अहिल्यानगर जिल्हा

महाराष्ट्रातील जिल्हा
(अहमदनगर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

अहिल्यानगर जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यातील राहाता तालुका यात आहे.


अहिल्यानगर जिल्हा
नगर जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
अहिल्यानगर जिल्हा चे स्थान
अहिल्यानगर जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नाशिक
मुख्यालय अहिल्यानगर
तालुके १. अकोले २. कर्जत ३. कोपरगाव ४. जामखेड ५. नगर ६. नेवासा ७. पाथर्डी ८. पारनेर ९. राहाता १०. राहुरी ११. शेवगाव १२. श्रीगोंदा १३. श्रीरामपूर १४. संगमनेर
क्षेत्रफळ
 - एकूण १७,४१३ चौरस किमी (६,७२३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४५,४३,०८० (२०११)
-लोकसंख्या घनता २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १७.६७%
-साक्षरता दर ८०.२२%
-लिंग गुणोत्तर ९३९ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी सिद्धाराम सलिमाठ
-लोकसभा मतदारसंघ १.अहमदनगर
२.शिर्डी
-खासदार १. निलेश लंके
२. सदाशिव लोखंडे
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ५०१.८ मिलीमीटर (१९.७६ इंच)
प्रमुख_शहरे अहिल्यानगर, श्रीरामपूर, शिर्डी, संगमनेर श्रीगोंदा
संकेतस्थळ


भौगोलिक स्थान

अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७,४१२ किमी असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिकछत्रपती संभाजीनगर, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूरधाराशिव आणि पश्चिमेस पुणेठाणे हे जिल्हे आहेत. अहमदनगर जिल्ह्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.

अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो/आहे. मुळा नदीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण राहुरी तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून अहमदनगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास ज्ञानेश्वरसागर असे म्हणले जाते. अहमदनगर सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. भौगोलिक दृष्ट्या या जिल्ह्याची तीन भागात विभागणी होते-

  • पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश

अकोले तालुका आणि संगमनेर तालुका यांचा यात समावेश होतो. अजोबा, बाळेश्वर आणि हरिश्चंद्रगड यांसोबत अनेक शिखरे याच भागात आहेत. कळसूबाई, जे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, १६४६ मीटर याच भागात आहे.

  • मध्य भागातील पठारी प्रदेश

पारनेर तालुका आणि नगर तालुका आणि संगमनेर तालुक्याचा, श्रीगोंदा तालुक्याचाकर्जत तालुक्याचा काही भर यात मोडतो.

  • उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश

यात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव तालुक्याचा उत्तरेकडील प्रभाग येतो. या भागात गोदावरी, प्रवरा, घोड, भीमा आणि सीना नद्यांचे खोरे येते.

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात प्रामुख्याने अकोलेसंगमनेर तालुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत ज्या हरिश्चंद्राच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगांमध्ये अकोले तालुक्यात आहे. जिल्ह्याचा मध्य भाग हा बाळेश्वराचे पठार या नावाने संबोधला जातो. उत्तरेकडे गोदावरी नदीचे खोरे आहे तर दक्षिण भाग हा घोड, भीमासीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.

गोदावरी, भीमा, सीना, मुळाप्रवरा या अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळा, घोड, कुकडी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यात प्रवरासंगम येथे होतो.

हवामान

अहमदनगर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान थंड आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरित्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.

दळणवळण

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०) हा जिल्ह्यातील संंगमनेर तालुक्यातून जातो. निर्मल - कल्याण (राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२) हा महामार्ग जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस धावली ती अहमदनगर- पुणे या मार्गावर. अहमदनगर रेल्वे स्थानक हे दौंड - मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. १९७ कि.मी.चा रेल्वे (ब्रॉडगेज) मार्ग जिल्ह्यात असून अहमदनगर - बीड - परळी आणि पुणतांबा- शिर्डी हेे इतर रेल्वे मार्ग आहेत. संंगमनेरहून भंडारदरा धरणाकडे जाताना लागणारा विठे घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.

विशेष

मराठी भाषेतील सार्वकालिक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. ज्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणले जाते, तो ग्रंथ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे.

अहमदनगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा मूल स्रोत म्हणून! डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी जिल्ह्यात प्रवरानगर (लोणी) येथे राज्यातील पहिली सहकारी पतपेढी (लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी) सुरू केली (१९२३), तसेच राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला (जून १९५०) आणि सहकार या तत्त्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली. अर्थतज्ज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ या कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते. या पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर सहकारी साखर कारखान्यांची एक साखळीच राज्यात निर्माण झाली. एक सहकारी साखर कारखाना आणि त्या भोवतीच्या परिसराचा शैक्षणिक, औद्योगिक व सोयी सुविधांचा विकास अशी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली.

'राळेगणसिद्धी' या खेड्याने जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील 'मढी' हे शहर 'कानिफनाथगड' म्हणून प्रसिद्ध आहे. नाथसंप्रदयाचा पाया येथेच रचलेला आढळून येतो.

 

ऐतिहासिक महत्तव

पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाहीमोगल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्ती ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवासातील उत्खननानंतर काढला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचे अस्तित्त्व सिद्ध झालेले आहे.

निजामशाही

मुख्य लेख: निजामशाही

१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली.

निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मोगलशाही अनुभवली. १७५९ मध्ये अहमदनगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून अहमदनगर वर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर जिल्ह्याची स्थापना केली.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म याच नगर जिल्ह्यातील चौंडी ता.जामखेड या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे चौंडी ता.जामखेड या गावाचे पाटील होते. अहिल्यादेवींचे बालपण याच गावात गेले. त्या शिवभक्त होत्या. पुढे मराठा साम्राज्याचे इंदौर संस्थानच्या खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत. त्यांच्या नंतर अहिल्यादेवी ह्या मध्य भारताच्या माळवा राज्याच्या महाराणी म्हणून 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला.त्यांनी भारत देशात ठिकठिकाणी मंदिरे, धर्मशाळा, घाट, पाणपोई- विहिरी, बारवे, अन्नछत्रे उभारले.

भारत छोडो आंदोलन

इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी. घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.

राजकीय संरचना

अहमदनगर जिल्ह्यात २ लोकसभा मतदारसंघ असून १२ विधानसभा मतदारसंघ आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

हा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ, कर्जत-जामखेड, पारनेर, राहुरी, शेवगाव-पाथर्डीश्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ

हा इ.स. २००९ पासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ श्रीरामपूर, शिर्डी, अकोले, संगमनेर, कोपरगाव, नेवासा या विधानसभा मतदारसंघांचा बनला आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ

तसेच जिल्ह्यात ७५ जिल्हा परिषद मतदारसंघ असून, १५० पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

शेती

ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुले ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे.

कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ होय. या ठिकाणी कृषीविषयक विविध अभ्यासक्रम शिकवले जातात तसेच अनेक पिकांबाबत संशोधन केले जाते. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले भंडारदरा धरण, राहुरीजवळ बारागाव नांदूूूर येथील मुळा धरण हे जिल्ह्यातील प्रमुख सिंंचन प्रकल्प आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

धार्मिक स्थळे

  • जगदंबा देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मोहटे ता. पाथर्डी जि. अहमदनगर
  • विशाल गणपती मंदिर, माळीवाडा, अहमदनगर
  • स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिर, आव्हाणे बु, शेवगाव.
  • श्री हरिहरेश्वर कैलाश गमन देवस्थान, महादेव दर्रा (तोंडोळी)
  • कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी, पाथर्डी.
  • बहिरीआई व सेवालाल महाराज देवस्थान,सेवानगर तांडा, तोंडोळी (पाथर्डी)
  • श्री अनखिरी देवी मंदिर, धानोरा (फक्रबाद), जामखेड, अहमदनगर
  • रेणूका माता मंदिर, धामणगाव देवी
  • अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी
  • जगदंबा मंदिर / मोहटादेवी मंदिर, पाथर्डी
  • दुर्गामाता मंदिर शिराळ, पाथर्डी
  • जगदंबामाता मंदिर, टाहाकरी
  • जगदंबा देवी मंदिर, राशिन
  • श्री ढोकेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वर
  • भगवानगड, ता. पाथर्डी जि. अहमदनगर
  • रेणुकामाता मंदिर, केडगाव
  • शनी-शिंगणापूर
  • साईबाबा मंदिर, शिर्डी
  • पैस खांब मंदिर, नेवासा
  • वृद्धेश्वर शिव मंदिर, घाटशिरस
  • विठ्ठल मंदिर, पळशी (पारनेर)
  • श्री कोरठण खंंडोबा मंदिर, पिंपळगाव रोठा
  • सिद्धटेक
  • गोरक्षनाथ मंदिर, मांजरसुंबा
  • देवगड (अहमदनगर)
  • साईबाबा तपोभूमी मंदिर, कोपरगाव
  • शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव
  • भगवती माता मंदिर, कोल्हार
  • वाकडी. श्री क्षेत्र खंंडोबा मंदिर (वाकडी खंंडोबाची)
  • कुशाबाबा देवस्थान (सातवड)
  • ढोलेश्वर देवस्थान (सातवड)

ऐतिहासिक वारसा असलेली स्थळे

  • अहमदनगर किल्ला
  • सलाबत खान कबर
  • चांदबिबी महाल
  • फराहबक्ष महाल, अहमदनगर शहर
  • धर्मवीरगड (पेडगाव किल्ला)
  • किल्ले शिवपट्टन, खर्डा निजामकालीन गढी
  • कानिफनाथ गड, मढी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंनी या गडाचे बांधकाम केले.

निसर्गपर्यटन स्थळे

महत्त्वाची ठिकाणे

  • कोकमठाण - विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम
  • पुणतांबा - गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन तीर्थक्षेत्र. संत चांगदेव महाराजांची समाधी.
  • मढी - श्री कानिफनाथ समाधी मंदिर
  • साकुरी - सदगुरू उपासनी महाराज आश्रम
  • राळेगण सिद्धीहिवरे बाजार - संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली आदर्श गावे.
  • दायमाबाद- पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
  • राशिन - श्री जगदंबा देवी मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत.

अहमदनगर जिल्ह्यातील तालुके

अहमदनगर जिल्ह्यात एकूण ४ उपविभाग आणि १४ तालुके आहेत.

  1. अकोले (संगमनेर उपविभाग)
  2. कर्जत (कर्जत उपविभाग)
  3. कोपरगाव (संगमनेर उपविभाग)
  4. जामखेड (कर्जत उपविभाग)
  5. नगर (अहमदनगर उपविभाग)
  6. नेवासा (श्रीरामपूर उपविभाग)
  7. पाथर्डी (अहमदनगर विभाग)
  8. पारनेर (अहमदनगर विभाग)
  9. राहाता (श्रीरामपूर उपविभाग)
  10. राहुरी (श्रीरामपूर उपविभाग)
  11. शेवगाव (अहमदनगर उपविभाग)
  12. श्रीगोंदा (अहमदनगर उपविभाग) नवीन रचनेनुसार
  13. श्रीरामपूर (श्रीरामपूर उपविभाग)
  14. संगमनेर (संगमनेर उपविभाग)

नवीन रचनेनुसार श्रीगोंदा (पूर्वीचा कर्जत उपविभाग) व पारनेर यांचे एकत्रित उपविभागीय कार्यालय अहमदनगर येथे स्थापण्यात आले आहे.

अहमदनगर शहरापासून १२ किमी अंतरावर चांदबीबीचा महाल आहे ती एक ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच शहराच्या पूर्वेस भातोडी या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाची भिंत छत्रपती शाहू महाराज यांनी एका युद्धाच्या वेळी फोडली होती व त्या पाण्याच्या प्रवाहाने विरोधी सैन्य वाहून गेले होते असा इतिहास सांगितला जातो तसेच तिथे शहाजी राजे यांचे बंधू शरीफजी राजे यांची समाधी देखील आहे.

तसेच प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी अहमदनगर शहरात वास्तव्य केलेले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांचे जन्मगाव देखील याच जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील चिचींडी या गावी झालेला आहे.

स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे पूर्वजांचे मूळ गाव पारनेर तालुक्यातील हंगा आहे अशी ही आख्यायिका आहे. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी याच जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. जायकवाडी धरण हे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जायकवाडी या ठिकाणी आहे.

संदर्भ