शंकर नारायण जोशी

मराठी इतिहाससंशोधक

शंकर नारायण जोशी उर्फ शंकर नारायण वत्स ऊर्फ शंकर नारायण वत्स जोशी (जन्म : वाई, १९ फेब्रुवारी १८८९) हे एक मराठी इतिहाससंशोधक होते. ते पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यरत होते.


शं.ना.जोशी
शं.ना.जोशी
जन्म नाव शंकर नारायण जोशी
जन्म १९ फेब्रुवारी , इ.स. १८८९
वाई, सातारा
शिक्षण इंग्रजी तिसरी इयत्ता
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास संशोधन
भाषा मराठी संस्कृत
साहित्य प्रकार इतिहास
चळवळ मुळशी सत्याग्रह
प्रसिद्ध साहित्यकृती अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास काळातील राज्यकारभाराचा अभ्यास
शिवचरित्र साहित्य खंड ३, ८
वडील नारायण जोशी
पत्नी अन्नपूर्णाबाई जोशी

शिक्षण

संपादन

शं.ना.जोशीचे पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पाचवडला झाले. पुढे इंग्रजी शिक्षण कुरूंदवाड व जमखंडी संस्थानच्या हायस्कूल मधे सुरू होते , पण इंग्रजी तिसऱ्या इयत्तेत शिकत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले . त्यामुळे शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी ते पाचवडला येऊन शेती करु लागले. शेती व पुढे सुरू केलेला मागाचा कारखाना यात मन रमेना म्हणून १९१० सेली भाऊशास्त्री लेले यांच्याकडे लेखनाचे काम सुरू केले. सोबत प्राज्ञपाठ शाळेत संस्कृतचे अध्ययन सुरू केले. १९१३ साली शं.ना.जोशी पुण्यात आले. ज्ञानप्रकाश व आर्यभूषण छापखान्यात मुद्रिते तपासन्याचे काम त्यांनी सुरू केले. पुढे त्यांचा लोकमान्य टिळकांशी संबंध आला व टिळकांच्या दौऱ्यात स्वयंसेवक म्हणून जोशींनी काम केले. पुढे मुळशी सत्याग्रहात जोशींनी हिरिरीने भाग घेतला.
शं.ना.जोशी ह्यांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील वाईचे. जोशींच्या घराण्यात सराफीचा व्यवसाय होता , त्यावरून हुंडीवाले जोशी ह्या नावाने ते त्यांचे घराणे प्रसिद्ध होते. जोशी उपनामांची अनेक घराणी होती , त्यामुळे ते स्वतःला वाईकर वत्स गोत्री जोशी म्हणवून घेत असत. वत्स , वत्स जोशी , जोशी वत्स , वाईकर अशी अनेक उपनामे त्यांच्या लेखांमधे व ग्रंथात आढळतात.

इतिहास संशोधन

संपादन

आर्यभूषण छापखान्यात मुद्रित संशोधक म्हणून काम करत असताना इतिहास विषयक साहित्य वाचल्याने ते इतिहास अभ्यासाकडे वळले. १९१६ मध्ये न.चिं.केळकराच्या सांगण्यावरून ते भारत इतिहास संशोधक मंडळात काम करु लागले. तेथील संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली ते इतिहास अभ्यास करु लागले.
इतिहास विषयक सूची व शकवल्या तयार करण्याचे किचकट काम उत्तम प्रकारे करत असत. त्यांनी शिवाजी व संभाजी महाराज , माधवराव पेशवे , आंग्रे, नाना फडणीस, रायगड ह्यांच्या शकावल्या प्रसिद्ध केल्या. मध्ययुगीन ग्रामव्यवस्था , वतनदार व राज्यव्यवस्था ह्याविषयी त्यांनी संशोधन करून अनेक शोधनिबंध लिहिले व ते भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात प्रसिद्ध केले. शिवाजी महाराजांच्या राज्य कारभारावर अभ्यास करून पुणे विद्यापीठासाठी त्यांनी सहा व्याख्याने दिली व ती व्याख्याने पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्धही करण्यात आली. सातारा जिल्ह्याच्या मराठी आवृत्ती साठो त्यांनी जिल्ह्याचे ऐतिहासिक संशोधन केले. ठिकठिकाणी दौऱ्यावर असताना इतिहास विषयक रसाळ भाषेत ते उत्तम व्याख्याने देत असत. तसेच ऐतिहासिक व्यक्तीच्या चरित्र विषयक अनेक भाषणे जोशींनी पुण्याच्या नभोवाणी केंद्रावरून केली.

सामाजिक व राजकीय सहभाग

संपादन

पाचवडला असताना त्यांनी खेडेगावांमधे अनेक शाळा काढल्या. जोशींनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला होता , तेव्हा मुळशी पेट्याच्या इतिहासावर एक निबंध लिहून तो प्रकाशित केला. मुळशी सत्याग्रहासाठी जोशींना तीन महिन्यांची शिक्षाही झाली होती. कांग्रेसच्या अधिवेशनात ते सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून जात असत व तेथे स्वयंसेवकाचे कामही करत असत. तसेच सन्मित्र समाज मेळाव्यातही ते जात असत.

शंकर नारायण जोशी यांचे ग्रंथ

संपादन
  • मुळशी पेट्या संबंधी ऐतिहासिक माहिती , (प्रकाशक - गजानन कानिटकर - मुळशी सत्याग्रह सहाय्यक मंडळ) १९२२
  • राजवाडे लेखसंग्रह - ऐतिहासिक प्रस्तावना (संपादक - शं.ना.जोशी)
  • जोशी, शंकर नारायण; खरे, गणेश हरी (१९३०). शिवचरित्र साहित्य खंड ३. पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळ.
  • राजवाडे लेखसंग्रह - संकीर्ण निबंध भाग १ (संग्राहक - शं.ना.जोशी)
  • राजवाडे लेखसंग्रह - संकीर्ण निबंध भाग २ (संग्राहक - शं.ना.जोशी)
  • मङ्गलाष्टके विवाह व मौंजीबन्धन जुनी व नवी दोन पुस्तके एकत्र ( प्रकाशक- केशव भिकाजी ढवळे , मुंबई ) १९३४
  • परांजपे कुलासंबंधी ऐतिहासिक उल्लेख , १९३५
  • शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड ३ (शके १३४८ - शके १६०२) - प्रकाशक - पुणे भारत इतिहास संशोधक मंडळ, १९३७
  • शिवचरित्र साहित्य खंड ५
  • संभाजीकालीन पत्रसारसंग्रह (शके १६०२ - शके १६१०) - प्रकाशक - पुणे भारत इतिहास संशोधक मंडळ, १९३७ (नवीन आवृत्ती - ऑगस्ट २०१५)
  • रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था (प्रकाशक - भारत इतिहास संशोधन मंडळ), १९४०
  • मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २५ - बापू गोखले पत्रव्यवहार (सहसंपादक - कृ.वा.पुरंदरे) ,१९४१
  • जोशी, शंकर नारायण (१९४२). शिवचरित्र साहित्य खंड ८. पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळ.
  • छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक, स्थळ वढू बुद्रुक - साधार विवेचन , १९४६
  • सेनापती दाभाडे दफ्तर , भाग १ला (भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक वर्ष ३१ अंक २-३ , १९५१)
  • ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ३
  • ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ६
  • ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ९ - मराठी राजवटींतील कांहीं घाटमार्ग चौक्या व संकीर्ण (भा.इ.सं.मं.त्रैमासिक वर्ष ३५ अंक १-२ , १९५४)
  • कृष्णदयार्णवकृत हरिवरदा : श्रीमद्‌भागवत दशम स्कंधावरील टीका (पाठभेद, शब्दार्थ, कविचरित्र व विस्तृत प्रस्तावना यांसह) खंड १ला, प्रकाशक - दयार्णव रघुनाथ कोपर्डेकर : पुणे.- १९५५)
  • जोशी, शंकर नारायण (१९५९). भाऊसाहेबांची बखर (७ वी ed.). पुणे: शं.दा.चितळे.
  • अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास कालांतील राज्यकारभाराचा अभ्यास (१६०० - १६८०) , पुणे विद्यापीठ, १९५९
  • डाकिन्यां भिमाशंकरम् मीमाशंकर क्षेत्र (प्रकाशक - वोरा ऍण्ड कंपनी पब्लिशर्स.लि. मुंबई ) , १९५९
  • मंत्र्युत्तम नाना फडणवीस उत्सवपन्नाशी व शकावली
  • जोशी, शंकर नारायण (१९६०). कृष्णाजी अनंत सभासद विरचित छत्रपती श्रीशिवाजीराजे यांची बखर. पुणे: चित्रशाळा प्रकाशन.
  • हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य यांचे आज्ञापत्र आणि राजनीति - (सहसंपादक - ल.म.भिंगारे)  कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे , १९६०
  • नाना फडणीस यांचे शब्दात पानिपतचा रणसंग्राम ( विवेचक मिमांसा - शं.ना.जोशी , संकलन - प.म.लिमये , श्री.बा.सोहोनी )
  • मराठेकालीन समाजदर्शन (संपादक - इतिहास संशोधक शंकरराव जोशी सत्कार समिति | शं.ना.जोशी यांच्या निवडक लेखांचा संग्रह), १९६०