आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे अंतराळात बांधले जाणारे संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले. १९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे, ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक आहे. ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे आहे. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे. अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि १० युरोपियन देशांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. तासाला २७,७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० कि.मी. उंचीवर आहे. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रह असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे. स्थानकाला रशियन ऑर्बिटल सेगमेंट (आरओएस) आणि युनायटेड स्टेट्स ऑर्बिटल सेगमेंट (युएसओएस) अशा दोन भागात विभागण्यात आले आहे. याची लांबी २४० फूट, तर रुंदी ३३६ फूट आहे. यामध्ये सहा व्यक्ती एका वेळेस राहण्याची व्यवस्था आहे. २ नोव्हेंबर २००० पासून या स्थानकात सलग २४ वर्षे, १९ दिवस अंतराळवीरांचे वास्तव्य आहे. आयएसएस २०२४ पर्यंत अनुदानित आहे आणि २०२८ पर्यंत कार्यरत राहण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक | |
---|---|
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक | |
उपशीर्षक | आयएसएस |
कक्षीय माहिती | |
कक्षा | जवळपास वर्तुळाकार |
कक्षीय गुणधर्म | सरासरी उंची: ३७० किमी |
कक्षेचा कल | ५१.६५°[१] |
परिभ्रमण काळ | ९२.६९ मिनिट [१] |
सरासरी वेग | ७.६६ किलोमीटर प्रति सेकंद (२७,७२४ किमी/तास)[१] |
प्रक्षेपण माहिती | |
प्रक्षेपक स्थान | बैकोनूर कॉस्मोड्रोम केनेडी अंतराळ केंद्र |
प्रक्षेपण दिनांक | २० नोव्हेंबर १९९८[१] |
निर्मिती माहिती | |
आकार | लांबी: ७२.८ मी (२३९ फूट) रुंदी: १०८.५ मी (३५६ फूट) उंची: २० मी (६६ फूट) |
वस्तुमान | अंदाजे ४१९,४५५ किलोग्रॅम[२] |
बांधणी
संपादनया स्थानकाची बांधणी अवकाशातच करण्यात आली. निरनिराळ्या मोहिमांमध्ये अंतराळ स्थानकाचे सुटे भाग स्पेस शटल डिस्कव्हरी आणि इतर वाहने जसे स्पेस शटल अटलांटिस च्या मदतीनं तेथे नेण्यात आले. आधीच्या मोहीमेतील स्पेस-शटलमधून तेथे गेलेल्या अंतराळवीरांनी हे सुटे भाग मुख्य स्थानकाच्या यंत्रणेला जोडले आणि आवश्यक त्या यंत्रणा सुरू केल्या केल्या.
प्रयोग
संपादनया स्थानकात जीवशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र आणि रसायनशास्त्रात केले जाणारे प्रयोग असतील. पृथ्वीवरील गुरुत्वीय बलामुळे येथे करता न येणारे प्रयोग या अंतराळ स्थानकात करण्यात येतात. या स्थानकावर, मंगळावरील मोहिमेसाठी माणूस पाठवता येण्याच्या उद्देशाने, वजनविरहित अवस्थेमध्ये मनुष्याचे वास्तव्य किती दिवस वाढवता येईल याचा अभ्यास केला जात आहे: संशोधन करण्यासाठी साधारणपणे दर सहा महिन्यांनी अंतराळवीरांचा नवा चमू[श १] पृथ्वीवरून पाठविला जातो.
दाब नियंत्रित भाग
संपादनआयएसएस मध्ये पुढील दाब नियंत्रित भाग[श २] आहेत.
झऱ्या (रशियन: Заря́; पहाट), फंक्शनल कार्गो ब्लॉक (एफजीबी) म्हणून ओळखला जातो. हा रशियन बनावटीचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा अवकाशात नेण्यात आलेला पहिला स्वयंपूर्ण भाग होता. झऱ्याला २० नोव्हेंबर १९९८ साली रशियाच्या प्रोटॉन क्षेपणास्त्रावरून कझाकस्तान येथून प्रक्षेपित करण्यात आले. आयएसएसच्या बांधणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात झऱ्याचा उपयोग गोदामासाठी, अंतराळात सोडलेल्या रॉकेटच्या मार्गदर्शनासाठी, किंवा त्याला पुढे ढकलण्यासाठी (प्रोपल्शनसाठी) आणि गोदामासाठी केला गेला. सध्या झऱ्याचा उपयोग मुख्यतः गोदाम म्हणून केला जातो. झऱ्याचे वजन १९,३०० किलो आहे. सौर पॅनेल वगळता त्याची लांबी १२.५५ मी आणि रुंदी ४.१ मी आहे.[३]
युनिटी हा आयएसएससाठी अमेरिकेने बनवलेला अवकाशात नेण्यात आलेला पहिला विभाग होता (युएसओएस[श ३]). युनिटीला एंडेव्हर अंतराळयानाने १९९८ साली कक्षेत प्रस्थापित केले. वृत्तचित्तीच्या[श ४] आकारातील या विभागामध्ये ६ बर्थिंग स्थाने[श ५] आहेत. त्यामुळे इतर विभाग एकमेकांना जोडले जातात. युनिटीमध्ये ५०,००० पेक्षा जास्त यांत्रिक गोष्टी आहेत. द्रवपदार्थ आणि वायू वाहून नेण्याकरता २१६ लाईन आणि एकूण सहा मैल लांबीच्या वायर वापरून बनवलेल्या १२१ अंतर्गत आणि बाह्य विद्युत केबल आहेत.[४] युनिटी ॲल्युमिनियम पासून बनवले असून त्याचे वजन ११,६०० किलो आहे.
झ्वेज्दा (रशियन: Звезда́, तारा) डीओ८ किंवा सेवा मोड्यूल[श ६] म्हणूनही ओळखले जाते. झ्वेज्दावरील डीएमएस-आर हा संगणक संपूर्ण स्थानकाचे मार्गदर्शन, दिशादर्शन आणि नियंत्रण हाताळतो.[५] झ्वेज्दाच्या इंजिनचा वापर स्थानकाची कक्षा वाढवण्याकरता केला जातो. रशियन किंवा युरोपियन अंतराळयाने त्याला जोडून त्यांच्या इंजिनामार्फत स्थानकाची कक्षा बदलली जाऊ शकते.
डेस्टिनी हे अमेरिकेची पेलोडसाठी[श ७] आयएसएसवरील प्रमुख संशोधन सुविधा आहे. डेस्टिनीमध्ये २४ आंतरराष्ट्रीय मानक पेलोड रॅक[श ८] आहेत ज्यामधील काहींचा वापर वातावरणीय प्रणाली आणि चमूच्या रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी केला जातो.[६]
क्वेस्ट हे एकमेव युएसओएस एअरलॉक[श ९] आहे. यामध्ये दोन विभाग आहेत. एका विभागात (एक्विपमेंट लॉक) उपकरणे आणि अंतराळ पोशाख ठेवले जातात आणि दुसऱ्या विभागातून (क्रू लॉक) अंतराळवीर अवकाशात जाऊ शकतात. या मोड्यूलमधील वातावरण स्वतंत्रपणे नियंत्रित केले जाते.[७]
पीर्स (रशियन: Пирс, पाण्यावरील पदपथ) आणि पॉईस्क (रशियन: По́иск, शोध) हे रशियन एअरलॉक मोड्यूल आहेत. या दोनही मोड्यूलना सारखे दरवाजे आहेत. पीर्सचा वापर रशियन ऑर्लन अंतराळ पोशाख ठेवणे, ते दुरुस्त करणे आणि स्वच्छ ठेवणे यासाठी केला जातो. त्याचबरोबर अमेरिकेचे अवजड आणि मोठे अंतराळ पोशाख वापरणाऱ्या अंतराळवीरांच्या तातडीच्या प्रवेशासाठीदेखील याचा उपयोग होतो. सर्वात बाहेरील दोन एअरलॉकना सोयुझ आणि प्रोग्रेस अंतराळयाने जोडली जाऊ शकतात.[८]
हार्मनी हे स्टेशनचे दुसरे नोड मोड्यूल[श १०] आणि युएसओएसचे उपयुक्तता केंद्र[श ११] आहे. हे मोड्यूल विद्युत उर्जा, बस इलेक्ट्रॉनिक डेटा[श १२] पुरवते आणि काही इतर भागांसाठी केंद्रीय जोडणीचे ठिकाण म्हणून उपयोगात येते. युरोपची कोलंबस आणि जपानची किबो या प्रयोगशाळा हार्मनीला कायमच्या जोडल्या आहे.
ट्रॅंक्विलीटी (Tranquility)
संपादनट्रॅंक्विलीटी हे आयएसएसवरील अमेरिकेचे तिसरे आणि शेवटचे नोड मोड्यूल आहे. यावर चमूच्या वापरासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी व्यवस्था आणि प्राणवायू निर्माण करणारी, अतिरिक्त जीवन राखणारी यंत्रणा आहे. यावरील चार पैकी तीन जोडणीची ठिकाणे वापरात नाहीत. एका जोडणीच्या ठिकाणाला क्यूपोला जोडले आहे आणि दुसऱ्या ठिकाणाला डॉकिंग पोर्ट ॲडाप्टर जोडले आहे.
कोलंबस ही युरोपियन पेलोडसाठी प्राथमिक संशोधन सुविधा आहे. यामध्ये एक व्यापक प्रयोगशाळा आणि जीवशास्त्र, बायोमेडिकल संशोधन आणि द्रवपदार्थ भौतिकशास्त्रासाठी सुविधा आहेत. यातील अनेक आरोहित स्थाने[९] मोड्यूलच्या बाहेरील भागात आहेत. ही स्थाने युरोपियन तंत्रज्ञान एक्सपोझर सुविधा (EuTEF), सौर देखरेख वेधशाळा, साधनसामग्री वापरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचे प्रयोग आणि अणुघड्याळ साकल्याने वस्तूंचे केलेले अवलोकन यासारख्या बाह्य प्रयोगांना ऊर्जा आणि डेटा प्रदान करतात.[१०]
किबो (जपानी: きぼう, आशा) सर्वात मोठे आयएसएस मोड्यूल आहे. या प्रयोगशाळेत अवकाशीय औषध, जीवशास्त्र, पृथ्वी निरीक्षण, माल उत्पादन, जैवतंत्रज्ञान, संचार संशोधन आणि झाडे व मासे वाढवण्यासाठी सुविधा आहे. या प्रयोगशाळेमध्ये १० प्रायोगिक रॅकसह एकूण २३ रॅक आहेत आणि प्रयोगांसाठी समर्पित एअरलॉक आहे. एक लहान दाब नियंत्रित मोड्यूल किबोवर जोडण्यात आले आहे जे मालवाहू विभाग म्हणून सेवा पुरवते.[११]
क्यूपोला ही सात खिडक्या असलेली वेधशाळा आहे व तिचा वापर पृथ्वी, अंतराळयानांचे डॉकिंग[श १३] पाहण्यासाठी केला जातो. तिचे नाव क्यूपोला या इटालियन शब्दापासून देण्यात आले आहे ज्याचा अर्थ घुमट असा होतो. क्यूपोला हा प्रकल्प नासा आणि बोईंगने सुरू केला होता पण निधी कमी केल्यामुळे तो रद्द करण्यात आला होता. नंतर नासा आणि युरोपीय अंतराळ संस्थेमध्ये (इएसए) वस्तुविनिमय करार झाला आणि १९९८ मध्ये इएसएने क्यूपोलाचे काम पुन्हा सुरू केले. हे मोड्यूल त्याच्या खिडक्यांची सूक्ष्म उल्कांपासून संरक्षण करण्यासाठी मुख्य रोबोटिक आर्म आणि शटर्सना चालवण्यासाठी रोबोटिक वर्कस्टेशनने सुसज्ज आहे. त्यामध्ये ७ खिडक्या आहेत. त्यातील ८० सेंटिमीटर गोलाकार खिडकी आयएसएसवरील सर्वात मोठी खिडकी आहे.
रासव्हेट (रशियन: Рассве́т), पहाट) लघू संशोधन मोड्यूल १ (एमआरएम-१) म्हणून ओळखले जाते. रासव्हेट प्रामुख्याने मालाचे गोदाम[श १४] आणि भेटीस आलेल्या अंतराळयानासाठी डॉकिंग पोर्ट[श १५] म्हणून वापरले जाते. त्याला नासाच्या अटलांटिस अंतराळयानाने एसटीएस-१३२ मिशनमध्ये अंतराळात नेले आणि मे २०१० मध्ये त्याला आयएसएसला जोडण्यात आले.[१२][१३]
लिओनार्डो हे स्थायी बहुउद्दिष्ट मोड्यूल (पीपीएम) ट्रॅंक्विलीटी नोडशी संलग्न असलेले स्टोरेज मोड्यूल आहे. या मोड्यूलची निर्मिती इटलीतील तोरिनो येथे अल्काटेल अलेनिआ स्पेस, आताची थेल्स अलेनिआ स्पेस या कंपनीने नासासाठी केली. इटलीने बनवले असले तरी हे मोड्यूल अमेरिकेचे मोड्यूल आहे. याबदल्यात अमेरिकेने इटलीला आयएसएस वरील प्रयोगांसाठी त्यांना इएसए मार्फत मिळणाऱ्या वेळाव्यतिरिक्त जास्तीचा वेळ दिला.[१४]
उर्जा स्रोत
संपादनसौर सेल किंवा फोटोव्होल्टाइक सेल आयएसएसला विद्युत उर्जा पुरवतात. या सेलच्या दोनही बाजूंना सौर पॅनेल आहे. एका बाजूचे पॅनेल सूर्यप्रकाशापासून तर दुसऱ्या बाजूचे पॅनेल पृथ्वीवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाश किरणांपासून विद्युतनिर्मिती करते. स्थानकावरील रशियन विभाग चार फिरणाऱ्या २८ व्होल्ट डीसी सौर सेल शृंखलेचा वापर करते आणि अमेरिकन विभाग १२०-१८० व्होल्ट डीसी क्षमतेच्या फोटोव्होल्टाइक सौर सेल शृंखलेचा वापर करते.
युएसओएसवरील सौर सेल शृंखला पंखांच्या चार जोड्यांमध्ये बसवण्यात आले आहेत आणि प्रत्येक पंख ३२.८ किलो वॅट विद्युत ऊर्जेची निर्मिती करतो. जास्तीत जास्त ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी या सौर सेल शृंखला सूर्याचा मागोवा घेतात. प्रत्येक शृंखलेचे क्षेत्रफळ ३७५ चौमी असून लांबी ५८ मी आहे. ९० मिनिटांच्या कक्षेत आयएसएस ३५ मिनिटे पृथ्वीच्या छायेत असते. त्या वेळेत त्याला रिचार्जेबल निकेल-हायड्रोजन बॅटऱ्यांपासून ऊर्जा मिळते. उर्वरित वेळेत या बॅटऱ्या चार्ज केल्या जातात. त्यांचा कार्यकाळ साधारणतः ६.५ वर्षे आहे आणि आयएसएसच्या नियोजित २० वर्षांच्या कार्यकाळात त्यांना क्रमाक्रमाने बदलण्यात येईल.
भ्रमण कक्षा
संपादनआयएसएस समुद्रसपाटीपासून कमीत कमी ३३० आणि जास्तीत जास्त ४१० किमी उंचीवरून पृथ्वीभोवती साधारण गोलाकार कक्षेत परिभ्रमण करते. त्याची कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या तुलनेने ५१.६ अंशांनी कललेली आहे. ही कक्षा रशियाची प्रोग्रेस आणि सोयूझ अंतराळयाने स्थानकापर्यंत सुरक्षित पोहोचण्यासाठी निवडली गेली. ते सरासरी २७७२४ किमी प्रती तास या वेगाने परिभ्रमण करते आणि एका दिवसात पृथ्वीभोवती १५.५१ प्रदक्षिणा पूर्ण करते.[१५]
झ्वेज्दा वरील दोन इंजिने किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या रशियन किंवा युरोपियन अंतराळयानांच्या मदतीने स्थानकाच्या उंचीमध्ये बदल करता येतो (Orbital boosting). स्थानकाची कक्षा उंचावण्यासाठी साधारणतः तीन तास किंवा दोन प्रदक्षिणांचा कालावधी लागतो.
संवाद
संपादनरेडिओ संचार आयएसएसवरील संचाराचे मुख्य माध्यम आहे. रेडिओ संचार स्थानक व मिशन नियंत्रण कक्ष यांच्यामध्ये संदेशांचे स्वयंचलित प्रक्षेपण आणि वैज्ञानिक डेटाच्या देवाणघेवाणीसाठी दुवा प्रदान करते. डॉकिंगच्या वेळी आणि चमूमधील सदस्यांना उड्डाण नियंत्रकासोबत आणि त्यांच्या परिवारासोबत श्राव्य किंवा दृश्य संवाद साधण्यासाठी रेडिओ संचाराचा वापर केला जातो. परिणामी आयएसएस अनेक आंतरिक आणि बाह्य संचार प्रणाल्यांनी सुसज्ज आहे.
आरओएस झ्वेज्दावर बसवण्यात आलेल्या लीरा या संवेदानाग्राच्या[श १६] सहाय्याने थेट जमिनीवर संवाद साधते. वोस्खोद-एम ही आणखी एक रशियन संचार प्रणाली आहे. तिच्या सहाय्याने झ्वेज्दा, झऱ्या, पीर्स, पॉईस्क आणि युएसओएस यांमध्ये टेलिफोन संचार होतो, तसेच ते झ्वेज्दावरील बाह्य संवेदानाग्राच्या सहाय्याने जमिनीवरील स्थानकांसोबत संपर्कासाठी व्हीएचएफ रेडिओ दुवा पुरवते.
युएसओएस ऑडिओ संचारासाठी एस बॅंड आणि ऑडिओ, व्हिडिओ आणि डेटा संचारासाठी केयू बॅंड या दोन बॅंडचा वापर करतात. त्यामुळे नासाच्या ह्युस्टन येथील मिशन नियंत्रण कक्षाशी वास्तविक वेळेत सलग संवाद साधता येतो. मोड्यूलमधील संचार हा आंतरिक बिनतारी नेटवर्कच्या सहाय्याने साधला जातो.[१६] स्थानकाबाहेर काम करणाऱ्या अंतराळवीरांशी युएचएफ रेडिओने संपर्क साधला जातो.
आयएसएस १०० आयबीएम आणि लेनोव्हो थिंकपॅड लॅपटॉप संगणकांनी सुसज्ज आहे. हे लॅपटॉप स्थानकावरील बिनतारी नेटवर्कशी वाय-फायने आणि जमिनीशी केयू बॅंडने जोडले आहेत. ते स्थानकापासून सेकंदाला ३ मेगाबिट आणि स्थानकापर्यंत सेकंदाला १० मेगाबिट इतक्या वेगाने संदेशांची देवाणघेवाण करतात.[१७]
जीवन राखणारी यंत्रणा
संपादनजीवन राखणाऱ्या यंत्रणांपैकी वातावरण नियंत्रण प्रणाली, पाणी पुरवठा प्रणाली, अन्न पुरवठा सुविधा, स्वच्छता उपकरणे आणि आगीचा शोध लावणारी आणि बुझवणारी उपकरणे आहेत. रशियन ऑर्बिटल सेगमेंटची जीवन राखणारी यंत्रणा सेवा मोड्यूल झ्वेज्दा मध्ये समाविष्टीत आहे. त्यापैकी काही यंत्रणांना युएसओएस वरील उपकरणांपासून मदत मिळते.
वातावरण नियंत्रण यंत्रणा
संपादनआयएसएस मधील वातावरण पृथ्वीवरील वातावरणासारखे आहे.[१८] आयएसएस मधील सामान्य हवेचा दबाव १०१.३ किलो पास्कल आहे जो पृथ्वीवरील समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाइतका आहे.[१९] पृथ्वीसारखे वातावरण चमूच्या सोयीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि शुद्ध ऑक्सिजन वातावरणापेक्षा सुरक्षित आहे.
झ्वेज्दा मधील इलेक्ट्रोन यंत्रणा आणि डेस्टिनी मधील तत्सम यंत्रणा स्थानकावर ऑक्सिजनची निर्मिती करतात.[२०] झ्वेज्दा मधील वोझदुख यंत्रणा हवेतील कार्बनडायऑक्साईड काढते. हवेतील मानवी चयापचय क्रियेतील इतर टाकाऊ घटक जसे आतड्यातील मिथेन वायू आणि घामातील अमोनिया सक्रिय कोळशाच्या गाळण्या वापरून काढले जातात.[२१]
युएसओएसकडे क्वेस्ट एअरलॉक मोड्यूलवर २००१ साली पोहोचवलेल्या उच्च दाबाच्या ऑक्सिजनच्या टाकीमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा आहे.
आंतरराष्ट्रीय मदत
संपादन- सहभागी देश
स्थानकावरील जीवन
संपादनअंतराळ स्थानकावरील चमूचा सर्वसाधारण दिवस सकाळी ६.०० वाजता सुरू होतो. त्यानंतर झोपेनंतरची नित्यक्रमे आणि सकाळची स्टेशनची पाहणी होते. त्यानंतर नाष्टा, मिशन नियंत्रण कक्षाशी बैठक होते आणि ८.१० वाजता काम सुरू होते. त्यानंतर पहिला व्यायामाचे सत्र आणि नंतर पुन्हा १३.०५ पर्यंत काम असते. एक तासाच्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर दुसरे व्यायामाचे सत्र आणि काम असते. १९.३० वाजता क्र्यूची बैठक, रात्रीचे जेवण व इतर झोपेपूर्वीची नित्यकर्मे होतात. २१.३० वाजता झोपेची वेळ सुरू होते. हे कर्मचारी आठवड्यातील कामांच्या दिवशी सामान्यतः १० तास आणि शनिवारी ४ तास काम करतात.[२२]
व्यायाम
संपादनस्टेशनवर दोन पायगिरण्या[श १७], वजन उचलण्याच्या व्यायामाच्या उपकरणांचा संच आणि एक स्थिर सायकल आहे. प्रत्येक अंतराळवीर रोज कमीत कमी दोन तास या उपकरणांवर व्यायाम करतो. ते स्वतःला उपकरणांशी बांधून ठेवण्यासाठी बंजी केबलचा वापर करतात.[२३]
स्वच्छता
संपादनआयएसएसवर शॉवर नाही. चमू अंघोळीसाठी ओले कपडे आणि पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करतात. पाणी वाचवण्यासाठी फेस न होणारा शाम्पू आणि खाता येऊ शकणारी टूथपेस्ट वापरली जाते. स्थानकावर रशियन रचनेची दोन शौचालये आहेत; एक झ्वेज्दा आणि एक ट्रॅंक्विलीटी मध्ये आहे. अंतराळवीर प्रथम स्वतःला शौचालयाच्या सीटशी घट्ट बांधतात.[२३] एक तरफ शक्तिशाली पंखा चालू करते आणि हवा शोषून घेणारे भोक उघडते. हवेचा प्रवाह मलमूत्र दूर घेऊन जातो. मल पिशव्यांमध्ये जमा केला जातो आणि मूत्र जमा करून पाणी पुनर्प्राप्ती प्रणालीकडे पाठवले जाते जिथे त्यावर प्रक्रिया करून त्यापासून पाणी बनवले जाते.[२४]
झोप
संपादनचमूला झोपण्यासाठी प्रत्येकासाठी स्वतंत्र कक्ष आहेत. झ्वेज्दामध्ये दोन आणि हार्मनीमध्ये चार कक्ष आहेत. चमूतील सदस्य त्यांच्या कक्षामध्ये बांधून ठेवलेल्या स्लीपिंग बॅगमध्ये झोपू शकतात. भेटीस आलेले सदस्य कक्ष उपलब्ध नसल्याने उपलब्ध मोकळ्या जागेत भिंतीला स्लीपिंग बॅग अडकवून त्यामध्ये झोपतात.[२५]
अन्न व पाणी
संपादनस्थानकावरील सर्वाधिक अन्न निर्वात पोकळी (व्हॅक्यूम) सीलबंद प्लास्टिक पिशव्यांमध्ये आहे. धातूचे डबे खूप जड आणि वाहतूक करण्यासाठी महाग असतात, म्हणून जास्त नाहीत. जतन अन्नाकडे सामान्यतः जास्त लक्ष दिले जात नाही. सूक्ष्म गुरुत्वामुळे चव कमी लागत असल्याने अन्न अधिक रुचकर करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात.[२६] स्वयंपाकात नेहमीपेक्षा जास्त मसाले वापरले जातात आणि चमू ताजी फळे आणि भाज्या पृथ्वीवरून घेऊन येणाऱ्या अंतराळयानाची आतुरतेने वाट पाहतात. अन्नाचे लहान तुकडे होणार नाहीत याची काळजी घेतली जाते. प्रत्येक सदस्याकडे वैयक्तिक अन्नाचे पॅकेज असते आणि ते स्थानकातील गॅलीमध्ये[श १८] शिजवतात. या गॅलीमध्ये दोन अन्न गरम करणारी यंत्रे, एक शीतकपाट आणि गरम आणि थंड पाणी पुरवणारे यंत्र आहे. द्रव्ये शुष्क भुकटीच्या रूपात उपलब्ध असतात आणि प्यायच्या वेळी पाण्यात मिसळली जातात.[२७][२८] द्रव्ये आणि सूप स्ट्रॉच्या मदतीने प्लास्टिक पिशव्यातून पिले जातात तर घन अन्नपदार्थ चाकू आणि काटाचमच्याच्या मदतीने खाल्ले जातात. ते स्थानकात कुठेही तरंगू नये म्हणून ताटाशी लोहचुम्बकाने जोडलेले असतात.
स्थानकाचे कार्य
संपादनप्रत्येक कायमच्या चमूला मोहीम क्रमांक दिला जातो. प्रत्येक मोहीम सहा महिने चालते. पहिल्या एक ते सहा मोहिमांमध्ये तीन जणांचा चमू होता. त्यानंतर नासाच्या कोलंबिया अंतराळयानाच्या अपघातानंतर सातव्या ते बाराव्या मोहिमेमध्ये प्रत्येकी दोन जणांचा चमू होता. सोळाव्या मोहिमेनंतर चमूची संख्या २०१० पर्यंत हळू हळू सहा पर्यंत वाढवण्यात आली.[२९]
पहिल्या मोहिमेचे सदस्य आणि अकराव्या मोहिमेचे कमांडर सर्जेई क्रिकालेव्ह यांनी अंतराळात सर्वात जास्त, एकूण ८०३ दिवस ९ तास ३९ मिनिटे एवढा वेळ घालवला आहे. त्यांना ऑर्डर ऑफ लेनिन, हिरो ऑफ द सोविएत युनिअन, हिरो ऑफ द रशियन फेडरेशन हे पुरस्कार आणि नासाकडून ४ अन्य पदके मिळाली आहेत. १६ ऑगस्ट २००५ रोजी त्यांनी सर्जेई अव्देयेव यांचा अंतराळात ७४८ दिवस राहण्याचा विक्रम मोडला. अमेरिकन अंतराळवीरांमध्ये कमांडर मायकल फिंक हे अंतराळात सर्वाधिक वेळ राहणारे अंतराळवीर आहेत. त्यांनी ३८२ दिवस अंतराळात वास्तव्य केले.
स्वखर्चाने अंतराळात जाणाऱ्यांना अंतराळ उड्डाणातील भागीदार किंवा अंतराळ पर्यटक असे म्हणतात. जेव्हा चमूची संख्या सोयूझमधील ३ जागांच्या पटीत बदलत नाही आणि छोट्या कालावधीसाठी चमू पाठवले जात नाहीत, तेव्हा एक उपलब्ध जागा विकली जाते. २०१३ नंतर सोयूझच्या उड्डाणांमध्ये वाढ करण्यात आली. दर वर्षी ५ उड्डाणे (१५ जागा) होतात तर सध्या फक्त दोन मोहिमांची (१२ जागा) आवश्यकता आहे.[३०] बाकीच्या जागा ४० दशलक्ष अमेरिकन डॉलरने वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्यांना विकल्या जातात. डेनिस टिटो हे स्वखर्चाने अंतराळात जाणारे पहिले मनुष्य आहेत.
अपघात
संपादनआयएसएस ज्या कमी उंचीच्या कक्षेमध्ये आहे, त्या कक्षेमध्ये अनेक प्रकारचा अवकाशीय कचरा[श १९] आहे. यामध्ये कार्यरत नसलेले उपग्रह, विस्फोटानंतरचे अवशेष या इतर अनेक गोष्टींचा समावेष होतो. अवकाशीय कचऱ्याचा पृथ्वीवरून दुरस्थपणे मागोवा घेतला जातो आणि धोक्याबाबत चमूला सुचित केले जाउ शकते. त्यामुळे डेब्रिस ॲव्हॉयडन्स मॅन्यूवर (डीएएम) शक्य होते, ज्यामध्ये आरओएसवरील अग्निबाणांच्या सहाय्याने स्थानकाच्या कक्षेची उंची बदलली जाते आणि अवकाशीय कचऱ्याशी संपर्क टळतो. मार्च २००९ पर्यंत नऊ वेळा डीएएम करण्यात आले आहे. यात सामान्यतः परिभ्रमण गती १ मी प्रती सेकंदने वाढवून कक्षेची उंची १ ते २ किमीने वाढवली जाते. कक्षेतील अवकाशीय कचऱ्याच्या धोक्याची सूचना उशिरा कळल्यास चमू स्थानकावरील सर्व दरवाजे बंद करून सोयूझ अंतराळयानात जाऊन माघार घेतात जेणेकरून स्थानकाला गंभीर नुकसान पोहोचल्यास ते सुरक्षितपणे स्थानक रिकामे करून सोडून जाऊ शकतात. अशा स्थानक आंशिकतः रिकामे करण्याच्या घटना १३ मार्च २००९, २८ जून २०११ आणि २४ मार्च २०१२ रोजी घडल्या आहेत.[३१]
हे सुद्धा पाहा
संपादनबाह्य दुवे
संपादनसंदर्भयादी
संपादन- ^ a b c d पीट, ख्रिस. "आयएसएस - ऑर्बिट" (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ गार्सिया, मार्क. "अबाउट द स्पेस स्टेशन: फॅक्ट्स ॲंड फिगर्स" (इंग्रजी भाषेत). 2015-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "झऱ्या" (इंग्रजी भाषेत). 2006-09-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "युनिटी" (इंग्रजी भाषेत). 2014-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "झ्वेज्दा" (इंग्रजी भाषेत). ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "डेस्टिनी" (इंग्रजी भाषेत). 2007-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "Space Station Extravehicular Activity" (इंग्रजी भाषेत). 2009-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-31 रोजी पाहिले.
- ^ "पीर्स" (इंग्रजी भाषेत). 2005-10-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ आरोहित स्थाने (इंग्लिश: mounting locations); उच्चार - माऊंटिंग लोकेशन्स
- ^ "कोलंबस प्रयोगशाळा" (इंग्रजी भाषेत).
- ^ जॅक्सा. "Monitor of All-sky X-ray Image (MAXI):Experiment – Kibo Japanese Experimental Module – JAXA" (इंग्रजी भाषेत).
- ^ "STS-132: PRCB baselines Atlantis' mission to deliver Russia's MRM-1" (इंग्रजी भाषेत).
- ^ "STS-132 MCC Status Report #09" (इंग्रजी भाषेत). 2013-04-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-31 रोजी पाहिले.
- ^ "ISS Elements: Multi-Purpose Logistics Modules (MPLM)" (इंग्रजी भाषेत).[permanent dead link]
- ^ "आयएसएसची कक्षा" (इंग्रजी भाषेत).
- ^ "INTERNATIONAL SPACE STATION Operations Local Area Network (OPS LAN) Interface Control Document" (PDF) (इंग्रजी भाषेत).[permanent dead link]
- ^ NICK BILTON. "First tweet from space" (इंग्रजी भाषेत).
- ^ अंतराळयान कसे काम करते (इंग्रजी मजकूर)
- ^ आयएसएस मधील हवा (इंग्रजी मजकूर)
- ^ New oxygen systems (इंग्रजी मजकूर)
- ^ "Breathing easy on the space station (इंग्रजी मजकूर)". 2008-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-31 रोजी पाहिले.
- ^ ISS crew timeline Archived 2016-07-30 at the Wayback Machine.(इंग्रजी मजकूर)
- ^ a b दैनंदिन जीवन(इंग्रजी मजकूर)
- ^ Living and working on ISS Archived 2009-04-19 at the Wayback Machine.(इंग्रजी मजकूर)
- ^ Sleeping in space (इंग्रजी मजकूर)
- ^ दैनंदिन जीवन (इंग्रजी मजकूर)
- ^ Station prepares for expanding crew Archived 2008-12-04 at the Wayback Machine. (इंग्रजी मजकूर)
- ^ Living and working on the international space station Archived 2009-04-19 at the Wayback Machine. (इंग्रजी मजकूर)
- ^ ISS Expeditions Archived 2014-03-28 at the Wayback Machine. इंग्रजी मजकूर
- ^ "Breaking News | Resumption of Soyuz tourist flights announced" इंग्रजी मजकूर
- ^ ISS crew take to soyuz capsul on space junk alert
पारिभाषिक शब्दसूची
संपादन- ^ चमू (इंग्लिश: Crew; उच्चार - क्र्यू)
- ^ दाब नियंत्रित भाग (इंग्लिश: Pressurised modules; उच्चार - प्रेशराईज्ड मोड्यूल्स)
- ^ युएसओएस (इंग्लिश: (USOS) United States Orbital Segment; उच्चार - युनायटेड स्टेट्स ऑर्बिटल सेगमेंट)
- ^ वृत्तचित्ती (इंग्लिश: Cylinder; उच्चार - सिलिंडर)
- ^ बर्थिंग स्थान (इंग्लिश: Birthing station; उच्चार - बर्थिंग स्टेशन) - दोन विभाग एकमेकांना जोडण्याचे ठिकाण
- ^ सेवा मोड्यूल (इंग्लिश: service module; उच्चार - सर्व्हिस मोड्यूल)
- ^ पेलोड - (इंग्लिश: payload)
- ^ आंतरराष्ट्रीय मानक पेलोड रॅक - (इंग्लिश: International Standard Payload Racks)
- ^ एअरलॉक - (इंग्लिश: Airlock) - असा दरवाजा ज्याच्यातून दाब नियंत्रित भागातील हवेचा दबाव न बदलता किंवा हवा सुटू न देता लोक किंवा वस्तूंची वाहतूक करता येऊ शकते
- ^ नोड मोड्यूल - (इंग्लिश: node module)
- ^ उपयुक्तता केंद्र - (इंग्लिश: utility hub;उच्चार - युटिलिटी हब)
- ^ बस इलेक्ट्रॉनिक डेटा - (इंग्लिश: bus electronic data)
- ^ डॉकिंग (इंग्लिश: docking) - अंतराळयान आयएसएसला जोडण्याची प्रक्रिया
- ^ मालाचे गोदाम (इंग्लिश: Cargo storage) - कार्गो स्टोरेज
- ^ डॉकिंग पोर्ट (इंग्लिश: Docking port) - अंतराळयान आयएसएस ला ज्या ठिकाणी जोडले जाते ती जागा
- ^ संवेदानाग्र (इंग्लिश: Antenna) - ॲंटेना
- ^ पायगिरणी (इंग्लिश: Treadmill) - ट्रेडमिल
- ^ गॅली (इंग्लिश: Galley)
- ^ अवकाशीय कचरा (इंग्लिश: Space debris);उच्चार - स्पेस डेब्रिस