भास्करबुवा बखले, म्हणजे भास्कर रघुनाथ बखले (ऑक्टोबर १७, १८६९ - एप्रिल ८, १९२२) हे मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार होते. त्यांचा जन्म सुरतजवळील कठोर या गावी झाला. बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे त्यांनी गायनकलेचा श्रीगणेशा केला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखॉं यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत बखलेबुवांचे नाटकातील गाणे ऐकून आनंदाने बुवांची स्वतः शिकवणी घेतली. फैजमहंमदखॉं, नथ्थनखॉं आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.

भास्करबुवा बखले
आयुष्य
जन्म १७ ऑक्टोबर १८६९
जन्म स्थान कठोर, गुजरात
मृत्यू ८ एप्रिल १९२२
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
संगीत साधना
गुरू नथ्थनखॉं आग्रेवाले
घराणे ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर
संगीत कारकीर्द
पेशा गायक

शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली वापरून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किर्लोस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, ताराबाई शिरोडकर, गोविंदराव टेंबे आदींना भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर येथील मैफिली भास्करबुवांनी गाजवल्या.

१९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे 'रामराज्यवियोग' या नाटकात मंथरेची, संगीत सौभद्र या नाटकात नारदाची आणि संगीत शाकुंतलात शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमानसंगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखले यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते.

संगीत स्वयंवर या नाटकाला १० डिसेंबर २०१६ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने बालगंधर्व यांचे साथीदार ऑर्गनवादक हरीभाऊ देशपांडे ज्यांच्या ऑर्गनवादनाने मास्टर कृष्णराव खुष होऊन स्वयंवर नाटकाच्या पदांची मूळ बंदिशींची तालीम स्वतःदिली होती , यांनी ऑर्गनवर वाजविलेली स्वयंवर नाटकातली गाणी येथे ऐकता येतात.

दुर्दैवाने भास्करबुवांच्या आवाजातली एकही कलाकृति ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याच्या संगीताबद्दल लिहिलेले अर्धेमुर्धे पुस्तक भास्कबुवांच्या शैला दातार या नातसुनेने पूर्ण करून प्रकाशित केले आहे. सन १९२२ मध्ये भास्करबुवांचे दुःखद निधन झाले व त्यानंतर अध्यक्ष म्हणून मास्टर कृष्णराव यांनी भारत गायन समाजाची धुरा सांभाळली. मास्टर कृष्णरावांनी भारत गायन समाजाकरता एकूण सात भागांची रागसंग्रहमाला तयार केली. त्यात त्यांनी स्वनिर्मित राग व बंदिशी यांचा समावेश केला तसेच भास्करबुवांनी शिकवलेल्या बंदिशी आणि इतर पारंपारिक बंदिशी यांचादेखील अंतर्भाव केलेला आहे.

स्मृति महोत्सव

संपादन
  • पुण्याचा भारत गायन समाज दरवर्षी भास्करबुवांच्या स्मृतिदिनी संगीत समारोह आयोजित करतो.
  • भास्करबुवांच्या स्मरणार्थ १९२६मध्ये स्थापन झालेला मुंबईतील कल्याण गायन समाज, वर्षभर विविध संगीत सभा तर घेतोच, शिवाय त्यांच्या वर्षदिनी देवगंधर्व संगीत महोत्सव भरवतो.
  • चंदीगडमधील प्राचीन कला केंद्र दरवर्षी अखिल भारतीय भास्करराव नृत्य व संगीत संमेलन आयोजित करते.
  • पुणे विद्यापीठ बी.ए.ला संगीतात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला भास्करबुवा बखले पुरस्कार देते.
  • मुंबई विद्यापीठ असाच एक पुरस्कार एम.ए.ला संस्कृत हा विषय घेऊन पहिला आलेल्या विद्यार्थ्याला देते.

बाह्य दुवे

संपादन