मौर्य साम्राज्य

प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य; भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य

मौर्य साम्राज्य हे प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य असून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य वंशाने शासन केलेल्या साम्राज्याचा कालखंड इ.स.पू. ३२१ ते इ.स.पू. १८५ इतका समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक तर सम्राट अशोक हे या साम्राज्यातील सर्वात प्रमुख शासक होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा) ही होती.[१] हे साम्राज्य इ.स.पू. ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करून स्थापन केले. त्याने त्याकाळच्या भारतातील सत्तांच्या विसंवादाचा फायदा उठवून आपल्या साम्राज्याचा पश्चिमेकडे व मध्य भारतात विस्तार केला. इ.स.पू. ३२० पर्यंत या साम्राज्याने सिकंदरच्या प्रांतशासकांना (क्षत्रप) हरवून पूर्णपणे वायव्य भारत ताब्यात घेतला होता.[२]

मौर्य साम्राज्य
इ.स.पू. ३२२इ.स.पू. १८५  
 


सर्वोच्च शिखरावर असताना मौर्य साम्राज्य (गडद निळे) मांडलिक राज्यांसहित (फिकट निळी).
ब्रीदवाक्य: सत्यमेव जयते
राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा)
शासनप्रकार निरंकुश राजतंत्रीय (अर्थशास्त्र या चाणक्याच्या ग्रंथानुसार)
राष्ट्रप्रमुख सम्राट :
चंद्रगुप्त मौर्य (इ.स.पू. ३२०-२९८)
बृहद्रथ (इ.स.पू. १८७-१८०)
अधिकृत भाषा मागधी, प्राकृत व इतर
धर्म
क्षेत्रफळ ५०,००,००० ते ५२,००,००० चौरस किमी
लोकसंख्या ६ कोटी (१/३ जागतिक लोकसंख्या)
मौर्य सम्राट (ख्रि.पू. ३२२ – ख्रि.पू. १८०)
चंद्रगुप्त (ख्रि.पू. ३२२–२९७)
बिंदुसार (ख्रि.पू. २९७-२७२/२६८)
अशोक (ख्रि.पू. २७२/२६८-२३२)
दशरथ (ख्रि.पू. २३२-२२४)
संप्रती (ख्रि.पू. २२४-२१५)
शालिसुक (ख्रि.पू. २१५-२०२)
देववर्मन (ख्रि.पू. २०२-१९५)
शतधन्वन (ख्रि.पू. १९५-१८७)
बृहद्रथ (ख्रि.पू. १८७-१८०)
पुष्यमित्र
(शुंग राजवंश)
(ख्रि.पू. १८०-१४९)

५०,००,००० वर्ग चौरस किमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक व भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. आपल्या सर्वोच्च शिखरावर असताना हे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला पाकिस्तान, अफगाणिस्तानइराणचे काही भाग इतके पसरले होते. भारताच्या मध्य व दक्षिण प्रदेशांमध्ये चंद्रगुप्तबिंदुसार यांनी कलिंग (सध्याचा ओरिसा) हा प्रदेश वगळता विस्तार केला. नंतर सम्राट अशोकाने कलिंग जिंकून घेतला. अशोकांच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी मौर्य साम्राज्याचा अस्त झाला. इ.स.पू. १८५ मध्ये शुंग साम्राज्याने मौर्यांना पराभूत करून मौर्य साम्राज्य संपुष्टात आणले.

चंद्रगुप्ताने आपल्या कारकिर्दीत सिंधू नदीपलीकडील अलेक्झांडरच्या साम्राज्याचा प्रदेश जिंकून घेतला. चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटर याला पराभूत करून इराणचेही काही भाग जिंकून घेतले.

कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकांच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याने ५० वर्षे शांतता व सुरक्षितता अनुभवली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून या धर्माचा श्रीलंका, आग्नेय व पश्चिम आशिया तसेच युरोपमध्ये प्रसार केला. अशोकाचे सारनाथ येथील स्तंभशीर्षावरील सिंह व अशोकचक्र हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहे.

या साम्राज्याची लोकसंख्या अंदाजे ५ ते ६ कोटी इतकी होती व हे साम्राज्य हे जगातील लोकसंख्येनुसार मोठे साम्राज्य होते.[३]

इतिहास

संपादन

चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य

संपादन

मौर्य साम्राज्याची स्थापना साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याने चाणक्य या तक्षशिला येथील त्याच्या शिक्षकाच्या मदतीने केली. आख्यायिकांनुसार, चाणक्य मगध प्रांतात गेला. मगधामध्ये नंद घराण्यातील धनानंद हा जुलमी राजा राज्य करीत होता. त्याने चाणक्याला अपमानित केले. सूड घेण्याच्या निर्धाराने चाणक्याने ही जुलमी सत्ता मोडून काढण्याची प्रतिज्ञा केली.[४] दरम्यान, अलेक्झांडर या ग्रीक सम्राटाने बियास नदी ओलांडून भारतावर स्वारी केली होती. अलेक्झांडर बॅबिलोनला परत गेला तिथेच त्याचा इ.स.पू. ३२३ साली मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या साम्राज्यात फूट पडली व त्याच्या क्षत्रपांनी (प्रांतशासक) आपापली अनेक वेगवेगळी विखुरलेली राज्ये तयार केली.

ग्रीक सेनापती युडेमस व पिथोन यांनी इ.स.पू. ३१६ पर्यंत राज्य केले. नंतर चंद्रगुप्ताने चाणक्याच्या मदतीने (जो त्याचा आता सल्लागार होता) त्यांना पराभूत केले. मगधातील सत्तेच्या जोरावर त्याने एक मोठे साम्राज्य तयार केले.[५]

चंद्रगुप्ताचा उदय हा काहीसा विवादात्मक व रहस्यमय आहे. मुद्राराक्षस या काव्यात विशाखदत्ताने चंद्रगुप्त मौर्य हा नंदांचा नातलग असल्याचे लिहिले आहे. महापरिनिबाण सुत्त या प्राचीन बौद्ध धर्मग्रंथात एक मौर्य नावाच्या क्षत्रिय जमातीचा उल्लेख आहे. तरीही, ऐतिहासिक पुराव्यांविना अजून निष्कर्ष काढणे कठीण आहे. चंद्रगुप्ताचा ग्रीक लेखांत सॅंड्रोकोत्तोस म्हणून उल्लेख येतो. तरुणपणी तो अलेक्झांडरला भेटला असल्याचेही सांगण्यात येते. असेही सांगण्यात येते की तो नंद सम्राटाला भेटला व त्याने सम्राटाला नाराज केले व कशीबशी सुटका करून घेतली. चाणक्याचे मूळ ध्येय हे चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली लुटारू टोळी तयार करण्याचे होते. विशाखादत्ताचे मुद्राराक्षस व जैन ग्रंथ परिशिष्टपावन यांत चंद्रगुप्ताच्या हिमालयीन राजा पुरुषोत्तम तथा पोरस यांच्या मैत्रीसंबंधी उल्लेख आहेत.

मगध साम्राज्यावरील विजय

संपादन

चाणक्याने चंद्रगुप्त व त्याच्या सैन्यास मगध जिंकण्यासाठी प्रोत्साहन दिले. चंद्रगुप्ताने चातुर्याने मगध व आजूबाजूच्या प्रांतांमधून नंद राजावर नाराज झालेले तरुण लोक व लढण्यासाठीची साधने गोळा केली. त्याच्या सैन्यामध्ये तक्षशिलेचा भूतपूर्व सेनापती, चाणक्याचे इतर हुशार विद्यार्थी, काकायीच्या पोरस राजाचा मुलगा मलयकेतू व लहान राज्यांचे राज्यकर्ते होते.

पाटलीपुत्रावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने चंद्रगुप्ताने एक योजना आखली. युद्धाची घोषणा झाल्यावर मगधचे सैन्य मौर्य सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी शहरापासून लांब आले. दरम्यान मौर्याचे सेनापती व हेर यांनी मगधाच्या भ्रष्ट सेनापतीला लाच दिली, तसेच राज्यात यादवी युद्धाचे वातावरण निर्माण केले. या गोंधळात मगधाचा युवराज मृत्यू पावला. धनानंदाने शरणागती पत्करली व सत्ता चंद्रगुप्त मौर्याकडे देऊन तो अज्ञातवासात गेला. चंद्रगुप्ताने मगधाचा प्रधान राक्षस यास हे पटवून दिले की त्याची निष्ठा मगधावर राज्य करणाऱ्या नंद वंशावर नसून मगधावर होती. चंद्रगुप्ताने राक्षसाला हेही सांगितले की शहर व राज्य नष्ट होईल असे युद्ध तो होऊ देणार नाही. राक्षसाने चंद्रगुप्ताचा युक्तिवाद मान्य केला व चंद्रगुप्त अधिकृतरीत्या मगध सम्राट झाला. राक्षस हा चंद्रगुप्ताचा मुख्य सल्लागार झाला व चाणक्य मोठा राजनेता झाला.

चंद्रगुप्त मौर्य

संपादन

अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचा क्षत्रप सेल्युकस निकेटर याने साम्राज्याचा पूर्वेस असलेल्या भारतावर चढाई केली. चंद्रगुप्ताने त्याचा प्रतिकार केला. इ.स.पू. ३०५ मध्ये झालेल्या या लढाईत चंद्रगुप्ताने सेल्युकसचा पराभव केला. त्यानंतरच्या तहानुसार सेल्युकसच्या मुलीचा चंद्रगुप्ताबरोबर विवाह झाला. तर कंभोज-गांधार (पॅरोपॅमिसेड), कंदाहार (अराकोसिया) व बलुचिस्तान (जेड्रोसिया) हे प्रांत मौर्य अधिपत्याखाली आले. बदल्यात ५०० लढाऊ हत्ती चंद्रगुप्ताकडून सेल्युकसला मिळाले, ज्यांचा उपयोग त्याला इप्ससच्या लढाईत झाला. दोन्ही देशांत राजनैतिक संबंध दृढ झाले. मेगॅस्थनिस, डिमॅकसडायोनिसस हे ग्रीक इतिहासकार चंद्रगुप्ताच्या दरबारात राहत.

चंद्रगुप्ताने पाटलीपुत्र येथे गुंतागुंतीच्या शासनव्यवस्थेसोबत शक्तिशाली व केंद्रीकृत प्रांत निर्माण केला. मॅगॅस्थनिसने लिहिल्याप्रमाणे, चंद्रगुप्ताने भव्य इराणी शहरांशी स्पर्धा करेल अशी ६४ दरवाजे व ५७० मनोरे असलेली मोठी लाकडी भिंत पाटलीपुत्रभोवती बांधली होती. चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार याने दक्षिण भारतात आपल्या सत्तेचा विस्तार केला. त्याच्या दरबारीही डिमॅकस हा ग्रीक राजदूत होता.

मेगॅस्थनिसने चंद्रगुप्ताच्या सत्तेतील मौर्य जनतेचे शिस्तप्रिय, साधी राहणी, प्रामाणिकता या गुणांचे तसेच निरक्षरतेचेही वर्णन केलेले आहे.

सर्व भारतीय अत्यंत काटकसरीने राहत (विशेषतः तंबूत). त्यांना बेशिस्त लोक आवडत नसत. ते कायद्यांचे नीट पालन करत असत. चोरी हा प्रसंग फार कमी वेळा घडे. सॅंड्रोकोत्तोसच्या (चंद्रगुप्त) तंबूतील ४,००,००० माणसांपैकी काहीनी असे निदर्शनास आणले की चोरीमध्ये २०० द्राखमांहून जास्त काहीही नेलेले नव्हते. भारतीयांचे लिखित कायदे नव्हते व भारतीय लिहिण्याच्या बाबतीत अज्ञानी होते. त्यामुळे ते स्मृतीवरच अवलंबून असत. तरीही ते आनंदाने, साधेपणाने व काटकसरीने राहत. बार्लीच्या धान्यापेक्षा ते तांदळापासून बनलेली मदिरा पीत असत. त्यांचे अन्न हे भातापासून बनलेले आहे.

बिंदुसार

संपादन

चंद्रगुप्ताचा मुलगा बिन्दुसार चंद्रगुप्तानंतर मौर्य सम्राटपदी आला. त्याच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याचा दक्षिणेत कर्नाटकमध्ये विस्तार झाला. त्याचा मृत्यू इ.स.पू. २७२ मध्ये झाला.

चंद्रगुप्ताचा नातू (बिन्दुसाराचा मुलगा) हा अशोकवर्धन मौर्य हा होता. तो इ.स.पू. २७३ ते इ.स.पू. २३२ इतका काळ मौर्य साम्राज्याचा सम्राट होता.

अशोक राजपुत्र असताना त्याने उज्जैनतक्षशिला येथील बंडे मोडून काढली. राजा म्हणून तो महत्त्वाकांक्षी व आक्रमक होता. त्याने दक्षिण भारतात मौर्य राजवट पुनर्स्थापित केली. कलिंगचे युद्ध हा त्याच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा प्रसंग ठरला. घनघोर युद्धानंतर अशोकाने कलिंगच्या सैन्याचा पराभव केला. या युद्धात व नंतरच्या कत्तलीत अंदाजे १,००,००० सैनिक व नागरिक या युद्धात मरण पावले. त्यातील अंदजे १०,००० सैनकि मागधी तर इतर कलिंगदेशीय होते. हे पाहिल्यावर त्याला इतके घोर युद्ध करून लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा पश्चात्ताप झाला. कलिंग जिंकल्यावर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने हिंसा व युद्ध यांचा त्याग केला.

अशोकाने अहिंसेची तत्त्वे आपल्या राज्या अंमला आणली तसेच प्राण्यांची शिकार करणे तसेच गुलामगिरीची प्रथा बंद केली. त्यानुसार कलिंग युद्धातील पराभूतांना सक्तीने गुलाम केलेल्यांना मुक्ती दिली गेली. अशोकाने आपल्या प्रचंड व शक्तिशाली सैन्याचा उपयोग राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी केला. अशोकाने आशिया व युरोपीय राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवले तसेच त्याने तिथे बौद्ध विचारांचा प्रसार केला. ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्याच्या राज्यात शांती, समृद्धी व सामंजस्य त्याच्या राज्यात नांदत होते. त्यामुळे तो भारतातील सर्वांत प्रसिद्ध राजांपैकी एक समजला जातो. तो भारतात अजूनही एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो.

 
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील मस्की येथील शिलालेख

दगडामध्ये कोरलेले अशोकाचे शिलालेख संपूर्ण भारतीय उपखंडात सापडतात. अतिपश्चिमेकडील अफगाणिस्तानपासून दक्षिणेकडे नेल्लोर जिल्ह्यातही ते आढळतात. या शिलालेखांवर अशोकाची धोरणे व कार्य लिहिले आहे. प्रामुख्याने हे शिलालेख प्राकृत भाषेत लिहले गेले आहेत, तरी दोन शिलालेख ग्रीकमध्ये तर एक ग्रीक व एक ॲरेमाइक भाषेमध्ये लिहला गेला आहे. ते असेही प्रमाणित करतात की अशोकाने भूमध्य समुद्राकडील ग्रीक राजांकडेसुद्धा आपले राजदूत पाठवले होते. त्यांच्यावर ग्रीक राजांची नावेदेखील कोरण्यात आली आहेत. अंतियोको (ॲंटियोकस), तुलामाया (टॉलेमी), अंतिकिनी (ॲंटिगोनस), मक (मॅगस), व अलिकासुन्दरो (अलेक्झांडर) यांची नावे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे शिलालेखांवर आली आहेत. त्यांच्या प्रदेशाचे (म्हणजेच ग्रीसचे) भारतापासूनचे अंतरही शिलालेखांवर अचूक म्हणजेच "६०० योजने दूर" (एक योजन म्हणजे सात मैल) असे लिहिले आहे (अंदाजे ४,००० मैल).

अशोकानंतर पन्नास वर्षे दुर्बळ सम्राटांचे राज्य होते. दक्षिणेकडे सातवाहन साम्राज्य व वायव्येकडे ग्रीक-बॅक्ट्रिया राजतंत्र या सत्तांच्या उदयामुळे मौर्य साम्राज्याचा विस्तार घटला. अखेरचा मौर्य सम्राट बृहद्रथ याची हत्या त्याच्या ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग याने ख्रि.पू. १८५ मध्ये एका लष्करी संचलनात केली व शुंग राजवंशाची स्थापना केली.

प्रशासन

संपादन
 
उभ्या देवतेसह असलेले मौर्य खंडित पदक. उत्तरपूर्व पाकिस्तान. इ.स.पू. तिसरे शतक. ब्रिटिश म्युझियम

मौर्य साम्राज्य हे चार प्रांतात विभागले गेले होते. अशोकाच्या शिलालेखांच्या अनुसार प्रांतांची नावे तोसली (पूर्वेकडील), उज्जैन (पश्चिमेकडील), सुवर्णनगरी (दक्षिणेकडील) व तक्षशिला (उत्तरेकडील) ही होती. प्रांतीय प्रशासनाचा प्रमुख हा कुमार (राजपुत्र) असे. तो राजाचा प्रतिनिधी म्हणून प्रांतावर राज्य करत असे. राजपुत्राला सहाय्यक म्हणून महाअमात्य व मंत्र्यांची समिती असे. अशीच शासनव्यवस्था साम्राज्याच्या स्तरावरदेखील असे. प्रशासनाचा प्रमुख म्हणून सम्राट तर त्यास साहाय्य करण्यासाठी मंत्रिपरिषद असे.

मौर्य साम्राज्याचे सैन्य हे त्याकाळचे सर्वांत मोठे सैन्य होते. या साम्राज्याकडे ६,००,००० पायदळ, ३०,००० घोडदळ व ९,००० लढाऊ हत्ती होते. हेरगिरीचा विभाग अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करत असे. अशोकाने जरी युद्ध व विस्तारास आळा घातला तरी त्याने त्याचे सैन्य शांतता व सुरक्षितता यांसाठी कायम ठेवले.

अर्थव्यवस्था

संपादन
 
मौर्य साम्राज्याचे चांदीचे नाणे. यावर चक्र व हत्ती यांच्या प्रतिमा आहेत. इ.स.पू. तिसरे शतक

मौर्य साम्राज्याच्या आधिपत्याखाली एकछत्री शासन आल्यामुळे अंतर्गत लढायांना आळ बसला व प्रथमच संपूर्ण भारताची अशी एकत्र आर्थिक व्यवस्था उदयास आली. आधीच्या काळात शेकडो राज्ये, शेकडो लहान सैन्ये, शेकडो प्रमुख तसेच आपापसातील अनेक युद्धे अशी परिस्थिती होती. मौर्य काळात शेतकरी कराच्या व सरकारला पिके देण्याच्या बोज्यातून मुक्त झाले. त्याऐवजी अर्थशास्त्र या चाणक्याच्या ग्रंथातील तत्त्वांच्या आधारे शासनाद्वारे प्रशासित अशा शिस्तशीर व उचित प्रणालीद्वारे कर घेतला जाई.

चंद्रगुप्ताने संपूर्ण भारतभर एकच चलन स्थापित केले. त्याने भारतात शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना न्याय व सुरक्षा मिळावी म्हणून प्रांतीय नियंत्रकांचे व प्रशासकांचे जाळे निर्माण केले. मौर्य सैन्याने अनेक गुन्हेगारी टोळ्या, प्रांतीय खाजगी सैन्यांना पराभूत केले. फुटकळ जमीनदारांची राज्ये साम्राज्यात विलीन केली. मौर्य शासन कर गोळा करण्यात कडक असले तरी त्याचा खर्च अनेक सार्वजनिक कार्यांवर केला गेला. याच काळात भारतात अनेक कालवे तयार केले गेले. भारतात अंतर्गत व्यापार या काळात नवीन राजकीय एकात्मता व अंतर्गत सुरक्षा यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाढला.

 
मौर्य साम्राज्याचे तांब्याचे नाणे. इ.स.पू. तिसऱ्या शतकाचा उत्तरार्ध.

याचबरोबर मौर्य साम्राज्याने आंतरराष्ट्रीय व्यापारासही प्रोत्साहन दिले. ग्रीक क्षत्रपांच्या राज्यांशी मैत्री करून त्यांच्याशी व्यापाराचे आंतरराष्ट्रीय जाळेही वाढविले. सध्या पाकिस्तानअफगाणिस्तानच्या सीमेवरील खैबर खिंड ही या व्यापारात अतिशय महत्त्वाची होती. पश्चिम आशियातील ग्रीक राज्ये भारताशी मोठ्या प्रमाणावर व्यापार करू लागली. मौर्य साम्राज्याचे मलय द्वीपकल्पाबरोबरही व्यापारी संबंध होते. भारत रेशीम, रेशमी कापड, कपडे तसेच मसाले व विविध खाद्यपदार्थ निर्यात करी. युरोपाबरोबर विज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केल्याने हे साम्राज्य अधिकच समृद्ध झाले. अशोकाच्या कारकिर्दीत हजारो रस्ते, कालवे, जलमार्ग, दवाखाने, धर्मशाळा व इतर सार्वजनिक कामे झाली. धान्य व कर गोळा करण्यासंबंधीच्या अनेक कठोर कायद्यांच्या शिथिलीकरणाने मौर्य साम्राज्यात उत्पादनक्षमता व आर्थिक हालचाल वाढली.

मौर्य साम्राज्याची अर्थव्यवस्था ही त्यानंतर अनेक शतकांनंतर उदयाला आलेल्या रोमन साम्राज्यासारखीच होती. दोन्ही साम्राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध होते. दोन्ही साम्राज्यांत सहकारी संस्थांसारख्या संस्था होत्या.

देशव्याप्ती

संपादन
 1.   भारत
 2.   पाकिस्तान
 3.   नेपाळ
 4.   बांगलादेश
 5.   अफगाणिस्तान
 6.   भूतान
 7.   इराण
 8.   तुर्कमेनिस्तान
 9.   ताजिकिस्तान
 10.   उझबेकिस्तान

वरील १० देशांच्या कमी-अधिक भूभागांवर मौर्य साम्राज्य पसरलेले होते.

 
सम्राट अशोकांच्या काळात झालेला बौद्ध धर्माचा प्रसार

मौर्यकाळात आरंभी जैन धर्म साम्राज्याचा प्रमुख धर्म होता. पुढे सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याचा देशभर - जगभर प्रसार केला. सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता. तसेच त्यांनी श्रीलंकेमध्ये आपला मुलगा महेन्द्र व मुलगी संघमित्रा यांना पाठवून तेथे बुद्ध धर्माचा प्रसार केला. तेथील राजा तिसा याने बुद्ध धर्माचा स्वीकार केला. अशोकाने पश्चिम आशिया, ग्रीसआग्नेय आशिया येथे अनेक धर्मप्रसारक पाठवले.

साम्राज्याचा अस्त

संपादन

अशोकाच्या राजवटीनंतर ५० वर्षे दुर्बल राजांनी मौर्य साम्राज्यावर राज्य केले. बृहद्रथ हा या साम्राज्याचा शेवटचा राजा होता. त्याच्या कारकिर्दीत त्याचे राज्य अशोकाच्या साम्राज्याहून खूपच लहान होते. तो बुद्ध धर्माचा पुरस्कर्ता होता.

बृहद्रथाची हत्त्या

संपादन

बृहद्रथाची हत्त्या इ.स.पू. १८५ मध्ये लष्करी संचलनादरम्यान त्याच्या मुख्य सेनापती असलेल्या पुष्यमित्र शुंग याने केली. त्याने मौर्य साम्राज्याच्या जागी शुंग साम्राज्याची स्थापना केली. "अशोकवदन" सारख्या बौद्ध ग्रंथात बृहद्रथाच्या मृत्यूमुळे व शुंगांच्या उदयामुळे हिंदू धर्माचे पुनरुत्थान व बौद्धांविरोधी लाट आली असे लिहिले आहे. सर जॉन मार्शल यांच्या म्हणण्याप्रमाणे बौद्ध धर्माविरोधीच्या लाटेला स्वतः पुष्यमित्र शुंगच कारणीभूत असावा, परंतु नंतरचे शुंग राजे बौद्ध धर्माला समर्थन करणारे होते हे लक्षात आले आहे. मात्र एटिने लॅमोते व रोमिला थापार तसेच इतर इतिहासकारांनी सांगितले आहे की बौद्ध धर्माला विरोध करण्यासंबंधी ऐतिहासिक पुरावा सापडत नसल्याने बौद्ध धर्मासंबंधीचा विरोध अतिशयोक्तीपूर्ण आहे.

भारत-ग्रीक राज्याची स्थापना

संपादन

मौर्यांचे साम्राज्य संपुष्टात आल्यावर खैबर खिंड असुरक्षित बनली व पुढील काळात तेथून परकीय आक्रमणे आली. ग्रीस-बॅक्ट्रियाचा राजा डिमेट्रियस याने या परिस्थितीचा फायदा घेऊन इ.स.पू. १८०च्या सुमारास दक्षिण अफगाणिस्तान व पाकिस्तान जिंकून घेतले. त्याने भारत-ग्रीक राज्य स्थापन केले. ग्रीकांनी पुढील शंभर वर्षांच्या कालखंडात मध्य भारतावर चढाई केली. या ग्रीक राजांच्या कारकिर्दीत बौद्ध धर्म खूपच फोफावला तसेच राजा मिनॅंडर हा बौद्ध धर्मातील महत्त्वाची व्यक्ती बनला. परंतु या राजांचे राज्य कुठवर पसरले होते हे विवादात्मक आहे. नाणकशास्त्रात्मक पुराव्यांवरून लक्षात येते की त्यांचे राज्य ख्रिस्तजन्माच्या कालखंडापर्यंत शिल्लक होते. परंतु त्यांनी शुंग, सातवाहनकलिंग अशा प्रबळ स्थानिक सत्तांसी केलेला संघर्ष संदिग्ध आहे. परंतु हे स्पष्ट आहे की शक (सिथियन) टोळ्यांनी इ.स.पू. ७०च्या सुमारास भारत-ग्रीक राज्याचा पराभव करून सिंधू नदीच्या आसपासचा प्रदेश, मथुराजवळील प्रदेश व गुजरात हे प्रदेश जिंकले.

वास्तूंचे अवशेष

संपादन
 
कुम्राहर येथील मौर्य स्तंभ

सध्या मौर्यकाळातील वास्तूंचे अवशेष फारच तुरळक प्रमाणात सापडतात. १० मीटर उंची असलेल्या ८० स्तंभ असलेल्या मौर्यकालीन बहुस्तंभी मंडपाचे अवशेष पाटणा रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कुम्राहर येथे सापडले आहेत. मौर्य राजधानीच्या जवळ असल्याने ह्यास खूप महत्त्व आहे. तिची शैली काही प्रमाणात इराणच्या हखामनी वास्तुशैलीसारखी आहे.

बराबार गुहा या मौर्यकालीन वास्तुशैलीचे अजून एक उत्तम उदाहरण आहेत. यातील लोमस ऋषी गुहेचा पुढील भाग महत्त्वाचा आहे. या गुहा मौर्यांनी बौद्धांमधील आजीविक संप्रदायांना देऊ केल्या होत्या.

अशोकाचे स्तंभ ह्या सर्वांत जास्त पसरलेल्या मौर्य वास्तू आहेत. बरेचसे स्तंभ सुंदरतेने सजवलेले आढळले आहेत. संपूर्ण भारतीय उपखंडात ते चाळीसहून अधिक सापडले आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
 1. ^ अ हिस्टरी ऑफ इंडिया भाग १ (इंग्लिश) (रोमिला थापर)
 2. ^ हिस्टरीफाइल्स.कॉम
 3. ^ गुगल बुक्सवरील द फर्स्ट ग्रेट पॉलिटिकल रिॲलिस्ट: कौटिल्य ॲन्ड हिज अर्थशास्त्र
 4. ^ बिटविन द पॅटर्न्स ऑफ हिस्टरी : रीथिंकिंग मौर्यन इंपीरियल इन्टरॅक्शन इन द सदर्न डेक्कन लेखक-नमिता संजय सुगंधी
 5. ^ हिस्टरीफाईल्स.कॉ.यूके

बाह्य दुवे

संपादन