देवराई

भारतीय संस्कृतीतील जैवविविधता सांभाळणारी धार्मिक आणि पर्यावरणीय संकल्पना

देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. इंग्लिश भाषेत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात.[] सहसा, अशी अरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने समाजाने सांभाळलेली असतात. अशा वनांना अनेकदा शरणवन, अभयारण्य किंवा अभयस्थान असेही म्हणले जाते. देवराया जशा भारतभर विखुरलेल्या आहेत तशा त्या भारताबाहेरही आहेत. काही भागांत देवरायांना ‘चर्च फॉरेस्ट’ असेही म्हणले जाते.[]

निलेश्वरम येथील देवराई
कन्नूर येथील वडाचे झाड
आंबेश्वर देवराई, आंबा(गाव)

इतिहास

संपादन

देवराईचे मूळ वैदिक संस्कृतीपासून सुरू झाल्याचे दिसून येते.[][] देवराई या संकल्पनेचा उगम कसा झाला याविषयी अनेक मतप्रवाह आहेत.[] या संकल्पनेचा मूळ गाभा श्रद्धा या विषयावर बेतला असल्याने, तोच मूळ उद्देश असावा असे अनेक जाणकार मानतात.[]अश्मयुगीन काळात जेव्हा शेतीसाठी जंगलतोड सुरू झाली तेव्हा जंगलाचे महत्त्व देखील लक्षात आले असावे. त्यातून मानवाच्या देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा योग्य वापर जंगलाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केला गेला.[]

पर्यावरण आणि जैव विविधता हे शब्द जरी आज आले असले तरीही त्यांच्या संवर्धनाची व संरक्षणाचीची सोय आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासूनच करून ठेवली हीच होती देव राहील एखादं छोटसं दगडी बांधकामाचे देऊळ किंवा कमरेत वाकलेले या झाडाखालचा एक चौथरा आणि उघड्या वर बसलेला तो देव मग तो म्हसोबा, भुतोबा, चाळोबा, वेताळबा, अथवा नावलाई, घाटजाई, वाघजाई, जननी-माता सारखी देवी आणि आसपासच्या परिसरातील एखाद्या वाळवंटातील मरुस्थळ सारखा हिरव्यागार पाचूचा झाडोरा म्हणजेच देवराई (देवराई -धडा एक पर्यावरणाचा २०१२,उमाकांत चव्हाण)

राज्यानुसार देवराई परंपरांची नावे

संपादन

देवराईसाठी इतर भारतीय भाषांमध्ये वापरले जाणारे शब्द -

  1. कर्नाटक: देवरकडू, नागबन, नागकुडू
  2. राजस्थान: जोगमाया, शरणवन, अभयस्थान
  3. बिहार : सरण्य
  4. ओरिसा : जाहेर
  5. महाराष्ट्र : राय, राई, देवराई
  6. छत्तीसगढ :सरणा, जाईनाथा
  7. केरळ : सर्पकाऊ, नागरकाऊ
  8. तमिळनाडू कोविलकाडू, शोला[][]

याखेरीज देवरहाटी, देवरकंड, सिद्दरवनम, ओरांस अशा वेगवेगळ्या संज्ञा देवराईसाठी आहेत.[१०]

देवराईतील देवता

संपादन

देवराई म्हणजे एक समृद्ध असा जंगलाचा तुकडा. देवराई ही एक परिपूर्ण परिसंस्था असते असे मानण्यास काही अडचण नाही. या सर्व वन-राज्यावर देखरेख करणारी एक सामर्थ्यशाली देवता देवराईत असते.[] ही शक्तिमान देवता बहुतेक तांदळा म्हणजे निराकार पाषाणाची असते. ५० ते ६० टक्के या देवता मातृदेवता असतात.[११] त्या काही ठिकाणी एकेकट्या तर काही ठिकाणी समूहाने असतात. डॉ. धर्मानंंद कोसंंबी यांनी नमूद केल्याप्रमाणे या मातृदेवतांचे वैशिष्ट्य म्हणजे या देवतांपैकी कुणालाही पुरुषसहचर नाही. शिरकाई, वरदाई अशी यांची नावे असतात. पुरुष देवता जेथे आहेत तेथे त्यांची नावे चेलोबा, म्हसोबा, बाजीबुवा, भैरोबा अशी दिसून येतात.[१२]

 
दक्षिण भारतातील स्थानिक दैवते

पर्यावरणीय महत्त्व

संपादन

देवाच्या नावाने राखून ठेवले असल्याने या वनाला वृक्षतोडीपासून एक प्रकारचे वेगळेच संरक्षण कवच असते. भारतात पश्चिम घाटासह संपूर्ण भारतभर दाट जंगलांचे हे पुंजके आढळतात.[१३]

जगभरातही अशा प्रकारची वने आहेत. ही वने अत्यंत निबिड असतात. देवराईमध्ये उंचउंच वृक्ष, जाडजाड खोडे असलेल्या व कधीकधी जमिनीवर पसरलेल्या महालता, पाऊल बुडेल असा पाचोळ्याचा थर, त्यातून धावणारे नानाविध प्राणी, मधूनच दिसणारे विविध पक्षिगण आणि प्राणी आढळू शकतात. देवराईतील पाण्याचा तसेच बारमाही झऱ्यांचा उपयोग आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांसाठी, गुराढोरांसाठीही होत असतो. या देवराया म्हणजे अनेक औषधी वनस्पतींचे भांडारच असतात.[१४]

[१५]वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांना देवराई या विषयावर अभ्यास करण्यासाठी वाव आहे.[१६] या देवरायांमध्ये विविध प्रकारची शैवाले, भूछत्रे, कवकवर्गी नेच्यांचे अनेकविध नमुने, ओंबळसारखी अनावृत्तबीजी महावेल, आणि अनेक पुष्पवंत वनस्पती, झाडाच्या फांद्यांवर वाढणारी सुगंधी ऑर्किड्‌स सारखी फूलेही पहायला मिळतात.[१७] सर्वेक्षणांनुसार प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ, नष्ट होत असलेल्या प्रजाती, धोक्याच्या पातळीवर असलेल्या प्रजाती फक्तं या देवरायांमध्येच आढळतात. उदा. उत्तर कन्नड जिल्ह्यातील देवरायांमध्ये असणारे सिंहपूछ वानराचे अस्तित्त्व.

देवराई म्हणजे नुसते देवाचे ठिकाण किंवा जंगल न्हवते, तर गावाची समृद्धी, संस्कार, परंपरा, व एकोपा याच देवरांनी जपलेला आहे देवराईतील झाडामुळे गारवा तर मिळतोच पण येथील वनस्पतींचे जमिनीवरील आच्छादन जमिनीची धूप थांबते यामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता चांगली राहते आजही एंटडा, अश्वगंधा, शतावरी, सारख्या दुर्मिळ औषधी वनस्पतीही या देवराईत सहजपणे मिळतात याच देवराईत मोठ मोठ्या वृक्षात आपले घरटे करणारे मलबारी धनेश यांसारखे पक्षी देखील आढळतात गुळवेल, हिरडा, अर्जुन, शतावरी सारख्या वनस्पतीही मिळतात तर वेगवेगळे पक्षीही पाहायला मिळतात या देवराईत महाकाय गारबी पिठगुलीच्या वेली लोमकळताना दिसत असतात अनेक दुर्मिळ वनस्पतींची रोपे आणि उत्तम प्रतीच्या बियांचा खजिना या देवराईतच सापडतो त्याबरोबरच शुद्ध प्राणवायू (O2) हाही देखील मिळतो. (देवराई -धडा एक पर्यावरणाचा २०१२,उमाकांत चव्हाण)

अभ्यासाचे महत्त्व

संपादन

पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातील संशोधक डॉ. धर्मानंद कोसंबी यांनी देवरायांचा पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, आणि भारतविद्याशास्त्र या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. डॉ. वा.द. वर्तक, डॉ. माधव गाडगीळ, कैलास मल्होत्रा आदी अभ्यासकांनी विसाव्या शतकाच्या मध्यापासून देवरायांचा विशेष अभ्यास केला आहे. डॉ. माधव गाडगीळ हे देवरायांचे तज्ज्ञ मानले जातात.[१८] त्यांचा अभ्यास करताना डॉ. वर्तकांनी १९८३ साली देवरायांमधील जैवविविधतेचे महत्त्व सांगितले. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील देवरायांचे पहिले पथदर्शक सर्वेक्षण केले.[१९][२०]

देवराईचे कार्य

संपादन

देवरायांच्या अनेकविध कार्यांपैकी वन्य पशु-पक्ष्यांना आसरा देणे,त्यांचे अधिवास म्हणून काम करणे हे एक अत्यंत मूलभूत कार्य आहे.एखाद्या देवराईची प्राणी विविधता किती संपन्न असते हे पुढील घटकांवर अवलंबून असते.त्यातील काही प्रमुख घटकः[२१]

१. देवराईचे भौगोलिक स्थान

२. देवराईचा आकार

३.वनस्पतींची विविधता

४.पंचक्रोशीतील वनांची अवस्था

५.सद्यस्थिती व मानवी हस्तक्षेप

रक्षणाचे प्रयत्न

संपादन

शहरीकरणाची लाट खेड्यापाड्यापर्यंत पोचली त्यामुळे देवराई ही संकल्पना हळूहळू काळाच्या ओघात धोक्यात आली आहे.[२२] मात्र १९९२ च्या ‘वसुंधरा परिषदे‘ने 'निसर्ग वाचवा' अशा धोरणाला अनुसरून जैव विविधता टिकवण्यासाठी, भारतीय उपखंडात दोन मर्मस्थळे ‘हॉट स्पॉट्‌स‘ म्हणून घोषित केलीत. पैकी एक ईशान्य हिमालय [२३] आणि दुसरा पश्चिम घाट. हे दोन्हीही पर्जन्यवनांचे प्रदेश आहेत.

कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात 'सह्याद्री संवर्धन केंद्र' यांच्याकडून देवराई संवर्धन व संरक्षण कार्यशाळा राबविल्या जातात. यामध्ये देवराईचे महत्व त्यांचे उपयोग देवराईंना असणारे धोके याबाबतची माहिती चित्रफितीतून दिली जाते.

निरीक्षण

संपादन

१. देवरायांचा उदय, त्यांचे अस्तित्त्व व संवर्धन याला परंपरा आहे. प्रत्येक देवराईच्या काही विशिष्ट श्रद्धा, संकेत आणि परंपरा आहेत. हजारो वृक्ष आणि त्याच्या शेकडो प्रजातीनी मिळून देवराया बनल्या आहेत.[२४] त्यामुळे देऊळ बांधून त्याच्या आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणता येणार नाही. देवराईचे क्षेत्र केवढे असावे याला बंधन नाही; मात्र संबंधित गावाशी नाळ त्या क्षेत्राशी जोडलेली असली पाहिजे, असे किमान बंधन आहे. त्याचे संवर्धन करण्याचे काम गावकरी करत असले पाहिजेत.
२. वन विभागाने पाश्चात्य झाडे लावून वाढवलेल्या जंगलास देवराई म्हणता येणार नाही.
३. कोणीही देवराईतील झाडाची फांदीही तोडत नाहीत. सुकलेल्या झाडाची काटकीही घरी घेऊन जात नाहीत. झाडावरचे किंवा झाडावरून खाली पडलेले फूलही देवाला वाहत नाहीत. देवराईत चप्पल घालून जायचे नाही. असे संकेत पाळले जात असतील तरच त्या जंगलाला “देवराई’’ म्हणायचे.
[२५]

महाराष्ट्रातील देवराया

संपादन

कोकणच्या रत्‍नागिरीसिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांत मिळून सुमारे २,५०० हजार देवरायांची नोंद केली गेली आहे. त्यापैकी १६०० सिंधुदुर्गात तर उर्वरित रत्‍नागिरी जिल्ह्यात आहेत.[२६] ह्या जिल्ह्यांत सुमारे नऊशे ते हजार वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. त्यांपैकी शंभराहून जास्त दुर्मीळ आणि लुप्तप्राय वनस्पती यांतील बऱ्याच देवरायांमध्ये आहेत. देवरायांच्या बाबतीत रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग इतके समृद्ध आहेत की जवळ जवळ प्रत्येक गावात एक किंवा दोन देवराया आहेत. देवराई ही बहुधा देवळाभोवती असते. त्यामुळे तिथले अजस्र बुंध्याचे शेकडो वर्षे वयाचेष जुने वृक्ष, महाकाय वेली टिकून आहेत. माडगरुडासारखे पक्षी हे देवरायांचे खरे वैभव होय.[२७] बहुतेक देवरायांमध्ये गुळवेलची आणि खूप विस्तारलेल्या बेहड्याची झाडे आढळतात. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावरच्या औषधांत वरदान असलेल्या ‘अमृता’सारख्या वनस्पती काही देवरायांमध्ये दिसतात. आजीबाईंच्या बटव्यातील अनंतमूळ, काडेचिरायत, अशा नेहमीच्या वापरातील औषधी, झाडपाला आणि सीतेचा अशोक वृक्ष देवरायांमध्ये खात्रीने सापडतो. अनेक देवरायांमध्ये जुने वटवृक्ष, हजारो फुले ओघळवणारे बकुळीचे पुरातन वृक्ष, तसेच गच्च केवड्याची बने आहेत. बहुतेक देवरायांमध्ये वड बेल, पिंपळ, आपटा, दासवण, काजरा, कडूकवठ, अशोक, चांदफळ हे वृक्ष आहेत.

महाराष्ट्रातही सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, विंझाई ,म्हसोबा, सोनजाई, आंबेश्वर अशा अनेक देवतांच्या नावाने त्या त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भोवतालचा परिसर तेथील आदिवासी, गांवकरीच जतन करीत असतात. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम घाटात अनेक देवराया आढळतात. पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी या तालुक्यात देवरायांची संख्या अधिक आहे.[२८] या देवरांयामध्ये झाडावरचे फूलही निसर्गतःच खाली पडल्याशिवाय देवाला वाहिले जात नाही. देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी असते. देवराया या जंगलातील आदिवासींनीच जतन केलेले संरक्षित क्षेत्र असल्याने विविध प्रकारचे वनस्पती, प्राणी, कीटक तेथे आश्रय घेतात. कित्येक दुर्मीळ सजीव केवळ देवरायांच्या परिसरात आढळतात. वनस्पतींची येथे कोणतीही हानी होत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातही शेकडो कीटक, कवक, गांडूळ यांच्या जाती तेथे सापडतात. कर्नाटकातील काही देवरायांमध्ये पामच्या दुर्मीळ जाती आढळतात. देवरायांमुळे मातीची सुपीकता तर वाढतेच, पण जमिनीखालच्या पाण्याचेही संवर्धन होत असते.

काही देवराई फॉरेस्ट खात्याकडे, काही खाजगी मालकीच्या, काही सामाजिक वनोकरणाकडे, तर काही गावाच्या मालकीच्या आहेत. पण एकंदरीत आजकाल मूळ दगडांची मंदिरे आणि चौथरे यांची जागा सिमेंटच्या आर,सी,सी मंदिरानी घेतल्यामुळे मूलभूत सौंदर्यच नष्ट झालेल आहे. याचबरोबर त्या बांधकामासाठी थोड्याफार प्रमाणात वृक्षतोड ही करण्यात आलेली आहे. त्यापैकी गगनबावडा, राधानगरी, आजरा, गारगोटी, चंदगड या परिसरातील देवराई बऱ्यापैकी सुस्थितीत आढळतात. बाकी अंदुरची महादेव राई सुलगांवची केदारलिंगराई, अंदूरची रासाई मोराई, नरवेलीची गांगोबा, करंजफेनची विठ्ठलाई इत्यादी देवराया विकासाच्या नावाखाली तोडल्या गेल्या. तर वाकीघोल ची वाकेश्वर, लखमापूर ची गांगोबाराई, सारख्या देवरायांवर धरणे व पाणलोट क्षेत्रात मुळे अवकळा आली. पण आजही ही या बिकट परिस्थितीत काही श्रद्धाळू गावकरी व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे हे ऑक्सिजन पार्क गावाच्या एका कोपऱ्यात काळाचे व आधुनिक विकास प्रकल्पाचे घाव सोसत तग धरून उभे आहेत.

 
पश्चिम घाट- ताम्हिणी,पुणे जिल्हा

वैशिष्ट्यपूर्ण देवराया-

१. कुंवारा भिवसन(रामटेक, नागपूर) : मुरुड शेंगेची विपुल झाडे

२. माय गवस देवराई (हेवळे, सिंधुदुर्ग) : सीतेच्या अशोकाची विपुल झाडे

३. स्मृती देवराई (म्हाळुंगे, कोल्हापूर) : पूर्वजांच्या स्मृतीचे जतन

४. जैन पार्श्वनाथ देवराई (इब्राहीमपूर, चंदगड) : बारमाही जलस्रोतांचे रक्षण

५. पेमगिरी महावृक्ष (संगमनेर) : पिंपळाच्या जातीची झाडे

६. भीमाशंकर देवराई (पुणे) : शेकरू या प्राण्याचे संवर्धन [२९]

कोकणातील काही देवराया-[३०]

  • कुंडीची देवराई : या देवराईत तीस फूट घेराचा भला मोठा दासवनाचा वृक्ष आहे.
  • कुरवंड्याच्या राईत कडूकवठाचे अनेक वृक्ष आजही टिकून आहेत.
  • जानवळे-पाटपन्हाळेच्या देवरायांत दासवण, कडू कवठ, अर्जुन, बेल असे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात.
  • तामनाळ्याच्या देवराईत राळधुपाचे वृक्ष आहेत.
  • कुंडे, मार्लेश्वर, उजगाव, कुळे, मासरंग येथील देवरायांत पाण्याची कुंडे आहेत.
  • विग्रवली, काटवली, कुरघुंडा, बाशी यांसारख्या देवरायांतही जुन्या विहिरी आणि कुंडेही आहेत. अासपासच्या बाकीच्या ठिकाणी भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असली, तरी देवराईमधल्या जलस्रोतांना भरपूर पाणी असते, आणि उन्हाळ्याच्या दिवसांत गावाचा पाणीपुरवठा येथील विहिरींवरच अवलंबून असतो.संगमेश्वर तालुक्यातील धामणी या गावातील बाजीबुवा मंदिर व श्री देवी वाघजाई मंदिर येथील देवराई समृद्ध आहे.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडोबा, मोचीमाडजवळ एक वैशिष्ट्यपूर्ण देवराई आहे. येथे एकच झाड आहे आणि ते संरक्षित आहे. दुसरीकडे याच भागातील डोंगोबा कोचऱ्याजवळची देवराई तब्बल १०० एकरांवर पसरली आहे.

देवराईतील वन्यप्राणी

संपादन

सर्वच देवरायांमध्ये विपुल प्रमाणात प्राण्यांचे वैविध्य आढळते.[३१] कोकणाचे वैभव असणारे माडगरुडासारखे पक्षी, भेकर, पिसोरी, ससे, मोर , कोल्हे असे पूर्वी सर्वत्र आढळणारे वन्यजीव देवरायांच्या आश्रयाने राहतात.देवराई आकाराने मोठी असल्यास सांबर, भेकर यासारखे मोठे प्राणी खाद्यशोधार्थ भेट देतात किंवा तात्पुरत्या मुक्कामासाठी येतात.ज्या देवराया सह्याद्रीच्या मुख्य रांगेत आहेत तेथे वर्षभर माकडे असतात.रानडुकरे,शेकरू,उदमांजर,सायाळ,असे प्राणी येथे आढळतात.

पक्षी

संपादन
 
इंडियन रोलर पक्षी

बहुतेक देवराया पक्षी संपन्न आहेत.डॉ.देब व अन्य यांनी १९९७ मध्ये लिहिताना ,देवराया पक्ष्यांची शेवटची आश्रयस्थाने असल्याचे म्हणले आहे.सूर्यपक्षी,बुलबुल,कुकू,,धनेश ,घुबडे,तांबट ,कोतवाल,पोपट यांच्या विविध प्रजाती देवरायात आढळून येतात असे रत्‍नागिरी जिल्ह्यातील देवरायांच्या सर्वेक्षणात आढळले आहे.[३२]

केरळ राज्यातील देवराया पक्षी वैभवाने समृद्ध आहेत.[३३]

झाडा-झुडपांचे गचपण, पुरेसा आडोसा, गारवा, संरक्षण यामुळे देवराईमध्ये साप, सरडे, पाली, सापसुरळ्या, नागांचे विविध प्रकार कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळ्या प्रजातीनुसार आढळून येतात. बेडकांचे 25-30 प्रकार पावसाळ्यात देवराईत आढळतात.

भारतातील देवराया

संपादन

संपूर्ण भारतात हिमालयाच्या परिसरात[३४] तसेच राजस्थान,कर्नाटक, आंध्र प्रदेश [३५] अशा विविध राज्यात देवराया आस्थेने जपलेल्या दिसून येतात.

भारताबाहेरील देवराया

संपादन

प्राचीन परंपरांपैकी ग्रीक आणि रोमन संस्कृतीत देवराईचे उल्लेख आढळतात. ओक वृक्षांची देवराई "डोडोना" आणि अथेन्स शहराबाहेरील ऑलिव्ह वृक्षांची संरक्षित भूमी "The Groves of academe" या नावांनी प्रसिद्ध आहे.रोममधील "Roman Forum" आणि इटलीमधील "Bosco Sacro" या देवराया प्रसिद्ध आहेत.नायजेरिया या आणखी एका आफिकन देशात UNESCO World Heritage म्हणून प्रसिद्ध असलेली "Osun-Osogbo" नावाची देवराई आहे.[३६][३७]

 
परदेशातील एक राखीव जंगल

काही प्रसिद्ध देवराया

संपादन
  • अधिष्ठी-अंबा
  • मार्लेश्वर
  • वाघजाईची देवराई
  • शिरसिंगी
  • वाकीघोल
  • लखमापूर ची गांगोबाराई
  • करंजफेनची विठ्ठलाई
  • शिरशिंगी

साहित्य व माध्यमांंमधे

संपादन
  • 'देवराई' या विषयावर उमाकांत चव्हाण यांचे एक पुस्तक २०१२ साली प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील देवराईंची सखोल माहिती दिली गेलेली आहे. देवराई समोरचे धोके, देवराईंची व्यवस्थापन आणि उपयोग, संगोपन व संवर्धन कसे करायचे याची विस्तृत माहिती दिली गेलेली आहे.
  • याच विषयावर 'देवराई' नावाचा सुमित्रा भावे यांनी काढलेला एक पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट आहे.अतुल कुलकर्णी यांंची यात महत्त्वाची भूमिका आहे.

संकेतस्थळ

संपादन

महाराष्ट्रातील देवराया

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Verschuuren, Bas; McNeely, Jeffrey; Oviedo, Gonzalo; Wild, Robert (2012-06-25). Sacred Natural Sites: Conserving Nature and Culture (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781136530746.
  2. ^ डॉ. हेमा साने, डॉ. विनया घाटे, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७
  3. ^ Taylor, Bron (2008-06-10). Encyclopedia of Religion and Nature (इंग्रजी भाषेत). A&C Black. ISBN 9781441122780.
  4. ^ Krishna, Nanditha (2017-12-26). Hinduism and Nature (इंग्रजी भाषेत). Penguin Random House India Private Limited. ISBN 9789387326545.
  5. ^ Woudstra, Jan; Roth, Colin (2017-08-24). A History of Groves (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781317200161.
  6. ^ a b GADGIL, MADHAV; CHANDRAN, M. D. SUBASH (1992). "Sacred Groves". India International Centre Quarterly. 19 (1/2): 183–187.
  7. ^ दीपक जाधव, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक (२०१७)
  8. ^ डॉ.गोखले योगेश, भवताल द्वैमासिक, (दिवाळी विशेषांक) २०१७
  9. ^ Bedi, Freda Marie (Houlston) (2009). Social Welfare (इंग्रजी भाषेत). Publications Division.
  10. ^ साईली पलांडे दातार, भवताल दिवाळी विशेषांक (देवराई) 2017
  11. ^ Krishna, Nanditha (2017-12-26). Hinduism and Nature (इंग्रजी भाषेत). Penguin Random House India Private Limited. ISBN 9789387326545.
  12. ^ डॉ.हेमा साने, डॉ. विनया घाटे, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७
  13. ^ Gadgil, Madhav; Vartak, V. D. (1976-04-01). "The sacred groves of Western Ghats in India". Economic Botany (इंग्रजी भाषेत). 30 (2): 152–160. doi:10.1007/BF02862961. ISSN 0013-0001.
  14. ^ Cederlöf, Gunnel; Sivaramakrishnan, K. (2005). Ecological Nationalisms: Nature, Livelihoods, and Identities in South Asia (इंग्रजी भाषेत). Permanent Black. ISBN 9788178241241.
  15. ^ Jain, Pankaj (2016-04-22). Dharma and Ecology of Hindu Communities: Sustenance and Sustainability (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781317151609.
  16. ^ Pungetti, Gloria; Oviedo, Gonzalo; Hooke, Della (2012-07-19). Sacred Species and Sites: Advances in Biocultural Conservation (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 9780521110853.
  17. ^ "खुलली विविधरंगी वृक्षसंपदा! -Maharashtra Times". Maharashtra Times. 2014-03-22. 2018-05-01 रोजी पाहिले.[permanent dead link]
  18. ^ Gadgil, Madhav; Guha, Ramachandra (1993-03-31). This Fissured Land: An Ecological History of India (इंग्रजी भाषेत). University of California Press. ISBN 9780520082960.
  19. ^ "हिरवा कोपरा : परंपरागत ठेवा देवराई". Loksatta. 2017-12-20. 2018-05-01 रोजी पाहिले.
  20. ^ Lewis, Michael L. (2003). Inventing Global Ecology: Tracking the Biodiversity Ideal in India, 1947-1997 (इंग्रजी भाषेत). Ohio University Press. ISBN 9780821415405.
  21. ^ सुरेश. "लोके".
  22. ^ Verschuuren, Bas; McNeely, Jeffrey; Oviedo, Gonzalo; Wild, Robert (2012-06-25). Sacred Natural Sites: Conserving Nature and Culture (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781136530746.
  23. ^ Gokhale, Yogesh; Negi, Ajeet K. (2011-01-01). Community-based Biodiversity Conservation in the Himalayas (इंग्रजी भाषेत). The Energy and Resources Institute (TERI). ISBN 9788179934036.
  24. ^ Verschuuren, Bas; McNeely, Jeffrey; Oviedo, Gonzalo; Wild, Robert (2012-06-25). Sacred Natural Sites: Conserving Nature and Culture (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781136530753.
  25. ^ राजेंद्र जाधव, भवताल द्वैमासिक (दिवाळी अंक ) २०१७
  26. ^ Ranade, Prabha Shastri (2009). Infrastructure Development and Its Environmental Impact: Study of Konkan Railway (इंग्रजी भाषेत). Concept Publishing Company. ISBN 9788180694509.
  27. ^ "जैवविविधतेचे आगर - कोकण -Maharashtra Times". Maharashtra Times. 2016-06-05. 2018-05-01 रोजी पाहिले.[permanent dead link]
  28. ^ Pullaiah, T.; Krishnamurthy, K. V.; Bahadur, Bir (2016-12-01). Ethnobotany of India, Volume 2: Western Ghats and West Coast of Peninsular India (इंग्रजी भाषेत). CRC Press. ISBN 9781315341927.
  29. ^ साईली पलांडे -दातार, भवताल द्वैमासिक (दिवाळी अंक) २०१७
  30. ^ कोनकर अनिकेत. "जैवविविधतेचे आगार-कोकण".[permanent dead link]
  31. ^ Pungetti, Gloria; Oviedo, Gonzalo; Hooke, Della (2012-07-19). Sacred Species and Sites: Advances in Biocultural Conservation (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 9780521110853.
  32. ^ डॉ.नलावडे संजीव ,भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक)२०१७
  33. ^ Palot, Praveen J. C. Shashikumar, Mohammad Jafer (2011-10-13). Birds of Kerala (इंग्रजी भाषेत). D C Books. ISBN 9788126436781.
  34. ^ K.P, Laladhas; Oommen, Oommen V.; P.R, Sudhakaran (2015-03-06). Biodiversity Conservation - Challenges for the Future (इंग्रजी भाषेत). Bentham Science Publishers. ISBN 9781681080215.
  35. ^ Office, World Wide Fund for Nature--India A. P. State (1996). Sacred and protected groves of Andhra Pradesh (इंग्रजी भाषेत). World Wide Fund for Nature--India, A.P. State Office.
  36. ^ डॉ.तेरवाडकर शार्दुली,भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७
  37. ^ Tuxill, John D.; Nabhan, Gary Paul (2001). People, Plants, and Protected Areas: A Guide to in Situ Management (इंग्रजी भाषेत). Earthscan. ISBN 9781853837821.