दाबोळी विमानतळ
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा दाबोळी विमानतळ (Dabolim) (आहसंवि: GOI, आप्रविको: VAGO) हा भारताच्या गोवा राज्यातील वास्को द गामा येथे असलेला विमानतळ आहे.
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा विमानतळ दाबोळी नौसेना विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: GOI – आप्रविको: VAGO | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक/सेना | ||
मालक | गोवा व भारतीय नौसेना[१] | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | वास्को दा गामा, गोवा, भारत | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १८४ फू / ५६ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 15°22′51″N 073°49′53″E / 15.38083°N 73.83139°Eगुणक: 15°22′51″N 073°49′53″E / 15.38083°N 73.83139°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
०८/२६ | ३,४५८ | ११,३४५ | डांबरी |
इतिहास
संपादनहा विमानतळ भारतातील पोर्तुगीज सरकारने १९५० च्या दशकात बांधला.[२] २४९ एकर जमिनीवर असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून कराची, मोझांबिक आणि तिमोरसह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान भारतीय वायुसेनेने या विमानतळावर बॉम्बफेक करून हा तळ जवळजवळ निकामी करून टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.[३] त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह भारतीय नौसेनेच्या हवाली केला.
पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६ च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. भारत सरकारने इंडियन एरलाइन्सला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून देशांतर्गत विमानसेवा उपलब्ध झाली. १९८० च्या सुमारास जुआरी व मांडवी या नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्सची मीटिंग (चोगॅम) गोव्यात भरण्ली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाभोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाभोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यांत जर्मनीची कॉंडोर एरलाइन्स ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्या एकूण चार्टर्ड विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाभोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमान कंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाभोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८ च्या मोसमात केवळ युनायटेड किंग्डममधून एक लाख तर रशियातून ४२,००० प्रवासी चार्टर्ड विमानांतून दाभोळीस आले.
आर्थिक व्यवस्थापन
संपादनइमारत आणि सुविधा
संपादनदाभोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह[मराठी शब्द सुचवा] आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी२ क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक देशांतर्गत वाहतुकीसाठी तर दुसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्गत वाहतुकीचे टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी येजा करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलष्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ मोटारी आणि आठ बसेस पार्क करण्याची सोय आहे.[४]
दाभोळी विमानतळावरून रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः नाताळ व नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाभोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून दिल्ली किंवा मुंबईची तिकिटे मुंबई-दुबई किंवा मुंबई-बॅंगकॉकच्या तिकिटांच्या पातळीची असतात.[५]
येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरून सैनिक चालत किंवा सायकलींवरून धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.
स्थानिक दळणवळण
संपादनगोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. वास्कोपासून चिखली मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर मुरगाव हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून कोंकण रेल्वेद्वारे गोव्यातील तसेच भारतात इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
विस्तार
संपादननवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम फेब्रुवारी २१, इ.स. २००९ रोजी सुरू झाले होते. त्यामुळे आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य झाले आहे. याशिवाय येथे बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेंद्र बांधले आहे..
टर्मिनल
संपादन- टर्मिनल १ - देशांतर्गत
दाभोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे.
- टर्मिनल २ - आंतरराष्ट्रीय
येथून मुख्यत्वे इराणच्या आखातात आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त एर इंडिया आणि इंडियन या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाभोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात.
विमानसेवा व गंतव्यस्थान
संपादनविमान कंपनी | गंतव्य स्थान | टर्मिनल |
---|---|---|
एरोफ्लोट | मॉस्को (हिवाळी सेवा) | २ |
एर अरेबिया | शारजा | २ |
आर इटली पोलास्का | वॉर्सॉ (चार्टर सेवा) | २ |
आर्कफ्लाय | ॲम्स्टरडॅम (चार्टर सेवा) | २ |
कॉंडोर | फ्रांकफुर्ट | २ |
एडेलवाइस एर | झुरिक (चार्टर सेवा) | २ |
गोएर | दिल्ली, मुंबई | १ |
इंडियन एरलाइन्स | दिल्ली, मुंबई | १ |
इंडियन आरलाइन्स | बंगळूर, चेन्नई, दुबई, कुवैत | २ |
ईंडिगो | दिल्ली, मुंबई | १ |
जेट एरवेझ | बंगळूर, हैदराबाद, मुंबई | १ |
जेट लाईट | अमदावाद, दिल्ली, मुंबई | १ |
किंगफिशर एरलाइन्स | बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, पुणे, श्रीनगर | १ |
एमडीएलआर एरलाइन्स | दिल्ली | १ |
मोनार्क एरलाइन्स | लंडन-गॅटविक, मॅंचेस्टर (चार्टर सेवा) | २ |
नोव्हएर | ग्योटेबोर्ग, ऑस्लो, स्टॉकहोम | २ |
पॅरामाउंट एरवेझ | चेन्नई, कोची, तिरुवअनंतपुरम | १ |
कतार एरवेझ | दोहा | २ |
स्पाईसजेट | अमदावाद, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, मुंबई | १ |
थॉमस कूक एरलाइन्स | लंडन-गॅटविक, मॅंचेस्टर (चार्टर सेवा) | २ |
थॉमसन एरवेझ | ईस्ट मिडलॅंड्स, लंडन-गॅटविक, मॅंचेस्टर (चार्टर सेवा) | २ |
ट्रांसएरो | मॉस्को-दोमोदेदोवो | २ |
सांख्यिकी
संपादनवर्ष | एकूण प्रवासी | एकूण विमान आवागमनसंख्या |
---|---|---|
1999 | 758,914 | 7,584 |
2000 | 875,924 | 7,957 |
2001 | 791,628 | 8,112 |
सैनिकी विमान प्रशिक्षण
संपादनभारतीय आरमार दाबोळी विमानतळावरून आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्डर्डर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत.
विमानतळास नागरी विमानळ करण्यासाठीची चळवळ
संपादनगोव्यातील राजकारण्यांनी दाभोळीतील आरमारी तळ आय.एन.एस. कदंब येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाभोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर कर्नाटकातील कारवार शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाभोळीमध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हट्ले गेले आहे.[६]
२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही.
नागरी विमान मंत्रालयाने उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यात मोपा येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. स्थानिक नागरिक तसेच गोव्यातील असंख्य नागरिकांचा या प्रकल्पाला विविध कारणांनी विरोध होत आहे. [७]या संदर्भात घेण्यात आलेल्या जनसुनावण्यात सर्व बाजू मांडण्यात आल्या आहेत.[८] प्रकल्प बाधित क्षेत्राचे पर्यावरणीय सर्वेक्षण अत्यंत चुकीचे केलेले असून या भागात मोठ्या प्रमाणावर वने, प्राणी व पाण्याचे स्रोत आहेत.[९] या सर्व विरोधाला डावलून राज्य व केंद्र सरकारने सर्व परवानग्या देत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे.[१०]
भारतीय आरमारी तळ
संपादनदाभोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या कोइंबतूर जवळील सुलूर येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली बी.ए.ई. सी हॅरियर प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केंद्रही उभारले. आय.एन.एस. विक्रमादित्य या नवीन विमानवाहू नौकेबरोबर विकत घेतलेल्या १२ मिग-२९के विमानांपैकी चार विमानांना दाभोळी येथे ठेवण्याचा बेत आहे.[११] कारवार बंदरात असलेल्या विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाभोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौकेवर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मीटर लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे.
याशिवाय भारतीय आरमाराची कामोव्ह केए-२८ प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, आयएल-१८, आयएल-३८ आणि टीयू-१४२एम प्रकारची विमाने दाभोळी विमानतळावर आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊ बॉंबफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाबोळीस ठेवतात. ही विमाने किनाऱ्याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची किरण ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाबोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करून दाखवतात. दाबोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे.
माल वाहतूक
संपादनदाभोळी विमानतळावरून प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते.
दाबोळी विमानतळावर झालेल्या दुर्घटना व अपघात
संपादन- ऑक्टोबर १, इ.स. २००२ रोजी भारतीय आरमाराची दोन आयएल-१८ प्रकारची विमाने एकमेकांवर आदळली यात १२ सैनिकी कर्मचारी तर जमिनीवरील तीन व्यक्ती मृत्यू पावल्या.
- डिसेंबर २००४मध्ये सी हॅरियर विमानाने उतरताना पलटी खाल्ली. वैमानिक बचावला होता.
- डिसेंबर २००५मध्ये सी हॅरियर उतरत असताना धावपट्टी सोडून निर्बंधक, संरक्षक भिंत व एक रस्ता ओलांडून पुढे गेले. त्यानंतरच्या स्फोटात वैमानिक मृत्यू पावला.
- डिसेंबर २४, २००७ रोजी सकाळी ११:१५ वाजता सी हॅरियर थेट खाली उतरण्याचा प्रयत्न करीत असताना पडले. वैमानिकाने आपला बचाव करून घेतला.
संदर्भ
संपादन- ^ [१]
- ^ [https://web.archive.org/web/20120206062229/http://goancauses.com/9.html Archived 2012-02-06 at the Wayback Machine. Os Transportes Aereos Da India Portuguesa
- ^ "Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline". 2012-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-20 रोजी पाहिले.
- ^ Goa Agenda: Goa Infrastructure Report. Goa Chamber of Commerce & Industry. Undated (circa 2005/2006)
- ^ Dev Roy, Atreyee and Sharma, Rouhan. New Year Goa flights on a high. Financial Express.
- ^ D'Cunha C. "Room for more flights at Dabolim: Adm.Mehta". Goa Plus (The Times of India supplement). 5 January 2007
- ^ http://www.business-standard.com/article/pti-stories/eia-hearing-on-mopa-airport-conducted-illegally-farmers-115030301016_1.html
- ^ http://timesofindia.indiatimes.com/city/goa/Unruly-scenes-at-Mopa-airports-EIA-hearing/articleshow/46089868.cms
- ^ http://www.dnaindia.com/india/report-overlooking-wildlife-corridor-and-rich-water-source-moef-clears-mopa-airport-in-goa-2140006
- ^ http://www.heraldgoa.in/Goa/EC-granted-for-Mopa-airport-CM-Parsekar/94837.html[permanent dead link]
- ^ India to receive MiG-29 from Russia in 2007. The Times of India. 13 March 2006
बाह्य दुवे
संपादन- विमानतळ माहिती VAGO वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.
- एव्हीएशन सेफ्टी नेटवर्कच्या संकेतस्थळावर, GOI या विमानतळावरील अपघातांचा इतिहास बघा