संभाजी भोसले

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती
(संभाजी या पानावरून पुनर्निर्देशित)

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती, स्वराज्यरक्षक, धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराज व पुत्र शाहु महाराज
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ १६ जानेवारी १६८१११ मार्च १६८९
अधिकारारोहण छत्रपती पदाभिषेक
राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१
राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणि
उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून ते
दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी रायगड
पूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
जन्म १४ मे १६५७
पुरंदर किल्ला, महाराष्ट्र
मृत्यू ११ मार्च १६८९
तुळापूर, महाराष्ट्र (समाधी: वढू, महाराष्ट्र)
पूर्वाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज
सरसेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते
उत्तराधिकारी छत्रपती राजाराम महाराज
वडील छत्रपती शिवाजी महाराज
आई महाराणी सईबाई
पत्नी महाराणी येसूबाई
संतती भवानीबाई,
शाहू पहिले
राजघराणे भोसले
राजगीत हिंदू पत पातशाह
राजब्रीदवाक्य श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरीव राजते, यंदकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी
चलन होनशिवराई

बालपण

संपादन

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.

संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.

त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई[] यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई सोयराबाई[] यांनी संंभाजी महाराजांना पोरकेेेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला.

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघल सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.[ संदर्भ हवा ]

तारुण्य

संपादन

इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.[ संदर्भ हवा ]

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.[ संदर्भ हवा ]

तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले.[ संदर्भ हवा ]

दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले.[ संदर्भ हवा ]

मुद्रा व दानपत्र

संपादन

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||

अर्थ: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.[ संदर्भ हवा ]

संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्‌प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री (ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात) यांना दरसाल १०,००० पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे दि. २४ ऑगस्ट १६८० (भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२) रोजी केले आहे. दानपत्र ३०० से.मी. लांब आणि २३.५ से.मी. रुंद आहे. या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत.[ संदर्भ हवा ] त्या ओळी खालीलप्रमाणे :

|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज ||
|| छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री ||

यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच 'हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति' म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंव्छक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले असा करतात. यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.[ संदर्भ हवा ]

धार्मिक धोरण

संपादन

दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, ..राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य...[ संदर्भ हवा ] युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.[ संदर्भ हवा ]

संतजनांस राजाश्रयः

१. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)[ संदर्भ हवा ]

२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर १६८०)[ संदर्भ हवा ]

३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पूजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु. १ शके १५९७ रोजी सनद करून दिली. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. (दि. १८ ऑक्टोबर १६८०)[ संदर्भ हवा ]

४. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या 'माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये' यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. (दि. ६ नोव्हेंबर १६८०)[ संदर्भ हवा ]

५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च १६८१)[ संदर्भ हवा ]

६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यांस श्रीचे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?... अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.[ संदर्भ हवा ]

७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना ..जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील... अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे.[ संदर्भ हवा ]

८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी धर्मकार्यात खलेल न करणे. अशा शब्दांत ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही... असे अभिवचन दिले आहे.[ संदर्भ हवा ]

सक्तीने धर्मांतरास विरोध:

छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराज व हेनरी ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम आहे,'That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians'[ संदर्भ हवा ]

अंत्रुज परगण्यातील अडकोळण गावचा शिलालेख:

छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरू झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफीसंबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरले आहे.[ संदर्भ हवा ]

'...आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन...पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यांसी महापातक आहे...'

प्रधान मंडळ [ संदर्भ हवा ]

संपादन

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले)

श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)

  • सरसेनापती - हंबीरराव मोहिते
  • छांदोगामात्य - कवी कलश
  • पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
  • मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
  • दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव
  • चिटणीस - बाळाजी आवजी
  • सुरनीस - आबाजी सोनदेव
  • डबीर - जनार्दनपंत
  • मुजुमदार - अण्णाजी दत्तो
  • वाकेनवीस - दत्ताजीपंत

औरंगजेबाची दख्खन मोहीम

संपादन

औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला.औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. त्याकाळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला.[ संदर्भ हवा ] मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले.[ संदर्भ हवा ] संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.[ संदर्भ हवा ]

इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती.

दगाफटका

संपादन

इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या ब्राह्मणांच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला, फ्रेंच गवर्नर गेनरल मार्टीनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे, की जवळच्या ब्राम्हणांनी महाराजांशी दगाफटका केला.[] कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

 
मार्टीनच्या डायरीचं पान ३३ "Memores De Francois Martin Fond Vol.3 page 33 March 1689 (1665-1694)"

महाराजांना वाचवण्याचे प्रयत्न

संपादन

छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.[ संदर्भ हवा ]

शारीरिक छळ व मृत्यू

संपादन

मुघलांनी पकडल्या नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. 'औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जिवन जगन्याचे' किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. शेवटी दोघांनाही नर्क यातना देउन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. शेवटी एक मशाल शांत झाली.[ संदर्भ हवा ]

साहित्य

संपादन

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.[ संदर्भ हवा ]

बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे :

'कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः ।

जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥

अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास

तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "

याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिखा, सातशतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले. गागाभट्टांनी समयनय हा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना अर्पण केला.[ संदर्भ हवा ]

संभाजीमहाराजांविषयी इतिहास लेखन [ संदर्भ हवा ]

संपादन
  • सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद.
  • चिटणीस बखर - मल्हार रामराव चिटणीस
  • ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ. सदाशिव शिवदे
  • अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज (संशोधनात्मक ग्रंथ - खंड १ ते ५) - अनंत दारवटकर
  • राजा शंभूछत्रपती - विजयराव देशमुख
  • पोर्तुगीज कागदपत्रे - डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर
  • पोर्तुगीज-मराठे संबंध - डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर
  • The Portuguese and The Marathas translated by P.R. Kakodkar
  • फ्रेंच-मराठा संबंध - लेखक ?
  • बिकानेर पुरालेखाभिगार - राजस्थान
  • संभाजीकालीन पत्रसार संग्रह (शा.१६०२ - शा.१६१०) : संपादक - शंकर नारायण जोशी; प्रकाशक भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे) (पहिली आवृत्ती - १९४९; नवीन आवृत्ती - ऑगस्ट २०१५)
  • छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे : डॉ. सदाशिव शिवदे यांच्या या पुस्तकात छत्रपती संभाजीराजांच्या ३१५ पत्रांचा परिचय करून देण्यात आला आहे.
  • बुधभूषण-राजनीती - संपादक : प्रा. रामकृष्ण आनंदराव कदम (कदंब), राजमयूर प्रकाशन, पुणे
  • शाक्तवीर संभाजी महाराज (ॲडव्होकेट अनंत दारवटकर)
  • छत्रपती संभाजी महाराज प्रकाशन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते (पृष्ठसंख्या ७५०, पहिली आवृत्ती १९६०,पी.पी.एच.बुक स्ट.प्रकाशन १९७१ २री-आवृती,मनोरमा प्रकाशन ३री आवृती २००१, लेखक: वा.सी. बेंद्रे ( इ.स.१९१८ ते इ.स.१९५८म्हणजे सुमारे ४० वर्षे अथक मेहनत करून त्यांनी अखेर १९६० मध्ये संभाजी महाराजांचे सत्य चरित्र सर्वांसमोर आणले).
  • छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती (डॉ. केदार महादेवराव फाळके)
  • छ. संभाजी स्मारक ग्रंथ - संपादन- डॉ. जयसिंगराव पवार
  • श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ - संपादक सुशांत संजय उदावंत
  • रणझुंजार : डॉ. सदाशिव शिवदे
  • शिवपुत्र संभाजी : डॉ. कमल गोखले
  • सभासद बखर, चिटणीस बखर, शेडगावकर बखर, पंतप्रतिनिधी बखर, बावडेकर अमात्यांची बखर, न्यायशास्त्री बखर इत्यादी निरनिराळ्या मराठी बखरींमध्येही संभाजीराजांसंबंधी माहिती मिळते. याशिवाय मनुचीसारख्या परकीय फिरस्त्याच्या Storio De mogor मधून सुद्धा माहिती मिळू शकते.
  • फारसी दस्तावेज -
    • फुतूहाते आलमगिरी - ईश्वरदास नागर
    • खुतूते शिवाजी मधील निवडक पत्रे
    • मुन्तखबुललुबाब महंमदशाही - खाफी खान
    • तारीखे दिल्कुशा - भीमसेन सक्सेना
    • मासिरे आलमगिरी - साकी मुस्तैदखान
    • अहकामे आलमगिरी - इनायतुल्ला खान
  • मोगल दरबाराची बातमीपत्रे

ललित साहित्य [ संदर्भ हवा ]

संपादन

(संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथने आणि कादंबऱ्या)

  • अर्घ्य - नयनतारा देसाई (१९७३)
  • अश्रू ढळले रायगडाचे - अर्जुनराव झेंडे, नाटक.
  • आम्ही यातनांचे स्वामी - वा.ना. देशपांडे, १९७३
  • इथे ओशाळला मृत्यू - वसंत कानेटकर, नाटक.
  • खरा संभाजी - प्रा. नामदेवराव जाधव
  • छत्रपती संभाजी - मनमोहन नातू
  • छत्रपती संभाजी महाराज अथवा राजाचे दुष्कर्म राजाला भोवतेव प्रजेलाही भोवते - ना.वि. बापट
  • छत्रपती संभाजी राजे - नाटक, वासुदेवशास्त्री खरे, १८८५)
  • छावा - शिवाजी सावंत
  • छावा (कादंबरी, लेखक - शिवाजी सावंत); (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, १९७९)
  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज - अरुण जाखडे (पद्मगंधा प्रकाशन)
  • धर्मवीर संभाजी- ग.कृ. गोडसे, नाटक-१९४१
  • बेबंदशाही - वि.ह. औंधकर, नाटक-१९२४
  • मराठी साहित्यातील संभाजी - प्रबंध - डॉ. शालिनी मोहोड
  • मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण व. भोसले (नरसिंह पब्लिकेशन्स)
  • मानी मराठा - नाना कोचरेकर, नाटक-१९५०
  • मी मृत्युंजय संभाजी (संजय सोनवणी)
  • राजसंन्यास - राम गणेश गडकरी, नाटक-१९२२
  • राजा शंभू छत्रपती - विजय देशमुख
  • रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर, नाटक-१९६३
  • वज्‍रदेही संभाजी - ना.ल. मोरे, नाटक-१९८३
  • शंभूराजे - गावंडे, २०००
  • शंभूराजे - दशरथ यादव (काव्य)
  • शंभूराजे - प्रा. सु.ग. शेवडे (धर्मसेवा प्रकाशन)
  • शहेनशाह - ना.सं. इनामदार (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, १९९८)
  • शापित राजहंस - अनंत तिबिले (रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर, १९७८).
  • शिवतेज संभाजी (त्रिमिती चरित्र, संतोष रासकर)
  • शिवपुत्र - राजकुंवर बोबडे, १९८१
  • शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
  • शिवस्नुषा येसूबाई, - सुशीला खेडकर (उन्मेष प्रकाशन, १९९२)
  • संभवामि युगे युगे - मनमोहन नातू
  • संभाजी - विश्वास पाटील (मेहता पब्लिशिंग हाउस)
  • सह्याद्री सांगे कथा शंभुची - आबासाहेब आचरेकर (नाटक-त्रिदल प्रकाशन, गिरगांव, मुंबई, १९८४)
  • स्वधर्मसूर्य संभाजी - स्वामी धर्मव्रत (नाटक-शुभेच्छा प्रकाशन, डोंबिवली (पश्चिम), १९९५)
  • स्वराज्यावरील संकट - नाथ माधव

संभाजी महाराजांवरील नाटके

  • इथे ओशाळला मृत्यू (लेखक : वसंत कानेटकर)
  • चैतन्यगाथा तेजपुत्राची (लेखक : ?)
  • संगीत छत्रपती संभाजी (लेखक : आत्माराम मोरेश्वर पाठारे)
  • बेबंदशाही (लेखक : वि.ह. औंधकर)
  • मृत्युंजय
  • मृत्युंजय अमावस्या (महा-नाट्य : लेखक/दिग्दर्शक : नीलेश भिसे)
  • राजसंन्यास (लेखक : राम गणेश गडकरी)
  • रायगडाला जेव्हा जाग येते (लेखक : वसंत कानेटकर); एप्रिल २०१३पर्यंत २४२५ प्रयोग
  • शंभुराजे (महानाट्य) : (लेखक : नितीन बानुगडे पाटील)
  • शूर संभाजी (लेखक : ?)
  • शिवपुत्र शंभुराजे (महानाट्य) (दिग्दर्शन/संवादः महेंद्र महाडीक)
  • नरशार्दुल राजा संभाजी (लेखक - इंद्रजित सावंत)

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ शापित राजहंस - (लेखक) अनंत तिबिले.
  2. ^ पाटील, विश्वास (February 2018 16th edition). संभाजी. Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस. pp. Whole book. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ A. Martineau; Societe De Lʼhistoire Des Colonies Francaises 28, Rua Bonaparte (1934). Memores De Francois Martin Fondateur De Pondichery. Societe De Lʼhistoire Des Colonies Francaises 28, Rua Bonaparte, page 33, पृष्ठ ३३.

बाह्यदुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: