केवडा (अन्य मराठी नावे: केतकी ; शास्त्रीय नाव: Pandanus Odoratissimus, पांदानस ओडोटिसिमस ; इंग्लिश: Screw Pine, स्क्रू पाइन ;) ही आग्नेय आशिया, दक्षिण आशिया या प्रदेशांत आढळणारी सुगंधी वनस्पती आहे. केवड्याची नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. याचे कणीस म्हणजे नरफूल २५-५० से.मी. लांब असते. त्यात ५-१० से.मी. लांब अनेक तुरे असतात व त्यावर पांढरट पिवळे सुगंधी आवरण असते, तर मादी फूल लहान असून (५ से. मी.) त्याचे पुढे पिवळे व पिकल्यानंतर लाल रंगाचे लंबगोल १५-२५ से. मी. लांबीचे फळ तयार होते.


केवडा

लागवड संपादन

 
केवड्याचे बन

लागवडीसाठी ३-४ इंच जाडीचे २/२.५ फूट लांबीच्या फुटव्यांची अथवा फांद्याची लागण करावी. याच्या खोडाला जमिनीपासून थोडय़ाशा अंतरावर आधारमुळे येतात. वाढणाऱ्या झाडास या हवेतील मुळांपासून आधार मिळतो. केवड्याची अभिवृद्धी जमिनीतून निघालेल्या फुटव्यांपासून अथवा जुन्या फांद्यांपासून करतात. सुगंधी कणसाकरिता नर झाडांची लागवड करतात.

भारतातील उत्पादन संपादन

भारतात केवडा आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओरिसा, गुजरात, अंदमान व कोकणात आढळतो. ओरिसामध्ये मोठय़ा प्रमाणावर याचे उत्पादन घेतले जाते.

उपयोग संपादन

केवडा ही बहुउपयोगी वनस्पती असून सुगंधी औषधी व इतर उत्पादनासाठी केवडय़ाचा उपयोग होतो. फुलांचा वापर केवडा अत्तर, केवडा तेल व केवडा पाणी यासाठी करतात. जल ऊर्ध्वपतनाने केवडा तेल व केवडा पाणी मिळते. केवड्याचे तेल काढताना केवड्याच्या कणीसापासून हिरवी पाने वेगळी करतात व कणसाचे ३-४ तुकडे करून स्टेनलेस स्टीलच्या ऊर्ध्वपतन यंत्रात पाण्यासह घालून गुलाबाप्रमाणेच ऊर्ध्वपतन प्रक्रिया करतात. केवड्याच्या तेलात सुमारे ७.५ टक्के मिथाईल बीटा फिनाईल इथाईल ईथर हे रासायनिक घटक द्रव्य असते. केवड्याच्या पाण्याचा वापर विविध प्रकारांच्या मिठायांत केला जातो. सरबते तयार करण्यासाठी देखील केवडा पाणीचा वापर केला जातो. केवडा तेलाचा वापर पान मसाल्यात, जर्दा तसेच उच्च प्रतीच्या सौंदर्यप्रसाधनात केला जातो.