चंगीझ खान
चंगीझ खान किंवा चंगेझ खान (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [ʧiŋgɪs χaːŋ]; मंगोलियन: Чингис Хаан, Činggis Qaɣan (चिंगिज खान)) किंवा (फारसी दस्तऐवजांप्रमाणे) गेंगीझ खान (इ.स. ११६२ - इ.स. १२२७) हा बाराव्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते. पाश्चात्य इतिहासकारांनी चंगीझ खानाचे वर्णन रक्तपिपासू, क्रूरकर्मा जगज्जेता असे केले असले तरी मंगोलियात त्याला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. जगातल्या सर्वांत शक्तिशाली व यशस्वी शासकांमध्ये चंगीझ खानाची गणना होते. इ.स. १२२७ नंतर मंगोल राजघराण्यातर्फे नमूद केलेल्या मंगोलियाचा गुप्त इतिहास या दस्तऐवजांवरून चंगीझच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा आढावा घेता येतो.
चंगीझ खान | ||
---|---|---|
खान (मंगोल शासक) | ||
चंगीझ खानाचे व्यक्तिचित्र | ||
अधिकारकाळ | १२०६ – ऑगस्ट १८, १२२७ | |
पूर्ण नाव | तेमुजीन बोर्जिगीन | |
जन्म | ११६२ | |
हेन्ती प्रांत, मंगोलिया | ||
मृत्यू | ऑगस्ट १८, १२२७ | |
उत्तराधिकारी | ओगदेई खान | |
वडील | येसुगेई | |
आई | हौलन | |
पत्नी | बोर्ते, कुलन, यिसुगेन, यिसुई, आणि इतर | |
राजघराणे | बोर्जिगीन |
बालपण
संपादनचंगीझकालीन मंगोलिया
संपादनबाराव्या शतकात मंगोलियाच्या पठारावर अनेक रानटी टोळ्यांचे वास्तव्य होते. या भटक्या टोळ्यांचा मुख्य उद्योगधंदा पशुपालनाचा होता. उन्हाळ्यात ते भाजीपाल्याची लागवड करत आणि हिवाळ्यात बोचरी थंडी टाळण्यासाठी दक्षिणेकडे आपला तळ हलवत. पक्की घरे न बांधता गेर नावाच्या तंबूत त्यांचे वास्तव्य असे. मंगोलियाच्या वाळवंट व पठारावरील गवताळ प्रदेशामध्ये त्यांना उपजीविकेची पुरेशी साधने नव्हती. यामुळे आपापसातील चकमकी, लुटालूट यांचे प्रमाणही लक्षणीय असे.
जन्म
संपादनचंगीझ खानाचा जन्म इ.स. ११६२ साली मंगोलियातील ओनोन नदीजवळील प्रदेशात येसुगेई नावाच्या एका मंगोल टोळीप्रमुखाच्या घरी झाला. येसुगेई हा कियाड टोळीचा प्रमुख होता. ही टोळी इतर टोळ्यांच्या मानाने हलक्या दर्जाची समजली जाई. त्याच्या आईचे नाव हौलन असे होते. चंगीझ खानाच्या जन्मापूर्वी येसुगेईने तेमुजीन उगे या तातार योद्ध्याला लढाईत ठार केले होते. घरी परतल्यावर त्याला पुत्रजन्माची बातमी कळताच त्याने आपल्या शौर्याचे प्रतीक म्हणून जन्मलेल्या बाळाचे नाव 'तेमुजीन' असे ठेवले.
तेमुजीन जन्मला तेव्हा त्याच्या मुठीत रक्ताची गुठळी होती असे सांगितले जाते. त्यावरून तो मोठेपणी अतिशय पराक्रमी परंतु क्रूर योद्धा बनेल असे भविष्य वर्तवण्यात आले होते. तेमुजीनच्या जन्माबद्दलची ही गोष्ट सर्वत्र आढळल्याने ती केवळ आख्यायिका नसावी असे तज्ज्ञांचे मत आहे.
कुटुंब
संपादनलहानपणापासूनच तेमुजीनला धनुष्य बाण चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले. त्याचप्रमाणे अगदी लहान वयातच त्याला घोडेस्वारी शिकवण्यात आली. भरधाव दौडणाऱ्या घोड्यावरून अचूक नेम साधण्यात मंगोल योद्धे पटाईत होते. पुढे याच कौशल्याचा मंगोल सैन्याला अनेक महत्त्वाच्या लढायांत फायदा झाला.
तेमुजीन सुमारे ९ वर्षांचा असताना त्याचे वडील त्याचे लग्न लावून देण्यासाठी त्याला आपल्या समवेत घेऊन दुसऱ्या टोळीच्या भेटीस गेले. तेथे तेमुजीनचे लग्न त्या टोळीप्रमुखाची मुलगी बोर्ते हिच्याशी ठरवण्यात आले. मंगोल टोळ्यांच्या रीतीरिवाजांप्रमाणे तेमुजीनला लग्नापूर्वी आपल्या नववधूच्या घरी काही वर्षे राहून तिच्या कुटुंबियांची सेवा करणे भाग होते. त्यानुसार त्याला बोर्तेच्या घरी ठेवून येसुगेई एकटाच परतला.
परंतु वाटेत एका सहभोजनाच्या दरम्यान येसुगेईला तातार टोळीने विषप्रयोग करून मारले. तेमुजीनपर्यंत ही बातमी पोहोचल्यावर तो बोर्तेला मागे ठेवून आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करूनच आपल्या टोळीत परतला. येसुगेईच्या मागे दोन बायका व सात मुले अशा सर्वांची जबाबदारी लहानग्या तेमुजीनवर येऊन पडली. तेमुजीनच्या कमी वयामुळे त्याच्या टोळीतील इतरांनी त्याला टोळीप्रमुख बनवण्यास आक्षेप घेतला आणि त्याला, तसेच त्याच्या कुटुंबाला हाकलून दिले. त्यामुळे तेमुजीनच्या मनात स्वतःच्या टोळीबद्दल घृणा निर्माण झाली.
खडतर काळ व युद्धमय जीवन
संपादनमंगोलियाच्या उजाड पठारावरील या कठीण कालखंडात तेमुजीनने आपल्या कुटुंबाची सर्वतोपरीने काळजी घेण्याचा प्रयत्न केला. याच काळात त्याची मैत्री दुसऱ्या एका टोळीतील त्याच्याच वयाच्या जमुगाशी झाली. दोघांनी बंधुत्वाच्या शपथा घेतल्या. यानंतर एकदा तेमुजीन मासे पकडत असता त्याच्या हाती आलेला मासा त्याच्या बेख्तेर या सावत्र भावाने चोरला आणि एकटयानेच फस्त केला. अशा कठीण काळात मिळालेले अन्न वाटून न खाण्याची वृत्ती पाहून तेमुजीनने बेख्तेरला अन्न चोरी केल्याची शिक्षा म्हणून ठार केले. बेख्तेर हा तेमुजीनपेक्षा वयाने अंमळ मोठा असल्याने त्याने आपल्याच घरातल्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला ठार करून स्वतःच्या मार्गातील काटा दूर केला असेही म्हणले जाते.
या गोष्टीचा गवगवा होऊन पुढे एकदा शिकारीवर असताना तेमुजीनला त्याच्याच टोळीकडून जेरबंद केले गेले. तिथे तेमुजीनने रक्षकांना ठार करून मोठ्या कौशल्याने आपली सुटका केली व परत येऊन तो आपल्या कुटुंबाला मिळाला. पुढे त्याच्या कुटुंबावर पुन्हा हल्ला होऊन त्यांना लुटले गेले आणि त्या दरम्यान त्याचे घोडे लुटारूंनी पळवले. तेमुजीनने लुटारूंचा पाठलाग केला, पण तो व्यर्थ ठरला. याच सुमारास त्याची गाठभेट बोगुर्ची या धनाढ्य इसमाशी झाली. या दोघांत घनिष्ठ मैत्री निर्माण झाली आणि बोगुर्चीने तेमुजीनला त्याचे चोरलेले घोडे परत मिळवून देण्यास फार मदत केली.
त्यानंतर सुमारे चार वर्षांनी तेमुजीनचे लग्न बोर्तेशी झाले, पण दुर्दैवाने थोड्याच काळात बोर्तेचे दुसऱ्या एका टोळीकडून अपहरण करण्यात आले. तेमुजीन व त्याचे कुटुंबीय या टोळीचा सामना करण्यास असमर्थ होते. तेमुजीनने बोर्तेला परत मिळवण्यासाठी वांग खान नावाच्या आपल्या वडिलांच्या मित्राची मदत घेण्याचे ठरवले व दोघांनी मिळून तातार व इतर मंगोल टोळ्यांवर हल्ले करण्यास साथ देण्याची शपथ घेतली (वांग खानाचे नाव काही ठिकाणी 'तोग्रुल' असल्याचे वाचनात आले आहे. [ संदर्भ हवा ]). त्यानुसार वांग खान आपल्या योद्ध्यांसमवेत तेमुजीनला येऊन मिळाला. यावेळेस तेमुजीनचे वय १७ वर्षे होते. वांग खानाने बोर्तेच्या सुटकेसाठी तेमुजीनला दुसऱ्या एका मित्रटोळीतील योद्ध्याची मदत घेण्यास सांगितले. हा योद्धा दुसरातिसरा कुणी नसून चंगीझचा बालमित्र जमुगा होता. दोघांनी आपल्या मैत्रीच्या आणाभाका स्मरून बोर्तेचा शोध घेतला व तिची सुटका केली.
त्यानंतर जमुगा आणि तेमुजीन यांनी एकत्र आपली टोळी प्रस्थापित केली. या टोळीची कीर्ती लवकरच मंगोल पठारावर सर्वदूर पोहोचली. पण थोड्याच काळत जमुगाला, तेमुजीन वरचढ होतो आहे अशी भीती वाटू लागली व त्याने तेमुजीनला टोळीतून बाहेर पडून वेगळी टोळी स्थापन करण्याचे सुचवले. यामुळे दुखावलेला गेलेला तेमुजीन आपल्या कुटुंबासमवेत जमुगाच्या टोळीतून रातोरात बाहेर पडला.
या नंतरच्या काळात बरेच योद्धे व लहान मोठ्या टोळ्या आपली शस्त्रे, माणसे, घोडे घेऊन तेमुजीनला येऊन मिळाल्या. तेमुजीनने आपल्या हजारोंच्या सैन्याला कडक शिस्त लावली होती. जमुगाच्या टोळीशी मात्र त्याने वैर पत्करले व पुढील अनेक वर्षे मंगोल टोळ्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जमुगा व तेमुजीनच्या टोळीत अनेक चकमकी झाल्या.
तेमुजीन ते चंगीझ खान नावाचा प्रवास
संपादनइ.स. ११८३च्या सुमारास तेमुजीनच्या मंगोल सैन्याने त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास दर्शवून त्याला 'चंगीझ' असे संबोधण्यास सुरुवात केली. चंगीझ या शब्दाचा अर्थ 'सर्वोत्तम योद्धा' असा समजला जातो. जरी चंगीझला 'सर्वोत्तम योद्धा' असे संबोधले गेले, तरी या काळात बऱ्याच मंगोल टोळ्या चंगीझच्या आधिपत्याखाली आलेल्या नव्हत्या. यापुढील काळात अनेक स्वाऱ्या करून त्याने आपले स्वामित्व सिद्ध केले.
तरीदेखील तो आणि जमुगा हे दोघेही वांग खानाचे मांडलिक म्हणूनच ओळखले जात होते. जातीने जमुगाची आणि वांग खानाची जमात चंगीझच्या जमातीपेक्षा श्रेष्ठ गणली जाई. याकारणास्तव पुढे या दोघांना चंगीझ डोईजड होऊ लागला. इ.स. १२०० सालाच्या सुमारास वांग खान आणि जमुगाच्या टोळ्यांच्या चंगीझच्या टोळीशी चकमकी झडू लागल्या. इ.स. १२०१ सालामध्ये जमुगाच्या आणि वांग खानाच्या टोळ्यांना चंगीझने जवळजवळ संपुष्टात आणले. जमुगाशी शेवटची लढाई इ.स. १२०३ मध्ये लढली गेली. यात चंगीझने जमुगाला बंदिवान केले. त्याला चंगीझने आपल्या आधिपत्याखाली येण्याचे आमंत्रण दिले. जमुगाने तसे करण्यास नकार दिला आणि चंगीझकडे देहदंडाची शिक्षा मागितली. मंगोल रीतीरिवाजांप्रमाणे जमुगाने 'रक्ताचा एकही थेंब न सांडता मरण द्यावे' अशी इच्छा प्रकट केली. त्यावर चंगीझने आपल्या जुन्या प्रिय मित्राला दोन गोधड्यांखाली दाबून गुदमरवून मृत्यू दिला.
याचबरोबर जमुगाला आश्रय देणाऱ्या प्रबळ अशा नैमन टोळीवरही चंगीझने हल्ले केले आणि या टोळीचा पाडाव केला. या टोळीचा टोळीप्रमुख तायांग खान याचा मुलगा 'गुलचग' हा पश्चिमेच्या दिशेने पळून गेला. अशा प्रकारे सर्व मंगोल टोळ्यांवर चंगीझने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
यानंतर इ.स. १२०६ पासून चंगीझने आपल्या नावामागे 'खान' लावायला सुरुवात केली. खान या मंगोल शब्दाचा अर्थ 'शासक' असा होतो. मंगोलियातील सर्व टोळ्या आपल्या आधिपत्याखाली आल्यावर चंगीझने चीनवर स्वारी करण्याचा बेत आखला. त्यापूर्वी आपल्या मोठ्या मुलाला जोचीला त्याने सैबेरियावर स्वारी करण्यास पाठवले व तो भूभागही आपल्या अंकित केला.
चीनवर स्वारी
संपादनमंगोलियाच्या मानाने चीन हा त्याकाळी एक प्रगत भूभाग होता आणि धातूची भांडी, रेशीम, इतर वस्त्रे आणि कलाकुसरीच्या अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध होता. त्या काळात चीन, जुर्चेन, सुंग व खितान अशा तीन मोठ्या साम्राज्यांत आणि काही लहान राज्यांत विभागला गेला होता. इ.स. १२०७ मध्ये चंगीझने चीनमध्ये प्रवेश करून भूभाग जिंकण्यास सुरुवात केली. उघर या राज्याने स्वतःहून आणि टंगट या राज्याने थोड्या लढ्यानंतर चंगीझचे मांडलिकत्व स्वीकारले.
जुर्चेन राज्यावर स्वारी
संपादनझोंगडू (बीजिंग) प्रांतावर जुर्चेन या प्रबळ राजघराण्याची सत्ता होती. इ.स.१२१० मध्ये त्यांनी चंगीझकडे दूत पाठवून त्याला आपले मांडलिक होण्याची आज्ञा केली. या प्रकारावर संतापून चंगीझने या साम्राज्यावर हल्ला करण्याचे ठरवले. इ.स. १२१५ पर्यंत बीजिंग जिंकून त्याने उत्तर चीन गिळंकृत केला. मंगोल सैन्याच्या मानाने चीनी सैन्य युद्धात तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रवीण होते. त्यांची संख्याही मंगोल सैन्याच्या दुप्पट होती परंतु मंगोल सैन्याच्या युद्धनीतीसमोर ते टिकाव धरू शकले नाही. याचे कारण असे की खडतर जीवनाला सरावलेल्या मंगोल सैन्याची उपाशीपोटी दिवसेंदिवस युद्ध करण्याची क्षमता होती. युद्धक्षेत्राजवळील भूभाग बेचिराख करून त्यांनी चीनी सैन्याला नामोहरम केले. खितान राज्याचीही त्यांना या युद्धात मदतच झाली. चीनी सैन्याकडे असलेल्या तोफा व इतर युद्धसामुग्रीचे चंगीझला आकर्षण असल्याने त्याने अनेक अभियंते व कारागिरांना आपल्या बाजूला वळवले. जुर्चेन आणि खितान या दोन्ही राज्यांनी सरतेशेवटी चंगीझ खानाला आपला सम्राट म्हणून मान्यता दिली. चीन प्रांत लुटून त्याने अनेक कलाकार, स्थापत्यशास्त्रज्ञ, अभियंते, कारागीर यांना आपल्या समावेत मंगोलियाला नेले. पश्चिमेकडील इतर लहान राज्यांनी चंगीझचे प्रताप पाहून त्याचे मांडलिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
चीनची दोन मोठी साम्राज्ये चंगीझला अशाप्रकारे मांडलिक झाली तरी संपूर्ण चीन जिंकायचे चंगीझचे स्वप्न मात्र त्याच्या आयुष्यात पूर्ण होऊ शकले नाही. ते पुढे त्याचा नातु कुब्लाई खान याने पूर्ण केले.
मंगोलियाला प्रचंड लुट घेऊन परतल्यावरही चंगीझच्या समोर अनेक लहान मोठे प्रश्न होते. रशिया व सैबेरियाच्या भागातील टोळ्यांचा त्याला बंदोबस्त करावा लागला. मंगोलियातील काही बंडखोर टोळ्यांचेही प्रश्न सैन्याच्या साहाय्याने सोडवावे लागले. खितान जमातीच्या बऱ्याच टोळ्या चंगीझबरोबर असल्या तरी पश्चिमेकडील खितान राज्य चंगीझच्या अंकित नव्हते. याला 'कारा खितान' किंवा 'काळे खितान' म्हणून संबोधले जाई.
कारा खितानवर स्वारी
संपादनचंगीझचा जुना शत्रु नैमन टोळीचा तायांग खान याचा मुलगा गुलचग याने चंगीझशी झालेल्या लढाईतून पळून जाऊन कारा खितान राज्यात आश्रय घेतला होता. पुढे त्याने कारा खितान टोळीप्रमुखाच्या मुलीशी लग्न करून राज्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली. गुलचग हा ख्रिश्चन असून खितान टोळीप्रमुख बौद्ध होते. तसेच त्यांच्या राज्यात अनेक मुसलमान होते. गुलचगने त्यांना त्रास देण्यास व त्यांना आपापले धर्मपालन करण्यास बंदी आणल्याने ते चंगीझला शरण गेले.
चंगीझने आपला विश्वासू सरदार जेबे याला २०,००० सैनिकांच्या सैन्यानिशी कारा खितानवर स्वारी करण्यास पाठवले. जेबेने या लढाईत गुलचगचा पराभव करून त्याला ठार केले.
आपल्या राज्याची सुबत्ता वाढावी यासाठी चंगीझला व्यापार वाढविण्याचे प्रयत्न करण्याची गरज भासू लागली. मध्य आशियाचा भाग व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा होता. तेथील राज्यकर्ते मुसलमान होते आणि त्यांनी कला, शिक्षण, संशोधन, कारागिरी व व्यापाराच्या क्षेत्रात वाखाणण्याजोगी प्रगती केली होती. धातूंपासून भांडी घडवणे, धारदार शस्त्रनिर्मितीसारख्या उद्योगांत ते मुरलेले होते. अशा राज्यांत व्यापार केल्याने आपल्याला, आपल्या राज्याला व सैन्याला फायदा आहे हे पाहून चंगीझने आपल्याकडील व्यापाऱ्यांचा एक चमू तुर्कस्तानचा शाह - ख्वारिझम घराण्याचा मुहम्मद दुसरा - याच्याकडे पाठवला. या चमूचे नेतृत्व एका हिंदू व्यापाऱ्याकडे होते. दुर्दैवाने वाटाघाटी फिस्कटल्या व ख्वारिझमने त्या सर्वांची कत्तल केली. या कारणाने संतप्त होऊन चंगीझने सूड उगवायचा ठरवले आणि आपला मोर्चा पश्चिमेकडे वळवला.
मध्य आशियावर स्वारी
संपादनइ.स. १२१८ मध्ये चंगीझने मध्य आशियावर अनेक स्वाऱ्या केल्या. तेथे झालेल्या तुंबळ युद्धात चंगीझ खानासोबत सुमारे एक लाखाहून अधिक सैन्य लढले तर शाह, मुहम्मद दुसरा या मध्य आशियातील ख्वारिझम घराण्याच्या सत्ताधाऱ्याकडून सुमारे चार लाखाहून अधिक सैन्य लढले. तरीही अंतिम विजय चंगीझ खानाच्या सैन्याचाच झाला. सुमारे चार वर्षे हे युद्ध चालले. या काळात आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या शहरावर चंगीझच्या सैन्याने हल्ला करून ते बेचिराख केले, लुटालूट केली.
निशापूरची लढाई
संपादनशत्रूला जिवंत सोडले तर तो उलटून पुन्हा हल्ला करण्याची शक्यता असल्याने चंगीझ या शहरातील नागरिकांना शरण येण्याचे आवाहन करत असे. जे शरण येत त्यांना जीवदान मिळत असे, परंतु जे विरोध करत त्यांना, बायकामुले इतकेच नाही तर पाळीव प्राण्यांसकट मारले जाई.
इराणमधील निशापूरच्या लढाईपूर्वी चंगीझने तेथील नागरिकांना शरण येण्याचा प्रस्ताव दिला होता. तो ज्यांनी मानला नाही, त्यांची कत्तल करून चंगीझने या भागावर देखरेखीसाठी थोडे सैन्य ठेवले व पुढे कूच केले. चंगीझचे सैन्य परतून येणार नाही या विचाराने निशापूरच्या नागरिकांनी चंगीझच्या सैन्यावर हल्ला चढवला. यांत चंगीझचा जावई मारला गेला. या प्रकाराने संतापलेल्या चंगीझने आपल्या गरोदर मुलीला निशापूरवर हल्ला करून हवा तसा बदला घेण्याची मुभा दिली. असे सांगितले जाते की दुःखाच्या भरात चंगीझच्या मुलीने निशापूरमधील सर्व माणसे, प्राणी-पक्षी यांच्या हत्या करण्याचा आदेश दिला व तो मंगोल सैन्याने पाळला [ संदर्भ हवा ].
ख्वारिझमच्या पराभवानंतर चंगीझचे सैन्य इराण, अफगाणिस्तानमधून मुल्तानपर्यंत पोहोचले. उत्तर भारतावर स्वारी करण्याचा चंगीझचा मानस मात्र पूर्ण होऊ शकला नाही. खडतर प्रवास व हवामानाला कंटाळलेल्या सैन्याला त्याने परतण्याचा आदेश दिला. मध्य आशियावरील स्वारीच्या दरम्यान सुमारे १५,००,००० माणसांची चंगीझने कत्तल केली असे सांगितले जाते. या सर्व प्रदेशातून त्याने केलेली लुट सुमारे पाच वर्षे अव्याहत मंगोलियाला पाठवली जात होती [ संदर्भ हवा ].
पूर्व युरोपावर स्वारी
संपादनख्वारिझम राजवटीच्या पराभवानंतर चंगीझने आपल्या सैन्याची विभागणी केली. अर्ध्याहून अधिक सैन्यासमवेत चंगीझने इराण, अफगाणिस्तान, भारताच्या दिशेने कूच केले, तर सुबदेई आणि जेबे या आपल्या विश्वासू सेनापतींच्या नेतृत्वाखाली काही सैन्य पूर्व युरोपाच्या दिशेने रवाना केले. या नव्या भागात कोणते लोक राहतात, कोणती राज्ये आहेत याचा या दोन सेनापतींना अजिबात गंध नव्हता.
सर्वप्रथम त्यांनी जॉर्जिया हे लहान राज्य स्वारी करून अंकित करून घेतले. तेथून त्यांनी आपली नजर काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्राच्या तीरावर वसलेल्या किपचॅक प्रांताकडे वळवली. तेथील काही भटक्या टोळ्यांना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले, तर ज्या टोळ्यांनी प्रतिकार केला त्यांचा त्यांनी निःपात केला. किव्हचा राजपुत्र म्स्तिस्लाव्ह रोमोनोव्हिच याने मंगोल सैन्याला हुसकावून लावण्यासाठी आपल्या सैन्यानिशी त्यांचा पाठलाग केला. इ.स. १२२३ मध्ये चंगीझच्या मोजक्या २०,००० सैन्याने रशियाच्या ८०,००० वर सैन्याचा पाडाव करून त्यांना पळता भुई थोडी केली. तिथून त्यांनी प्रचंड लुटालूट, जाळपोळ करत युरोपात प्रवेश केला. मार्गात येणाऱ्या सर्व शहरांना लुटून बेचिराख करत चंगीझच्या सैन्याने रशिया, पोलंड व हंगेरीची सर्व महत्त्वाची शहरे लुटली. अशाप्रकारे मंगोल साम्राज्य पूर्व युरोपातील स्लाव्हवांशिक प्रदेशांना जिंकून जवळपास मध्य युरोपाच्या सीमेपर्यंत भिडले.
भारताच्या सीमेपर्यंत स्वारी
संपादनउर्वरित सैन्यासह अफगाणिस्तानाच्या दिशेने निघालेल्या चंगीझने वाटेत लागणारी सर्व शहरे जिंकली. असे सांगितले जाते की नव्या शहरावर हल्ला करण्यापूर्वी चंगीझचे हेर पुढे जाऊन चंगीझच्या हल्ल्याची कल्पना देत. त्याने इतरत्र केलेल्या स्वाऱ्यांचे व हल्ल्यांचे वर्णन करून घबराट निर्माण करत. त्यामुळे प्रत्यक्ष लढाई जिंकणे मंगोल सैन्याला फार सोपे जाई. वाटेत लागणारी बुखारा, समरकंद, हेरात, बामियान, गझनी, पेशावर अशी अनेक शहरे जिंकत व लुटत चंगीझ भारताच्या सीमेपाशी पोहोचल्यावर कडक उन्हाळा सहन न झाल्याने मोहीम अर्धवट टाकून चंगीझने मंगोलियाला परतण्याचा निर्णय घेतला.
आपल्या कारकिर्दीत त्याने आजच्या काळातील मंगोलिया, चीन, अझरबैजान, रशिया, आर्मेनिया, जॉर्जिया, तुर्कस्तान, इराक, इराण, कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कुवेत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मोल्दोव्हा या सर्व देशांच्या भूभागांवर निर्विवाद स्वामित्व मिळवले.
कुशल शासनकर्ता
संपादनएका बाजूने लुटालूट, जाळपोळ आणि शत्रुपक्षाच्या सार्वत्रिक हत्यांमुळे क्रूरकर्मा म्हणून ओळखला जाणारा चंगीझ दुसऱ्या बाजूने अतिशय कुशल, उदार व निष्ठावान शासनकर्ता म्हणूनही ओळखला जात असे. आपल्या सैन्यातील माणसांकडून तो संपूर्ण निष्ठेची अपेक्षा ठेवायचा. त्याच्या राज्यात राज्यद्रोह्यांना देहदंड दिला जाई. इतकेच नव्हे तर शत्रुपक्षाच्या फुटीर व राज्यद्रोही माणसांनाही त्याने देहदंडाची शिक्षाच दिल्याचे दिसून येते. तो अत्यंत कुशल सेनापती होता. त्याने आपल्या सैन्यात शिस्त बाणवली. त्याच्या सैन्यातील अधिकारी पद हे त्या त्या योद्ध्याच्या शौर्यावर व क्षमतेवर अवलंबून असे. सेनाधिकाऱ्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार श्रद्धा होती. मंगोल टोळ्यांचे फुटणे, एकमेकांपासून दुरावणे हे नित्याचे असले तरीही चंगीझच्या इतक्या वर्षांच्या राजवटीत त्याचा एकही सेनाधिकारी त्याला सोडून गेला नाही यावरून त्याचे माणसे जोडून ठेवण्याचे कौशल्य दिसून येते. युद्धात एखादा सैनिक मेला तर केलेल्या लुटीतला वाटा त्याची विधवा पत्नी व पोरक्या मुलांकडे पोचता केला जाई. चंगीझच्या या कायद्यामुळे त्याचे दोन फायदे झाले; त्याचे सैनिक मृत्यूपश्चात आपल्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल या विश्वासाने त्याच्यासाठी मरायला तयार होत व मेलेल्या सैनिकांचे कुटुंब चंगीझशी प्रामाणिक राहत असे.
त्या काळातील बऱ्याच मंगोल टोळ्या या रानटी व अशिक्षित होत्या. आपल्या साम्राज्याची घडी नीट बसावी म्हणून त्याने कडक कायदे अस्तित्वात आणले. बायकांना पळवणे ही मंगोल टोळ्यांची पूर्वापार पद्धत होती. चंगीझने बायकांचे अपहरण हा अक्षम्य गुन्हा मानला जाईल असा नवा कायदा अंमलात आणला. बायकांच्या खरेदी विक्रीला चंगीझने बंदी आणली. जन्मास आलेल्या सर्व संतति औरस असतील असा त्याने कायदा केला. इतरांची जनावरे पळवणे, हरवलेले जनावर किंवा हरवलेली संपत्ती हडप करणे हेही गंभीर गुन्हे मानले जात.
सैन्य बांधणी
संपादनचंगीझचे सैन्य केवळ मंगोल वंशाचे नव्हते, तर त्याने ज्या ज्या भूभागावर स्वारी केली तेथील राज्यांतील व टोळ्यांतील लोकांचाही आपल्या सैन्यात समावेश केला. आपल्या सैन्यात एकजूट रहावी म्हणून त्याने एक नवा कायदा अस्तित्वात आणला. त्यानुसार त्याने १० सैनिकांचा एक गट केला ज्याला अरबान असे म्हणत. या दहा सैनिकांना त्यांची जातजमात विसरून कुटुंबाप्रमाणे एकत्र राहावे लागत असे. अशा १० अरबानांचा म्हणजेच १०० जणांचा एक झगुन बनत असे. या शंभरजणांपैकी एकजण झगुनचा प्रमुख म्हणून नियुक्त केला जात असे. १० झगुनांचा म्हणजेच १००० योद्ध्यांचा एक मिंगन तयार होई. १० मिंगनांच्या म्हणजेच १०,००० योद्ध्यांच्या गटाला तुमेन संबोधले जाई. तुमेनच्या प्रमुखाची निवड स्वतः चंगीझ करत असे.
कुशल नेतृत्वाव्यतिरिक्त चंगीझच्या यशाची दोन प्रमुख कारणे आढळतात. सबळ हेरखाते हे त्यातील पहिले कारण होते. तर दुसरे कारण होते - एखाद्या प्रदेशावर स्वारी केल्यानंतर जर त्याला त्या शहरातून किंवा राज्याकडून विरोध झाला, तर तो ते शहर संपूर्ण बेचिराख करून टाकत असे; पण त्याचबरोबर युद्धसंधी करणाऱ्या, त्याच्या विरुद्ध शस्त्रे न उचलणाऱ्या शरणागतांना तो अभयदान देत असे. या दुसऱ्या कारणामुळे त्याच्याविषयी दहशत व आदर एकत्र दिसून येई.
सहिष्णू राज्यकर्ता
संपादनचंगीझच्या उदयापूर्वीपासूनच मंगोलियात ख्रिश्चन व बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. स्वतः चंगीझ पूर्वापार चालत आलेला मंगोल टोळ्यांचा धर्मच पाळत होता. इतर धर्मांबाबत त्याचा दृष्टीकोण सहिष्णू होता. आपल्या राज्यात त्याने सर्व धर्मांना अभय दिले. आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन दिले. त्याच्या घरातही त्याने असे विवाह घडवून आणले. असे केल्याने राज्यात एकोपा नांदतो आणि राज्यात एकी राहावी यासाठी धर्मांतराची अजिबात गरज नाही असा त्याचा विश्वास होता.
राज्याची वाटणी
संपादनवयोमानाने चंगीझला आपल्या प्रचंड राज्याची वाटणी करावी असे वाटू लागले. त्याला अनुक्रमे जोची, चुगतई खान, ओगदेई व तोलुई असे चार पुत्र होते. शांत आणि समजूतदार स्वभावाचा ओगदेई त्याला लहानपणापासून प्रिय होता. जन्माधिष्ठित पदांवर चंगीझचा विश्वास नव्हता, त्याचबरोबर सतत एकमेकांशी भांडणाऱ्या जोची व चुगतई या दोन्ही मुलांवरही त्याचा विश्वास नसल्याने त्याने आपल्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून तिसरा मुलगा ओगदेईची निवड केली व इतर मुलांना राज्याच्या वाटण्या करून दिल्या.
चंगीझ खान: व्यक्ती व स्वभाव
संपादनमंगोलियाच्या गुप्त इतिहासातील नोंदींवरून चंगीझच्या स्वभावाचा फारसा उलगडा होत नाही. काही ठिकाणी कुटुंबियांशी झालेले संवाद व इतरांशी केलेल्या वागणुकीवरून त्याच्या स्वभावाविषयी अंदाज बांधले जातात.
साधे आयुष्य
संपादनप्रचंड लुटीनंतरही चंगीझने आपले जीवनमान फारसे बदलले नाही असे दिसून येते. त्याने आपल्या आयुष्यात 'गेर' या तंबूमध्ये राहणेच पसंत केले. पक्के महाल बांधून राहण्याचा किंवा पक्की शहरे उभारण्याचा त्याचा मनोदय दिसून येत नाही. आपल्या टोळ्या, सैनिक व इतर प्रजेत तो आलेली लुट वाटून देत असे. लुटालूट केल्यावर त्यातील भाग स्वतःकडे न ठेवता तो एकत्र करून नंतर प्रत्येकाच्या हुद्द्याप्रमाणे वाटून द्यावा असा कायदा त्याने केला होता. देवावर, दैवी संकेतांवर व भविष्यावर त्याचा विश्वास असल्याचे दिसून येते. बरेचसे मंगोल कायदे त्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टांवरून तयार केले.
विश्वास व निष्ठा
संपादनविश्वास व निष्ठेचे चंगीझ खानाला नेहमीच महत्त्व वाटत आले तरी आपल्याच कुटुंबियांवर त्याचा फारसा विश्वास नव्हता हे सावत्र भावाला ठार करण्यावरून किंवा पुढे आपल्या सल्लागार व भविष्यवेत्त्यावर विश्वासून आपल्या खासार या सख्ख्या भावालाच जेरबंद करण्याच्या घटनांवरून दिसून येते. उलटपक्षी सुबदेई, जेबेसारख्या आपल्या सेनाधिकाऱ्यांवर विश्वासून त्याने त्यांना मोठ्या मोहिमांवर जाण्याची व सर्व निर्णय घेण्याची मुभा दिल्याचे दिसते.
शत्रुपक्षातील फितुरांना चंगीझने कधीही संरक्षण दिले नाही आणि त्यांना फितुरीबद्दल शिक्षाच फर्मावली. याउलट शत्रुपक्षाच्या ज्या शूरवीरांनी त्याला सामिल होण्याची इच्छा दर्शवली त्यांना त्याने मानाने आपल्या सैन्यात स्थान दिले. चंगीझच्या सैन्यातील एकही सेनाधिकारी त्याला सोडून गेला नाही किंवा फितूर झाला नाही. जमुगाला जेरबंद केल्यावरही सर्वप्रथम आपल्या मैत्रीची आठवण ठेवून, सर्व विसरून एकत्र होण्याचा प्रस्ताव त्याने मांडला होता.
दूरदर्शी राज्यकर्ता
संपादनस्त्रियांच्या अपहरणाला गुन्हा ठरवणे, सर्व संतति औरस मानणे, सर्व धर्मांना संरक्षण देणे, जातीजमातीतील तेढ कमी होण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे, सैन्यात जमातींनुसार गट न करणे या सर्व कायद्यांवरून चंगीझचा दूरदर्शीपणा दिसून येतो. राज्यकारभार चालवताना एकाधिकारशाहीपेक्षा सेनाधिकारी, राज्याधिकारी व टोळीप्रमुख यांची सभा बोलावून एकत्रित निर्णय घेण्यावर त्याचा विश्वास होता. कोणत्याही मोठ्या हल्ल्यापूर्वी किंवा राज्यकारभारविषयक अडचणी सोडवण्यापूर्वी तो खुर्लिताई नावाची सभा बोलावत असे. राज्यकारभार चालवण्यासाठी त्याच्या दरबारात सुमारे ९५ अधिकारी कार्यरत असल्याचे सांगितले जाते.
मृत्यू
संपादन
इ.स. १२२७ मध्ये शिकार करत असता घोड्यावरून पडून चंगीझ खान जबर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उलानबातरजवळील त्याच्या जन्मगावी नेण्यात आला. मंगोलियन रिवाजाप्रमाणे कोणतेही स्मारक न उभारता चंगीझचे अगदी साधेपणाने दफन करण्यात आले व इतिहासातील एका महत्त्वाची व्यक्ती मंगोलियाच्या विस्तीर्ण पठारावर नाहीशी झाली. चंगीझच्या दफनाबद्दल अनेक आख्यायिका आढळून आल्या तरी त्यात फार तथ्य असावे असे इतिहासकारांना वाटत नाही.
मृत्युपश्चात
संपादनचंगीझने उभे केलेले विस्तृत साम्राज्य त्याच्या चारही मुलांना मृत्युपश्चात सांभाळता आले नाही. चंगीझची चारही मुले कमीअधिक प्रमाणात मदिरा व ऐशारामाच्या आहारी गेलेली होती. चंगीझनंतर १४ वर्षांत त्याच्या चारही मुलांचा मृत्यू ओढवला. ओगदेईच्या मृत्यूनंतर पुढील काही वर्षे राजकीय अस्थैर्याची गेली. यानंतर त्याच्या घराण्यातील काही कर्तृत्त्ववान स्त्रियांनीही राजकारणाची धुरा सांभाळली. शेवटी राज्यकारभार तोलुईच्या घराण्याकडे येऊन चंगीझचे नातु हुलागु खान आणि कुब्लाई खानाच्या राज्यग्रहणानंतर पुन्हा स्थैर्य प्रस्थापित झाले.
भारत आणि चंगीझ खान
संपादनभारतातील मुघल हे चंगीझ खानाचे वंशज असल्याचा दावा केला जातो. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा तैमूर घराण्यातील होता. बाबरच्या मातृवंशाचा संबंध चंगीझ खानपर्यंत पोहचतो, असे आजच्या अनेक अधिकृत साधनांत सांगितले आहे.[ संदर्भ हवा ] तर पितृवंशातील चौदाव्या शतकातील 'तैमूर लंग' हा तुर्क-मंगोल जमातीतील एक सैन्याधिकारी होता. पुढे सत्ता हाती आल्यावर त्याने चुगतईच्या वंशजांपैकी एकीशी लग्न केल्याने तो स्वतःला 'खान घराण्याचा जावई' म्हणवून घेई[ संदर्भ हवा ]. चंगीझ खानाच्या घराण्याशी संबंध जोडल्याचा उपयोग त्याला स्वाऱ्या व राज्यविस्ताराच्या दरम्यान स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी झाला. त्याने स्वतः 'खान' ही पदवी चालवली नाही, त्याऐवजी आपल्या नावापुढे त्याने 'आमीर' ही पदवी लावली.
संदर्भ
संपादन- गेंगीज खान अँड द मेकिंग ऑफ द मॉडर्न वर्ल्ड - जॅक वेदरफोर्ड
- द मंगोल कॉन्क्वेस्ट्स - बाय द एडिटर्स ऑफ टाइम-लाइन बुक्स
बाह्य दुवे
संपादन- चंगीझ आणि त्याचे वंशज Archived 2007-03-07 at the Wayback Machine.
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी २, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- चंगीझ आणि मंगोल
- चंगीझ खान इन अवर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)