शिवाजी गोविंदराव सावंत
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
शिवाजी गोविंदराव सावंत (ऑगस्ट ३१, १९४० - सप्टेंबर १८, २००२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.[ संदर्भ हवा ]
शिवाजी गोविंदराव सावंत | |
---|---|
जन्म | ऑगस्ट ३१, १९४० |
मृत्यू |
सप्टेंबर १८, २००२ गोवा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अध्यापन, साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रसिद्ध साहित्यकृती | मृत्युंजय |
पुरस्कार | ज्ञानपीठ(१९९४) |
स्वाक्षरी |
व्यक्तिगत जीवन आणि कारकीर्द
संपादनशिवाजी सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 साली सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते.[ संदर्भ हवा ]
पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले.[ संदर्भ हवा ]
शिवाजी सावंत हे इ.स. १९९५ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते. १९८३ मध्ये बडोदा येथे भरलेल्या "बडोदे मराठी साहित्य संमेलनाचे" ते संमेलनाध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ]
मृत्युंजय(१९६७), या पौराणिक कादंबरीच्या प्रस्तावनेत शिवाजी सावंत यांनी हिंदीतील केदारनाथ मिश्र ह्यांचे कर्ण आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ ह्यांचे रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.[ संदर्भ हवा ]
मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांना थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.[ संदर्भ हवा ]
’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगंधर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली.[ संदर्भ हवा ]
शिवाजी सावंत यांची कादंबऱ्यांसहित अन्य पुस्तके इंग्लिश भाषेत अनुवादित झाली आहेत. युगंधरचा इंग्रजी अनुवाद सावंत यांची अमेरिकास्थित कन्या कादंबिनी यांनी केला आहे.[ संदर्भ हवा ]
मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी-हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली. मृत्युंजय ही कादंबरी दानशूरपणासाठी प्रख्यात असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर, तर युगांतर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेत कसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[ संदर्भ हवा ]
कऱ्हाड येथे भरणाऱ्या ७६व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे, शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ]
प्रकाशित साहित्य[ संदर्भ हवा ]
संपादन- अशी मने असे नमुने (व्यक्तिचित्रे -१९७५)
- कवडसे (ललित निबंध)
- कांचनकण (ललित निबंध)
- छावा (छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी -१९७९)
- छावा (नाट्यरूपांतर)
- पुरुषोत्तमनामा
- मृत्युंजय -(महारथी कर्णाच्या जीवनावरील कादंबरी -१९६७)
- मृत्युंजय (नाट्यरूपांतर)
- मोरावळा (व्यक्तिचित्रे -१९९८)
- युगंधर (भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील कादंबरी -२०००)
- युगंधर श्रीकृष्ण : एक चिंतन
- लढत (सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र, दोन भागांत -१९८६)
- शेलका साज (ललित निबंध-१९९४)
- संघर्ष (कामगार नेते मनोहर कोतवाल यांचे चरित्र -१९९५)
सावंत यांना मिळालेले सन्मान/पुरस्कार[ संदर्भ हवा ]
संपादन- मृत्यंजयसाठी -
- महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७)
- न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२)
- ललित मासिकाचा पुरस्कार (१९७३)
- भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ (१९९४)
- फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६)
- आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८)
- पूनमचंद भुतोडिया बंगाली पुरस्कार (ताम्रपटासह, कलकत्ता -१९८६)
- ’मृत्युंजय’च्या प्रतिमा दवे यांनी केलेल्या गुजराती भाषांतराला, गुजरात सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार (१९९०)
- त्याच गुजराती भाषांतराला केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (१९९३)
- छावासाठी -
- महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (१९८०)
- बडोदे मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद (१९८३)
- पुणे महापालिकेतर्फे सन्मानपत्र (१९९७)
- कोल्हापूर येथे १९९८ मध्ये भरलेल्या सातव्या कामगार साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद
- पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (१० फेब्रुवारी २०००)
- ‘कोल्हापूरभूषण’ पुरस्कार (२ मार्च २०००)
- महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान (मे २०००)
- भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती.
- नवी दिल्ली येथील भारतीय ज्ञानपीठाचा ’मूर्तिदेवी पुरस्कार' दि. ६ फेब्रुवारी १९९६ रोजी उपराष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते दिल्लीत समारोहपूर्वक प्रदान.
शिवाजी सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
संपादन- शिवाजी सावंत याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे येथे मृत्युंजय प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठानातर्फे दर वर्षी ’मृत्युंजकार शिवाजीराव सावंत स्मृति साहित्य आणि स्मृति समाजकार्य’या नावाचे दोन पुरस्कार.देण्यात येतात.[१]
- त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मगावी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या वतीने प्रतिवर्षी ‘मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार’ दिला जातो.
संदर्भ
संपादन- ^ "प्रा. शेषराव मोरे यांना मृत्युंजय पुरस्कार". महाराष्ट्र टाइम्स. १४ सप्टेंबर २०१४. १८ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले.[permanent dead link]