कलिंग हे भारतामधील एक प्राचीन साम्राज्य होते. सामान्यतः महानदी आणि गोदावरी नद्यांमधील पूर्व किनारपट्टीचा प्रदेश म्हणून त्याची ओळख केली जाते, जरी त्याच्या सीमांमध्ये बदलत्या राजांनुसार चढ-उतार झाले. कलिंगाचा मूळ प्रदेश आता ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या ईशान्य भागाचा मोठा भाग व्यापत असे. त्याच्या विस्तीर्ण मर्यादेत, कलिंग प्रदेश पश्चिमेला अमरकंटकपर्यंत विस्तारलेला तर सध्याच्या छत्तीसगडचा देखील काही भाग त्यात समाविष्ट होता.

कलिंग चे प्रभाव क्षेत्र

महाभारत या पौराणिक ग्रंथात कलिंगांचा उल्लेख एक प्रमुख जमात म्हणून करण्यात आला आहे. इ .स.पूर्व २६५ मध्ये सम्राट अशोकाच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याने कलिंगावर आक्रमण केले व कलिंगचे युद्ध घडले ज्यामध्ये कलिंगचा पराभव झाला. त्यानंतर अनेक प्रादेशिक राजवंशांनी कलिंगवर राज्य केले, ज्यांच्या राज्यकर्त्यांना कलिंगाधिपती ("कलिंगाचा स्वामी") ही पदवी होती; या राजवंशांमध्ये महामेघवाहन, वसिष्ठ, मथरा, पितृभक्त, शैलोद्भव, सोमवंशी आणि पूर्व गंगा यांचा समावेश होतो. कलिंग प्रदेशावर राज्य करणारे मध्ययुगीन शासक म्हणजे सूर्यवंश गजपती, भोई राजवंश, परलाखेमुंडी गंगा आणि गंजम आणि विजागापटमचे जमीनदार.