राजाराम भोसले
छत्रपती राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी साम्राज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१ म्हणजे ३ मार्च १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला.
छत्रपती राजाराम भोसले | ||
---|---|---|
छत्रपती | ||
छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले यांचे अस्सल चित्र | ||
मराठा साम्राज्य | ||
श्री धर्मप्रद्योतितायं शेषवर्ण दशरथेऽरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते। | ||
अधिकारकाळ | १६८९ - १७०० | |
अधिकारारोहण | छत्रपती पदाभिषेक | |
राज्याभिषेक | १२ फेब्रुवारी १६८९ | |
राज्यव्याप्ती | दक्षिण भारतात जिंजी प्रांत, आणि कोल्हापूर, सातारा प्रांत | |
राजधानी | जिंजी | |
पूर्ण नाव | राजारामराजे शिवाजीराजे भोसले | |
जन्म | २४ फेब्रुवारी १६७० | |
राजगड किल्ला, महाराष्ट्र | ||
मृत्यू | ३ मार्च १७०० | |
सिंहगड किल्ला, महाराष्ट्र | ||
पूर्वाधिकारी | छत्रपती संभाजी महाराज | |
प्रधानमंत्री | रामचंद्रपंत अमात्य | |
उत्तराधिकारी | छत्रपती ताराबाई राणीसाहेब (कार्यकारी) | |
वडील | छत्रपती शिवाजी महाराज | |
आई | महाराणी सोयराबाई | |
पत्नी | महाराणी जानकीबाई , महाराणी ताराबाई , महाराणी राजसबाई , महाराणी अंबिकाबाई | |
संतती | छत्रपती शिवाजी द्वितीय , छत्रपती संभाजी द्वितीय | |
राजघराणे | भोसले | |
राजब्रीदवाक्य | श्री धर्मप्रद्योतितायं शेषवर्ण दशरथेऽरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते। | |
चलन | होन, राजारामराई (सुवर्ण होन, रुप्य होन??) |
राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्यावरचा एकछत्री अंमल खऱ्या अर्थाने संपला.[ संदर्भ हवा ] नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्माण झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपूर, कोल्हापूर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर, उज्जैन व इंदूर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती.
मराठेशाही सन १६८८ ते १७००
संपादनशिवाजी महाराजांनी जे कमावले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली; ते त्यांनी राखले पण त्यांच्या अकाली घरपकडीनंतर व हत्येमुळे मराठेशाहीचा कणा पार मोडून गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणून राजाराम महाराज सिंहासनावर बसले. हा कालावधी राजाला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. राजाराम महाराजांच्या जीवनातील पहिली लढाई १० जून १६८९ला प्रतापगडच्या पायथ्याशी झाली. काकरखान सारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली. १० जून ते १० ऑगस्ट १६८९ या काळात राजाराम महाराजांचे वास्तव्य प्रतापगडावर होते.
नंतर छत्रपती राजाराम व त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला व तो काळ गाजविला, व राज्य कसे का होईना[ संदर्भ हवा ], जिवंत ठेवले.
जन्मताना राजाराम पायाकडून जन्मले म्हणून सर्वजण चिंतीत झाले असताना, शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले.[ संदर्भ हवा ] प्रत्यक्षात जरी राजारामाने पातशाही पालथी घातली नाही, तरी त्याने पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली.[ संदर्भ हवा ] राजाराम महाराज हे शांत, धीरगंभीर प्रकृतीचे होते. राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहित्यांकडे (स्वराज्याचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा) झाले. हंबीरराव हे कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचे लग्न लावले.
वतनदारीस प्रारंभ
संपादन१ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराज पकडले गेले. गादीचे औरस वारस युवराज शाहू त्यावेळी १९ वर्षाचे पण नव्हते. त्यांना छत्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसूबाई आणि मंत्रिमंडळाने राजाराम महाराजांना छत्रपती करण्याचा निर्णय घेतला व लगेच १२ फेब्रुवारी रोजी राजाराम छत्रपती झाले.
राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्यापुढील परिस्थिती खराब होती. संभाजी महाराज अटकेत होते, काही मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकत होते. चारीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला, स्थानिक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशाची चणचण हे सर्व प्रश्न त्यांच्यापुढे होते. स्वराज्य तर राखायचे, मराठेशाहीला जिवंत तर ठेवायचे, पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भीषण परिस्थिती होती. औरंगजेबाच्या सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजाराम महाराजांच्या मागेच लागले होते. ह्यामुळे महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना दूर जिंजीस जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला. प्रल्दाद निराजी यांना "पंत प्रतिनिधी"पद (जे अष्टप्रधानांच्या वरचे होते) देऊ केले. ह्या पदामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते. वरील सर्व परिस्थिती पाहता राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय लगेच अंमलात आणला. स्वराज्याभोवती मोगलांचा वेढा घट्ट होत होता. राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजूस वळविण्यास बोलणी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. होताहोईतो मराठी लोकांना एकत्र आणण्याचे सुरू केले. पण यात एक मोठी मेख मोगलांनी मारून ठेवली होती. संभाजी महाराजांच्या शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिणेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करण्यासाठी मोगलांनी वतने देणे सुरू केले होते. वतने देऊन मराठी लोकांना स्वराज्याचा बाबतीत निष्क्रिय करणे सुरू केले होते. वतनदारीची जी पद्धत शिवाजी महाराजांनी मोडली होती ती परत वर आली. याचा मराठी राज्याला फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. लालूच, दुष्काळ आणि वतनाचा लोभ ही तीन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक देशमुख, पाटील, व सरदार मोगलांना मिळाले.[ संदर्भ हवा ]
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा बराचसा भाग अगदी काहीच दिवसात मोगली अंमलाखाली आला होता.[ संदर्भ हवा ] स्वराज्य राहून राहून सातारा-परळी, विशाळगड, रत्नागिरीचा काही भाग व मोजकेच दोन-पाच किल्ल्यापर्यंत मर्यादित झाले. राजाराम महाराज स्वतः ह्या वेळी पन्हाळ्यास होते. मोगलांनी पन्हाळ्यासदेखील वेढा घातला. राजाराम महाराजांवर संकटावर संकटे येत होती. रामचंद्रपंत, जे संभाजी महाराजांच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना "हुकुमतपनाह" हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले गेले. अंधाऱ्या रात्री राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले व जिंजीच्या मार्गावर लागले. भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली. राजाराम महाराज सुटल्याचे बहादुरखानाच्या लक्षात आले. तुंगभद्रा नदीतीरी भीषण संग्राम झाला. महाराज स्वतः लढत लढत नदीत उडी मारून निसटून गेले. बेदनूरला राणी चेन्नामा राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरूप रवानगी जिंजीला केली. जिंजीला राजारामांचे जावई हरजीराजे महाडीक होते तेव्हा राजांनी जिंजी हस्तगत केली.
जिंजीसारख्या ८००-९०० मैल दूर असलेल्या प्रदेशातून राजाराम महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविण्यासाठी त्यांनी वतनदारी देणे सुरू केले. वतनदारीच्या आमिषांमुळे परत जुने लोक स्वराज्याला सामील होऊ लागले. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ ह्यामुळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदार नेमला जो गावागावात फिरून गुन्हेगारांस शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंडीच्या रूपात वतने द्यायला सुरुवात केली आणि येथूनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली.[ संदर्भ हवा ] वतनाप्रमाणे सरदार स्वतः फौजफाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडेल तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांच्या वतनापुरते राजे बनले. त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे इमान हे मुख्य राजा सोबत नसून वतनदारासोबत असे. त्यामुळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाऊन मिळत. त्यामुळे एकच वतन अनेक लोकांना दिले गेले व स्वराज्याच्या न्यायाधिशाला भलत्याच भानगडींना सामोरे जावे लागले.
अशातच एका मर्द मराठ्याने (संताजीने) औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित "भंगले स्वप्न महाराष्ट्रा" या नाटकात या धाडसी हल्ल्याचे व संताजी - धनाजी यांच्या पराक्रमाचे दर्शनचं घडवण्यात आले आहे.[१] लगेच पंधरा दिवसात घोरपडे बंधूंनी झुल्फिकारखानावर हल्ला चढवून त्याचे पाच हत्ती पळवून आणले. मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली. स्वराज्यावर आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना लांबवर उगवत्या सूर्याची किरणे दिसायला सुरुवात झाली.
धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे दोघे सरदारपण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चीज बाळगून होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरू करून शिवाजी महाराजांप्रमाणे अकस्मात हल्ले करायला सुरुवात केली. ह्या दोघांसोबत हुकुमतपनाह, प्रतिनिधी, घोरपडे बंधू (बहिर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवसरात्र पायपीट करून हे लोक हल्ले करून अकस्मात माघार घेत. "स्वराज्य" ही कल्पना टिकवून ठेवण्यासाठी ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली.
पुढे जिंजीवरच झुल्फिकारखानाने हल्ला केला. त्याला फ्रेंच सैन्याची मदत होती. महाराज परत अडचणीत आले. जिंजी किल्ला मोठा कठीण आणि लढवायला मजबूत होता. महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि दिवसरात्र वाटचाल करत धनाजी जाधव व संताजी कर्नाटकात येऊन पोचले. त्यांनी शाहजादा कामबक्ष व झुल्फिकारखान या मोगली सरदारांचा धुव्वा उडवत परत एकदा जिंजीच्या आजूबाजूच्या परिसर जिंकून घेतला. ह्यानंतर संताजी घोरपडे स्वराज्यासाठी मरेपर्यंत झुंज देत होते. हे इमान पैदा केले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. महाराजांनी पत्र पाठवून निर्धोक राहा असे सांगितले, पण त्याच वेळेस तंबीही दिली होती. नवीन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही, त्यामुळे महाराजांनी संताजीस त्याची फौज खाली करण्याचा हुकूमपण दिला व सरसेनापतीपद धनाजीला दिले. पण संताजीने फौज सोडली नाही, तो लढत राहिला पण स्वराज्याच्या बाजूनेच. औरंगजेबाकडे १,४३,००० खडी फौज व ९६ मराठे सरदार होते यावरून राजाराम महाराजांचा लढा किती विचित्र होता याची कल्पना करता येते. मिर्झा राजाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना पार शेवटच्या थरापर्यंत रुजविली होती, पण राजारामाच्या काळात ती पूर्णपणे उखडली गेली होती. [ संदर्भ हवा ] मराठी सैन्यात त्यावेळेस साधारण (वतनदारी मिळून) ३०,००० ते ५०,००० इतके सैन्यपण भरत नव्हते. एकास साडेतीन असा हा लढा होता. शिवाय मोगलांबरोबर हत्ती, तोफखाना हे सर्व, तर मराठ्यांचे सैन्य हे तलवार, बर्च्या व ढाली एवढेच घेऊन लढत होते.
सन १६७९ ते १७००पर्यंत महाराष्ट्रावर सतत स्वाऱ्या होत होत्या. दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचून गेला होता. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा(?), पुरेशी फौज नाही अशा काळात वतनदाऱ्या बहाल करण्याशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर नव्हता असे मत आहे. पण नंतर याचे भयंकर दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले.
सततची धावपळ, सोबत वाईट प्रकृती यामुळे राजाराम महाराज लवकरच वारले. छत्रपती राजाराम वारल्यावर स्वराज्य परत एकदा डळमळीत झाले. राजाराम महाराजांना दोन पुत्र होते. संभाजी (दुसरे) आणि शिवाजी (तिसरे). ह्यांपैकी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर कर्णाला गादीवर बसवल्याचा उल्लेख रिसायतकार करतात पण तो ३ आठवड्यात वारला. गादी परत पोरकी झाली. संभाजी दुसरे हे राजसबाई आणि राजाराम महाराज ह्यांचे पुत्र होते.
राजाराम हा मुळात शांत स्वभावाचा माणूस होता. त्याने राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. व्यक्तिगतरीत्या तो गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होता. एका पत्रात त्याने दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. काळ पाहिला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता, राजारामाकडे पैसे नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू या असे त्याच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला? बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही. (इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ती लगेच झाली. १७२८ला साली निझामाने पुणे घशात घातल्यावर बाजीरावाने औरंगाबादवर हल्ला चढविला) हे गुण राजारामाला त्याच्या वडिलांकडून आले. एवढेच नाहीतर त्याने वडिलांसारखी सुरतेला तिसऱ्यांदा हल्ला चढविण्याची तयारी केली होती, पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला..
राजाराम महाराज महाराष्ट्रात परत १६९८मध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर आपला पवित्रा बदलला. आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी. नंतर मात्र ज्या झाल्या त्या आक्रमण करण्यासाठी. मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असूनही टिकत नव्हते कारण त्यांचा राजा हाल सोसून त्यांना लढण्यास भरीस पाडत होता. स्वतः स्वाऱ्यांवर जात होता. औरंगजेबाने त्याच्या युद्धनीतीत १६९८ला परत बदल करून मोठी चढाई केली. त्याला घाबरून जाऊन परत एकदा जिंजीला जाण्याबद्दल बोलणे चालले पण त्या बोलण्यास राजाराम महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतःच अनेक स्वाऱ्या चालू केल्या. गदग, वऱ्हाड येथे जाऊन संपत्ती लुटून आणली. महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारीबद्दल जास्त माहिती नाही. संताजी व धनाजी असे दोन थोर सेनापती त्याला लाभले. भरताने जसे रामाचे राज्य स्वीकारले तसे राजारामाने शाहूचे (संभाजीचे) राज्य स्वीकारले. त्याला छत्रपतीपदाचा मोह नव्हता. कित्येक कागदपत्रांत हे दिसून येईल की तो बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहितो. असा थोर राजा महाराष्ट्राला लाभला हे मराठी लोकांचे भाग्य. त्यांनी नवीन राष्ट्र उदयास आणले ही त्यांची कामगिरी. जुन्या इतिहासकारांनी राजारामवर थोडा अन्यायच केला असे वाटते. नवीन पुस्तकांत मात्र त्यांना जे श्रेय दिले पाहिजे ते दिले जात आहे.
छत्रपती राजाराम महाराजांबद्दलचे लेखन/ मराठी पुस्तके
संपादन- छत्रपती राजाराम-ताराराणी [लेखक - ड़ाॅ. सदाशिव शिवदे]
- छत्रपती राजाराम महाराज (मराठा-मोगल रोमहर्षक संघर्ष) [लेखक - अशोकराव शिंदे सरकार]
- मराठी रियासत छत्रपती रामराजा [लेखक -गो.स. सरदेसाई]
- भंगले स्वप्न महाराष्ट्रा [नाटक, लेखक - बशीर मोमीन (कवठेकर)]
- शिवपुत्र राजाराम [लेखक -डाॅ. प्रमिला जरग]
संदर्भ
संपादन- मराठी रियासत - लेखक गो.स.सरदेसाई
- मराठ्यांचा इतिहास - सपांदक अ. रा. कुळकर्णी
- केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया (५ वा भाग) - ग.ह. खरे
- ^ खंडूराज गायकवाड, लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!, “दै नवाकाळ", 20-Jan-2011”