पैठण
पैठण उच्चार (सहाय्य·माहिती) (प्राचीन नाव:प्रतिष्ठान) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. छत्रपती संभाजीनगरपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
?पैठण प्रतिष्ठान महाराष्ट्र • भारत | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ४५८ मी |
लोकसंख्या | ३०,००० (२००१) |
भाषा | मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४३११०७ • +०२४३१ • MH - २० |
कसे याल-- पैठण येथे येण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून अनेक वाहने उपलब्ध आहेत.
इतिहास
संपादनसाडीप्रकाराचे पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरून पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष स्वतःचे वेगळेपण राखून आहे. हे गाव प्राचीन कालापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. पूर्वी (मूळ नाव "प्रतिष्ठान") ही सातवाहन राजाची राजधानी होती. त्या काळापासून अगदी आतापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या येथील पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे.
एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असे गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे.
फाल्गुन वद्य षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो.
गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे.
ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.[१]
उद्योगधंदे
संपादनतालुक्यात उद्योगधंदे मध्यमगतीचे आहेत व वाढत आहे. पैठण शहराजवळ एमआयडीसी आहे, पण तेथील अनेक उद्योग बंद आहेत. तालुक्यातील चितेगाव येथे विडिओकॉन सारखे काही उद्योग सुरू आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेतीच आहे.
पण यंदा (DMIC) दिल्ली मुंबई औद्योगिक केंद्र पैठण प्रकल्प बिडकीन येथे सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न नक्कीच सुटेल.
पैठणमध्ये आकर्षक पैठणी साडी सध्या बाजारात खूप प्रसिद्ध आहे. अनेक लांब राज्यातील पर्यटक पैठणमध्ये काही खास सुट्यांचा महिन्यात भेट देतात. पर्यटकांची खास सोय व्हावी यासाठी पैठण नगरप्रशासन व व्यापारी दर वेळेस प्रयत्न करतात.
प्रेक्षणीय स्थळे
संपादन- संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर - एकनाथांची पैठण येथे दोन मंदिरे आहेत. एक त्यांचे देवघर कि ज्यास हल्ली गावातील नाथ मंदिर म्हणून ओळखण्यात येते. तसेच दुसरे मंदिर आहे ते संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थान, कि जे गोदावरी नदीच्या काठी वसले आहे. भव्य अशा कमानीतून आत गेल्यावर दोन्ही बाजून निरनिराळ्या वस्तूंच्या दुकान आहेत. त्यावरच भक्तनिवासाची सोय करण्यात आली आहे. मंदिराचा आवार भव्यदिव्य असून तेथील दगडी तटबंदी ही अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे कळते. मंदिरास चारी दिशांनी दरवाजे असून महाद्वार हे पूर्वाभिमुख आहे, पश्चिमेस गोदावरी द्वार, उत्तरेस दत्त द्वार तर दक्षिणेस जनार्दनस्वामी द्वार आहे. महाद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्याहातास अजानवृक्षाचे झाड असून ते शेवटची घटक मोजत आहे. एकनाथ महाराजांच्या समाधीमागे उद्धवांची समाधी आहे. हे उद्धव एकनाथ महाराजांच्या भावकीतील असून नाथांच्या लग्नाचे वेळी पैठणास आले व नंतर नाथांचे शिष्य बनले. नाथ समाधीच्या उत्तरेस नाथ शिष्य गावोबा यांची समाधी असून हे गावोबा नाथांच्या अनेक प्रमुख शिष्यांपैकी एक होत. गाभाऱ्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूस दोन ओवऱ्या असून मोठी घंटा लावण्यात आलेली आहे. मंदिर मुख्यतः लाकडी स्वरूपाचे असून गाभाऱ्यातील उंचच उंच लाकडी खांब लक्ष वेधून घेतात तसेच लाकडाची नक्षीदार सिलिंग आकर्षक दिसते. मंदिरात समाधीच्या अगदी वर एकनाथ महाराजांचा एक जुना फोटो लावण्यात आला असून नाथ समाधीच्या समोरील बाजूस प्रवेशद्वारावर संत एकनाथांचे ११ वे वंशज संस्थांनाधिपती श्री भानुदास महाराज गोसावी यांचा फोटो लावण्यात आला आहे. हे मंदिर एकनाथांच्या वंशजांनी बांधले आहे. आत प्रवेश केल्यानंतर उजव्या हातास शेंदूर लावलेल्या दक्षिण मुखी मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर एकनाथ महाराजांच्या समाधीच्या आजूबाजूस काही पादुकायुक्त समाध्या आहेत. डावीकडे तीन तर उजवीकडे दोन समाध्या आहेत. समाधीकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताची पहिली समाधी ही नाथांचे मोठे नातू प्रल्हाद यांची असून त्याच्या नंतर लहान नातू राघोबा यांची तेथे समाधी आहे. त्यापुढील छोटी मंदिरसदृश्य समाधी ही एकनाथ महाराजांचे वडील सूर्यनारायण महाराज यांची आहे. उजव्या बाजूस नाथ समाधीपेक्षा थोडी छोटी मंदिर सदृश समाधी ही एकनाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित महाराज यांची आहे. हरिपंडित यांनी सुरुवातीच्या काळात नाथांच्या सर्वसामावेशकतेचा विरोध केला व परिवारासह काशीस निघून गेले, नाथांच्या आज्ञेवरून पुन्हा ते सपरिवार पैठणास आले. पुढे काही घटना घडल्या व त्यांना नाथांचा अधिकार कळाला व ते नाथांचे शिष्य बनले. नाथांनी जलसमाधी घेतल्यानंतर यांनीच नाथसमाधीस्थित पादुकांची स्थापना केली आहे. उजवीकडील शेवटची समाधी ही नाथांचे दुसरे नातू मेघश्याम यांची आहे. मंदिर पहाटे ५ वाजता उघडते. पहाटे साडेपाचला काकडआरती होते. त्यानंतर आरती होते. दुपारी नैवेद्य तर संध्याकाळी सूर्यास्तासमयी नाथसमाधीची पूजा करण्यात येते. यास स्थानिक लोक भागीरथी असे संबोधतात. रात्री शेजारती होऊन १० वाजता मंदिर बंद होते. प्रति शुद्ध एकादशीस लाखो भाविक नाथसमाधीचे दर्शन घेतात. एकनाथ षष्ठी हा येथील महत्वाचा उत्सव असून ही वारी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी म्हणून सुपरिचित आहे. संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले कि, दररोज येथे सुमारे पाच ते सहा हजार भाविक विविध ठिकाणावरून नाथ दर्शनासाठी येतात.
- संत एकनाथ महाराजांचा वाडा : नाथ महाराजांचा वाडा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण समाधी मंदिराचा काही अंतरावर आहे. मुख्यतः हे एकनाथ महाराजांचे निवास स्थान आहे.
- सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात.
- जायकवाडी धरण : गोदावरी नदीवरील जायकवाडी हे धरण पैठण जवळच आहे. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी हे प्रसिद्ध धरण आहे. या जलाशयास नाथसगर असे नाव दिले आहे. नाथसागर पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
- जांभुळ बाग
- संत ज्ञानेश्वर उद्यान
- नागघाट : नागघाट हे अतिशय सुंदर असे ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर आहे. येथेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले होते. तसेच येथे सिद्ध वरुण पेशवे गणपती, हनुमान मंदिर, नाग देवता मंदिर, नागेश्वर व इन्द्रेश्वर महादेव मंदिर आहेत. नागपंचमीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्सव साजरा होतो.
- लद्दू सावकाराचा वाडा
- पेशव्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या वानोळे सावकारांचा वाडा
- जामा मशीद
- तीर्थ खांब
- मौलाना साहब दर्गा
- जैन मंदिर पैठण : दिगंबर जैन मंदिर हे पैठणमधील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण असून अतिशय पवित्र क्षेत्र आहे. देशाचा कानाकोपऱ्यातून लांब ठिकाणांहून जैन बांधव व धार्मिक लोक येथे भेट देतात.
- आचार्य आर्यनंदी महाराज यांचा जन्म ढोरकिन गावत झाला, ढोरकीनला आर्यनंदीनगर असही म्हणतात, पैठण, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र, ते भारतात महान मूनी म्हणुन ओखले जायचे. सैतवाल समाजाचे एकमेव जैन आचार्य राहिले आहेत
- सातबंगला पैठणी साडी केंद्र
- वीज प्रकल्प, जुने कावसान नाथसागर धरण
- नवनाथ मंदिर, पालथी नगरी पैठण
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक
- महाराणा प्रताप चौक
- मराठा क्रांती भवन (महाराष्ट्रातील पहिले क्रांती भवन)
- सातवाहन कालीन वस्तुंचे बाळासहेब पाटील संग्रहालय
प्रसिद्ध व्यक्ती
संपादन१. संत भानुदास महाराज
२. संत एकनाथ महाराज
३. संत गावबा महाराज
४. कृष्णदयार्णव महाराज
५. कवी अमृतराय महाराज
६. शंकरराव चव्हाण
७. भैयासाहेब महाराज गोसावी (नाथवंशज)
८. बाळासाहेब पाटील (इतिहास संशोधक)
९. कमलाकरराव वानोळे(पेशव्यांचे सहुकार आबाजी नाईक वानवळे यांचे वंशज)
१०. मधुसूदन ( रावसाहेब ) भैय्यासाहेब महाराज गोसावी ( १३ वे नाथ वंशज, श्रीक्षेत्र पैठण
वंशज )
११. ह.भ.प.पुष्कर रावसाहेब महाराज गोसावी ( १४ वे नाथ वंशज )
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |