अलेक्झांडर द ग्रेट
छोटा मजकूर
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अलेक्झांडर द ग्रेट (सिकंदर) | ||
---|---|---|
'दरायस तिसरा' या पर्शियन सम्राटाबरोबरील युद्धात लढताना अलेक्झांडर द ग्रेट, पॉंपेई येथील एक मोझेक | ||
अधिकारकाळ | इ.स.पू. ३३६ - इ.स.पू. ३२३ | |
राज्यव्याप्ती | ग्रीस, अनातोलिया, सीरिया, फिनीशिया, जुदेआ, गाझा, इजिप्त, बॅक्ट्रिया, मेसोपोटेमिया, इराण, पंजाब | |
जन्म | जुलै २०, इ.स.पू. ३५६ | |
पेल्ला, मॅसेडोनिया | ||
मृत्यू | जून ११, इ.स.पू. ३२३ | |
बॅबिलोन | ||
पूर्वाधिकारी | फिलिप दुसरा, मॅसेडोन | |
वडील | फिलिप दुसरा, मॅसेडोन | |
आई | ऑलिंपियास | |
पत्नी | रॉक्सेन | |
इतर पत्नी | स्टटेरा, बार्सिन | |
संतती | चौथा अलेक्झांडर, मॅसेडोन |
महान अलेक्झांडर, अर्थात तिसरा अलेक्झांडर, मॅसेडोन (अन्य नावे: अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर ; ग्रीक: Μέγας Ἀλέξανδρος ; मेगास आलेक्सांद्रोस) (जुलै २०, इ.स.पू. ३५६ ते जून ११, इ.स.पू. ३२३) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो.
आपल्या कारकीर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया,फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी (मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हणले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हणले गेले आहे.
प्लूटार्क आणि एरियन या प्राचीन ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवलेला अलेक्झांडरचा समग्र इतिहास योग्य आणि खरा इतिहास म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यापैकी 'अलेक्झांडरचे बालपण आणि तारुण्या'वर प्लूटार्कचा इतिहास अधिक समग्र आहे.
बालपण
संपादनजन्म व बालपण
संपादनइ.स.पूर्व ३५६ मध्ये (Μακεδονία) मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि त्याची चौथी पत्नी ऑलिंपियास यांच्या पोटी पेल्ला येथे अलेक्झांडरचा जन्म झाला. अलेक्झांडरच्या जन्माविषयी एक प्रसिद्ध आख्यायिका अशीही सांगितली जाते की तो फिलिपचा पुत्र नसून सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याचा पुत्र होता. याचे कारण अलेक्झांडरची आई ऑलिंपियास हिचा गूढ विद्यांवर विश्वास होता आणि तिच्याकडे एक सापही पाळलेला होता. साप हे झ्यूसचे प्रतीक मानले गेल्याने अलेक्झांडर हा साक्षात देवाचा पुत्र असल्याची वावडी उठवली गेली. या कथेत फारसे तथ्य नसले तरी राज्यविस्तार व स्वाऱ्यांच्या दरम्यान अजिंक्य ठरण्यास अलेक्झांडरला तिचा खूप मोठा उपयोग झाल्याचे सांगण्यात येते.
फिलिपच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे लहानपणापासून अलेक्झांडरची आपल्या आईशी आणि सख्खी बहीण क्लिओपात्रा हिच्याशी वडिलांपेक्षा जास्त जवळीक होती.
जन्मासंबंधीची आख्यायिका
संपादनअलेक्झांडरच्या वेळेस गर्भारशी राहण्याच्या काही दिवस आधी ऑलिंपियासला एके रात्री आपल्या गर्भावर प्रचंड गडगडाटासह विद्युत्पात झाल्याचे स्वप्न पडले. त्याच रात्री फिलिपच्या स्वप्नात तो स्वतः ऑलिंपियासचे गर्भाशय सिंहाच्या कातडीने शिवत असल्याचे दिसले. या विचित्र स्वप्नांचा अर्थ त्याने ज्योतिषाला विचारला असता त्याने सांगितले की ऑलिंपियासच्या पोटी सिंहाचे हृदय असणारा पुत्र जन्माला येणार आहे. अलेक्झांडरच्या जन्माच्या दिवशीच आर्टेमिसच्या मंदिराला आग लागली. सर्व देव अलेक्झांडरच्या जन्मोत्सवात व्यस्त असल्याने त्यांचे देवळाकडे दुर्लक्ष झाल्याचे प्लूटार्क नमूद करतो.
शिक्षण
संपादनफिलिप हा अत्यंत कुशल सेनापती होता. त्याने आपल्या सैन्याची रचना पायदळ, घोडदळ, अभियांत्रिकी अशा अनेक विभागांत केली होती. अलेक्झांडरला लढाईचे शिक्षण लहानपणापासूनच उत्तमरीत्या देण्यात आले. याचबरोबर कला, शास्त्र, राज्यकारभार यांचे योग्य ज्ञानही अलेक्झांडरला असावे अशी फिलिपची इच्छा होती. यासाठी त्याने ऍरिस्टोटलची नेमणूक अलेक्झांडरचा गुरू म्हणून केली तसेच होमरच्या साहित्याची गोडी अलेक्झांडरला लावली. ऍरिस्टोटलने दिलेली इलियडची प्रत अलेक्झांडर सतत आपल्यासोबत बाळगत असे.
ऍरिस्टोटलने अलेक्झांडरला भौतिकशास्त्र, तत्वज्ञान, भूगोल, धर्म अशा अनेक विषयांची गोडी लावली.
ब्युसाफलस आणि अलेक्झांडर
संपादनप्लूटार्कच्या इतिहासानुसार वयाच्या केवळ दहाव्या वर्षी अलेक्झांडरने ब्युसाफलस या नाठाळ घोड्याला काबूत आणल्याची गोष्ट वाचण्यास मिळते. हा घोडा विकावयास आणला तेव्हा अत्यंत उत्तम गणला गेला होता परंतु तो कोणाच्याही काबूत येत नसल्याने फिलिपने तो विकत घेण्याचे नाकारले. अलेक्झांडरने ह्या घोड्याला काबूत आणण्याची फिलिपकडे परवानगी मागितली आणि त्याला आपल्या काबूत करून त्यावर स्वार होऊन दाखवले.या अतुलनीय शौर्यावर खूश होऊन फिलिपने हा घोडा अलेक्झांडरला भेट दिला. या घोड्यावरून पुढे अनेक स्वाऱ्यांत अलेक्झांडरने लढाई केल्याचे सांगितले जाते.
फिलिपचा मृत्यू आणि अलेक्झांडरचे राज्यग्रहण
संपादनइ.स.पू. ३३९ मध्ये फिलिपने मॅसेडोनियाच्याच एका उच्च घराण्यातील क्लिओपात्राशी लग्न केले. या लग्नाच्या आनंदाप्रीत्यर्थ आयोजीत करण्यात आलेल्या स्वागतसमारंभात क्लिओपात्राचे काका, अटॅलसनी 'क्लिओपात्रा ही मॅसेडोनियाची असल्याने या लग्नामुळे जन्मणारी संतती हीच मॅसेडोनियाच्या राज्याची खरी उत्तराधिकारी व्हावी.' अशी इच्छा प्रकट केली. यावर संतापून अलेक्झांडरने आपल्या मद्याचा चषक अटॅलसच्या अंगावर फेकून "तर मग मी काय अनौरस पुत्र आहे की काय?" अशी पृच्छा केली. आपल्या व्याह्यांच्या अपमानाने रागवलेल्या फिलिपने तलवार उपसून अलेक्झांडरच्या दिशेने धाव घेतली परंतु मद्याधुंद अवस्थेत तो तेथेच खाली कोसळला. ते पाहून अलेक्झांडरने,"हाच तो मनुष्य आहे की जो अगदी ग्रीसपासून आशिया जिंकण्याचे बेत करतो आहे, आणि येथे पहा त्याला एका मेजावरून दुसऱ्या मेजापर्यंतही जाता येत नाही" असा टोमणा मारला असे सांगण्यात येते. यानंतर अलेक्झांडर आपली आई आणि सख्खी बहीण क्लिओपात्रा यांच्यासमवेत मॅसेडोनिया सोडून एपिरसला निघून गेला.
त्यानंतर फिलिपने अलेक्झांडरची समजूत घालून त्याला परत आणले परंतु ऑलिंपियास आणि क्लिओपात्रा एपिरसमध्येच राहिल्या. तसेच अलेक्झांडर आणि फिलिप यांच्यातील गैरसमजाची दरीही वाढत गेली.
पहिली स्वारी
संपादनतत्कालीन ग्रीस देश हा अनेक लहान राज्यांत विभागला गेला होता. या सर्व ग्रीक प्रदेशावर एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचे फिलिपचे स्वप्न होते. मुलाशी आणि राज्याच्या युवराजाशी बिघडलेले संबंध पुन्हा एकवार सुधारावेत म्हाणून या स्वारीत अलेक्झांडरने भाग घ्यावा अशी फिलिपची इच्छा होती. यामुळे अलेक्झांडरला स्वारीवर जाण्याची संधी कुमारवस्थेतच मिळाली. इ.स.पू. ३३८मध्ये फिलिपने अथेन्स आणि थेबेसवर स्वारी केली. या युद्धात अलेक्झांडर लढल्याची आणि लढाई जिंकल्याची नोंद मिळते. या लढाईत मिळालेला आपला विजय फिलिपने मोठ्या दिमाखात साजरा केला परंतु अलेक्झांडर या सोहाळ्यात सामील झाला नाही. काही नोंदींनुसार त्याने जखमी सैनिकांची विचारपूस आणि शुश्रूषा करणे पसंत केले असे सांगितले जाते.
याच सुमारास इ.स.पू. ३३६मध्ये पर्शियन साम्राज्याच्या सम्राटाचा मृत्यू झाला. या घटनेचा फायदा घेऊन फिलिपने आपला सेनापती पार्मेनियन याला १०,००० सैन्यानिशी आशियात पाठवले. या सैन्याने आशिया आणि युरोपच्या सीमेवरील अनेक शहरांना आपल्या ताब्यात घेतले. त्यादरम्यानच नव्या पर्शियन सम्राटाला कपटाने ठार करून दरायस तिसरा गादीवर बसला. दरायसचा पराभव करण्यासाठी फिलिपने स्वतः इराणच्या दिशेने कूच करायचे ठरवले परंतु त्यापूर्वी मॅसेडोनियाचा राजा आणि युवराज यांच्यातील संबंध घट्ट व्हावेत या हेतूने त्याने अलेक्झांडरची बहीण आणि आपली कन्या क्लिओपात्रा हिचा विवाह ऑलिंपियासचा भाऊ एपिरसचा राजा अलेक्झांडर याच्याशी निश्चित केला.
लग्नानंतर स्वागताप्रीत्यर्थ एजियाच्या सभागृहात मोठा उत्सव सुरू असतानाच पॉसेनियस नावाच्या एका तरुणाने काही खाजगी कारणस्तव फिलिपच्या छातीत खंजीर भोसकून त्याची हत्या केली. सत्तेची लालसा तसेच पॉसेनियसला पकडून न्यायसंस्थेपुढे उभे करणे सहज शक्य असतानाही अलेक्झांडरने त्याला ठार केले या आणि इतर काही कारणांवरून फिलिपच्या खुनात अलेक्झांडर आणि ऑलिंपियासचा हात असल्याचाही तर्क मांडला जातो. तसेच दरायसने आपल्या मार्गातील काटा दूर व्हावा म्हणून ही हत्या घडवून आणली अशीही शक्यता आहे.
यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी मॅसेडोनियन सैन्याने अलेक्झांडरला आपला राजा घोषित केले.
अथेन्स आणि थेबेसची बंडाळी
संपादनमॅसेडोनियाच्या तरुण राज्यकर्त्याला आपण उलथून पाडू शकू या विश्वासाने अथेन्स आणि थेबेस या दोन मांडलिक शहरांनी अलेक्झांडरच्या विरुद्ध बंड केले. इ.स.पू. ३३५ मध्ये अलेक्झांडर मॅसेडोनियाची उत्तरेकडील सीमा बळकट आणि निश्चित करण्यात मग्न होता. तिथून त्याने थेबेसवर स्वारी केली. थेबेसच्या सैन्याने अलेक्झांडरचा निकराने प्रतिकार केला. या लढाईत त्यांचे सैन्य मोठ्या प्रमाणावर कामी आले. परंतु अंतिम विजय अलेक्झांडरचा झाला. भविष्यात या शहरांकडून पुन्हा प्रतिकार व्हायला नको तसेच अथेन्ससारख्या इतर शहरांवर दहशत बसावी म्हणून अलेक्झांडरने ते शहर बेचिराख केले. थेबेसचे भाग करून ते इतर शहरांच्या अधिपत्याखाली दिले. सुमारे ६००० नागरिकांचे शिरकाण करून अंदाजे ३००० नागरिकांना गुलाम करून त्यांना आजूबाजूच्या प्रदेशात विकले; केवळ शहरातील पुजारी व अलेक्झांडरला सामील असणारे सरदार यांनाच अभयदान देण्यात आले. प्लूटार्कच्या इतिहासाप्रमाणे थेबेस शहरात पिंडर या प्रसिद्ध कवीच्या घराखेरीज इतर कोणतीही इमारत अलेक्झांडरने शिल्लक ठेवली नाही.
यानंतर अथेन्सने अलेक्झांडरसमोर आपली संपूर्ण शरणागती पत्करली. अलेक्झांडरनेही इतर बंडखोर शहरांना अभयदान दिले आणि आपले लक्ष पर्शियाच्या साम्राज्यावर केंद्रित केले.
अलेक्झांडरची कारकीर्द
संपादनपर्शियन साम्राज्याशी लढाई
संपादनपार्मेनियन पर्शियामध्ये ऱ्होड्सच्या मेमनन या मांडलिक राज्यकर्त्याशी बराच काळ युद्ध लढत होता, पण पर्शियन सैन्यापुढे त्याचे फारसे काही चालत नव्हते. शेवटी अलेक्झांडरने स्वतः लढाईत भाग घेण्याचे ठरवले. अलेक्झांडर येतो आहे असे कळताच मेमननने अलेक्झांडरच्या वाटेवरील शेते नष्ट करणे, पाण्याचा, अन्नधान्य आणि इतर साधन-सामग्रीचा पुरवठा नष्ट करून अलेक्झांडरला परतण्यास भाग पाडण्याचा बेत रचला. परंतु त्याच्या सैन्यातील बऱ्याच सरदारांना तो मान्य झाला नाही. अलेक्झांडरला परतवून लावण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करावेत असे ठरले आणि त्यातून ग्रेनायकसची लढाई झाली.
ग्रेनायकसची लढाई
संपादनया लढाईचे वर्णन एरियनने लिहिलेल्या इतिहासाप्रमाणे केले आहे. ही लढाई एका बाजून अलेक्झांडर, पार्मेनियन आणि दुसऱ्या बाजूने ऱ्होड्सच्या मेमनन या पर्शियन साम्राज्याच्या मांडलिक राज्यकर्त्यांमध्ये ग्रेनायकस नदीच्या तीरावर झाली. ग्रेनायकस हे प्राचीन ट्रॉयच्या स्थानाजवळील एक शहर होते. या युद्धात मॅसेडोनियाचे सैन्य ५००० घोडदळ आणि ३०,००० पायदळ असे होते तर पर्शियाचे सैन्य १०,००० पर्शियन पायदळ, ८,००० भाडोत्री ग्रीक सैन्य आणि १५,००० घोडदळ असे होते. (वेगवेगळ्या इतिहासकारांच्या नोंदींप्रमाणे या आकड्यांत फरक संभवतो.)
ग्रेनायकस नदीच्या उत्तरेकडे पर्शियन सैन्य होते तर दक्षिणेकडे अलेक्झांडरचे सैन्य. एरियनच्या इतिहासानुसार, पर्शियन सैन्याचे घोडदळ त्यांच्या पायदळाच्या पुढे उभे राहिले होते आणि सर्वांत मागे भाडोत्री ग्रीक सैन्य होते. अलेक्झांडरने ताबडतोब युद्धाला सुरुवात केली की पार्मेनियनच्या सांगण्यानुसार दुसऱ्या दिवशी पहाटे सुरुवात केली याबाबत इतिहासकारांत मतभेद दिसतात, एरियनच्या मते ३ मे ला या युद्धास तोंड फुटले.
बाजूच्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे मॅसेडोनियाच्या सैन्याने प्रथम डावीकडून छोटा (फसवा) हल्ला चढवला. पर्शियाच्या सैन्याने मोठ्या सैन्यानिशी आपला मोर्चा डावीकडे वळवला. याचा फायदा घेऊन अलेक्झांडरने आपले घोडदळ उजवीकडून पर्शियाच्या सैन्याच्या मध्यभागी नेऊन हल्ला चढवला. पर्शियाच्या सैन्याने निकराने प्रतिकार केला तरीही त्यांचा प्रतिकार तोकडा ठरला आणि त्यांच्या सैन्याची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. मॅसेडोनियाचे सैन्यही कामी आले. स्वतः अलेक्झांडर जिवावर बेतलेल्या हल्ल्यातून वाचल्याचे सांगितले जाते.
अलेक्झांडरच्या पर्शियावरील स्वारीचा प्रमुख उद्देश पर्शियाच्या अकिमेनिड साम्राज्याच्या तावडीतून ग्रीक शहरांची सुटका करणे आणि त्यावर ग्रीक अंमल बसवणे हा होता. ग्रेनायकसच्या लढाईनंतर त्याने त्या प्रदेशावर आपला मांडलिक राज्यपाल नेमला. यानंतर अलेक्झांडरने आपला मोर्चा सार्डिस, करिया आणि इतर समुद्रतटाजवळील शहरांकडे वळवला आणि ही शहरे आपल्या ताब्यात घेऊन त्यावर ग्रीक शासन बसवले. तेथून त्याने आपली सेना लिसिया आणि पॅम्फेलिया या महत्त्वाच्या बंदरांकडे वळवली. हे प्रदेश ताब्यात घेतल्यावर त्याने निअर्कस या आपल्या मित्राला या प्रदेशाच्या राज्यपालपदी नेमले. समुद्रतटाजवळ इतर कोणतीही शहरे न उरल्याने अलेक्झांडरने आपला हल्ल्याची दिशा पर्शियाच्या मुख्य भूमीकडे वळवली.
दरायस तिसरा याच्याशी युद्ध लढायचे झाल्यास फर्जियाचे पठार हा उपयुक्त प्रदेश होता. घोडदळाच्या लढाईसाठी उत्तम अशी सपाट, पिकाऊ जमीन आणि पाणी मॅसेडोनियाच्या सैन्याच्या गरजा भागवण्यास पुरेसे होते. अलेक्झांडरने आपले सैन्य दोन गटांत विभागले. अर्धे सैन्य पार्मेनियनच्या नेतृत्वाखाली पश्चिमेकडून सार्डिसच्या दिशेने आत घुसले तर अलेक्झांडरच्या नेतृत्वाखालील सैन्य पॅम्फेलियाकडून उत्तरेला वळले. या दोन्ही सैन्यांनी वाटेत लागणाऱ्या लहान मोठ्या शहरांचा पाडाव केला आणि हे दोन्ही गट फर्जियाची राजधानी गॉर्डियन येथे एकमेकांना मिळाले. आख्यायिकेनुसार येथेच अलेक्झांडरने 'गॉर्डियन गाठ' सोडवली. ही गाठ सोडवणारा आशियाचा सम्राट बनेल असे भाकित वर्तवण्यात आले होते. ऍंटिगोनसला फर्जियाचा राज्यपाल नेमून अलेक्झांडरने आपले सैन्य अंकाराच्या मार्गावरून सिलिसियाच्या द्वारापाशी आणले. आतापर्यंत अलेक्झांडरच्या सैन्याने सपाट पठारावरून वाटचाल केली होती. सिलिसियाच्या खिंडीत आपल्यावर छुपे हल्ले होतील या भीतीने अलेक्झांडरने आपल्या सैन्याला केवळ रात्री पुढे सरकण्याची आज्ञा दिली. सिलिसियाची राजधानी टॉर्सस येथे पोहोचेपर्यंत अलेक्झांडरला फारसा प्रतिकार झाला नाही. टॉर्सस ताब्यात घेऊन अलेक्झांडरने इ.स.पूर्व ३३३ सालातील ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात या शहरात आपल्या सैन्याची छावणी ठेवली.
आयससची लढाई
संपादनअलेक्झांडर आणि दरायस यांच्या सैन्याची आयसस (शहर) येथे पिनारस नदीच्या तीरावर गाठ पडली. या लढाईला आयससची पहिली लढाई म्हणून ओळखले जाते. अलेक्झांडरचे पायदळ आणि घोडदळ मिळून सुमारे ४५,००० सैन्य होते तर दरायसचे पायदळ, घोडदळ आणि भाडोत्री ग्रीक सैन्य मिळून सुमारे १ लाखावर सैन्य होते. ग्रीक सैन्याची एक बाजू पार्मेनियनच्या अधिपत्याखाली तर दुसरी बाजू अलेक्झांडरच्या अधिपत्याखाली लढली. दरायस रथातून तर अलेक्झांडर घोड्यावरून लढल्याचे सांगितले जाते. दोन्ही बाजूंनी तुंबळ युद्ध लढले गेले. शेवटी दरायसच्या रथाचा सारथी ठार झाला आणि दरायसने युद्धभूमीवरून माघार घेतली आणि पळ काढला. दरायसच्या या कृतीने त्याच्या सैन्याचे मनोधैर्य खच्ची झाले आणि ग्रीक सैन्याने त्यांचा धुव्वा उडवला.
या युद्धात सुमारे २०,००० पर्यंत मनुष्यहानी झाली. या युद्धानंतर पार्मेनियनने दमास्कस येथे लगोलग मोर्चा वळवून दरायसची प्रचंड संपत्ती आपल्या ताब्यात घेतली. तिचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात येते—५५ टन सोने, प्रचंड किंमतीची चांदी आणि चांदीच्या वस्तू, ३२९ गणिका, ३०६ आचारी, ७० मद्य ओतणाऱ्या दासी, ४० अत्तरिये आणि ज्यात दरायसची आई, पत्नी स्टटेरा आणि मुलगी (हिचे ही नाव स्टटेराच होते.) यांचा समावेश होता असा दरायसचा जनानखाना.
येथून पुढे पूर्वेला दरायसच्या मागावर जायचे की समुद्रतटावरील बाकीची बंदरे ताब्यात घेऊन पर्शियन साम्राज्याचे नाविक तळ उद्ध्वस्त करायचे हे अलेक्झांडरला ठरवायचे होते. एजियन समुद्र आणि गाझा पट्टीतील पर्शियन नाविक दळामुळे ग्रीक शिबंदी आणि दाणागोटा अलेक्झांडरच्या सैन्यापर्यंत पोहोचत नव्हता. तसेच ग्रीक विश्वाला असलेल्या प्राचीन इजिप्तच्या आकर्षणातून या राष्ट्राला भेट देण्याची अलेक्झांडर आणि ग्रीक सैन्याची मनीषा असल्याने त्याने इजिप्तमार्गे प्रयाण करायचे ठरवले.
इजिप्तकडे प्रयाण
संपादनटायर आणि गाझाचा वेढा
संपादनइजिप्तच्या वाटेवर लागणाऱ्या बऱ्याच शहरांनी अलेक्झांडरपुढे शरणागती स्वीकारली. फिनिशियातील टायर आणि गाझा या शहरांनी मात्र अलेक्झांडरशी मुकाबला करण्याचे ठरवले. या शहरांना अलेक्झांडरच्या सैन्याने वेढा घालून शहराच्या भिंतींवर तोफांचा मारा केला. त्याबरोबर त्यांचे नाविक तळही उद्ध्वस्त केले गेले. या शहरांतील नागरिकांची मोठ्याप्रमाणावर जीवितहानी झाली. यानंतर या दोन्ही शहरांनी अलेक्झांडरपुढे शरणागती पत्करली.
इजिप्त त्यावेळेस पर्शियाच्या साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता. पर्शियन साम्राज्यासाठी लागणारे धनधान्य आणि सैन्यबळ वाढवण्यासाठी इजिप्तच्या भूमीचा वापर होत असे. इजिप्तच्या नागरिकांना पर्शियन साम्राज्याला फार मोठे करही भरावे लागत, त्यामुळे अलेक्झांडरला इजिप्त स्वतःचा रक्षणकर्ता समजू लागले होते आणि अलेक्झांडरला विरोध करण्याची शक्यता मावळली होती. इ.स.पूर्व ३३२ मध्ये अलेक्झांडर इजिप्तला पेल्युसिअम (सध्याचे पोर्ट सैद) येथे पोहचला असता तेथील पर्शियाच्या मांडलिक शासकाने त्याचे भव्य स्वागत केले. तेथून अलेक्झांडर पुढे मेंफिसला गेला. मेंफिसला जात असता हेलिओपोलिसला (सध्याच्या कैरोच्या उत्तरेस) रा या इजिप्तमधील सूर्यदेवतेच्या मंदिरात त्याला इजिप्तचा फॅरो म्हणून घोषित करण्यात आले.
येथून अलेक्झांडरने आपला मोर्चा पुढे वायव्य दिशेला वळवला.
अलेक्झांड्रियाची निर्मिती
संपादनइ.स.पूर्व ३३१ मध्ये अलेक्झांडरने नाईल नदीच्या पश्चिमेकडील मुखावर भू-मध्य समुद्राच्या किनारी एक शहर स्थापन करण्याचे ठरवले. एजियन समुद्र आणि त्यामार्गे चालणाऱ्या व्यापारावर वर्चस्व ही या शहराच्या स्थापनेमागे प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते. या बंदर असलेल्या शहराचे नामकरण अलेक्झांड्रिया असे करण्यात आले.
मुंबई बंदरातील एका गोदीलाही अलेक्झांड्रा डॉक्स असे नाव होते. पूढे ते नाव बदलून इंदिरा डॉक्स असे झाले.
अलेक्झांडर येथून पुढे लिबियाच्या वाळवंटातील सिवा येथील अमुन रा (ग्रीक उच्चार ॲमन) या देवाच्या मंदिरात कौल घेण्यास गेला. येथे त्याला देवाच्या कौलानुसार झ्यूस/ अमुनचा पुत्र म्हणून घोषित करण्यात आले. जनता आणि सेनेकडून निर्विवाद पाठिंबा मिळवण्यासाठी ही एक राजकारणाची चाल असावी असे अनेक तज्ज्ञांचे मत पडते. सिवाला दिलेल्या भेटीनंतर अलेक्झांडर पुन्हा मेंफिसला परतला. यानंतर आशियात समेरिया येथे बंडाळी झाल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याने आपल्या सैन्याची आघाडी पुन्हा आशियाच्या बाजूला वळवली.
समेरियातील बंड मोडून काढून तो असिरियाच्या दिशेने वळला. इ.स.पूर्व ३३१ च्या जुलै महिन्यात सुमारे ४०,००० पायदळ आणि ७,००० घोडदळानिशी अलेक्झांडरने युफ्रेटिस नदी पार केली. या सुमारास मॅसेडोनियाच्या हेरखात्याने दरायसने असिरियाच्या पठारावर खूप मोठ्याप्रमाणात सैन्य गोळा केल्याची बातमी आणली. सप्टेंबरच्या महिन्यात तिग्रीस नदी पार करून अलेक्झांडरचे सैन्य दरायसच्या शोधार्थ निघाले.
पर्शियन साम्राज्याचा निःपात आणि आशियाचे सम्राटपद
संपादनगागामेलाचे युद्ध
संपादनया युद्धात सैन्याची डावी बाजू पार्मेनियनने तर उजवी फळी अलेक्झांडरने सांभाळली. विरुद्ध दिशेने दरायस आपल्या रथातून युद्धाला तयार होता. दरायसच्या रथाच्या चाकांना धारदार भाल्यांची पाती लावल्याचे सांगितले जाते. शत्रूपक्षाच्या पायदळाला कापून काढण्याचा तो एक मार्ग होता. दरायसच्या सैन्यात भारतातून आणलेल्या हत्तींचाही समावेश होता परंतु प्रत्यक्ष युद्धात त्यांचा उपयोग करण्यात आला नाही असे सांगितले जाते. या युद्धात अलेक्झांडरच्या बाजूने ७००० घोडदळ आणि ४०००० पायदळ लढले तर दरायसच्या बाजूने सुमारे दीड लाख सैन्य लढले असा पुरावा सापडतो. अलेक्झांडरच्या कुशल युद्धनीतीपुढे दरायसच्या सेनेचे काही चालले नाही. दरायसच्या घोडदळाला इतरत्र जाण्यास आणि गुंतवून ठेवण्यास भाग पाडून अलेक्झांडरने पर्शियाच्या युद्ध संरचनेत फूट निर्माण केली आणि या दरीचा फायदा घेऊन दरायसवर हल्ला चढवला. या युद्धातही दरायसने आपल्या मोजक्या सैन्यासमवेत पळ काढला आणि तो पूर्वेच्या दिशेने गेला.
येथून अलेक्झांडर बॅबिलोनकडे वळला. बॅबिलोनचा मांडलिक राजा मझेअस हा दरायस समवेत युद्धात लढला होता. दरायस पळून गेल्यावर तोही बॅबिलोनला परतला आणि अलेक्झांडर बॅबिलोनला पोहोचल्यावर त्याने अलेक्झांडरचे मांडलिकत्व पत्करले. त्याने युद्धात दाखवलेल्या पराक्रमावर खूश होऊन अलेक्झांडरने त्याला आणि तेथील नागरिकांना अभय दिले आणि त्यांची घरे न जाळण्याचा निर्णय दिला. तसेच, मझेअसला त्या प्रदेशाचा शासक निश्चित करून बॅबिलोनवरून त्याने आपली आघाडी त्या काळी मोठे असलेले शहर सुसा येथे वळवली. या शहराला लुटण्यात आले. अलेक्झांडरने या शहरावर आपले शासन बसवले आणि आपली आघाडी पर्शियन राजधानी पार्सा (पेर्सोपोलिस) येथे वळवली.
पेर्सेपोलिसचा पाडाव
संपादनअलेक्झांडरच्या स्वारीची बातमी कळताच पार्साच्या नागरिकांनी तेथून पलायन केले. पार्साच्या क्षत्रपाने (satrap/ governor) खजिन्यासह शहर अलेक्झांडरच्या स्वाधीन केले. पर्शियाचा एक सम्राट झेरेक्सिस याने केलेल्या ग्रीसवरील स्वारीचे उट्टे काढण्यासाठी आणि त्या निमित्ताने दरायसलाही धडा शिकवण्यासाठी अलेक्झांडरने हे शहर लुटून त्याला नंतर आग लावून बेचिराख करण्याचे आदेश दिले. या आगीत झेरेक्सिसचा राजवाडा जळून राख झाला. येथे अलेक्झांडरला "आशियाचा सम्राट" घोषित करण्यात आले.
दरायसचा मृत्यू
संपादनयानंतर मॅसेडोनियाचे सैन्य दरायसच्या मागावर प्रथम वायव्येला परंतु दरायसने तेथून आपला तळ हलवल्याने पूर्वेच्या दिशेने निघाले. दरायस बॅक्ट्रियाच्या दिशेने त्या राज्याची मदत मिळवण्यासाठी गेल्याचे मॅसेडोनियाच्या सैन्याला कळले परंतु मॅसेडोनियाच्या सैन्याने दरायसला गाठण्यापूर्वीच बॅक्ट्रियाच्या क्षत्रप बेसस याने वाटेत त्याची हत्या केली आणि स्वतःला पर्शियाचा सम्राट घोषित केले. अलेक्झांडरने दरायसचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा अंत्यविधी पेर्सेपोलिस येथे इतमामाने केला आणि बेससच्या मागावर जाण्याचे ठरवले.
पार्मेनियनचा वध
संपादनयानंतर अलेक्झांडरने हर्केनियावर स्वारी केली आणि बॅक्ट्रियाच्या दिशेने आघाडी उघडली. या दरम्यान अलेक्झांडरच्या खूनाचा कट समोर आला. पार्मेनियनचा पुत्र फिलोटस याला हा कट करण्याबद्दल दोषी ठरवून त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. या कटानंतर पार्मेनियन, अलेक्झांडरविरुद्ध बंडाळी माजवेल या भीतीने पार्मेनियनचा काटा काढण्याचेही ठरले. यावेळेस पार्मेनियन एकबटना येथे आघाडी सांभाळत होता. पुत्राच्या मृत्यूची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच अलेक्झांडरने दूत पाठवून या वृद्ध सेनानीचा मृत्यू घडवून आणला. या प्रकरणावरून अलेक्झांडरमधील हुकूमशाही वृत्ती वाढीस लागली होती असे तज्ज्ञांचे मत बनते.
अफगाणिस्तानाकडे कूच
संपादनफिलोटस आणि पार्मेनियनच्या प्रकरणांतून थोडे स्थैर्य आल्यावर अलेक्झांडरने आपल्या ६०,००० च्या सैन्यानिशी पूर्वेच्या दिशेने गांधार (कंदहार) प्रांताकडे प्रयाण केले. येथे त्याने अलेक्झांड्रिया, कॉकेशस या शहराची पुनःस्थापना केली आणि आपल्या अनेक सेनानींकडे या शहराचा कारभार सोपवला. पूर्वेकडील लढाया आणि राज्यकारभार सांभाळताना या शहराचा राजकीय व लष्करी तळ म्हणून वापर करता यावा अशी अलेक्झांडरची मनीषा होती.
येथून पुढे त्याने बॅक्ट्रियाच्या दिशेने प्रयाण केले. या वाळवंटातील खडतर वाटेवर ग्रीक सैन्याला अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. येथून पुढे बेससचा माग काढत अलेक्झांडरच्या सैन्याने अमू दर्या (प्राचीन ओक्सस नदी) ही नदीच्या दिशेने कूच केले आणि बॅक्ट्रियाची राजधानी ताब्यात घेतली. बेससचा माग काढताना अलेक्झांडरच्या सैन्याला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. रखरखीत वाळवंट, पाण्याची कमतरता, उन्हाळा या सर्वांना तोंड देताना ग्रीक सैन्यातील अनेक सैनिक मृत्युमुखी पडले. अलेक्झांडरने दिवसा विश्रांती घेऊन रात्री वाटचाल करण्याचे ठरवले. अमुदर्या पार करण्याचे सर्व मार्ग बेससने बंद केले होते. नदीतील सर्व जहाजे त्याने जाळून टाकल्याचे सांगितले जाते. ग्रीक सैन्याने तराफे बांधून त्यावरून ही नदी पार केली आणि ते सोगदिया प्रांतात पोहोचले.
बेससला पुढे जाण्यास पर्याय नव्हते. याच सुमारास त्याच्या सरदारांनी बंड करून बेससला अलेक्झांडरचा एक विश्वासू सेनापती टोलेमी याच्या ताब्यात दिले. अलेक्झांडरने बेससला हालहाल करून मारल्याचे सांगितले जाते. यानंतर ग्रीक सैन्याने सीर दर्या नदीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सोगदिया प्रांतात ग्रीक सैन्याच्या तेथील क्षत्रप आणि टोळ्यांशी अनेक चकमकी घडल्या. यापैकी एका टोळीच्या प्रमुखाची कन्या रॉक्सेन (रोशनाक्) हिच्याशी अलेक्झांडरने लग्न केले. ही गोष्ट ग्रीक सैन्याला चकित करून गेली. याचबरोबर अलेक्झांडरने अनेक पर्शियन योद्ध्यांना आपल्या सैन्यात दाखल करून घेतले, इतकेच नाही तर काही पर्शियन रीतिरिवाजही अवलंबिले. या सर्व घटनांमुळे अलेक्झांडरच्या सैन्यात थोडी चलबिचल झाल्याचे सांगितले जाते.
येथून अलेक्झांडरने आपले लक्ष पूर्वेकडील पंजाब प्रांताकडे वळवले.
भारतावर स्वारी
संपादनइ.स.पूर्व ३२६ ला अलेक्झांडरच्या सैन्यातील दोन प्रमुख तुकड्यांनी गांधार प्रांत लुटला. या तुकड्यांपैकी एका तुकडीचे नेतृत्व अलेक्झांडरचा प्रिय मित्र हेफेस्टियन तर दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व पेर्डिक्कसने केले. ग्रीक सैन्याने यानंतर खैबर खिंड पार केली आणि तत्कालीन पेशावरच्या जवळ तळ ठोकला. अलेक्झांडर स्वतः एका तुकडीसह उत्तरेकडील टोळ्यांच्या पारिपत्यासाठी वळला. येथे अलेक्झांडरच्या क्रूरपणाचे वर्णन इतिहासात केले जाते. एका टोळीशी झालेल्या युद्धात अलेक्झांडर थोडाफार जखमी झाला असता त्याच्या सैन्याने ही टोळी त्यांतील बायका मुलांसह कापून काढल्याचे सांगितले जाते. तर दुसऱ्या एका टोळीशी झालेल्या युद्धात शरण आलेल्या शरणागतांचेही शिरकाण झाल्याचे सांगितले जाते.
अलेक्झांडर आपल्या तुकडीला घेऊन नीसा या प्राचीन शहराच्या भेटीस गेला आणि तेथून तो सिंधू नदीकडे वळला. पेर्डिक्कस आणि हेफेस्टियन यांनी सिंधूनदीवर पूल बांधला होता. ग्रीक सैन्य हा पूल पार करून तक्षशिलेला पोहोचले.
या काळात भारत तीन मोठ्या भागांत विभागला गेला होता. पहिल्या भागात तक्षशिलेचा राजा अंभी याच्या राज्याचा समावेश होणारी सिंधू नदीच्या पश्चिमेकडील राज्ये होती, दुसऱ्यात पुरु(पोरस), या पौरव वंशातील राजाचे सिंधू नदीच्या पूर्वेकडील राज्य आणि तिसऱ्या भागात गंगेच्या खोऱ्यांतील प्रबळ मगध राज्य होते.
तक्षशिलेचा राजा अंभी याने अलेक्झांडर आणि त्याच्या सैन्याचे स्वागत केले. तक्षशिलेच्या मुक्कामात अलेक्झांडरने अनेक भारतीय विद्वानांशी चर्चा केल्याचे दिसून येते. या वास्तव्यात काश्मीरचा राजा अंभीसार याने अलेक्झांडरसमोर स्वतःहून शरणागती पत्करली परंतु पुरूने शरणागती पत्करण्यास साफ नकार दिला.
पुरु आणि अंभीच्या राज्यांच्या सीमेवर झेलम नदी (प्राचीन नाव: वितस्ता) होती. एकदा जूनचा महिना सुरू झाला आणि नदी दुथडी भरून वाहू लागली की ग्रीक सैन्याला नदी ओलांडणे अशक्य होणार आणि पैलतीरावर आपण सुरक्षित राहू,या कल्पनेत पुरु गाफील राहिला.
पुरूशी युद्ध
संपादनया विषयाचा विस्तृत लेख पहा - झेलमची लढाई
अलेक्झांडरने हा धोका ओळखून जलद निर्णय घ्यायचे ठरवले. त्याप्रमाणे इ.स.पूर्व ३२६ च्या मे महिन्यात त्याने आपल्या अर्ध्या सैन्याला पूर्व दिशेने कूच करण्याचे आदेश दिले. पावसाळ्यात संपूर्ण सैन्य नेणे अशक्य होते. पुरूची संरक्षण व्यवस्था चोख असूनही भर पावसाच्या एका रात्री ग्रीक सैन्य नदी पार करून पैलतीरावर पोहोचले. तेथे त्यांची पुरूच्या मुलाशी चकमक झडली. भारतीय सैन्याने युद्धात रथांचा वापर केला. पावसाने चिखलात हे रथ रुतून बसले आणि भारतीय सैन्याला ग्रीक सैन्याशी दोन हात करणे अशक्य झाले. या युद्धात पुरू पुत्राचा पराभव झाला.
यानंतर ग्रीक सैन्याने पुरूच्या तळाकडे प्रयाण केले. पुरुच्या मुलावर मिळवलेल्या विजयामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले होते. पुरूच्या सैन्यापेक्षा ग्रीक सैन्य शस्त्रास्त्रे, युद्धसामग्री या सर्वांत वरचढ होते. काळजी होती ती फक्त पुरूकडील हत्तींची. ग्रीक सैन्याला हत्तींवरून लढणाऱ्या सैन्याशी युद्ध करण्याचा अनुभव नव्हता. पुरूने आपल्या पायदळासमोर आणि घोडदळासमोर हत्ती उभे केले होते. ग्रीक घोड्यांना हत्तींशी लढण्याची सवय नसल्याने ते बिथरतील हे अलेक्झांडरला आणि त्याच्या सेनापतींना माहित होते. त्यांनी भारतीय सैन्याच्या दुतर्फा असणाऱ्या रथांवर हल्ले चढवले.ग्रीक तीरंदाजांनी हत्तींवर शरसंधान केले आणि माहुतांना ठार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्याने पुरूच्या सैन्यातील हत्ती बिथरून मागे फिरले आणि पुरूच्या सैन्याला चिरडून जाऊ लागले. ग्रीक सैन्याने यानंतर चोहोबाजूंनी हल्ला चढवला. या युद्धात पुरूचे बरेचसे घोडदळ मारले गेले आणि अगदी क्षुल्लक पायदळ जिवंत राहिले. जखमी झालेल्या पुरूने शेवटपर्यंत शर्थीने लढा दिला आणि शरणागती पत्करली.
अलेक्झांडरने पुरूची भेट घेतली तेव्हा त्याला विचारले, "शरणागताला कशी वागणूक अपेक्षित आहे?" यावर पुरूने निर्भयपणे उत्तर दिले, "राजासारखी!" पुरूच्या शौर्यावर खूश होऊन अलेक्झांडरने त्याला पंजाब प्रांताचा क्षत्रप बनवले. तसेच त्याचे मूळ राज्यही काश्मीर सीमेपर्यंत वाढवले. या युद्धापूर्वी अलेक्झांडरचा प्रिय घोडा ब्युसाफलस वृद्ध होऊन मरण पावला होता. त्याच्या स्मरणाप्रीत्यर्थ अलेक्झांडरने ब्युसाफला या शहराची स्थापना केली. आपल्या विजयाच्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने युद्धभूमीजवळच नायसीया या शहराचीही स्थापना केली.
सैन्यात बंडाळी
संपादनयानंतर पूर्वेकडील मगध या प्रबळ राज्यावर हल्ला करण्याचा अलेक्झांडरचा मानस होता. परंतु पावसाळ्यात पावसामुळे आणि हिमालयातील बर्फ वितळल्याने सर्व नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. चिनाब नदी पार करेपर्यंत ग्रीक सैन्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. ग्रीक सैन्याला पूर्वेकडे कूच करणे कठीण होत ; इतकी वर्षे घराबाहेर राहून, युद्ध करून सैनिक कंटाळले होते. मगधवर चालून जाण्याची त्यांची इच्छा नव्हती.
अलेक्झांडर सैन्याच्या या निर्णयाने अतिशय नाराज झाला असे सांगितले जाते. त्याने आपल्या सर्व सेनापतींची सभा बोलावून त्यांना गंगेच्या पलीकडे जाऊन जगाचा अंत पाहण्याची मनीषा व्यक्त केली परंतु त्याच्या निर्णयाला कोणीही अनुमोदन दिले नाही. ग्रीक सैनिकांनी सिंधू नदीच्या तटावर झालेल्या युद्धातील एक शूर सेनापती कोएनस याच्यामार्फत अलेक्झांडरशी परतण्याविषयी बोलणी केली.
दुसऱ्या दिवशी अलेक्झांडरने परतण्याची घोषणा केली आणि तीन दिवस स्वतःला कोंडून घेतले. या काळात त्याने कोणाशीही संभाषण केले नाही, तरीही सैन्याचा निर्णय बदलला नाही. अलेक्झांडरलाही सैन्यात बंडाळी नको होती. बियास नदीच्या तीरावर त्याने आपल्या सैन्याची अनेक तुकड्यांत विभागणी केली.
परतीचा प्रवास
संपादनबंडाळी माजवणाऱ्या आणि अशा सैनिकांबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना अलेक्झांडरने नव्याने वसवलेल्या शहरांत मागे राहण्याचे आदेश दिले. कोएनसचा अचानक मृत्यू झाला आणि स्वतः अलेक्झांडरने समुद्रमार्गे परतण्याचा निर्णय घेतला. नंतर सैन्यासह तो पश्चिमेला झेलम नदीच्या दिशेने गेला. समुद्रमार्गाने परतण्यासाठी जहाजे बांधणे आवश्यक होते. जहाजांचे बांधकाम होत असता अलेक्झांडरने तेथेच आपला तळ ठोकला होता.
पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अलेक्झांडरने मुलतान प्रांतातून परतीचा प्रवास सुरू केला. येथे अलेक्झांडरच्या सैन्याची माळवा आणि क्षुद्रक या लहान राज्यांशी तुंबळ लढाई झाली. हेफेस्टियन आणि टोलेमी यांनी पूर्वेकडून हल्ला चढवला तर अलेक्झांडरने घोडदळाचे नेतृत्व केले. या युद्धात भारतीय राज्यांनी शरणागती पत्करली तरी ग्रीक सैन्याची बरीच हानी झाली. स्वतः अलेक्झांडर छातीला बाण लागून फुप्फुसाला इजा झाल्याने जबर जखमी झाला. ही गंभीर दुखापत त्याला आयुष्यभर पुरली. अलेक्झांडरने रॉक्सेनच्या वडिलांना या राज्यांचे क्षत्रप बनवले.
यानंतर सिंध प्रांतातून प्रवास करत असताना अलेक्झांडरच्या सैन्याची मूषिक आणि शंभू (सिंध प्रांतातील लहान राजे) या दोन राजांच्या सैन्याशी चकमक झडली. भारतीय ब्राह्मणांनी या युद्धाची ठिणगी सर्वदूर पसरवली असे इतिहास सांगतो. येथून अलेक्झांडरचे सैन्य पट्टाला या (पाताळ, आधुनिक पाकिस्तानातील हैदराबाद शहर) प्राचीन शहरात पोहोचले. भारतात आपले अनेक अधिकारी तैनात करून ग्रीक सैन्याने बलुचिस्तानमार्गे वाळवंटातून पर्शियाच्या दिशेने वाटचाल केली. हा प्रवास सुमारे ६० दिवस चालला. त्या प्रवासात पाणी व अन्नाच्या कमतरतेमुळे ग्रीक सैन्याला फार हाल काढावे लागले. जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जाते. हे वाळवंट पार केल्यावर अलेक्झांडरच्या सैन्याने कार्मेनियातील पुरा या प्राचीन शहरात मुक्काम ठोकला. तोपर्यंत भारतातील लहानमोठ्या राज्यांनी उठाव करून ग्रीक शासनाला जेरीस आणले होते. येथे अलेक्झांडरची भेट समुद्रमार्गाने सैन्यासह आलेल्या निअर्कसशी झाली. इथला मुक्काम पुढे सुसाला हलवण्याचे ठरले.
सम्राटपद
संपादनइ.स.पू. ३२४च्या मार्च महिन्यात अलेक्झांडर सैन्यानिशी सुसाला पोहोचला. आशियाच्या पूर्वेकडील सीमा वगळता इतरत्र अलेक्झांडरच्या शासनाचा अंमल सर्वत्र बसला होता. सुमारे १० वर्षांपेक्षा अधिक काळ आशियात धामधुमीचा गेल्यावर प्रथमच सम्राटपद भोगण्याची संधी अलेक्झांडरला येथे मिळाली. अलेक्झांडरने आपल्या सेनापती आणि महत्त्वाच्या सैनिकांना येथे अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. यानंतर अलेक्झांडरने आपल्या सेनापतींची लग्ने पर्शियातील सरदार कन्यांशी लावून दिली. स्वतः अलेक्झांडर आणि हेफेस्टियन यांनी दरायस कन्यांशी लग्ने केली. अलेक्झांडरने आणखी एक लग्नही येथे केले.
या काळात मॅसेडोनियन सैन्य पुन्हा ग्रीसला जाण्याची तयारी करत होते. समुद्रमार्गे अलेक्झांडर त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था करत होता परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी त्याने बॅक्ट्रियन सैन्याला तेथे पाचारण केले. याचा मॅसेडोनियन सैन्यावर विपरीत परिणाम झाला. राजा आपल्यापेक्षा मांडलिक सैन्यावर अधिक विसंबतो आहे या विचाराने बंडाळी माजण्याची चिन्हे दिसू लागली. अलेक्झांडरने प्रथम बळाचा वापर करून आणि नंतर सामोपचाराने हे बंड मोडून काढले आणि सैन्य परत पाठवण्यास सुरुवात केली.
सुसानंतर अलेक्झांडरने आपला तळ एकबटनाला हलवला. येथे त्याचा प्रिय मित्र आणि सेनापती हेफेस्टियन आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. हेफेस्टियनच्या मृत्यूने अलेक्झांडर कोलमडून पडल्याचे सांगितले जाते. हेफेस्टियनच्या मृत्यूचे दुःख त्याने अखेरपर्यंत उराशी बाळगले.
यानंतर अलेक्झांडरने आपला मुक्काम बॅबिलॉनला नेला.
मृत्यू
संपादनबॅबिलॉनमध्ये अलेक्झांडर नव्या युद्धाची तयारी करत होता. हे युद्ध अरबांबरोबर लढण्याचे घाटत होते. रोम आणि सिसिलीसह युद्ध करण्याचाही अलेक्झांडरचा मानस होता असे सांगितले जाते. याच दरम्यान आयोजित एका समारंभात अलेक्झांडरने अतिमद्यपान केले. समारंभानंतर आपल्या एका मित्राच्या आमंत्रणावरून अलेक्झांडरने त्याच्या सोबत जाऊन अधिक मद्यपान केल्याचे सांगितले जाते.त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच अलेक्झांडर आजारी पडला आणि उत्तरोत्तर त्याची तब्येत बिघडत गेली. या आजारपणात त्याने आपल्या हातातील आंगठी पेर्डिक्कसला काढून दिली आणि ’आपण राज्य सर्वशक्तिमानाच्या हाती सोपवतो आहोत’ अशी घोषणा केली असे इतिहास सांगतो.
इ.स.पू. ३२३ मध्ये ११ जूनच्या दुपारी अलेक्झांडर द ग्रेट बाबिलॉनच्या दुसऱ्या नेबुकड्रेझर या राजाच्या राजवाड्यात मरण पावला. त्याचे वय फक्त ३३ होते. त्याच्या मृत्यूचे खरे कारण अजून समजलेले नाही.
राज्याची विभागणी
संपादनअलेक्झांडरच्या मृत्युपश्चात त्याच्या राज्याला उत्तराधिकारी निवडला गेला नसल्याने त्याच्या राज्याची विभागणी कशी करायची याबाबत त्याच्या महत्त्वाच्या सेनापतींमध्ये एकवाक्यता झाली नाही. अलेक्झांडरच्या पश्चात त्याचा एक सावत्र भाऊ अरिडिअस, बर्सिन या दासीपासून झालेला पुत्र हेरॅक्लीस आणि रॉक्सेनच्या गर्भातील अंकुर या सर्वांचा राज्यावर दावा होता. अलेक्झांडरची दुसरी पत्नी आणि दरायस पुत्री स्टटेरा हिचा खून करण्यात आला. निअर्कस, पेर्डिक्कस, टोलेमी आणि इतर सेनापती यांचे राज्याचा उत्तराधिकारी कोण असावा या वादावर एकमत होईना. त्यातून पुढे अंतर्गत युद्धपरिस्थिती निर्माण झाली.
या वादातून पुढे अरिडिअस, आणि काही काळाने रॉक्सेन आणि अलेक्झांडरचा पुत्र अलेक्झांडर चौथा यांचे खून करण्यात आले.
अलेक्झांडरच्या राज्याचे पुढीलप्रमाणे भाग झाले :
- ॲटिगोनसच्या अधिपत्याखालील मॅसेडोनिया आणि ग्रीस
- सेल्युकसच्या अधिपत्याखालील मेसोपोटेमिया आणि पर्शिया
- टोलेमीच्या अधिपत्याखालील इजिप्त आणि पॅलेस्टाईन
- पूर्वेकडील अनेक क्षत्रपांच्या ताब्यातील अफगाणिस्तान ते भारतापर्यंतचा भाग
अफगाणिस्तानापासून भारतापर्यंत पूर्वेकडील प्रदेश अलेक्झांडरने नेमलेल्या अनेक क्षत्रपांच्या ताब्यात होता. त्यांची या प्रदेशावरील पकड सुटल्याने तसेच अंतर्गत युद्ध, नागरिकांचा उठाव अशा अनेक कारणांनी हा प्रदेश सतत लढायांत राहिला. पंजाब प्रांत इ.स.पूर्व ३१६ मध्ये भारतातील सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्या अधिपत्याखाली आला.
चित्रपट
संपादनसिकंदरच्या रोमहर्षक कहाणीवर अनेक हिंदी-इंग्रजी चित्रपट, दूरचित्रवाणीपट, ॲनिमेशनपट निघाले. इंग्रजीत 'Alexander' (2004) Director - Oliver Stone, Alexander the Great (1956) Director - Robert Rossen, Alexander the Great (Greek Film, 1980), Young Alexander the Great (2010), The True Story of Alexander The Great - Documentary on History Channel of TV-2005, length 2 Hr 30 Min) वगैरे वगैरे.
हिंदीतला सोहराब मोदी दिग्दर्शित 'सिकंदर' १९४१ साली निघाला. त्यात सोहराब मोदी, पृथ्वीराज कपूर यांच्या भूमिका होत्या.
सिकंदर हा भारतीय भाषांमध्ये 'जेता' याच्या समानार्थी शब्द झाला. हा अर्थ धरून हिंदीत 'सिकंदर' शब्द असलेले काही सामाजिक सिनेमे निघाले. सुधीर मिश्रा दिग्दर्शित 'सिकंदर' (२००९), 'जो जीता वही सिकंदर' (१९९२), 'मुकद्दर का सिकंदर' (१९७८), ए.वेंकटेश दिग्दर्शित 'एक और सिकंदर', 'सिकंदर सडक का' हे त्यांतील काही चित्रपट होत.
व्यक्तिचित्र
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- Cartledge, Paul. Alexander the Great: The Hunt for a New Past. Woodstock, NY; New York: The Overlook Press, 2004 (hardcover, ISBN 1-58567-565-2); London: PanMacmillan, 2004 (hardcover, ISBN 1-4050-3292-8); New York: Vintage, 2005 (paperback, ISBN 1-4000-7919-5).
- Green, Peter. Alexander of Macedon: 356–323 B.C. A Historical Biography. Berkeley and Los Angeles: University of California Press, 1992. ISBN 0-520-07166-2.
- Hammond N.G.L. The Genius of Alexander the Great.First published in 1997 by Gerald Duckworth & Co. Ltd. ISBN 0-8078-2350-3(cloth: alk.paper)
बाह्य दुवे
संपादन- अलेक्झांडर द ग्रेट इन अवर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |