem, Simon Singh, 1997
  7. ^ Matt Rosenberg. "Do All Rivers Flow South?". 2007-06-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-02-04 रोजी पाहिले.
  8. ^ Matt Rosenberg. "Rivers Flowing North: Rivers Only Flow Downhill; Rivers Do Not Prefer to Flow South". 2013-04-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-02-04 रोजी पाहिले.
  9. ^ Nezette Rydell. "Re: What determines the direction of river flow? Elevation, Topography, Gravity??". Earth Sciences.
  10. ^ मराठी विश्वकोश खंड आठवा
  11. ^ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा

चित्र दालन

संपादन