पेशवे

पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद
(पेशवा या पानावरून पुनर्निर्देशित)

पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. पेशव्यांना छत्रपती सम्राट शाहू महाराजांनी पुणे सरंजाम जहागीर म्हणून दिले होते.

मराठा साम्राज्याचा ध्वज
बाळाजी विश्वनाथ भट पेशवे
बाजीराव बाळाजी तथा थोरले बाजीराव पेशवे
बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे
माधवराव बल्लाळ तथा थोरले माधवराव पेशवे
रघुनाथराव पेशवे
सवाई माधवराव पेशवे
धाकटे बाजीराव पेशवा
दुसरे नानासाहेब पेशवे

पेशवा हा पर्शियन(फारसी) शब्द असून त्याचा अर्थ 'सर्वात पुढे असलेला' असा आहे. दख्खनमध्ये त्या शब्दाचा मुस्लिम शासकांकडून प्रयोग केला गेला. मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या शिवाजी महाराज, त्यांच्या इ.स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते. पेशव्यांचे कार्य व अधिकार हे मुख्य प्रधानाच्या समकक्ष होते. शिवाजी महाराजांनी या पदाचे सन १६७४ मध्ये पंतप्रधान असे नामकरण केले. परंतु ते नाव त्या काळात त्यामानाने अधिक वापरले गेले नाही. मात्र आज कोणत्याही देशाच्या मंत्रिमंडळ प्रमुखाला मराठीत पंतप्रधानच म्हणतात.

खरे तर पेशवा म्हणजे छत्रपतींचा सरकारकून; पण श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशव्यांनी मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर असा पराक्रम गाजवला की लोकांनी त्यांना सहजच श्रीमंत हा किताब दिला. हा किताब पेशव्यांनी १०४ वर्षे टिकवून ठेवला. पेशवे छत्रपतींचे एकनिष्ठ सेवक होते. पण अतिशय पराक्रमी असून बहुतेक सर्व पेशवे हे अल्पायुषी होते. त्यामुळे राज्यात विद्या, कला यांची वाढ करण्यासाठी त्यांना स्वस्थता मिळाली नाही पेशव्यांची कारकीर्द म्हणजे सततची युद्धमोहीम असे चित्र उभे राहिले.

भट घराण्यातील पंतप्रधानांनी पेशवे या पदाला महत्त्व प्राप्त करून दिले. पहिला बाजीराव ( १७२०-१७४०) हा ताकदवान व शूर पेशवा होता. त्याचा काळात मराठे संपूर्ण भारतीय उपखंडात वर्चस्व गाजवत होते.

पेशवे रघुनाथराव यांनी इंग्रजांबरोबर मैत्री केल्याने पेशव्यांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली. नंतरचे पेशवे हे नाममात्र होते व त्यांनी मराठा साम्राज्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यास उतरती कळा लागली. मराठा साम्राज्याचे अनेक तुकडे स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून चालवले जाऊ लागले. उदा.होळकर,शिंदे,भोसले,गायकवाड,नवलकर,घोरपडे, वगैरे. इंग्रजांनी १८१८ साली मराठा साम्राज्याचा पूर्णपणे ताबा घेतला. नाना फडणविसांच्यानंतर इंग्रजांच्या उद्योगांकडे पेशव्यांचे दुर्लक्ष झाले, आणि मराठा राज्याचा अस्त झाला आणि त्यामुळे १०४ वर्षांची पेशव्यांचीची कारकीर्द झाकोळली गेली.

पेशव्यांची कारकीर्द : श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्यातील पेशवे

संपादन

श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्यातील पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ असा होता :

  1. बाळाजी विश्वनाथ पेशवे (इ.स.१७१४-१७२०)
  2. पहिले बाजीराव पेशवे (इ.स.१७२०-१७४०)
  3. बाळाजी बाजीराव पेशवे ऊर्फ नानासाहेब पेशवे (इ.स.१७४०-१७६१)
  4. माधवराव बल्लाळ पेशवे ऊर्फ थोरले माधवराव पेशवे (इ.स.१७६१-१७७२)
  5. नारायणराव पेशवे (इ.स.१७७२-१७७४)
  6. रघुनाथराव पेशवे (अल्पकाळ)
  7. सवाई माधवराव पेशवे (इ.स.१७७४-१७९५)
  8. दुसरे बाजीराव पेशवे (इ.स.१७९६-१८१८)
  9. दुसरे नानासाहेब पेशवे (गादीवर बसू शकले नाहीत)

पेशवाईतील स्त्रिया

संपादन

पेशवे कुटुंबातील सख्खे-सावत्र, चुलत व दत्तकपुत्र असलेल्या तमाम पुरुषांच्या विवाहांमुळे सुमारे ५५-६० सुस्वरूप ब्राह्मण स्त्रिया पेशवे घराण्यात सासुरवाशिणी म्हणून आल्या. या सगळ्याच स्त्रिया अतिशय सुरेख आणि हुशार होत्या. बाळाजी विश्वनाथ यांची पत्‍नी राधाबाई यांना इतक्या सुरेख वधू मिळतात तरी कुठे, असा प्रश्न छत्रपती शाहूमहाराजांच्या राणीवंशाला पडत असे. म्हणून पेशव्यांकडील विवाह समारंभांना देखणी वधू बघण्यासाठी त्या स्त्रिया आवर्जून येत असत.

  • अन्नपूर्णाबाई : मोरो भिकाजी थत्ते यांची कन्या, चिमाजीअप्पांची पत्नी.
  • आनंदीबाई : रघुनाथराव ऊर्फ राघोबादादांची दुसरी पत्‍नी, ओकांची कन्या
  • उमाबाई : सदाशिवरावभाऊंची पत्नी; निधन २२ मार्च १७५०.
  • जानकीबाई : रघुनाथराव ऊर्फ राघोबादादांची पहिली पत्नी
  • काशीबाई : थोरल्या बाजीरावांची पत्‍नी (चासचे सावकार महादजी कृष्ण जोशी यांची कन्या)
  • गंगाबाई : नारायणराव पेशव्यांची पत्‍नी, कृष्णाजी हरी साठे यांची कन्या
  • गोपिकाबाई : बाळाजी बाजीराव यांची पत्‍नी, माहेरची रास्ते-गोखले.
  • दुर्गाबाई (हरिपंत दीक्षित पटवर्धन यांची कन्या) नानासाहेबांचा ज्येष्ठ पुत्र विश्वासराव याची पत्नी. लग्नानंतर दुर्गाबाईंचे नाव बदलून लक्ष्मीबाई झाले.
  • पार्वतीबाई : सदाशिवरावभाऊंची पत्‍नी; पेणचे सावकार कृष्णराव ऊर्फ भिकाजी नाईक कोल्हटकर यांची कन्या.
  • बयाबाई :
  • भिऊबाई बारामतीकर : चिमाजीअप्पांची बहीण
  • मस्तानी : थोरल्या बाजीरावांची पत्‍नी, राजा छत्रसालाची मानसकन्या. मस्तानीची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्‍या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे.[संदर्भ हवा]
  • यमुनाबाई : बापू गोखले यांच्या दोन पत्‍नींपैकी एक. यमुनाबाई बापूंच्या मृत्यूनंतर साताऱ्यास जाऊन राहिली. तिला मूलबाळ नव्हते. पहिलीस दोन पुत्र होते. त्यांपैकी एक लहानपणीच वारला व दुसरा गोपाळ हा अष्टीच्या लढाईत मारला गेला.
  • यशोदाबाई : सवाई माधवरावांची दुसरी पत्‍नी
  • रमाबाई : सवाई माधवरावांची पहिली पत्‍नी, थत्ते यांची कन्या
  • रमाबाई : थोरले माधवराव पेशवे यांची पत्‍नी, सोलापूरकर यांची कन्या; ही सती गेली.
  • राधाबाई : बाळाजी विश्वनाथ यांची पत्‍नी, थोरल्या बाजीरावांची आई, माहेरची बर्वे. नेवरे येथील दादाजी मल्हार बर्वे यांची कन्या. विवाहप्रसंगी राधाबाई ७ वर्षाच्या होत्या. त्यांना दोन पुत्र (थोरले बाजीराव आणि चिमाजी अप्पा) आणि तीन कन्या होत्या. या सर्व मुलांना त्यांनी लेखन, जमाखर्च आणि त्याचबरोबर लष्करी आणि युद्धशास्त्राचे शिक्षण दिले.
  • लक्ष्मीबाई : विश्वासराव यांची पत्‍नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली.
  • वाराणशीबाई : आनंदीबाईंची सून. यांनी युद्धकला अवगत केली होती. पण आयुष्याच्या अखेरीस त्या दुर्दैवी ठरल्या.

दुसरे बाजीराव ऊर्फ रावबाजी यांना ११ बायका होत्या, त्या अशा : (संदर्भ हवा)

  • अभ्यंकर यांची कन्या (धाकट्या) सत्यभामाबाई
  • आठवले यांची कन्या
  • गोखल्यांची मुलगी.
  • पेंडसे यांची कन्या सरस्वतीबाई
  • फडके यांची कन्या राधाबाई
  • भागवतांची कन्या भागीरथीबाई
  • मंडलीक यांची कन्या (थोरल्या) सत्यभामाबाई
  • मराठे यांची कन्या लक्ष्मीबाई
  • रिसबूड यांची कन्या गंगाबाई
  • वाईकर रास्ते यांची कन्या वाराणशीबाई. ह्यांचा संस्कृत भाषेचा चांगला अभ्यास होता. स्त्रियांना सर्वसाधारणपणे कसलेही शिक्षण देण्याचा प्रघात नसलेल्या त्या काळात ही लक्षणीय गोष्ट होती. ह्यांनी युद्धकला अवगत केली होती. पण आयुष्याच्या अखेरीस त्या दुर्दैवी ठरल्या. वाराणशीबाईंवरून प्रभावित होऊन अनंतशास्त्री डोंगरे यांनी ज्या आपल्या मुलीला शिकविले होते, ती मुलगी पुढे पंडिता रमाबाई म्हणून नावाजली गेली.
  • हरिभाऊ देवधर यांची कन्या कुसूबाई

पेशवाईतील कर्तबगार माणसे

संपादन

पेशवाई थाट

संपादन

'पेशवाई थाट' हा महाराष्ट्रात अगदी सहज वापरला जाणारा वाक्प्रयोग आहे. मध्यंतरी 'पेशवाई थाट' म्हणून पेशवाईतील जेवणावळींचे वर्णन करणारा एक कागद प्रसिद्ध आहे. त्या कागदात कामाची एक यादी आहे. सदर यादी 'काव्येतिहास-संग्रहात प्रसिद्ध झालेली ऐतिहासिक पत्रे, यादी वगैरे लेख' (संपादक गो.स. सरदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकसकर) अशी प्रसिद्ध झाली आहे. १० फेब्रुवारी १७८३ च्या नाना फडणवीस यांनी बनवून दिलेल्या नेमणूक यादीत सुमारे बावीस बंद आहेत. सवाई माधवराव पेशव्यांच्या लग्नातील जबाबदाऱ्या व नेमणुका नाना फडणवीस यांनी करून दिल्या आहेत.

यादीतील काही उल्लेख दिले, म्हणजे 'पेशव्यांचा थाट' आणि नाना फडणवीसांची काटेकोर व्यवस्था आणि शिस्त याचे काही मासलेवाईक नमुने नजरेस येतील. उदा०

  1. जेवण झाल्यावर हात धुवायला कोमट पाणी, हातावर साखर व दात कोरावयास लवंग देत जावे.
  2. गंध-अक्षत लावताना - वाकडे गंध लागू नयें व अक्षता लावताना नाकाला धक्का न लागता कपाळचा मध्य पाहून लहान मोठी अक्षत ओघळ न येता वाटोळी लावावी व गंध उभे-आडवे ज्यास पाहिजे तसे लावावे.
  3. गंध अक्षत लावणार याणी नखे काढून बोटे चांगली करून लावावे'
  4. गंध राहिल ते जपोन दूसरे दिवसास राखीत जावे.
  5. विडे ज्यास जसे देणे तसे यथायोग्य पाहून देत जाणे. वावगा खर्च करू नये.
  6. भोजनासाठी बनवायची पक्वान्ने व जिन्नस याची तर एक व्यवस्थित यादीच दिली आहे. अगदी विडा बनवण्यासाठीचे साहित्य व पूर्ण पद्धत यात दिलेली आहे.
  7. चांगल्या कोशिंबिरी वीस प्रकारच्या व तिखट चटण्या चांगल्या बारीक वाटून रुचिकर कराव्यात. निंबू चिरून पंचामृत, रायती व भरते दोन आदिकरून पंचवीस तीस प्रकार करावे. एक दुसरी चमत्कारिक कोशिंबीर करावी, 'विचारून वाढावी.' !!

पेशवाईतील खाशांसाठीचे जेवण

संपादन

पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात. लाकडावर शिजवलेले अन्न पेशवे कधीही ग्रहण करीत नसत. नित्य, नैमित्तिक पंगतीचे भोजन बनविण्यासाठी पेशवाईत मक्ते दिले जात.

पुण्यातील हिराबागेत निरनिराळ्या कारणास्ताव पेशवे अनेक मेजवान्या आयोजित करत. त्या मेजवानीच्या बेतात साधा व केशरी गोड भात, कागदासारख्या पातळ पाटवड्या, पुरणपोळ्या, रंगीबेरंगी मिठाया, भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, केळीच्या पानावर वाढल्या जात. पानाच्या बाजूला द्रोणात दूध, तूप, ताक, दहीद्राक्षाचे सार वाढलेले असे. पेशवे ब्राम्हण असल्याने त्यांचे सोवळेओवळे अत्यंत कडक म्हणून खुद्द पेशवे मेजवानीच्या पंगतीत भोजनात बसत नसत. दूर उभे राहून अथवा आसनस्थ होऊन पंगतीचा समाचार घेत असत.

सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथम विवाहप्रसंगी भोजनसमयी पानात खायचे पदार्थ कोठे व कसे वाढायचे याबद्दलची वाढ़पाची पद्धत नाना फडणीसांनी सुरू केली. पानात वरच्या बाजूला मध्यभागी मीठ, मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबिरी, लोणची, पापड, भजी, कुरडया, खीर व पुरण असे. मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या, आमट्या, सार, सांबार व पक्वान्ने; पानाच्या मध्यभागी पोळ्या, पुऱ्या व भाताचे प्रकार. ही वाढपाची पद्धत महाराष्ट्रात अजही वर्षे टिकून आहे . ब्राम्हणभोजनाच्या समयी दीड किंवा दोन हात लांब केळीचे पान, दर पानाच्या बाजूला १० ते १२ द्रोण, पानाभोवती रांगोळ्या, बसायला व टेकायला रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट, चांदीच्या वाटीत गुलाबपाणी अथवा केशरपाणी ( एक पक्वान्न खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटे स्वच्छ करण्यासाठी), पानात १० भाज्या - त्यात तोंडली, परवर, पडवळ, वांगी या भाज्या नित्य असत. तुरीचे वरण, २ प्रकारची सांबारे, आमटी, १० प्रकारची लोणची-त्यांतील एक साखरेचे गोड लोणचे असे . ३-४ प्रकारच्या फेण्या, साधे वडे, वाटल्या डाळीचे कढीवडे, साजूक तूप, माध्यम गोड मठ्ठा, २ प्रकारच्या खिरी (शेवयाची व गव्हल्याची), सपिटाच्या पूर्ण पोळ्या (पुरण पोळ्या), खिचडी, ओले हरभरे, पापड, सांडगे, चिकवड्या, मिरगोंडे (मिरगुंडे), फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या, २० प्रकारच्या कोशिंबिरी, फळभाज्या, पालेभाज्या, उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड, तळवडे, पंचामृत, रायती, ताकाची कढी, चाकवताचे सांबार, मसालेदार वांगी, सुरण, पांढरा भोपळा, मेथीची किंवा अंबाडीची भाजी, चटण्या, कोशिंबिरींत कोथिंबीर, लसूण, आले, लाल मिरच्या, तीळ, जवस, कारले, आमसुले, हरभऱ्याची डाळ, लिंबे यांचा वापर करीत. तसेच आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे. घीवर, आमरस, श्रीखंड (हे पक्वान्न दुसऱ्या बाजीरावाने प्रचारात आणले), बासुंदी, केशरी साखरभात, जिलबी (हे पक्वान्न मुघल बादशाह बाबर याने सर्वप्रथम भोजनात आणले.) लाडू , पुरणपोळी ( हे पक्वान्न जास्त रूढ होते.). भोजनोत्तर ७ पानांचा प्रसिद्ध कुलपी विडा दिला जाई. ( पेशवाईत स्त्रियांनाही विडा खायची सवय होती.)

पेशव्यांचा गणपती उत्सवातील ब्राम्हणभोजनाचा मक्ता ६९०० रुपयांचा असे. त्यात २६ दिवस रोज ५०० ब्राम्हण भोजन करीत असत. यावरून दरपात्री साडे आठ आणे भोजनाचा खर्च पेशव्यांना येत असे. सन १८०७ मधील गणपती उत्सवाच्या भोजनाचा मक्ता दररोज ५०० ब्राम्हण याप्रमाणे दिला होता. तसेच नेवैद्याच्या व थोरल्या पंगतीसाठी १२५ भोजनपात्रे आणि नैमित्तिक प्रयोजनानिमित्त दरमहा १००० पात्रे मिळून भोजनाचा २९ हजार रुपयांचा वेगळा मक्ता दिला होता . या मक्त्यात वार्षिक ३७ हजार पात्रे होत असल्याने पात्री १२ आणेप्रमाणे भोजनखर्च होत असे.

आचारी-वाढपी वगैरे

संपादन

सदर्हू्ू प्रमाणे साहित्य आचारी चांगले शहाणे लावून स्वयंपाक चांगला करावा. पात्रांचा अदमास पुसोन घेऊन दोन प्रहरांत भोजने होत अशी तजवीज करावी. स्वयंपाक भाज्या वगैरे उष्ण रसाच्या लोणची भाज्या एक सारख्या हारीने वाटोळ्या वाढाव्या. एकास एक लावू नये. आंबटी, सांबारें वरण, क्षीर वगैरेचे थेंबटे मध्ये पाडूं नयेत. गडबड न करतां चतुराईनें वाढावें. हें काम चिंतो विश्वनाथ व मोरो विश्वनाथ भावे व वाकनीस यांणी करावें.

वाढावयास असामी :-

  1. दफतरचे कारकून.
  2. वाड्यातील मंडळी.
  3. शागीर्द नवे ठेवावे.

तूप वाढावयास पांडुरंग बाबूराव यांजकडील शहाणे वाढणारे यांनी रुप्याचे तोटीच्या कासंड्यांनी वाढावें.

सदर्हू बंदोबस्त अंताजी मल्हार वांकनीस यांणी राखावा. कमी पडल्यास मशारनिल्हेस पुसावें. दोन अडीच प्रहरां सोयऱ्यांकडे भोजनाचें झाल्यास आधी वाड्यांत फराळास घालावें. भोजनाचें तिकडे होईल. जे दिवशीं रात्रौ सोयऱ्यांकडे भोजनाचें होईल ते दिवशीं दोन प्रहरी भोजनाचे वाड्यांत होईल.

विडे बांधायचे काम नि|| केशवराव बल्लाळ केतकर

संपादन

खाशीं पानें कमावीसदारांकडून आणवली आहेत, ती माफजतीने राखावीं. वरकड पानांची तरतूद जाहली न जाहली पाहत जावी व खरेदी करावीं.

सुपारी फुवर्डा वगैरे चांगली पाहून धुवावी. त्यांपैकी तबकांत मोकळी घालावयाची त्यास केशराचे पाणी देऊन, गुलाब घालून, रंगदार करावी; व काही रोठा सुपारीचे फूल पाडून ठेवावे. चिकणी सुपारी नुस्ती व खुषबोईदार करून ठेवीत जावी.

पाने कळीची गंगेरी व रामटेकी तबकांत घालावी. ती रुमालाने पुसून चांगली निवडून नीट करून ठेवून देत जावी. व काही पाने सोनेरी वर्ख लावून तयार करावी.

विडे बांधणे ते हिरवे खर्ची पानांचा व बाजूचा सात पानांचा बांधावा. पिकल्या पट्या बाजूच्या सात पानांच्या सुपारीचे पानांची गुंडी उभी घालूनभरदार चांगल्या बांधाव्या. कुलपी विडे केळीची पाने लावून दहा पानांचा एक व बारा पानांचा एक. त्यांत गंगेरी दोन पाने घालीत जावी. त्यास दुकाडीची खूण करावी. या प्रमाणे कुलपी विडे धुतली सुपारी घालून चुना नेमस्त दुसरे पानास न लागे असा घालून बांंधावे.

ज्या दिवशी ब्राह्मण भोजनास व बायकांकडील जसे विडे लागतील तशी तरतूद करीत जावी. चुना केशरी व साधा पांढरा सफेत खांसा सभेंत तबकांत ठेवण्याकरिता करावा.

साहित्यास कारकून वगैरे :-

१ कारकून
१ ढलाईत
१ प्यादे
१ शिंदे पोरगे व खिजमतगार
१ भोई
१ कामाठी

साहित्य

संपादन
  1. सुपारी, कात, आंबाडी तसलमातीस आणावी. कालचा खर्च आज समजावून चिठ्ठी घेत जावी.
  2. चुना पारनेर व रेवदंडा व धोडपे पैकीं.
  3. कुंभार काम व बुरूड काम.
  4. नगारे यांचे पूड व घागरी व खाद्या व अडकित्ते व सुऱ्या, कातऱ्या वगैरे.
  5. चुना, सुपारी व रंगण्यास केशर व गुलाब.

(अपूर्ण)

पेशव्यांच्या इतिहासावरील ललितेतर पुस्तके

संपादन
  • आनंदीबाई पेशवे (म.श्री दीक्षित)
  • आमची तलवार पहावी (पेशवाईतील पराक्रमी सरदार आणि सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांच्यावर चरित्रात्मक कादंबरी)
  • थोरला बाजीराव पेशवा (मदन पाटील)
  • थोरले बाजीराव पेशवे (बालवाङ्मय, डाॅ. विजय तारे-इंदूर, वरदा प्रकाशन)
  • प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे (डॉ. पद्माकर विष्णू वर्तक)
  • पाणिपतची बखर (रघुनाथ यादव)
  • पानिपत (विश्वास पाटील) (गुजरातीतसुद्धा)
  • पानिपत १७६१ (त्र्यं.शं. शेजवलकर)
  • पानिपतचा अखेरचा रणसंग्राम (राजा लिमये)
  • पुण्याचे पेशवे (डॉ. अ.रा. कुलकर्णी)
  • पेशवाई (कौस्तुभ कस्तुरे)
  • पेशवाईच्या सावलीत (एन.जी चाफेकर, आर्य संस्कृती प्रेस, १९३७)
  • पेशवाईतील कर्तबगार स्त्रिया
  • पेशवाईतील स्त्रिया
  • पेशवे - लेखक श्रीराम साठ्ये (प्रकाशनदिवस : अक्षय्य तृतीया, १३ मे २०१३- पृष्ठसंख्या मासिकाच्या पानाच्या आकारातील ७८० पृष्ठे.)
  • पेशवे आणि पुणे
  • पेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली - लेखक प्रा. डॉ. पुष्कर शास्त्री
  • पेशवेकालीन महाराष्ट्र (वा.कृ. भावे, भारतीय इतिहास अनुसंशोधन परिषद, नवी दिल्ली, १९७६)
  • पेशवेकालीन स्त्रियांची लहान लहान चरित्रे (चिं. ग. कर्वे)
  • पेशवे घराणे
  • पेशवे घराण्याचा इतिहास, खंड १, २. - लेखक प्रमोद ओक
  • पेशव्यांचे विलासी जीवन (लेखिका : वर्षा शिरगावकर)
  • प्रतापी बाजीराव - लेखक म.श्री. दीक्षित
  • पेशवा पहिला बाजीराव -पूर्वार्ध (१९९९) (श.श्री. पुराणिक)
  • पेशवा पहिला बाजीराव - उत्तरार्ध (२०००) (श.श्री. पुराणिक)
  • श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे (ना.के. बेहरे. १९२९
  • पेशवा दुसरा बाजीराव (छाया प्रकाशन, २०११) (श.श्री. पुराणिक)
  • पेशवे बखर (संपादक - काशिनाथ नारायण साने, पुनःप्रकाशन, वरदा प्रकाशन)
  • सरदार बापू गोखले (सदाशिव आठवले)
  • बाळाजी बाजीराव - लेखक म.वि. गोखले
  • बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा (२००७) (]]श.श्री. पुराणिक]])
  • बाळाजी विश्वनाथ - लेखक म.वि. गोखले
  • दौलतीचे रणधुरंधर पेशवा बाळाजी विश्वनाथ (मदन पाटील)
  • बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे चरित्र (चिं.ग. गोगटे)
  • मराठा आणि पेशवे कालखंडातील महाराष्ट्रातील कर्तबगार स्त्रिया (डॉ. ज्योती व्होत्कार)
  • मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किंमतीचे पेशवे (रामचंद्र नारायण लाड)
  • ’मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात : प्रशासकीय, सामाजिक व आर्थिक अभ्यास (१७०७ ते १८१८)’ हे डॉ. पुष्कर शास्त्री यांनी लिहिलेले पुस्तक पुण्यातील व गुजरातमधील पेशवाई काळातील अस्सल अप्रकाशित कागदपत्रांच्या सखोल अभ्यासावर आधारित आहे. गुजरातचा काही भाग जसा आधी दाभाडे आणि नंतर गायकवाडांच्याकडे होता तसाच काही भाग पेशव्यांच्या अंमलाखाली होता. या भागावर पेशव्यांच्या शासन व्यवस्थेची, त्यांच्या महसूल, न्याय आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीची माहिती या पुस्तकात विस्ताराने येते. याशिवाय गुजरातमधील जनतेचे सामाजिक व धर्मिक जीवनाचीही ओळख या पुस्तकातून होते. या काळात महसूल वाढवण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांना कशा प्रकारे अनेक सवलती देत होते, गुजरातमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम रयतेसाठीसुद्धा कोणत्या विशेष सवलती दिल्या गेल्या होत्या, या पेशव्यांच्या संपूर्ण प्रशासन व्यवस्थेची माहिती या पुस्तकात आहे.
  • श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे चरित्र, १९०८ (चिं.ग. गोगटे)
  • रणधुरंधर थोरले माधवराव (पंडित कृष्णकांत नाईक)
  • श्रीमंत थोरले माधवराव पेशवे (सखाराम अच्युत सहस्रबुद्धे, १९३७, पुनरावृत्ती, वरदा प्रकाशन, २०१७) : या पुस्तकात न.चिं. केळकर यांनी दिलेला अभिप्राय आहे, व परिशिष्टात सावरकरांचा बक्षिसप्राप्त निबंध आहे.
  • दौलतीचे रणधुरंधर रघुनाथराव पेशवा (मदन पाटील)
  • राऊ (थोरले बाजीराव पेशवे) : ना.स. इनामदार
  • राघोभरारी - लेखक वासुदेव बेलवलकर
  • राजसत्तेच्या फटीतून पेशवेकालीन स्त्रिया - नीलिमा भावे
  • रामदास आणि पेशवाई - लेखक मा.म. देशमुख
  • वादळवारा : श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची कहाणी (मनोहर साळगांवकर)
  • वैभव पेशवेकालीन वाड्यांचे (डॉ. मंदा खांडगे)
  • व्ही.जी. दिघे यांचे 'पेशवा बाजीराव I & दि मराठा एक्स्पान्शन' (इंग्रजी पुस्तक)
  • शिकस्त (पार्वतीबाई, सदाशिवरावभाऊंच्या पत्नी) : ना.स. इनामदार
  • शिवकालीन व पेशवेकालीन स्त्रीजीवन - लेखिका शारदा देशमुख (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रकाशन, १९७३)
  • शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा (नीलिमा भावे)
  • शिवकाळ व पेशवाईतील दुष्काळाचा इतिहास (सुभाष पाटील, अनिल बैसाणे, अनिल कठारे)
  • संचित (पेशवाईतील स्त्रियांवरील पुस्तक) - लेखिका नयनतारा देसाई
  • सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ - लेखक कौस्तुभ कस्तुरे

पेशव्यांच्या इतिहासावरील ललित पुस्तके/नाटके/चित्रपट/दूरचित्रवाणी कार्यक्रम

संपादन
  • ... आणि पानिपत (संजय सोनवणी)
  • आभाळाचे ऊर फाटले (पेशवा सदाशिवरावभाऊ याच्यावरील कादंबरी; लेखिका - नयनतारा देसाई))
  • कळस चढविला मंदिरी (कॅप्टन वासुदेव बेलवलकर)
  • झेप -लेखक ना.सं. इनामदार
  • घटकेत रोविले झेंडे (थोरल्या बाजीरावांवरील कादंबरी, लेखक - कॅ. वासुदेव बेलवलकर)
  • घाशीराम कोतवाल (नाटक- लेखक विजय तेंडुलकर)
  • तोतयाचे बंड (नाटक, लेखक - नरसिंह चिंतामण केळकर)
  • नवरत्ने हरपली रणांगणी (पानिपतवरील कादंबरी, लेखक - कॅ. वासुदेव बेलवलकर)
  • नानासाहेब पेशवे सेनापती तात्या टोपे - लेखिका : नंदिनी शहासने
  • पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ - लेखिका - ज्योती चिंचणीकर
  • पानिपत (चित्रपट)(हिंदी चित्रपट, दिग्दर्शक - आशुतोष गोवारीकर) (२०१९)
  • पानिपत - लेखक विश्वास पाटील; गुजराती, कन्नड भाषांतरेही.
  • रणांगण ( नाटक, लेखक - विश्वास पाटील)
  • पानिपत असे घडले...(कादंबरी, संजय क्षीरसागर)
  • पानिपतचा रणसंग्राम - लेखक - सच्चिदानंद शेवडे
  • पानिपतचा विजय - लेखक - प्रा. नामदेवराव जाधव
  • पानिपतावरील संकल्पित महाकाव्याचा भाग (वि.दा. सावरकर)
  • पुण्याचे पेशवे (डॉ. अ.रा. कुलकर्णी)
  • पेशवेकालीन पुणे (दत्तात्रय बळवंत पारसनीस)
  • पेशवाईचा दरार - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचा ध्रुव ढळला - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचा पुनर्जन्म - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचा पुनर्विकास - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईची प्राणप्रतिष्ठा - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईची मध्यान्ह - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे दिव्य तेज - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे ध्रुवदर्शन - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे पानिपत - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे पुण्याहवाचन - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे पुनर्वैभव - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईचे मन्वंतर - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईच्या सावलीत - लेखक ना.गो. चाफेकर
  • पेशवाईतील आठवणी (बालवाङ्मय, जयंत खरे)
  • पेशवाईतील उत्तर-दिग्विजय - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील कथा
  • पेशवाईतील कलिप्रवेश - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील दुर्जन - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील धर्मसंग्राम - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील पश्चिमदिग्विजय - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील यादवी - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईतील साडेतीन शहाणे (शं.रा. देवळे)
  • पेशवाईतील सुरस कथा (बालसाहित्य, जयंत खरे)
  • (पेशवाईतील स्त्रियांसंबंधी पुस्तक) : संचित (लेखिका नयनतारा देसाई)
  • पेशवाईवर सावट - लेखक वि.वा. हडप
  • पेशवाईवरील गंडांतर - लेखक वि.वा. हडप
  • प्रतिशोध पानिपतचा (कौस्तुभ कस्तुरे)
  • मंत्रावेगळा - लेखक ना.सं. इनामदार
  • मंत्र्युत्तम नाना - लेखिका ज्योती चिंचणीकर
  • रणझुंझार थोरले बाजीराव पेशवे (कादंबरी, लेखिका - नयनतारा देसाई)
  • रविराज तू, मी रोहिणी (बाजीराव-मस्तानीच्या कथेवर आधारलेले नाटक)
  • रणझुंझार थोरले बाजीराव पेशवे (कादंबरी, लेखिका - नयनतारा देसाई))
  • ‘बाजीराव आणि मस्तानी’ ही ओळ असलेले एक भावगीत (गायक-संगीत दिग्दर्शक - गजानन वाटवे).
  • बाजीराव मस्तानी (मराठी नाटक)
  • बाजीराव मस्तानी (हिंदी चित्रपट)
    • दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी)(२०१६)
  • बाजीराव मस्तानी (मराठी दूरचित्रवाणी मालिका).
  • मस्तानी (ग्रंथलेखक चित्रकार द.ग. गोडसे) : पुरस्कारप्राप्त पुस्तक
  • मस्तानी : एक शोध (लेखक प्रा. डॉ. संजय घोडेकर)
  • रमा-माधव (चित्रपट- दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी)
  • राऊ - लेखक ना.सं. इनामदार
  • आभाळाचे ऊर फाटले (पेशवा सदाशिवरावभाऊ याच्यावरील कादंबरी; लेखिका - नयनतारा देसाई))
  • स्वामी - लेखक रणजित देसाई. (या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.)
  • स्वामी मालिका

हे सुद्धा पहा

संपादन