ईश्वर

(देव या पानावरून पुनर्निर्देशित)

ईश्वर ह्या संज्ञेने एकेश्वरवादात एका देवतेचा उल्लेख केला जातो, किंवा अनेकेश्वरवादात एकतत्त्वीय देवतेचा निर्देश केला जातो. पण दुनियेची निर्मीतीनंतर मानवाच्या अस्तीत्वापासून जगभरातील प्रत्येक मानवाचा धर्म हा एकच होता व आहे या धर्मात ब्रम्हा, विष्णू व शिव या तीन देवता आहेत, जे विश्वाचे प्रमुख उर्जा स्रोत आहेत. यातील ब्रम्हा हे निर्माते आहेत, त्यांनी ब्रम्हांडाची निर्मीती केली; शिव/महेष हे जीवन आहेत, ते प्रत्येक जिवाचा प्राण आहेत; विष्णू हे कर्ता आहेत, ते प्रत्येक जीवाकडून त्याचे कार्य करून घेतात. या तीनही उर्जा एकमेकांवर अवलंबून आहेत व त्या आपले कार्य अविरतपणे करत आहेत. यामध्ये कोण्या एकट्याच्या वर्चस्वाचा प्रश्नच नाही. या उर्जा आपले कार्य अनंत काळ सूरू ठेवतील. मनुष्य ही या शक्तींची सर्वात अद्यवत रचना आहे, जी या उर्जांना आपल्या रूपात पहाते व त्यांची विविध रूपांत व विविध नावांनी पूजा करते. यातील बहुतांश अवतार हे सनातन हिंदू धर्मात विविध अवतारांत पूजनीय आहेत. तसेच विश्वाच्या ईतर प्रांतातील विविध धर्मांत जे विविध नावांनी ओळखले जातात ते विश्वाचा प्रमूख धर्म असणाऱ्या सनातन हिंदू धर्मात वेगळ्या नावांनी उल्लेखीत आहेत. हिब्रू बायबलमध्ये "आय अ‍ॅम दॅट आय अ‍ॅम" आणि वायएचव्हीएच ही चार मुळाक्षरे (टेट्राग्रामॅटन) ईश्वराची नावे म्हणून वापरलेली आहेत; तर ख्रिश्चन धर्मात याहवेह व जेहोवा ही वायएचव्हीएचची नादरूपे म्हणून वापरलेली आढळतात. अरबी भाषेत अल्ला हे नाव वापरले जाते आणि अरबी भाषिकांमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य असल्याने "अल्ला" या नावासोबत इस्लामी श्रद्धा आणि संस्कृतीचे निर्देश येतात. इस्लाममध्ये ईश्वरासाठी अनेक नावे आहेत, तर यहुदी धर्मात इलोहिम व अडोनाई या मुख्य नावांनी ईश्वराला ओळखले जाते. अतिनैसर्गिक निर्माता आणि मानवजात व विश्वाचा नियंत्रक म्हणून ईश्वराला संकल्पित केले जाते. ईश्वरवाद्यांनी ईश्वराच्या विविध संकल्पनांना विविध गुण आरोपिलेले आहेत. त्यांमध्ये प्रामुख्याने सर्वज्ञता (अमर्याद ज्ञान), सर्वशक्तिमानता (अमर्याद सामर्थ्य), सर्वव्यापकता (सर्वत्र असणे), सर्वकल्याणदृष्टी (परिपूर्ण चांगुलपणा), दैवी सरलता आणि शाश्वत व आवश्यक अस्तित्त्व यांचा समावेश होतो. ईश्वर अमूर्त (द्रव्याने न बनलेला), वैयक्तिक अस्तित्त्व, समग्र नैतिक बंधनांचा स्रोत आणि "ज्याची कल्पना केली जाऊ असते असे सर्वश्रेष्ठ अस्तित्त्व" याही मार्गांनी संकल्पित केला गेलेला आहे. प्रारंभीच्या ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम ईश्वरवादी तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर या गुणारोपांचे समर्थन केले. अनेक उल्लेखनीय मध्ययुगीन आणि आधुनिक तत्त्वज्ञांनी ईश्वरास्तित्वाच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात युक्तिवाद केले आहेत. सिस्टाईन चॅपेलमधील मायकेलेंजेलोने बनविलेले भित्तिलेपचित्र : पाश्चात्य कलेतील 'पिता' ईश्वराचे उत्कृष्ट उदाहरण जातो.[][] [] इतर धर्मांमध्येही ईश्वरासाठी नावे आहेत : नमुन्यादाखल बहाई पंथात बहा,[] शीख धर्मात वाहेगुरू[] आणि झरतुष्ट्रमतात अहुर मज्द.[]

अनेक धर्मांच्या विश्वासानुसार देव ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे. विविध धर्मांत देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्मात देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म इत्यादी संकल्पना आहेत. ख्रिस्ती धर्मग्रंथ बायबलमध्ये देवाला सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ म्हणले आहे.

देव नावाची माणसे

संपादन

वि.कृ.श्रोत्रिय यांनी १९३७ साली लिहिलेल्या वेदांतील गोष्टी या पुस्तकातले पहिले वाक्य आहे.."फार प्राचीन काळी आपल्या देशात देव नावाचे लोक राहात असत."..

संत तुकाराम

संपादन

तुकारामाच्या मते - देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर॥

चार्वाकाचा देव

संपादन

यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।।

जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मजॆत जगा, वेळप्रसंगी कर्ज काढून तूप प्या, एकदा का देह चितेमध्ये भस्म झाला की संपले, तो देह परत कुठून येणार?

वैदिक देव

संपादन

प्रथमतः देव ही संकल्पना समजून घेऊ. वैदिक काळात देव, मूर्तिपूजा, यज्ञ, इत्यादी कर्मकांडे नव्हती. वैदिक कालखंडाच्या अखेरच्या काळात देव ही कल्पना समाजात रुढ होत गेली. मनुष्य स्वभावाचा विचार केला तर काही मर्यादेत ते योग्यही होते. कालांतराने देवावरचे अवलंबित्व वाढले, कर्मकांडे वाढली. या गोष्टींचा समाजात अतिरेक झाला व समाज निष्क्रिय होऊ लागला. तो पाहून, याला पहिल्यांदा विरोध केला तो गौतम बुद्धांनी!

देव शब्दाची व्युत्पत्ती देव: दानात् वा दीपनात् वा द्योतनात् वा । द्युस्थानः भवति इति वा । मराठीत अर्थ - देव दाता आहे, तो प्रकाशमान आहे, इतर वस्तू प्रकाशित करतो किंवा द्युलोकात राहतो म्हणून देव! देव शब्दाची दा - देणे किंवा द्युत - प्रकाशणे किंवा दीप् - प्रकाशविणे या धातुपासून व्युत्पत्ति साधली आहे[]. या दा वरूनच दाता शब्द आला आहे. आपण देवाची भक्ती करतो, पूजा करतो, त्याला नमस्कार करतो व काहीतरी मागणे मागतो. त्याची पूर्तता करण्यासाठी, ते मिळण्यासाठी, फलद्रूप होण्याची आपण देवाकडून अपेक्षा करतो. देव आपल्याला ते देईल, असा विश्वास असतो. म्हणजेच देणारा तो देव!

आपल्या इच्छा व वृत्ती अनेक प्रकारच्या आहेत. त्यानुसार प्रत्येकाची देवाची संकल्पना निरनिराळी असणार! त्यामुळे देवांचे आकार, रंग, वगैरे पण निरनिराळे आहेत. याचेही एक शास्त्र आहे.

विश्वाची निर्मिती आत्मतत्वापासून क्रमागत आकाश, वायू, तेजस, आप व पृथ्वी या पाच तत्वात झाली आहे. प्रत्येक तत्वाचा एक वर्ण व गुण आहे. ही तत्वे अव्यक्त असून अतींद्रीय ज्ञानाद्वारे तिची जाणीव होते, अनुभूती येते. आपल्या ऋषिमुनींना, खऱ्या संतांना व ज्ञानी लोकांना, हे माहित होते व आहे. ही विश्व निर्मितीची प्रक्रिया व मनावर होणारे संस्कार, तद्नुसार असणारी वृत्ती, यांची सांगड घालून, त्यांना मूर्त रूप दिले व देवदेवतांच्या मूर्ती अथवा प्रतिमा बनवल्या. देवदेवतांना मानवी जीवनाचा भाग बनविण्यासाठी, त्यांच्यावर कथा रचल्या गेल्या. त्यांचे अवतार कल्पीले, त्यांचे जन्म-मृत्यू, जीवन पण दाखवले. त्यांचा दुष्ट वृत्तीचे लोकांशी संघर्ष, दानवांशी संघर्ष, वगैरेही दाखवले. एवढेच नव्हे तर त्यांच्या मागच्या व पुढच्या वंशावळी निर्माण केल्या. साधनेत या सगळ्याचे काही महत्त्वाचे स्थान आहे.

हे विश्व व वृत्ती अस्तित्त्वात आहे, होते व भविष्यात असणार आहे! या दोन्हींना आरंभही नाही व शेवटही नाही. त्यांना जन्म नाही व मृत्यूही नाही. आहे ते केवळ स्थित्यंतर! म्हणून देवदेवता अजन्मा आहेत, असे म्हणले आहे.

आता देवदेवतांच्या दर्शना संबंधी पाहू. आपण वर बघितले की, व्यक्तीगणीक, प्रत्येकाच्या ईच्छा व वृत्ती निराळ्या असतात. यालाच त्या व्यक्तीचा पिंडधर्म म्हणतात. जो ज्या स्वरुपात आपल्या ईष्टदेवतेचे चिंतन करेल, भक्ती करेल, ध्यान करेल, त्यानुसार त्याला ईष्टदेवतेचे दर्शन होईल. म्हणून एकाच देवतेची उपासना, अनेकांनी केली तरी, त्या एकाच देवतेचे रुप, सर्वांना एकसारखे न दिसता, निरनिराळ्या आकारात व रंगछटात होईल. म्हणून एका देवतेच्या अनेक प्रकारच्या मूर्ती अथवा प्रतिमा असतात. ज्याचा जसा भाव असेल, त्या रुपात त्याला दर्शन होईल! म्हणून भाव तैसा देव म्हणले आहे. भाव आत म्हणजे मनात आहे, म्हणून देवही देहात आहे. तुकाराम महाराज म्हणतात,

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ।

जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।

जसे दु्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी ।

देव देहात देहात, का हो जाता देवळात ।

तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ।

उसात साखर व दुधात लोणी असते, पण ते बाहेरून दिसत नाही, तर उस व दुधावर प्रक्रिया केली असता, ते मिळते. त्याचप्रमाणे देवाच्या दर्शनासाठी साधना रुपी प्रक्रिया करायला लागते, मग ते साधन भक्ती, ज्ञान, कर्म वा ध्यान, काहीही असेल!

स्थूल अथवा जड जगत व सूक्ष्म अथवा चैतन्य, दोन्हींची निर्मिती प्रक्रिया लक्षात घेऊन दर्शन शास्त्र बनले आहे. दर्शने मानसिक पातळीवर होतात व ती संस्कारांना अनुकूल असतात. मनावरील संस्कार नष्ट झाल्यास, दर्शने होणार नाहीत. त्याऐवजी तत्व दर्शने, निराकार होतील. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणले आहे,

तुज सगुण म्हणो की, निर्गुण रे। सगुण निर्गुण एकु, गोविंद रे।।धृ।।

अनुमाने ना, अनुमाने ना। श्रुती नेति नेति म्हणती, गोविंदु रे।।१।।

तुज स्थूळ म्हणो की, सूक्ष्म रे। स्थूळ, सूक्ष्म एकु, गोविंदु रे।।२।।

तुज दृश्य म्हणो की, अदृश्य रे। दृश्य, अदृश्य एकु, गोविंदु रे।।३।।

निवृत्ती प्रसादे, ज्ञानदेव बोले। बाप रखुमादेवीवरू, विठ्ठलु रे।।४।।

ज्ञानेश्वर माऊलींच आराध्य दैवत आहे विठ्ठल!

नवस, इच्छापूर्ती, कामनापूर्ती, संकल्पपूर्ती, इत्यादी मनाच्या तीव्र संकल्पावर अवलंबून आहेत. संकल्पात शक्यतो दुसऱ्यांचे नुकसान अथवा हानी नको म्हणजे संकल्पपूर्ततेसाठी विरोध निर्माण होणार नाही. जितका संकल्प अथवा इच्छा दृढ तितकी घटना घडून येण्याची शक्यता अधिक व लवकर! या शास्त्राची गती समजणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. हे अतींद्रीय व अनुभवाचे शास्त्र आहे. मन वायू तत्वात आहे व तिथेच इच्छांचा उगम आहे. खरंतर इच्छा अथवा संस्कारांमुळेच मनाची निर्मिती आहे. 'संकल्प विकल्पात्मक मनः' अशी मनाची व्याख्या आहे. तीव्र इच्छांमुळे जडतत्वात धारणा होते व घटना घडून येतात. कर्मकांड आणि विधींमुळे कदाचित मनाची एकाग्रता व म्हणून धारणाशक्ती वाढेल. परंतु मानवी प्रयत्‍नही तितकेच महत्त्वाचे व आवश्यक आहेत. अशी कोणतीही शक्ती या विश्वात नाही की जी आपल्याला हातपाय न हलवता आयते आणून देईल. जेव्हा असे घडले, असे वाटते तेव्हा तो मानवी प्रयत्नांचा, पूर्ततेसाठीचा क्षण जवळ आलेला होता, इतकेच समजावे.

हे मानसशास्त्र समजणे अवघड आहे व म्हणून देव या या संकल्पनेची निर्मिती केली गेली. मानवी मनावरील संस्कारांना धरून देवाविषयीची व्यक्तीगत व सामाजिक संकल्पना भिन्न भिन्न राहिल. ग्रंथ, मूर्ती, चिन्हे, गत वा जिवंत व्यक्ती, इत्यादी अशी ती असू शकते. देव आणि माफक कर्मकांड, हा मानसोपचार आहे. सामान्यांना तो अवघड अथवा भार होणार नाही याची काळजीमात्र समाजधुरीनांनी घेणे आवश्यक आहे.

समाजात देव व देवधर्म न मानणाराही मोठा वर्ग आहे. या वर्गास नास्तिक म्हणतात. या विश्वाचा निर्माता व चालक कोणीही नाही तर हे विश्व विशिष्ठ नियमांनी चालले आहे, असे मत ते मांडतात. याविरुद्ध देव मानणाऱ्यांचे विचार आहेत. मतमतांतरे काहीही असोत, अंतिमतः आस्तिकांचा देवही निष्क्रिय, निराकार, निर्गुण, कसलेही नियमन न करणारा आहे.

आईनस्टाईनचा देव

संपादन

अमेरिकेतील अनेक विद्यापीठांत भरणाऱ्या वैज्ञानिक संमेलनांत हजर रहाताना आईनस्टाईनला एका प्रश्नास हटकून तोंड द्यावे लागे, आणि तो म्हणजे "तुमचा देवावर विश्वास आहे का? Do you believe in God ?" आणि तो नेहमी उत्तर द्यायचा 'हो,स्पिनोझाच्या देवावर माझा विश्वास आहे!"

स्पिनोझाचा देव

संपादन

डच तत्त्वज्ञ बरुच डी स्पिनोझा हा सतराव्या शतकातील ॲमस्टरडॅम येथील एका यशस्वी पण फार श्रीमंत नसणाऱ्या उद्योजकाचा मुलगा होता. त्याची देवाविषयीची कलपना अशी होती :-

देव असे म्हणत असणार,"उगीचच आपले उर बडवीत माझी प्रार्थना व पूजा करू नका. उलट जरा बाहेर नजर टाका आणि मी तुमच्यासाठी काय काय केले आहे त्याचा उपभोग घ्या. तुम्ही मौज करावी, गाणी म्हणावीत मी तुमच्यासाठी जे निर्माण केले आहे त्याचा उपभोग घ्या आणि त्याची मजा लुटा. ज्याला तुम्ही माझे घर समजतां, त्या अंधुक प्रकाशाने भरलेल्या, थंड,उदास देवळात जायचा विचारही करू नका. माझे घर मोठमोठ्या पर्वतशिखरात,झुळझुळ वाहाणाऱ्या नद्यांत,सरोवरात, अफाट पसरलेल्या समुद्रकिनाऱ्यावर आहे. आपले आयुष्य जर दुःखी असेल तर त्याबद्दल मला दोष देणे बंद करा. तुम्ही पापी आहात असे मी कधीच म्हणत नाही. उगीचच मनात भीती बाळगू नका. मी काही तुमच्या कृत्यांचा जाब विचारायला बसलो नाही.त्यामुळे तुमच्यावर टीका करायचा किंवा तुमच्यावर रागावण्याचा विचारही माझ्या मनात येत नाही. मला कशाचेच सोयर सुतक नाही,तुम्हाला शिक्षा करायला मी बसलो नाही. मी म्हणजे केवळ प्रेमाचा सागर आहे.

उगीचच माझ्याकडून क्षमायाचना करू नका.क्षमा करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? तुमच्या भावना, आकांक्षा,आनंद. गरजा, मर्यादा, वर्तनातील विसंगती या सर्व तुमच्या ठायी मीच निर्माण केलेल्या असताना, त्याबद्दल मी तुम्हाला कसा दोष देणार आणि तुम्हाला कशी शिक्षा करणार? तुम्हीच माझी सर्व लेकरे आहात. जी अयोग्य वागतील त्याना पुढील अनंत काळापर्यंत उकळत्या तेलात किंवा धगधगत्या ज्वाळांत टाकण्याची शिक्षा देण्यासाठी एकादी जागा मी तयार केली आहे असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे.

माझ्या काही आज्ञा किंवा कायदे आहेत असे मुळीच समजू नका. त्यामुळे तुमच्या मनात उगीचच अपराधीपणाची जाणीव त्यामुळे निर्माण होते. आपल्याला त्रास होऊ नये असे ज्यामुळे तुम्हास वाटते तो उपद्रव आपल्यामुळेही इतरांना होणार नाही याची कालजी घ्या. फक्त एकच गोष्ट मला अपेक्षित आहे, ती म्हणजे केवळ आपल्या आयुष्याविषयी दक्ष रहा. ही दक्षताच तुमची मार्गदर्शक आहे. हे आयुष्य म्हणजेच सर्व काही आहे, आणि तेवढेच तुम्हाला आवश्यक आहे. मी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे .त्यात तुम्हाला काही बक्षीस मिळणार नाही, की शिक्षाही होणार नाही. पाप किंवा पुण्य असे काही नसते, तुमच्या जीवनाचा स्वर्ग किंवा नरक बनवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे.

या आयुष्यानंतर पुढे काही आहे की नाही हे मी सांगणार नाही, पण यानंतर असे काही नाही असे समजूनच चाला. जे काही आनंद उपभोगणे, प्रेम करणे करायचे आहे त्यासाठी हीच एक संधी आहे. तुमची काही तक्रार नसेल तर मी दिलेल्या संधीचा तुम्ही पूर्ण फायदा घेतलात, असे मी समजेन. आणि काही असेलच तरी मी काही तुम्हाला विचारणार नाही की, तुम्ही चांगले वागलात किंवा नाही. मी फक्त विचारेन की तुम्ही आयुष्याचा आनंद लुटलांत की नाही? तुम्हाला ते आवडले की नाही?.मजा आली का तुम्हाला? त्यात जास्त मौज कशात आली? तुम्ही काय शिकलात?

माझ्यावर विश्वास टाकून निष्क्रिय राहणे सोडा, कारण तसे करणे म्हणजे काहीतरी अध्याहृत धरणे, कल्पना करणे. आपल्या छोट्या मुलीबरोबर तुम्ही खेळत असाल, किंवा आपल्या कुत्र्याच्या पिल्लाला कुरवाळत असाल, किंवा समुद्रात स्नान करत असाल तेव्हा माझी जाणीव तुम्हास व्हावी.

माझी स्तुती करण्याचे कारण नाही. स्वतःला कुणीतरी मोठा समजणारा प्राणी मी आहे असे का वाटते तुम्हाला? तुमच्या स्तुतिस्तोत्रांनी मला अगदी कंटाळा येतो. माझ्याविषयी इतके खरेच वाटत असेल तर ते प्रत्यक्ष स्वतःची, सभोवतालच्या जगाची काळजी घेऊन व्यक्त करा. तुमचा आनंद व्यक्त करा. ती माझी खरी स्तुति ठरेल.ए कच सत्य आहे ते म्हणजे तुम्ही येथे आहात, आणि हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेले आहे. आणखी मग काय हवे तुम्हाला? आणखी स्पष्टीकरणाची आवश्यकताच काय? मी कोठेतरी बाहेर आहे असे समजून मला शोधू नका, तुमच्या आत मी आहे हे निश्चित समजा. तुमच्या हृदयाच्या ठोक्यात मी आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ Swinburne, R.G. "God" in Honderich, Ted. (ed)The Oxford Companion to Philosophy, Oxford University Press, 1995.
  2. ^ Platinga, Alvin. "God, Arguments for the Existence of," Routledge Encyclopedia of Philosophy, Routledge, 2000.
  3. ^ Pantheism: A Non-Theistic Concept of Deity - Page 136, Michael P. Levine - 2002
  4. ^ A Feast for the Soul: Meditations on the Attributes of God : ... - Page x, Baháʾuʾlláh, Joyce Watanabe - 2006
  5. ^ Philosophy and Faith of Sikhism - Page ix, Kartar Singh Duggal - 1988
  6. ^ The Intellectual Devotional: Revive Your Mind, Complete Your Education, and Roam confidently with the cultured class, David S. Kidder, Noah D. Oppenheim, page 364
  7. ^ डाॅ. वाटवे, श्रीकृष्ण त्रिंबक (२४.०६.२००४). ऋग्वेद - एक शोधयात्रा. वरदा प्रकाशन संस्था. pp. ८. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)