शंकरराव चव्हाण

भारतीय राजकारणी

डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटुंबात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. १९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली. पण स्वामी रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद होते. १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.

शंकरराव चव्हाण

कार्यकाळ
२१ फेब्रुवारी १९७५ – १६ मे १९७७
मागील वसंतराव नाईक
पुढील वसंतदादा पाटील
कार्यकाळ
१२ मार्च १९८६ – २६ जून १९८८
मागील शिवाजीराव निलंगेकर
पुढील शरद पवार

१९४८-४९ मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. १९५२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (१९५६), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली. १९५६ मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे १९६० मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर १९७२ पासून फेब्रुवारी १९७५ पर्यंत ते कृषिमंत्री होते. २१ फेब्रुवारी १९७५ रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजीं यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे.

कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे १९७५ मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. फेब्रुवारी २६, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्यांचे सुपुत्र.

स्मरणार्थ संपादन

  1. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

चरित्रग्रंथ संपादन

  • महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार शंकरराव चव्‍हाण (लेखक : डॉ.सुरेश सावंत; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
मागील
वसंतराव नाईक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
फेब्रुवारी २१, इ.स. १९७५ - मे १७, इ.स. १९७७
पुढील
वसंतदादा पाटील
मागील
शिवाजीराव निलंगेकर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मार्च १२, इ.स. १९८६ - जून २६, इ.स. १९८८
पुढील
शरद पवार