रत्‍नाप्पा कुंभार

स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी

डाॅ. रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेले इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील २१ संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत ६ वेळा निवडून गेलेले आमदारमहाराष्ट्र सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते.

रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार
कार्यकाळ
इ.स. १९५२ – इ.स. १९५७
मागील -
मतदारसंघ इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ
कार्यकाळ
इ.स. १९५२ – इ.स. १९५७
मतदारसंघ शिरोळ विधानसभा मतदारसंघ
कार्यकाळ
इ.स. १९६२ – इ.स. १९६७
मतदारसंघ शिरोळ विधानसभा मतदारसंघ
मतदारसंघ शिरोळ विधानसभा मतदारसंघ
मतदारसंघ शिरोळ विधानसभा मतदारसंघ
मतदारसंघ शिरोळ विधानसभा मतदारसंघ

जन्म सप्टेंबर १५ , इ.स. १९०९
निमशिरगाव, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू डिसेंबर २३, इ.स. १९९८
इचलकरंजी
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मागील इतर राजकीय पक्ष संस्थान प्रजा परिषद
पत्नी पार्वती
अपत्ये ३ मुली
निवास इचलकरंजी
धर्म हिंदू धर्म , (लिंगायत)

१९८५ साली त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८५ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट् पदवी दिली.[१][२][३]

प्रारंभी जीवन संपादन

रत्नाप्पांचा जन्म १५ सप्टेंबर १९०९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव या खेडेगावात कुंभार काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील भरमाप्पा व आई गंगूबाई होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले. माध्यमिक शिक्षण हातकणंगले या तालुक्याच्या गावी झाल्यावर १९२८ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात गेले. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थांच्यासाठी स्थापन केलेल्या वीरशैव वसतीगृहात राहून त्यांनी १९३३ साली बी.ए.ची पदवी संपादन केली. कायद्याच्या अभ्यासासाठी त्यांनी एल्.एल्.बीच्या पहिल्या वर्गात प्रवेशही घेतला. मुलगा चांगले शिकत असलेले पाहून त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे वडिलांनी रत्नाप्पांचे लग्न ठरविले व मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावातील पार्वतीबाई यांच्याशी १९३४ साली रत्नाप्पांचा विवाह झाला.

भारतीय स्वातंत्र्य चळवळ संपादन

त्या काळात जोमात असलेल्या मिठाच्या सत्याग्रहामुळे भारतातील राजकीय वातावरण तापले होते. रत्नाप्पा एल्.एल्.बीच्या पहिल्या वर्गात असताना १९३४ साली, कोल्हापुरात माधवराव बागल हे शेती व शेतीमालाचे ब्रिटिशांकडुन होणारे शोषण व लूट या विषयांवर सभांमधून बोलत असत. रयतेच्या सत्यस्थितीचे बागल करीत असलेल्या विश्लेषणाने रत्नाप्पा त्यांच्याकडे आकर्षित झाले व कायद्याचा अभ्यासक्रम अर्धवट सोडून ते बागलांचे सहकारी बनले. २५ डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापुरात शेत-सारा कमी करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरच्या संस्थाना विरुद्ध मोर्चा निघाला. त्याकाळी अस्तित्वात असलेल्या स्थानिक संस्थानांचे राज्यांत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांमध्ये रत्नाप्पा आघाडीवर होते. ६ जून १९३९ रोजी जयसिंगपूर गावातील श्रीराम ऑईल मिल मध्ये प्रजा परिषद स्थापनेसाठी बैठक बोलावण्यात आली. माधवराव बागल, रत्नाप्पा, दिनाकर देसाईंसह अंदाजे दोन हजार लोक उपस्थित होते. बैठकीचे फलस्वरूप संस्थान प्रजा परिषद या नावाचा राजकीय पक्ष स्थापन झाला व ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. हा पक्ष ऑल इंडिया स्टेट पीपल्स कॉग्रेसशी संलग्न होता. ८ जुलै १९३९ रोजी त्यांना अटक झाली व दंडाची आणि कैदेची शिक्षा ठोठावली गेली. कुंभार, बागल, देसाई व इतरांना कोल्हापूरच्या तुरुंगात कैदेत ठेवून शिवाय त्यांना दंड ही करण्यात आला. काही दिवसांनी सुटल्यावर रत्नाप्पा लगेच कॉग्रेसच्या अधिवेशनात सामील होण्याकरता मुंबईला गेले. याच अधिवेशनात चले जावचा नारा दिला गेला. ब्रिटिश सरकारने कॉग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू केली. रत्नाप्पा रातोरात भूमिगत झाले व त्यांनी इंग्रज सरकारविरोधात लढाई सुरू ठेवली.

सुरुवातीला भूमिगत झाल्यावर त्यांनी त्यांची कचेरी मिरजे जवळ्च्या मालगाव जवळ असलेल्या दंडोबाच्या डोंगरावर असलेल्या बाबंण्णा धुळी यांच्या मळ्यात केली होती. तेथे त्यांना मदत करण्यासाठी कॉग्रेड एस. पी. पाटील सामील झाले. भूमिगत झालेले कार्यकर्ते गावातील चावड्या जाळणे, रेल्वे स्टेशन्स जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, दारूचे गुत्ते जाळणे आदी घातपाती कारवाया करत, रत्नाप्पांनी या भूमिगत कार्यकर्त्यांमधे एकसूत्रीपणा आणला. या भूमिगत चळवळीची सर्व आखणी आणि कर्यक्रम रत्नाप्पा या दंडोबाच्या डोंगरावरच्या कचेरीत ठरवत असत. त्या नंतर रत्नाप्पांच्या मार्गदर्शनाखाली अनेक घातपाती कार्यवाया झाल्या.[४] पुढे या चळवळीच्या कामासाठी पैशाची चणचण जाणवू लागली. मिरजेजवळील मालगावात काही मोजक्या क्रांतिकारकांची रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली २० डिसेंबर १९४३ च्या सुमारास ३ दिवासांची गुप्त बैठक झाली व यात बार्शी रेल्वेतून जाणारे इंग्रजांचे टपाल लुटण्याचा बेत त्यांनी आखला गेला.[५] चनगोंडा पाटील, काका देसाई, कुंडल देसाई, आय.ए. पाटील, व्यंकटेश देशपांडे, हरिबा बेनाडे, दत्तोबा ताबंट, ईश्वरा गोधडे, शंकरराव माने या क्रांतिकारी युवकांनी रत्नाप्पांच्या नेतृत्वाखाली २९ डिसेंबर १९४३ रोजी बार्शी येथे टपालाच्या डब्यावर हल्ला केला. ड्रायव्हर, फायरमन व गार्ड यांना पकडून त्यांना दोन ते तीन मैल लांब सोडून देण्यात आले. टपालाच्या पिशव्या व थैल्या ताब्यात घेऊन सर्वजण पसार झाले.[६] या लुटीत अनेक मौल्यवान वस्तुंबरोबरच एका शाळेच्या हिंदी परीक्षेच्या सर्टिफिकेट्सचा पुडका होता. तो पुडका कार्यकर्त्यांनी पोष्टाने त्या शाळेला परत पाठवला.

पुढे काही मोजक्या साथीदारांना सोबत घेऊन रत्नाप्पांनी जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरातील जामदारखाना लुटण्याचा बेत आखला. २७ जुलै १९४४ रोजीच्या रात्री शंकरराव माने, डॉ.माधवराव कुलकर्णी, दत्तोबा तांबट, शाम पटवर्धन, य. म. कुलकर्णी, शि. पी. पाटील, इब्राहीम नदाफ निवडक सहकारी क्रांतिकारी युवकांच्या साथीने रत्नाप्पांनी जेजुरी देवस्थानावर दरोडा घातला. तेथील सेवेकरी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हल्ल्ला करून त्यांना मारहाण केली व पुजाऱ्याकडून मंदिरातील जामदारखान्यातील तिजोरीच्या किल्ल्या घेऊन खजिना उघडला. तिजोरीत इंदूरचे होळकर , ग्वाल्हेरचे शिंदे आणि पुण्याचे पेशवे व इतर धनिकांनी खंडोबाला दिलेल्या सोन्याच्या, रत्नांच्या कुड्या, माणिकाचे खडे, पानड्या, लाकड्या(?), कंठी, मोत्याचे तुरे, कंबरेचे छल्ले, शिरपेच, देवाचे मुखवटे, जडजवाहीर, सोन्याच्या मूर्ती असे कोट्यवधी रुपये किमतीचे दागिने होते ते घेऊन हे सर्वजण पळून गेले.[७] पोलिसांनी या दरोड्याचा तपास लावला व रत्नाप्पा कुंभार सोडून बाकीच्या सर्व आरोपींना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. १९४५ सालच्या जानेवारीत पुणे कोर्टात १३ आरोपींवर खटला भरण्यात आला. ब्रिटिश सरकारने रत्नाप्पांबद्दल माहिती देणाऱ्या अथवा त्यांना अटक करण्यात मदत करणाऱ्यांसाठी २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले तरीसुद्धा ते काही सापडले नाहीत. पुढील ६ वर्षे ते अज्ञातवासातच होते. त्यांनी सहकारी क्रांतिकारकांच्या सोबतीने लुटलेल्या पैशाचा वापर भूमिगत चळवळीच्या कामासाठी अत्यंत योग्य रितीने केला.[८]

१९४७ साली त्यांचे वडील भरमाप्पा यांचे निधन झाले, ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्या घरावर त्यांना पकडण्यासाठी पहारा ठेवला होता पर्ंतु रत्नाप्पांनी वेशांतर करून वडिलांचे अंत्यदर्शन घेतले व ते त्याही वेळेस ही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.[९] १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर एके दिवशी अचानक ते कोल्हापुरात अवतरले.

संस्थाने विलीनीकरणाची चळवळ संपादन

१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांनी भारत देशातील ५६५ संस्थानातील राजेशाही अबाधित ठेवून भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. यामुळे सर्वंकष स्वातंत्र्य प्राप्तीचे स्वप्न अपुरे रहाण्याचा धोका निर्माण झाला होता. सरदार वल्लभभाईंसोबत रत्नाप्पा ही या चळवळीत सामील झाले. रत्नाप्पा कुंभारांनी स्थानिक संस्थानांना आपाआपली संस्थाने खालसा करण्याचे आवाहन केले. कोल्हापूर अक्कलकोट, सावंतवाडी, जंजिरा, मुधोळजतसह अनेक संस्थानांनी विलीनीकरणास नकार दिला होता.

अक्कलकोट संस्थान

प्रजा परिषदेने अक्कलकोट संस्थानाचे विजयसिंगराव राजे सरकारांना भारतात सामील होण्यासाठीच्या अनेक वेळा विनंत्या केल्या होत्या. पर्ंतु संस्थानिक त्यास अनुकूल नव्हते. शेवटी रत्नाप्पांनी आरपारच्या लढाईला हात घातला व आपला विश्वासू सहकारी गोपाळ बकरे यांना सत्याग्रहाच्या तयारीसाठी अक्कलकोटला पुढे धाडले. २५ डिसेंबर १९४७ रोजी रत्नाप्पांनी राज्य प्रजा परिषदेची बैठक बोलावून त्यात अक्कलकोटच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह करण्याचा ठराव मंजूर करून घेतला. दुसरे दिवशी सत्याग्रहाचा आराखडा तयार करून त्यांनी कामे वाटून दिली. १ जानेवारी १९४८ रोजी अक्कलकोटला सत्याग्रह सुरू करत असल्याची माहिती देण्यासाठी मुंबई व दिल्लीला तारा करून कळवले. १ जानेवारीच्या पहाटे अंदाजे १ हजार लोकांची प्रभात फेरी सुरू झाली व दुपारी १२ वाजता लक्ष्मी मार्केटवर तिरंगा ध्वज लावण्यात आला. त्याच दिवशी रात्री रत्नाप्पांचे भाषण झाले. २ जानेवारीला सत्याग्रहींनी शेंगदाण्याच्या निर्यातीस अक्कलकोट संस्थानाने घातलेली बंदी मोडली व लहान लहान पिशव्यातून शेंगदाणे सोलापूरला निर्यात केले. ३ जानेवारीला आंदोलन चिघळले व अशांतता, मारहाण व जाळपोळ सुरू झाली. सत्याग्रहींनी मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकवला व राजवाड्यावर दगडफेक केली. संस्थानच्या समर्थकांनी पण रत्नाप्पा कुंभार ज्या ठिकाणी मुक्कामास होते ती कचेरी जाळली व त्यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी दुपारी संचारबंदी जाहीर झाली. अक्कलकोट संस्थानाचे विजयसिंगराव राजे सरकारांनी सोलापूरच्या जिल्हाआधिकाऱ्यांकडे संरक्षण मागितले. भारतात विलिन होण्याच्या शर्तेवर संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले. वाटाघाटी झाल्या व ५ जानेवारीला संस्थानिकांनी भारतात खालसा होण्यास थोडी अनुकुलता दाखवली. ८ जानेवारीला सोलापूरच्या लोखंड गल्लीत रत्नाप्पांसह त्यांचे सहकारी गोपाळ बकरे, वकील भाऊसाहेब बिरजे, शांबदे, रहीम अत्तारांसह इतर सत्याग्रहींचा सत्कार झाला. १६ जानेवारीला रत्नाप्पांनी सरदार वल्लभभाई पटेलांना लिहिलेल्या पत्रात अक्कलकोट मधील परिस्थितीचा आढावा कळवला व कायदा व सुव्यवस्था चांगली नसल्याचे सांगून भारतीय यंत्रणेने ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.[१०] या सत्याग्रहचा परिणाम अक्कलकोट संस्थान ८ मार्च १९४८ साली भारताच्या मुंबई प्रांतात सामील झाले व अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका बनले.[११][१२][१३]

सावंतवाडी संस्थान

महात्मा गांधींची ३० जानेवारी १९४८ला हत्या झाली. देशभरात निषेधाची लाट पसरली होती. कोल्हापूर सह काही संस्थानांत जातीय हिंसाचार वाढला होता त्यातच सावंतवाडीला १४ फेब्रूवारी १९४८ रोजी रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली प्रजापरिषदेचे तिसरे आधिवेशनस सुरुवात झाली. सावंतवाडीत त्या आधी प्रजा परिषदेने विलीनीकरणासाठी अनेक अंदोलने केली होती. रत्नाप्पांनी आपल्या भाषणात विलीनीकरणाच्या प्रश्नावर जोर देत लठा आधीक तीव्र करण्याचे संकेत दिले व अधिक विलंब न लावता, भारतात विलीन होण्यास सावंतवाडी संस्थानाच्या राजेसाहेबांना विनंती करण्याचा व तसे न झाल्यास प्रतिसरकार स्थापन करण्या संमंधिचा ठराव करून मंजुर केला. २१ जानेवारी पर्यत वाट पाहुन २२ तारखेला जाहीर पत्रके वाटुन अंदोलन करण्यात आले. २३ जानेवारीला संस्थानाच्या सर्व आधिकाऱ्यांना कुडाळला कैदेत ठेवुन संस्थानात दंगल करण्यात आली. परिस्थीती हाताबाहेर जात आसल्याचे पाहून शिवराम राजे साहेबांनी विलीनीकरणास तयार असल्याची घोषणा केली.[१४]

कोल्हापूर संस्थान

ब्रिटिश राजवटीच्या अंतानंतर झालेला काँग्रेसचा वाढता प्रभाव पहाता कोल्हापूर संस्थानाने सर्व समावेशक सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतली व रत्नाप्पांना या सरकारात पद देऊ केले. परंतु संस्थाने भारतात पूर्णपणे विलीन करण्याच्या भूमिकेवर रत्न्नाप्पा हे ठाम होते. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.[१५] नंतर त्यांना डेक्कन रीजनल काउन्सिलचे अध्यक्ष करण्यात आले व त्यांच्या मार्गदर्शानाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सगळी संस्थाने भारतात विलीन झाली.

राजकीय कारकीर्द संपादन

रत्नाप्पांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. ते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षही झाले, १९५० साली त्यांची लोकसभा सदस्य पदी नियुक्ती झाली. ते भारतीय राज्यघटनेची रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या घटनासमितीचे सदस्य बनले. ते भारताच्या घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. १९५२ च्या पहिल्या लोकसभेचे ते खासदार म्हणून निवडून आले. कोल्हापूर व सातारा असा हा मतदार संघ होता. रत्नाप्पांना १,६३,५०५ मते मिळाली व त्याचे प्रतिद्वंदी कृष्णाजी लक्ष्मण मोरे यांना १,४५,७४७ मते मिळाली. त्यांनी मोरे यांचा १७७५८ मतांनी पराभव केला.[१६] १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातगोंड रेवगोंड पाटील ( सा. रे. पाटील) त्यांनी रत्नाप्पांचा पराभव केला.[१७] इ.स १९६२ ते १९८० आणि नंतर १९९० ते निधनापर्यंत त्यांनी आमदार म्हणून शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. नोव्हेंबर१९७४मध्ये शंकरराव चव्हाण ांच्या मंत्रिमंडळात माहिती व गृह राज्यमंत्री तसेच फेब्रुवारी १९७५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून पद भूषविले व नंतर वसंतराव दादा पाटीलांच्या मंत्रिमंडळात १९७४ ते १९७८ पर्यंत नगरविकास खात्याचेराज्यमंत्री होते. कोल्हापूर जिल्हातील शिरोळहातकणंगले तालुक्यांत औद्योगिक व शेतीविषयक समृद्धी घडवून आणण्यात रत्नाप्पांचे फार मोठे योगदान होते.

निवडणूक वर्ष लोकसभा/विधानसभा प्रतिद्वंदी रत्नाप्पांचे मताधिक्य निकाल
१९५२ लोकसभा कृष्णाजी लक्ष्मण मोरे १,४५,७४७ विजयी
१९५७ विधानसभा सातगोंड रेवगोंड पाटील पराभूत
१९६२ विधानसभा सातगोंड रेवगोंड पाटील २४,६५१ विजयी
१९६७ विधानसभा सातगोंड रेवगोंड पाटील २,८४० विजयी
१९७२ विधानसभा जाधव ४२,९१८ विजयी
१९७८ विधानसभा दिनकरराव यादव १२,४४९ विजयी
१९८० विधानसभा दिनकरराव यादव ३,१२८ पराभूत
१९९० विधानसभा शामगोंड कलगोंड पाटील १९,६६६ विजयी
१९९५ विधानसभा शामगोंड कलगोंड पाटील २६,१६८ विजयी

सहकारी चळवळ संपादन

रत्नाप्पा कुंभारांनी १९५२ साली खासदार झाल्यावर लगेचच भारतातील दुसऱ्या सहकारी सहकारी साखर कारखान्याची उभारणीच्या हालचाली इचलकरंजी येथे सुरू केल्या. त्या काळात खाजगी उद्योग प्रचलित होते, सार्वजानिक अथवा सहकारी क्षेत्रातील उद्योग नव्हते. पिकलेल्या उसाचा गूळ करून गुजराती व्यापाऱ्यांना विकणे एवढेच प्रचलित होते. रत्नाप्पांनी सहकारी साखर कारखाना उभारणीसाठीचा अभ्यास केला व सरकारी परवानगी साठीच्या हालचाली करून प्रस्ताव सादर केला. तात्कालिन मुंबई राज्याचे अर्थमंत्री जीवराज मेहता यांनी साखरेच्या उत्पादनाने गुळाच्या निर्यातीस मार बसतो असे कारण सांगून कारखाना स्थापन करण्यासाठीची परवानगी नाकारली. गुजराती गुळाच्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देणे योग्य नसल्याचे जाणून रत्नाप्पांनी प्रस्तावित कारखाना क्षेत्रातील एकूण बागायती असलेली जमिन, पाणी पुरवठा करून येणारी अतिरिक्त बागायती जमीन, त्यांच प्रमाणे साखर व गूळ उत्पादनाचा तुलनात्मक अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हिताचा आढावा घेणारा सर्वंकष अहवाल त्यांनी अर्थ तज्ज्ञांना सादर केला. या तज्ञांच्या अभिप्रायासह कारखान्याच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव पुन्हा अर्थमंत्र्यांना सादर केला गेला. ३ वर्षाच्या अथक परिश्रमांनंतर त्यांनी १ ऑक्टोबर १९५५ रोजी सहकारी तत्त्वावरच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचा परवाना मिळवला. १२,९६,०३७ रुपयांचे भागभांडवल शेतकरी जनतेतून उभे केले व पश्चिम जर्मनीतील बकाऊ वुल्फ या कंपनीकडून रोज १००० टन ऊस गाळण क्षमता असलेली यंत्रसामुग्री आयात केली.

"सहकारातून समृद्धीकडे"

प्रत्येक साखर कारखान्याने आपल्या परिसरातील गावांचा आर्थिक,
शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधून संपूर्णपणे कायापालट घडवून आणला पाहिजे...
साखर कारखाना हा शिक्षणाचे व संस्कृतीचे केंद्र बनला पाहिजे.
साखर कारखान्याचे काम समाजाच्या जडणघडणीचे आहे.
प्रत्येक साखर कारखाना आदर्श समाजाचा शिल्पकार म्हणून पुढे यावा.

..रत्नाप्पा कुंभार., [२]

कारखान्याची उभारणी पूर्ण झाल्यावर १९५७/५८ च्या पहिल्या गळित हंगामात या साखर कारखान्याने ३५३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले व शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला ४१ रुपये प्रती टन इतका भाव दिला. १९६३-६४ च्या हंगामात कारखान्याने २,३५,००० पोती सखरेचे उत्पादन केले. रत्नाप्पांनांनी १ कोटी रुपयांच्या खर्चाने नवीन २४ पाणी पुरवठा योजना केल्या. १९६४ साली या साखर कारखान्याच्या अनुषंगाने त्यांनी उभारलेल्या एकूण ५९ पाणी पुरवठा योजनांनी अंदाजे ५६,००० एकर शेतीला पाणी पोहचवले. शेतीच्या विकासासाठी पाणी, खत, अवजारे, तांत्रिक ज्ञान, शेतीमालाच्या किमती यांबरोबरच खेड्यातून शेतीवाड्यात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची बांधणी आणि दुरुस्ती करण्यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांना गावातून शेताशिवारात जा-ये करण्यासाठी या पाणंद रस्त्यांची अहोरात्र गरज असते त्या पांदण रस्ते, जोड रस्ते करण्याचा २ लाख रुपये खर्चाचा प्रकल्प साखर कारखान्याच्या वतीने केला.[१८] यासाठीच रत्नाप्पा कुंभारांना, शेतकरी राजाचे आर्थिक उन्नयन होण्यात मोलाची कामगिरी बजावणारे देशभक्त म्हणून ओळखले जाते. स्थापनेच्या वेळी रोज १००० टन ऊस गाळण क्षमता असलेला कारखाना ३० सप्टेंबर १९८३ रोजी कर्जमुक्त झाला व तेव्हा तो रोज ५००० टन गाळण क्षमतेचा होता. पुढच्या काळात त्यांनी एक सहकारी बँक व ग्राहक सोसायटीही स्थापन केली, परंतु त्या दोन्ही संस्था नंतर बुडाल्या. रत्नाप्पा कुंभार यांनी स्थापन केलेली सहकारी सूतगिरणी यड्राव येथे सुरू आहे.[१९]

१९७२ साली तत्कालीन सहकारमंत्री यशवंतराव मोहिते यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य कापूस एकाधिकार महासंघाची संकल्पना मांडली. रत्नाप्पा कुंभार या महासंघाचे पहिले अध्यक्ष झाले. त्यांनी शेतकऱ्यांंकडून कापूस विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग फॅक्टऱ्यांचे जाळे उभे केले. विदर्भामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरभराटीचे दिवस आले. पण पुढे काही चुकीच्या धोरणांमुळे ही योजना बुडीत निघाली.[२०] १९७५ साली डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या उभारणीत ते अग्रणी होते.

शिक्षण संस्था संपादन

शिक्षण ही एक अखंड जीवनप्रक्रिया आहे.
जीवनातील नव्या अनुभवांचा अर्थ समजावून घेणे व
समजावून देणे म्हणजे शिक्षण.

- - रत्नाप्पा कुंभार

१९५१ साली कोल्हापूर संस्थान भारतात विलीन झाल्यावर या संस्थानाच्या वतीने चालवले जाणारे शहाजी कायदा महाविद्यालय अनाथ झाले व आर्थिक मदत थांबल्यामुळे अधोगतीस आले होते. रत्नाप्पा कुंभारांनी कॉन्सिल ऑफ एज्युकेशन नामक शिक्षण संस्था १७ फेब्रुवारी १९५१ रोजी स्थापन करून या संस्थेमार्फत शहाजी कायदा महाविद्यालय दत्तक घेतले. ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.[२१] १९५७ साली त्यांनी कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज स्थापन केले. १९८५ साली त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कॉमर्स कॉलेजचे नाव देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स असे करण्यात आले. हा कार्यक्रम तेव्हाचे उपराष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते पार पडला.[२२] १९६० साली त्यांनी कसबा सांगाव येथे दादासाहेब मगदूम हायस्कूलची स्थापना केली. १९६३ साली त्यांनी कोरोची गावात रत्नदीप हायस्कूल उभारले. दिवसा काम करणाऱ्या मुलांसाठी त्यांनी कोल्हापुरात रात्र महाविद्यालयाची कल्पना मांडून नाइट कॉलेज ऑफ आर्ट्‌स ॲन्ड कॉमर्सची स्थापना १९७१ साली केली.[२३]

१९९० साली रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची स्थापना झाली.[२४] Deshbhakta Ratnappa Kumbhar vidyalaya Kamptee Dist Nagpur also established by Educationalist Mr Ramdas Khopey

चित्रपट निर्माता संपादन

१९६७ साली निर्माता म्हणुन बाळासाहेब पाटील (सत्त्यवादीकार) यांच्या सह रत्नाप्पा कुंभारांनी सुदर्शन नामक चित्रपट केला. दत्ता माने हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.[२५]

निधन संपादन

रत्नाप्पा कुंभार यांचे २३ डिसेंबर १९९८ च्या सकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी हृदयाघाताने निधन झाले. त्या काळाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. रत्नाप्पा कुंभार यांच्या निधनानंतर त्यांनी उभारलेल्या सहकारी साखर कारखान्यास त्यांचे नाव देण्यात आले. आता हा साखर कारखाना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना मर्यादित या नावाने ओळखला जातो. कोल्हापूरच्या वाणिज्य महाविद्यालयाचेही देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार वाणिज्य महाविद्यालय असे नामांतर झाले.

शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे देशभक्‍त रत्नाप्पा कुंभार यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधननंतर त्यांच्या कन्या रजनीताई मगदूम यांनी त्यांच्या राजकीय वारस म्हणून २००४ साली निवडणुक लढविली. पण त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्या.[२६]

पुस्तके संपादन

  • हे कुंभ अमृताचे ( रत्नाप्पा कुंभार यांनी १९६४ ते १९७४ या कालखंडात केलेल्या निवडक ३४ भाषणांचा संग्रह), संपादक: रा. तु. भगत, पाने: २१५, चक्रप्रवर्तन प्रकाशन, (१९७५)
  • कोल्हापूर संस्थान प्रजा परिषदेतील रत्नाप्पा कुंभार यांचा सहभाग - १९३८ ते १ मार्च १९४९, लेखक: रामलिंग कुंभार, अभिनंदन प्रकाशन.
  • "कथा एका महा मानवाची"- लोकनेते डॉ. रत्नाप्पा कुंभार यांचे जीवन चरित्र, मूळ कन्नड लेखक- के.बी. होन्नायक, मराठी अनुवाद - सी. एस. कुलकर्णी

संदर्भ संपादन

  1. ^ Singh, Trilochan. Personalities: A Comprehensive and Authentic Biographical Dictionary of Men who Matter in India. [Northen India and Parliament] (इंग्रजी भाषेत). ११ जानेवारी २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ "Freedom fighter Ratnappa Kumbhar dead" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ Karadage, A K. Lingayat community in Kolhapur district a socio-economic study (1949-1990) (PDF) (इंग्रजी भाषेत). ११ जानेवारी २०१८ रोजी पाहिले.
  4. ^ [ रत्नाप्पांच्या ८५ व्या वाढदिनाप्रित्यर्थ ' रुद्रवाणी ' या पाक्षिकात त्यांचे नंतरच्या काळातील राजकीय विरोधक व इचलकरंजीचे माजी आमदार कॉग्रेड एस. पी. पाटील यांनी लिहीलेला लेख]-ऑक्टोबर १९९४.
  5. ^ The parallel government of Satara: a phase of the Quit India movement , पान - १०३ - Shinde A. B. - Allied Publishers, 1990, ISBN - 8170231388, 9788170231387
  6. ^ करू या स्मरण स्वातंत्र्यलढ्याचे Maharashtra Times - Updated: Aug 15, 2017
  7. ^ . आठवणीतील गोष्ट : असे हे देवस्थानी दरोडे -- सुहास सोनावणे, लोकसत्त्ता March 3, 2016.
  8. ^ INDIAN REVOLUTION AND CONTEMPORARYPARALLEL GOVERNMENT by Dr. Littan Sarkar, International Research Journal of Human Resources and Social Sciences ISSN(O): (2349-4085) ISSN(P): (2394-4218)
  9. ^ कोल्हापूर महानगर पालिकेने रत्नाप्पांना दिलेले मानपत्र
  10. ^ A NOTE ON THE POLITICAL SITUATION IN THE DECCAN STATES SUBMITTED TO SARDAR VALLABHBHAI PATEL by Ratanappa Kumbhar ,President, Deccan States Regional Council. Dt:16 January 1948
  11. ^ अक्कलकोट संस्थानातील स्वातंत्र्य चळवळ, PDF
  12. ^ मराठी विश्वकोश : खंड १ पान - ९१
  13. ^ Freedom movement in princely states of Maharashtra, Arun Bhosale, Ashok S. Chousalkar, Lakshminarayana Tarodi, Shivaji - University Shivaji University, 2001 - History] पान २३१
  14. ^ http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/146850/6/06_chapter%203.pdf
  15. ^ Freedom movement in princely states of Maharashtra, Arun Bhosale, Ashok S. Chousalkar, Lakshminarayana Tarodi, Shivaji - University Shivaji University, 2001 - History - 238 pages
  16. ^ List of winner and runner MPs in 1951 General Elections
  17. ^ सा. रे. पाटील यांचे निधन
  18. ^ [अर्थ १९६४]
  19. ^ GLIMPSES OF ICHALKARANJI CITY Author-Dr.Chandravadan Naik, Publisher- Lulu.com, ISBN - 1329829425, 9781329829428 (१९९८)
  20. ^ http://lokmat.news18.com/program/article-31110.html[permanent dead link] राज्य सरकार कापूस उत्पादकांच्या पाठीमागे उभे राहिले - मुख्यमंत्री
  21. ^ "कथा एका महा मानवाची"- लोकनेते डॉ. रत्नाप्पा कुंभार यांचे जीवन चरित्र, मूळ कन्नड लेखक- के.बी. होन्नायक, मराठी अनुवाद - सी. एस. कुलकर्णी, पत्रकार सदलगा.
  22. ^ प्रा. जी बी अंबपकर यांच्या युगांधर मासिकातील लेख , पान ६४
  23. ^ Shahaji Law College, Kolhapur ]
  24. ^ मराठीमाती.कॉम
  25. ^ http://www.marathifilmdata.com/chitrapat/sudarshan/ व्ही. शांताराम फौंडेशन 
  26. ^ [१]