दत्तात्रय गणेश गोडसे

(द.ग. गोडसे या पानावरून पुनर्निर्देशित)

दत्तात्रय गणेश गोडसे (३ जुलै, इ.स. १९१४ - ५ जानेवारी, इ.स. १९९२) हे इतिहासकार, नाटककार, चित्रकार, नेपथ्यकार, लेखक, कला समीक्षक व १९८८ चे संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते होते. त्यांनी वि.का. राजवाडे, म.वि धोंड यांना अनुसरून फक्त मराठी भाषेत लेखन केले.[ दुजोरा हवा]

बालपण आणि शिक्षण

संपादन

द.ग.गोडसे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील वाघोडे येथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण सावनेरला, आणि कॉलेज शिक्षण नागपूरच्या मॉरिस आणि नंतर मुंबईच्या विल्ससन कॉलेजातून घेतले. त्यांनी लंडन विद्यापीठाच्या ’स्लेड स्कूल ऑफ फाइन आर्ट’मधून ललितकलेचे प्रशिक्षणही घेतले.

गोडसे यांनी मराठीत अनेक विषयांवर लिखाण केले. शिवाजी-मस्तानी-रामदास या ऐतिहासिक व्यक्तींवर, मराठी वाङ्‌मय-नाटकांवर, चित्रकला-शिल्पकला-वास्तुकलांवर आणि अगदी बुद्धकालीन स्थापत्यावर गोडसे लिहीत असत. थॉमस डॅनियल ने इ.स. १७९० साली पेशव्यांच्या दरबाराचे एक रंगचित्र काढले होते. त्यावरही गोडसेंनी एक लेख लिहिला होता. त्यांचा मराठी चित्रकार दीनानाथ दलाल यांच्यावर लिहिलेला "भारलेल्या जगातून आलेला अलौकिक माणूस" हा लेख अतिशय गाजला होता. ना.सं. इनामदार यांनी ’राऊ’ ही कादंबरी लिहिताना द.ग. गोडसे यांची खूप मदत झाली, असे त्या कादंबरीच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.

द.ग. गोडसे यांनी आपल्या चित्रांनी अनेक मासिके आणि पुस्तके सजवली. १०७हून अधिक नाटकांचे ते नेपथकार होते. तीन मराठी आणि दोन हिंदी चित्रपटांचे ते कलादिग्दर्शकही होते.

वाद-संवाद

संपादन

साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घटना, ढोंगबाजी, गटबाजी, मक्तेदारी, भाषेचा-आशयाचा बोजडपणा, नावीन्याच्या आणि प्रयोगशीलतेच्या नावाखाली चाललेला भोंगळपणा हे वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या या ’वाद-संवादा’चे विषय असत. वृत्ती-प्रवृत्तींवर टीका केली जाई आणि ती व्यक्तिगत पातळीवर घसरणार नाही, याची काळजीही घेतली जाई. शमा आणि निषाद म्हणजे अनुक्रमे द.ग.गोडसे आणि मं.वि. राजाध्यक्ष यांनी हे चुरचुरीत आणि पौष्टिक सदर जवळजवळ नऊ वर्षे चालवले. त्या काळात या सदरावर अनेकांचा रोषही ओढवला, पण अशी वृत्तिलक्ष्यी टीका वाचण्याची सवय वाचकांना लागली. 'टवाळा आवडे विनोद' या वचनाला छेद देणारे लेखन द.ग. गोडसे यांनी या सदरात सातत्याने केले.

१९४३ ते ५३ या वर्षांतील या सदरांचे निवडक संकलन वाद-संवाद (निषाद आणि शमा) याच नावाने प्रसिद्ध झाले आहे. तात्कालिक लेखन वगळून आजही प्रस्तुत वाटेल, असे लेख यात घेतल्याचे संपादकांनी म्हटले आहे. 'मुद्रणसाक्षेप' किंवा 'पदवी आणि प्रबंध' असे लेख याची उत्तम उदाहरणे आहेत.

गोडसे यांच्यावर लिहिले गेलेले लेख, ग्रंथ वगैरे

संपादन

पुरस्कार

संपादन

भारत सरकारने त्यांना ’भारताचा सर्वश्रेष्ठ नेपथ्यकार’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

पुस्तके

संपादन
 • ऊर्जायन (१९८५)
 • काळगंगेच्या काठी (१९७४) (नाटक)
 • काही कवडसे
 • गतिमानी (१९७६)
 • दफ्तनी (१९९२)
 • दीनानाथ दलाल, १९१६-१९७१ (सहलेखक : प्रभाकर कोलते, वसंत सरवटे)
 • नांगी असलेले फुलपाखरू (१९८९) : (कलावंतांचा सत्कार करणारे पुस्तक -महाराष्ट्र टाइम्स)
 • पोत (१९६३)
 • प्रतिमा (भाषांतरित)
 • सोंग
 • भारलेल्या जगातून आलेला अलौकिक माणूस (लेख)
 • मस्तानी (१९८९)
 • मातावळ (१९८१)
 • लोकधाटी (१९७९)
 • वाद-संवाद : निषाद आणि शमा (२००३) (सहलेखक - मं.वि. राजाध्यक्ष)
 • वाक विचार (१९९३)
 • शाकुंतल (कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतलचे मराठी रूपांतर)
 • शक्तिसौष्ठव (१९७२)
 • संभाजीचे भूत
 • समंदे तलाश (लेखसंग्रह) (१९८१)
 • The Genius from an Enchanted land (चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या विषयीचे लेखन)

द.ग. गोडसे यांच्याबद्दल लिहिले गेलेले

संपादन
 • द.ग. गोडसे यांच्याविषयी वाङ्मयशास्त्रविद्‌, भाषाशास्त्री आणि चिन्हाभ्यासशास्त्रतज्ज्ञ अशोक रामचंद्र केळकर यांनी लिहिले आहे, ’गोडसे यांचे कलेच्या इतिहासासंबंधीचे लिखाण क्वचित विवाद्य असले तरी जीववादाच्या दृष्टिकोनातून अतिशय मोलाचे आहे. गोडसे यांनी केवळ मराठीतच लिहिण्याचे जे ठरविले, त्यामुळे मराठी वाचकांना अपरिमित लाभ झाला आहे.’
 • द.ग. गोडसे यांची कलामीमांसा (पुस्तक, संपादक - सरोजिनी वैद्य आणि वसंत पाटणकर)

अधिक वाचन

संपादन

संदर्भ

संपादन