सायाळ

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: कुरतडणारे प्राणी
कुळ: Hystricidae
जातकुळी: Hystrix
शास्त्रीय नाव
Hystrix indica

वर्णन

संपादन

सायाळ(स्त्रीलिंगी), साळिंदर, साळू (इंग्रजीत, Porcupine) या नावाने ओळखला जाणारा साधारण तीन फुटांपर्यंत वाढणारा हा कुरतडणाऱ्या जातीचा प्राणी आहे. सस्तन प्राणी असल्याने सायाळीची मादी पिलांना जन्म देते आणि त्यांना आपले दूध पाजते. नर पिले मोठी झाल्यावर आपला वेगळा घरोबा करतात तर मादी पिले मोठी झाल्यावरही आपल्या आईच्या सोबतच राहतात.

साधारणपणे मार्च महिन्यात सायाळीला पिले होतात. गर्भावस्था सुमारे दोन महिन्यांची असतो. एकावेळी दोन ते चार पिले जन्मास येतात. नर-मादी दोघेही बिळामध्ये पिलांची काळजी घेतात. पिलांचे डोळे जन्माला येताना उघडे असतात. त्याचवेळी त्यांच्या शरीरावर मऊ व छोटे काटे असतात.

सायाळीच्या कातडीचा रंग मुख्यत्वे काळा असून, पाठीकडून मागच्या बाजूला असलेले केस विशेष पद्धतीने विकसित झाले आहेत. हे केस कडक असल्याने ते काट्यासारखे टोकदार होतात. हे 'काटे' पांढऱ्या तपकिरी रंगाचे आणि पूर्णपणे पोकळ असतात. पाठीवरील असे केस ३० सें.मी. पर्यंत लांब असतात. सायाळीच्या जिवाला धोका असल्यास ती आक्रमण करणाऱ्याकडे पाठ करून उभी राहते, व अंगावरील काटेदार केस उभे करते. शिकारी जास्तच जवळ येत असल्याचे दिसल्यावर सायाळ त्याच्या अंगावर उलट दिशेने वेगाने धावून जाते आणि आपले अतिशय टोकदार काटे त्याच्या अंगात सोडून क्षणात समोरच्या दिशेने धावते. हे इतक्या वेगात घडते की त्यामुळे सायाळ ही बाणासारखे काटे फेकून मारते असा एक गैरसमज पसरला आहे. सायाळीच्या या विशेष हत्याराने वाघ, बिबटेही जखमी होतात.

काट्यासारखे कडक आणि टोकदार झालेले सायाळीचे केस परत परत उगवतात. या विशेष केसांशिवाय सस्तन पशूंना असतात तसे साधे केसही सायाळीला जन्मतःच असतात.

सायाळीचे दात आतल्या बाजूने घासून धारदार केलेले असतात. हे दात नेहमी झिजतात पण लवकरच त्यांच्या जागी नवीन दात येतात. विविध प्रकारची कठीण कवचाची फळे व त्यांच्या बिया हे पशू सहजपणे फोडून खातात. मृत हरणांची शिंगेही हे चघळतात आणि खातात. यामुळे सायाळीच्या काट्यांच्या वाढीला पूरक असा कॅल्शियमयुक्त आहार मिळतो.

सायाळ ही मध्यपूर्व ते दक्षिण आशियात सर्वत्र आढळते. उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण वनांच्या पोकळ, खडकाळ प्रदेशांत तसेच पानगळीच्या जंगलात, कमी उंचीच्या जंगलात, वगैरे शेतात हा प्राणी जमिनीत बिळे करून राहतो. बिळाच्या गाभ्यात सायाळ कुटुंब एकत्र राहते. साठवून ठेवलेले अन्नही याच गाभ्यात असते. गाभ्याच्या अंतर्भागापासून सर्व दिशांनी दूरपर्यंत बोगदे केलेले असतात. जमिनीवर चरतांना कुठल्याही दिशेने आक्रमण होत असेल तर कुटुंबप्रमुख सायाळ सोडून सर्व लहान पिले अशा बोगद्यातून आपल्या घरात शिरतात.

भक्ष्य/आहार

संपादन

सायाळ हा शाकाहारी प्राणी आहे. सर्व प्रकारच्या भाज्या, धान्ये, फळे तसेच झाडांची मुळे हे त्यांचे अन्न आहे. यामुळे त्या बागायती पिके व शेतीचे फार नुकसान करतात.