आशा भोसले

पार्श्वगायिका

आशा भोसले (८ सप्टेंबर, इ.स. १९३३ - हयात) या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी, गुजराती आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.

आशा भोसले
जन्म ८ सप्टेंबर, इ.स. १९३३
सांगली, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत
निवासस्थान प्रभुकुंज अपार्टमेंट, पेडर रोड, दक्षिण मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा गायक मराठी, हिंदी, गुजराती
कारकिर्दीचा काळ १९४३ पासून
धर्म हिंदु
जोडीदार गणपत राव भोसले, दुसरा विवाह-राहुल देव बर्मन
अपत्ये हेमंत, वर्षा, आनंद
वडील दीनानाथ मंगेशकर
आई शेवंती उपाख्य शुद्धमती मंगेशकर (माई मंगेशकर)
नातेवाईक लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर
पुरस्कार पद्मविभूषण(२००८), ग्रॅमी पुरस्कार(१९९७), दादासाहेब फाळके पुरस्कार(२०००), महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०२१)
संकेतस्थळ
http://www.asha-bhonsle.com/

सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते. [ संदर्भ हवा ]

बालपण संपादन

आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. ते कलाकार आणि गायक होते.[१] लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. दीनानाथ मंगेशकरांचे वडील कऱ्हाडे ब्राह्मण आणि आई देवदासी होत्या. अशा अपत्यांना आता गोमंतक मराठा म्हणतात.

कारकीर्द संपादन

आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर, आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले.

इ.स. १९५७- इ.स. १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले.

ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. इ.स. १९६०च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूॅं ) हे गाणे; इ.स. १९६५चे जाइये आप कहॉं (मेरे सनम); इ.स. १९६८ मधील वो हसीन दर्द देदो (हम साया); चैन से हमको कभी - अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्यांनी गायली.

राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना पिया तू अब तो आजा हे इ.स. १९७१चे कारवॉं चित्रपटातील गीत, इ.स. १९७१ चेच फिल्मफेर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे इ.स. १९७२चे जवानी दिवानीतले गाणे, ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. इ.स. १९८१चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन ऑंखोंकी मस्तीसारखी शब्दरचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला इ.स. १९८१चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही इ.स. १९८६चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी, सगळेच विलक्षण!

त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार, ते गीतकार, त्या अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज - या सर्वांच्या परस्परसंबंधांचे संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे.

हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमारसुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज हृषीकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी १४ भाषांमध्ये १२०००हून अधिक गाणी गायली आहेत.

नाच रे मोरा, आईए मेहेरबाँ, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), तनहा तनहा यहाँ पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश... ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीत्गे, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई तेवढ्याच ताकदीने गायल्या आहे.

कॅनडा, इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्वीडन आदि अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेले काम, ‘राहुल ॲंन्ड आय’ सारखा अल्बम, लेस्ली लुईबरोबरचे काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. ‘आशा अँड फ्रेन्ड्‌स’ या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. अभिजात संगीत कलेला जसे स्थळ-काळ-वेळाचे बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचेच बंधन नाही.

आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणाऱ्या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी ... इत्यादी) या गोष्टी न विसरणाऱ्या, किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत.

पुरस्कार संपादन

राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये देण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.

  • महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रभूषण पुरस्कार (सन २०२१)

आशा भोसले पुरस्कार संपादन

२००२सालापासून आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त, चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पार्श्वगायकास, अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) आणि काही अन्य संस्थांच्या वतीने ’आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो. एक लाख अकरा हजार रुपये रोख व एक स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१३सालापर्यंत हा पुरस्कार लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतले प्यारेलाल, कल्याणजी आनंदजीमधले आनंदजी, अन्नू मलिक, शंकर महादेवन, शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरिहरन आणि सोनू निगम यांना मिळाला आहे.

पुस्तके संपादन

आशा भोसले यांच्या सांगीतिक आयुष्यावर अनेक पुस्तके आहेत त्यांपैकी काही ही :-

  • Asha Bhosale : A Musical Biography (इंग्रजी, राजू भारतन)

आशा भोसले यांच्यावरील लेख असलेली पुस्तके संपादन

  • आशा भोसले : नक्षत्रांचे देणे (संपादक - वामन देशपांडे, मोरया प्रकाशन)
  • खय्याम (विश्वास नेरुरकर)
  • नामांकित (डाॅ. अनघा केसकर)
  • मंगेशकर - स्वरांचा कल्पवृक्ष (प्रभाकर तांबट)
  • सुरा मी वंदिले (कृष्णकुमार गावंड)

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिक्वोट
आशा भोसले हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.