गझल एक वृत्तप्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक काव्यप्रकार व गायनप्रकारही आहे. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या सुगम गायनप्रकाराचा समावेश होतो. 

प्राचीन इराणमधील (पर्शियामधील) या प्रेमगीताचा प्रकार भारतात सूफी संतांच्यामुळे रुजला. ईश्वर-भक्ताचे नाते प्रियकर-प्रेयसीमधील संबंधाच्या परिभाषेत स्पष्ट करणाऱ्या या संतांनी आपली प्रार्थनागीते गझल या काव्यप्रकारात रचली आणि त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय रागतालांचा उपयोग केला. भारतातील संगीतपरंपरा आणि संगीत निषिद्ध मानणाऱ्या इस्लामचा विजय या दोन्हींचा परिपाक म्हणजे हा गायनप्रकार होय, तेराव्या शतकातील सूफी संत ⇨ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती  व खल्जी आणि तुघलक साम्राज्यांचा राजकवी ⇨अमीर खुसरौ  यांच्यामुळे पुढे हा प्रकार फोफावला. अनेक मोगल बादशहांनीही पुढे या प्रकारास राजाश्रय दिला. शेवटचा मोगल बादशहा बहादूरशाह जफर याच्या पदरी ⇨गालिब  व जौक हे प्रसिद्ध गझलरचनाकार शायर असून स्वतः जफर एक प्रसिद्ध शायर होता.

गझल हा एक वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझल हा प्रकार प्राचीन असून, अरबी काव्यात ह्या प्रकाराचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापनेअगोदरचा आहे.[१]

गझलेमधे साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा शेर असते. शेरामधील ओळींना मिसरह असे म्हणतात.

गझलेतला प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.[२]गझलाचे अनेक चरण असून दर दोन चरणांच्या प्रत्येक खंडास ‘शेर’ म्हणतात. एका गझलात कमीत कमी पाच व अधिकात अधिक सतरा शेर असतात. पण यासंबंधी कोणताही काटेकोर नियम नसतो. शेरातील दोन सारख्या चरणांना मिळून ‘मिसरा’ म्हणतात. शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना ‘रदीफ’ म्हणतात. यांचे यमकाशी साम्य आहे. या रदीफच्या आधी येणाऱ्या व सारखे ध्वनी असणाऱ्या शब्दांना ‘काफिया’ म्हणतात. यांचे अनुप्रासांशी साम्य आहे. ज्या शेराच्या दोन्ही मिसरांमध्ये रदीफ आणि काफिया सारखे असतात, त्या शेरास ‘मतला’ म्हणतात. गझलाच्या आरंभी बहुधा मतला असतोच.गझलाच्या पहिल्या शेरास ‘स्थायी’ म्हणतात. उरलेल्या सर्व शेरांना ‘अंतरे’ म्हणतात. बहुधा सर्व अंतऱ्यांची चाल सारखी असते. ज्या रागांत ⇨ठुमरी  व ⇨टप्पा हे गायनप्रकार आविष्कृत होतात, त्यांचाच उपयोग गझलांच्या बाबतीतही बहुधा केला जातो. अर्थात रागविस्तार वा रागाची शास्त्रोक्तता यांवर भर नसतो. गझलाबरोबरचा ठेका दुसऱ्या शेरापासून किंवा पहिल्या शेराच्या चरणार्धापासून सुरू होतो. दादरा, रूपक, केरवा, पुश्तो हे ताल बहुधा वापरले जातात. पहिला शेर विलंबित लयीत आणि बाकीचे मध्य लयीत गायले जातात. 


मराठी गझलसंपादन करा

अमृतराय हे मराठीतले पहिले गझलकवी होत. ‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही त्यांची गझल इ.स. १७२९च्या सुमारास लिहिली गेली. हीच मराठीतली पहिली गझल समजली जाते. त्यानंतर कविवर्य मोरोपंत यांनीही गझला लिहिल्याचे ज्ञात आहे.

त्यानंतरच्या काळात माधव ज्युलियन यांनी अनेक गझला लिहिल्या. इ.स. १९२५ ते १९३४ या काळात त्यांनी मराठीतली पहिली गझल चळवळ चालवली. दुसरी गझल चळवळ इ.स. १९७५ ते १९९५ या दोन दशकांत फोफावली. या चळवळीचे प्रवर्तक सुरेश भट होते. या दोन्ही चळवळींचे कार्य व्यक्तिगत होते. मात्र त्यानंतर भटांच्याच प्रेरणेने तिसरी मराठी गझल चळवळ इ.स.१९९७ पासून सुरू झाली. हिचे प्रवर्तक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी होत. त्यांच्यामुळे मराठी गझल फोफावली आणि अशा काळात भीमराव पांचाळे पुढे आले, आणि भटांच्याच मार्गदर्शनाखाली मराठी गझलकारांत नवचैतन्य निर्माण केले. भटांचा ‘सप्‍तरंग’ हा पाचवा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्याच तालमीत अनेक गझलकार तयार झाले.

पुणे विद्यापीठात डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी २०१७च्या आसपास ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावर चर्चासत्र झाले.

मराठी गझलेचा परिचय करून देणारे पुस्तकसंपादन करा

'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' हे डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी गझलविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. मराठी गझलेविषयी प्रसिद्ध झालेल्या विविध समीक्षालेखांचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. मराठी गझलेच्या उगमापासून अगदी नव्या गझलकारांच्या पुस्तकांपर्यंत अनेक गोष्टींची मीमांसा त्यांच्या पुस्तकात येते. माधव ज्युलियन, सुरेश भट यांच्यापासून प्रसाद कुलकर्णी, हृदय, चक्रधर आदी नव्या गझलकारांपर्यंतचा मागोवाही या पुस्तकातून येतो. वेगवेगळी उदाहरणे सांगत त्यांनी गझलेचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे.

मराठी गझलेचा प्रसार करणार्‍या संस्थासंपादन करा

मराठी गझलकारांची पुस्तकेसंपादन करा

 • कारवा (प्रातिनिधिक गझलसंग्रह)
 • शब्द झाले सप्तरंगी (दिलीप पांढरपट्टे)
 • समग्र मराठी ग़ज़ल (खावर)
 • ग़ज़लिका (डॉ. राम पंडीत)
 • स्पर्शांकुर (भीमराव पांचाळे आणि राम पंडीत)
 • ऋतू वेदनेचा (संदिप माळवी)
 • मनस्पंदन (प्रमोद खराडे)
 • आंतरसल (अनंत नांदुरकर)
 • मराठी गझल- सुरेश भटांनंतर (प्रातिनिधिक गझलसंग्रह)
 • अंधाराचे दुःख (डी. एन.गांगण)
 • श्वासांच्या समिधा (सतीश दराडे)
 • कैदखान्याच्या छतावर (सतीश दराडे)
 • धगीचा निखारा (प्रकाश मोरे)
 • रूईची फुले (जयदीप विघ्ने)

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा