नारायण श्रीपाद राजहंस

मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नत्यनिर्माते
(बाल गंधर्व या पानावरून पुनर्निर्देशित)

नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व (जन्म : नागठाणे (सांगली), महाराष्ट्र, २६ जून १८८८; - पुणे, १५ जुलै १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते होते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते.[१]

बालगंधर्व
Bal Gandharv.jpg
नारायण श्रीपाद राजहंस
टोपणनावे बालगंधर्व
आयुष्य
जन्म जून २६, इ.स. १८८८
जन्म स्थान नागठाणे (सांगली) , महाराष्ट्र, भारत
मृत्यू इ.स. १९६७
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव नागठाणे (सांगली)
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई अन्नपूर्णाबाई श्रीपाद राजहंस
वडील श्रीपाद कृष्णाजी राजहंस
जोडीदार गोहरबाई कर्नाटकी
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय गायन
घराणे कुलकर्णी
संगीत कारकीर्द
पेशा गायकी, अभिनय, गायन (संगीत नाटके)
कारकिर्दीचा काळ इ.स. १९०५ - इ.स. १९५५
गौरव
विशेष उपाधी बालगंधर्व
पुरस्कार पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार

कारकीर्दसंपादन करा

बालगंधर्व हे भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरूबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.[२]

बालगंधर्वांची रंगभूमीवरील आपली कारकीर्द किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेत इ.स. १९०५ साली आरंभली. मात्र तिचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या इ.स. १९११ मध्ये निधनानंतर संस्थेत वाद झाले. परिणामी इ.स. १९१३ मध्ये बालगंधर्वांनी, गणेश गोविंद (गणपतराव) बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. मात्र इ.स. १९२१ मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व हे एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यापुढच्या सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली. मात्र त्यापुढच्या काळात या संस्थेची आर्थिक स्थिती चढउताराचीच राहिली. नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये दर्जा आणि अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह हेही त्याचे एक कारण सांगितले जाते.

पुढे प्रभात फिल्म कंपनीसाठी बालगंधर्वांनी ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिकाही केली.

बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारून संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहिलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली.

भाऊराव कोल्हटकरांच्या इ.स. १९०१ मधील निधनानंतर जेंव्हा संगीत नाटक परंपरेला उतरती कळा आली, त्यानंतर बालगंधर्वांनी या परंपरेत मोलाची भर घालत ती पुढे नेण्याचे महत्त्वाचे कार्य केले. इ.स. १९२९ सालच्या ४२ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

स्त्री भूमिकांसाठी महिला कलाकारांची गरज निर्माण झाल्यानंतर एप्रिल इ.स. १९३८ मध्ये गोहर कर्नाटकी यांचा गंधर्व नाटक मंडळीत समावेश झाला. इ.स. १९६७मध्ये बालगंधर्वांच्या मृत्यू झाला. गोहरबाईंनी त्यानंतर कंपनीचा कारभार सांभाळण्यातही सहभाग दिला. इ.स. १९५१मध्ये नारायणरावांनी गोहरबाईंशी कायदेशीर विवाह केला.

त्यांनी संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर (नाटक), संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला, संगीत कान्होपात्रासह एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. त्यांची संगीत शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. इ.स. १९५५ रोजी त्यांनी एकच प्याला नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. बालगंधर्वाच्या रंगभूमीवरल्या कारकिर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘रत्नाकर’ मासिकाने १९३१ मधल्या जुलैचा अंक ‘गंधर्व अंक’ काढला होता. त्यानिमित्ताने ‘बालगंधर्वाची सर्वोत्कृष्ट भूमिका कोणती?’ असा प्रश्न वाचकांना विचारून सर्वेक्षण केले होते. तेव्हा वाचकांनी त्यांच्या ‘एकच प्याला’मधल्या सिंधूला सर्वाधिक पसंती दिली होती.[३]

निधनसंपादन करा

१५ जुलै १९६७ रोजी वृद्धापकाळामुळे व दीर्घ आजाराने बालगंधर्वांचे निधन झाले.

वारसासंपादन करा

इ.स. १९६८ साली पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह त्यांचे स्मृतिमंदिर तयार केले. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी यात पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्‌घाटन आचार्य अत्रे यांनी केले. खुद्द बालगंधर्व हयात असताना त्यांच्या हस्ते जिमखान्यावर या वास्तूसाठी भूमिपूजन झाले होते.[४]

बालगंधर्वांची चरित्रे आणि त्यांच्याविषयीची अन्य पुस्तकेसंपादन करा

 • मोहन नाडकर्णी. (इंग्लिश भाषेत). pp. ७७ http://books.google.com/books?id=X55UcgAACAAJ&dq=Bal+Gandharva&hl=en&ei=RQ_FTbDDK8KIrAfFram3BA&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=1&ved=0CCkQ6AEwAA. Text " title
 • बालगंधर्व: द नॉनपॅरेल थेस्पियन " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
 • असा बालगंधर्व (कादंबरी, लेखक अभिराम भडकमकर). या पुस्तकाला ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ह.ना. आपटे पुरस्कार मिळाला आहे. (२०१२) : गोरख थोरात यांनी या कादंबरीचा हिंदी अनुवाद केला आहे.
 • असा हा राजहंस (लेखक व्यंकटेश श्रीपाद राजहंस( (२०१७)
 • तो एक राजहंस (संगीत नाटक, लेखक - अनंत ओगले, सहलेखक - आकाश भडसावळे)
 • गंधर्वगाथा (लेखक : भा. द. खेर)
 • बालगंधर्व यांचे चरित्र (लेखक : बापूकाका राजहंस)
 • बालगंधर्व व्यक्ती आणि कला (लेखक - वसंत शांताराम देसाई)
 • बालगंधर्व - व्यक्ती आणि कार्य (लेखिका : मोहिनी वर्दे)
 • मी पाहिलेले बालगंधर्व (लेखक : बबनराव नावडीकर)
 • Balgandharva and the Marathi theatre (इंग्रजी, लेखक : ज्ञानेश्वर नाडकर्णी)
 • Bal Gandharva: The Nonparallel Thespian (इंग्रजी, लेखक मोहन नाडकर्णी)

स्मृतिस्थळेसंपादन करा

 • भिलवडी -नागठाणे (तालुका पलूस) या बालगंधर्वांच्या जन्मस्थानी येथील बालगंधर्व स्मारक समितीतर्फे एक स्मारक उभे केले जात आहे.
 • पुणे शहरात ’बालगंधर्व रंगमंदिर’ नावाचे एक नाट्यगृह आहे.
 • नागठाणे गावात, तासगाव जीवन विकास संस्थेचे ’नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय’ आहे.

चित्रपटसंपादन करा

पुरस्कारसंपादन करा

बालगंधर्व यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारसंपादन करा

 • पुणे महानगरपालिकेतर्फे इ.स. २०११ सालापासून दिले जाणारे बालगंधर्व (मुख्य) पुरस्कार आणि बालगंधर्व सहपुरस्कार
 • ’बालगंधर्व रसिक मंडळा’तर्फे दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार
 • नागठाणेच्या बालगंधर्व समितीतर्फे दरवर्षी नाट्यअभिनय किंवा संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंताला इ.स. २०१० सालापासून बालगंधर्व पुरस्कार व युवा बालगंधर्व पुरस्कार दिले जातात.
 • बालगंधर्व परिवारातर्फे दरवर्षी एका नाट्यकलावंताला बालगंधर्व ‘जीवनगौरव पुरस्कार’ आणि सुमारे २५ रंगकर्मींना अन्य बालगंधर्व पुरस्कार दिले जातात.

संदर्भ व नोंदीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा