जमुगा हा चंगीझ खानाचा एके काळाचा जीवलग मित्र होता. पुढे दोघांचे बिनसल्याने आपापसात लढाया झाल्या. अशाच एका लढाईत जमुगाला बंदिवान करण्यात आले. चंगीझने झाले गेले सर्व विसरून पुन्हा आपल्या टोळीत येण्याचे आमंत्रण जमुगाला दिले. यावर भावुक होऊन जमुगाने त्याला विनंती केली की मी जरी टोळीत सामील झालो आणि झाले गेले विसरून जायचा प्रयत्न केला, तरी ते वाटते तितके आपल्या दोघांनाही सोपे जाणार नाही. जिवंत राहून एकमेकांच्या आयुष्यात अधिक दुःख आणण्यापेक्षा मी मरण पत्करतो.

मंगोलियन रिवाजाप्रमाणे माणसाचे रक्त जमिनीवर सांडणे अपशकुनी मानले जाई; म्हणून जमुगाने आपल्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर न सांडता मृत्यू मिळावा अशी इच्छा प्रकट केली. त्याप्रमाणे त्याला चंगीझने गुदमरवून मृत्यू दिला व इमानाने त्याचा अंत्यविधी केला.