सत्यजित राय
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
सत्यजित राय (बंगाली: সত্যজিৎ রায়) (मे २, इ.स. १९२१ - एप्रिल २३, इ.स. १९९२ ) हे ऑस्कर पुरस्कारविजेते भारतीय लेखक, पटकथालेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते. चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल इ.स. १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. त्यांनी अपु के वर्ष (इ.स. १९५० ते इ.स. १९५८) व इ.स. १९५५ मध्ये पथेर पांचाली या चित्रपटाची निर्मिती केली. यांनी एकूण ३७ चित्रपटांची निर्मिती केली. ते स्वतःच चित्रपटांना संगीत देत, पटकथा लेखन, दिग्दर्शन व संपादन अशी अनेक कामे करत.
सत्यजित राय | |
---|---|
सत्यजित राय यांचे व्यक्तिचित्र | |
जन्म |
मे २, इ.स. १९२१ कोलकाता, भारत |
मृत्यू |
एप्रिल २३ ,इ.स. १९९२ कोलकाता |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
भाषा | बंगाली |
पुरस्कार |
ऑस्कर पुरस्कार (१९९२) भारतरत्न(१९९२) |
वडील | सुकुमार राय |
आई | सुप्रभा राय |
पत्नी | बिजया दास (इ.स. १९४८ -इ.स. १९९२ ) |
अपत्ये | संदीप राय |
यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकार तर्फे पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. या शिवायही त्यांना युगोस्लाव्हियाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातर्फे डी. लिट. असे अनेक मान सन्मान प्राप्त झाले. फ्रान्स येथील कान चित्रपट महोत्सव यांसहित यांना एकूण ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
सुरुवातीचे दिवस
संपादनसत्यजित राय यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांच्या घराण्यात कलात्मक सृजनशीलतेचा वारसा होता. त्यांचे आजोबा उपेंद्रकिशोर राय प्रसिद्ध लेखक, संगीतकार आणि चित्रकार होते. सत्यजित रायांचे वडील सुकुमार राय कवी, लेखक आणि चित्रकार होते. शाळेत असताना राय यांनी हॉलीवूडबद्दल मासिकांमध्ये वाचले आणि तेव्हापासून त्यांना चित्रपटांमध्ये गोडी वाटू लागली. याच काळात त्यांचा पाश्चात्य शास्त्रीय संगीताशीही परिचय झाला. शाळा संपवून महाविद्यालयीन शिक्षण घेताना रायांचा या विषयांमधील रस वृद्धिंगत झाला.
कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर राय यांचा शिक्षण थांबवण्याचा विचार होता. पण त्यांच्या आईच्या आग्रहाखातर ते रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी तयार झाले. शांतिनिकेतन येथे त्यांचा भारतीय, चिनी आणि जपानी कलांशी जवळून परिचय झाला. तिथे त्यांना बिनोद बिहारी मुखर्जी आणि नंदलाल बोस यांच्यासारख्या निष्णात चित्रकारांचा सहवास लाभला.
शांतिनिकेतन येथे पाच वर्षे शिक्षण घेतल्यानंतर इ.स. १९४२ मध्ये राय कोलकात्याला परतले. तिथे त्यांनी डी. जे. केमर नावाच्या ब्रिटिश जाहिरात कंपनीमध्ये नोकरी पत्करली. इथे त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या जाहिरातींची निर्मिती केली. नंतर त्यांची बदली त्यांचे ज्येष्ठ सहकारी डी. के.गुप्ता यांच्या 'सिग्नेट प्रेस' या प्रकाशनामध्ये झाली. इथे त्यांनी बऱ्याच पुस्तकांची मुखपृष्ठे बनवली. यात जवाहरलाल नेहरू यांचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि जिम कॉर्बेट यांचे मॅन इटर्स ऑफ कुमाऊं यांचा समावेश होता. याच संदर्भात बिभूतिभूषण बॅनर्जी यांची पाथेर पांचाली ही कादंबरी त्यांच्या वाचनात आली आणि या कथेचा राय यांच्या मनावर बराच प्रभाव पडला.
इ.स. १९४७ मध्ये राय यांनी कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना केली. इथे निरनिराळ्या विदेशी चित्रपटांची प्रदर्शने होत असत. याच काळात रायांनी चित्रपटांबद्दल वर्तमानपत्रे आणि मासिके यात लेख लिहिण्यास सुरुवात केली. राय बरेचदा आवडलेल्या कथांच्या पटकथाही लिहीत असत. इ.स. १९४९ मध्ये प्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक ज्यां रेन्वार त्यांच्या द रिव्हर या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कोलकाता येथे आलेले असताना राय यांची त्यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी बोलताना रायांनी पाथेर पांचाली या कथेवर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली. रेन्वार यांनी त्यांना या दिशेने जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. इ.स. १९५० मध्ये कंपनीतर्फे लंडन दौऱ्यावर असताना रायांनी बरेच विदेशी चित्रपट बघितले. यातच इटालियन दिग्दर्शक व्हित्तोरिओ दी सिका यांच्या बायसिकल थीव्ह्ज या चित्रपटाचा समावेश होता. हा चित्रपट बघितल्यावर रायांचा चित्रपट बनवण्याचा निश्चय पक्का झाला.
चित्रपट निर्मिती
संपादनपाथेर पांचाली बनवण्याचा विचार पक्का झाल्यावर राय यांनी या चित्रपटासाठी निर्माता शोधणे सुरू केले. बरीच शोधाशोध करूनही निर्माता मिळणे अशक्य आहे असे दिसल्यावर त्यांनी स्वतःच्या बचतीमधील पैसे वापरून चित्रीकरण सुरू केले. राय आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. यातून आपल्याला बरेच काही शिकता आले असे रायांनी नंतर नमूद केले. यादरम्यान राय पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. बी. सी रॉय यांना भेटले आणि चित्रपटासाठी सरकारकडून आर्थिक साहाय्याची हमी मिळाली. पाथेर पांचालीसाठी प्रसिद्ध संगीतकार पं. रविशंकर यांनी संगीत दिले.
अनेक अडचणींना तोंड देत अखेर हा चित्रपट पूर्ण करण्यात राय यशस्वी झाले. याचे पहिले प्रदर्शन न्यू यॉर्क येथील म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट येथे झाले. चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा झाली. त्याचबरोबर काही ठिकाणी प्रखर टीकाही झाली. पाथेर पांचालीला राष्ट्रपती सुवर्ण पदक आणि राष्ट्रपती रजत पदक याबरोबरच इतर अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले. इ.स. २००५ मध्ये टाइम मासिकाच्या सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश होता.
पाथेर पंचालीच्या अभूतपूर्व यशाने राय यांना पुढील चित्रपटांसाठी हवे ते स्वातंत्र्य मिळाले. त्यांचे नंतरचे दोन चित्रपट, अपराजितो आणि ओपुर शोंशार हे पाथेर पांचालीच्या कथेतील मुलगा अपूचा बालपण ते प्रौढावस्था असा प्रवास दाखवतात. ओपुर शोंशारमध्ये रे यांनी सौमित्र चॅटर्जी आणि शर्मिला टागोर या कलाकारांना प्रथम संधी दिली. नंतर सौमित्र बंगाली चित्रपटांमध्ये तर शर्मिला बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये आघाडीचे कलाकार म्हणून ओळखले गेले.
यानंतरचा राय यांचा प्रवास सृजनशीलतेचा एक दुर्मिळ आविष्कार होता. इ.स. १९५८ ते इ.स. १९८१ या वर्षांमध्ये त्यांनी एकाहून एक दर्जेदार चित्रपट काढले. त्यांचा निर्मितीचा वेग साधारणपणे वर्षाला एक असा होता. या प्रवासात रायांनी फँटसी, ऐतिहासिक कथा आणि सायन्स फिक्शन यासारखे विविध विषय हाताळले. यात अंधश्रद्धेवर आधारित देवी , आधुनिक शहरी आयुष्यातील समस्या हाताळणारा महानगर , चित्रपटजगतातील बेगडीपणाचे चित्रण करणारा नायक यांचा समावेश होता. याचबरोबर इ.स. १९६४ मधील रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित चारुलता हा त्यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो.
राय यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांना पं. रविशंकर, उस्ताद विलायत खान यांचे संगीत होते. इ.स. १९६१ मध्ये तीन कन्या या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःच संगीत दिले आणि यानंतरच्या बहुतेक चित्रपटांमध्ये ते संगीतकार होते. याचबरोबर संवाद, पटकथालेखन यामध्येही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असे. इ.स. १९६१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहाखातर रायांनी टागोरांवर माहितीपट काढला. इ.स. १९७७ मध्ये रायांनी मुन्शी प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित शतरंज के खिलाडी हा चित्रपट काढून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात संजीव कुमार ,सईद जाफरी ,शबाना आझमी ,अमजदखान ,व्हिक्टर बॅनर्जी आणि रिचर्ड ॲटनबरो यांच्यासारखे नावाजलेले कलाकार होते. या चित्रपटात इ.स. १८५७च्या उठावापूर्वीचे भारतातील निजामशाहीचे प्रभावी चित्रण आहे. यात समालोचक म्हणून अमिताभ बच्चन यांचा आवाज वापरला आहे.
इ.स. १९८३ मध्ये घरे बाइरे साठी काम करत असताना राय यांनी हृदयविकाराचा झटका आला. यानंतर पुढची नऊ वर्षे शारिरिक अस्वास्थ्यामुळे राय यांच्या कामावर बऱ्याच मर्यादा आल्या. यानंतरच्या त्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण मुख्यतः स्टुडिओतच झाले. यानंतर प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी आणखी तीन चित्रपट बनवले. आगंतुक हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
लेखनकार्य
संपादनचित्रपटनिर्मितीबरोबरच सत्यजित राय यांनी विपुल लेखनही केले. बंगाली साहित्यामध्ये त्यांनी गुप्तहेर फेलूदा आणि प्रा. शोंकू या दोन लोकप्रिय पात्रांची निर्मिती केली. यापैकी फेलूदांचे पात्र शेरलॉक होम्सच्या पात्रावर आधारलेले आहे. प्रा शोंकू यांच्या कथा सायन्स फिक्शन या प्रकारात मोडतात. सत्यजित राय यांचे साहित्य इंग्लिशमध्ये अनुवादित झाल्यामुळे त्यांना मोठा वाचकवर्ग लाभला आहे. त्यांच्या बऱ्याच पटकथाही प्रसिद्ध झाल्या आहेत. याशिवाय भारतीय आणि परदेशी चित्रपटांवर तुलनात्मक पुस्तक अवर फिल्म, देअर फिल्म्स आणि त्यांचे आत्मचरित्र जाखान चोटो चिल्लम विशेष उल्लेखनीय आहेत. बंगाली भाषेत त्यांचे लेखन कार्यातील योगदान मोलाचे आहे.
पुस्तके
संपादन- The Apu trilogy (सहलेखिका - शंपा बॅनर्जी)
- अवर फिल्म, देअर फिल्म्स (इंग्रजी)
- The chess players : and other screenplays (इंग्रजी)
- जाखान चोटो चिल्लम (बंगाली, आत्मचरित्र)
- My years with Apu (इंग्रजी)
- सत्यजित राय की कहानियाँ (हिंदी)
- सिनेमा तंत्र आठवणी चिंतन (मूळ बंगाली/इंग्रजी; मराठी अनुवाद - विलास गिते)
- फेलूदा (मूळ बंगाली; मराठी अनुवाद - अशोक जैन)
- प्रा.शोंकू (मूळ बंगाली; मराठी अनुवाद - संजय कप्तान)
सन्मान आणि पुरस्कार
संपादनराय यांना त्यांच्या आयुष्यात अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. चार्ली चॅप्लिननंतर हा सन्मान मिळवणारे ते पहिले चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांना १९८५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि १९८७ मध्ये फ्रान्सचा Lesions d'Onu पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी त्यांना सन्माननीय अकादमी पुरस्कार आणि भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. सॅन फ्रान्सिस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शनातील जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांना मरणोत्तर अकिरा कुरोसावा पुरस्कार मिळाला, जो त्यांच्या वतीने शर्मिला टागोर यांनी स्वीकारला. पूर्वीसारखाच जोम. त्यांचे वैयक्तिक जीवन कधीच मीडियाचे लक्ष वेधले गेले नाही, परंतु काहींच्या मते १९६० च्या दशकात चित्रपट अभिनेत्री माधवी मुखर्जी यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध होते.
वारसा
संपादनसत्यजित रे हे भारतातील आणि जगभरातील बंगाली समुदायासाठी एक सांस्कृतिक प्रतीक आहेत. राय यांनी बंगाली चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली आहे. अपर्णा सेन, रितुपर्णा घोष, गौतम घोष, तारिक मसूद आणि तन्वीर मुकम्मल या अनेक बंगाली दिग्दर्शकांना त्यांच्या कामातून प्रेरणा मिळाली आहे. बुद्धदेव दासगुप्ता, मृणाल सेन आणि अदूर गोपालकृष्णन यांच्यासह सर्व शैलीतील दिग्दर्शकांनी भारतीय सिनेमावरील त्यांचा प्रभाव मान्य केला आहे. भारताबाहेरही, मार्टिन सोर्सी, जेम्स आयव्हरी, अब्बास किआरोस्तामी आणि एलिया कझान यांसारखे दिग्दर्शकही त्यांच्या शैलीने प्रभावित झाले आहेत. इरा सॅक्सचा फोर्टी शेड्स ऑफ ब्लू हा चित्रपट चारुलतावर आधारित होता. राय यांच्या कामातील कोटेशन्स सेक्रेड एविल, दीपा मेहताच्या द एलिमेंट्स ट्रायलॉजी आणि जीन-लुक गोडार्डच्या अनेक कामांसारख्या इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसतात.
१९९३ मध्ये, UC सांताक्रूझने राय यांच्या चित्रपटांचे आणि त्यावर आधारित साहित्याचे संकलन सुरू केले. १९९५ मध्ये, भारत सरकारने चित्रपटांशी संबंधित अभ्यासासाठी सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची स्थापना केली. लंडन फिल्म फेस्टिव्हल नियमितपणे सत्यजित रे पुरस्कार एका दिग्दर्शकाला प्रदान करतो ज्याने त्याच्या पहिल्या चित्रपटात "रे यांच्या दृष्टीची कला, संवेदनशीलता आणि मानवता" मूर्त स्वरूप दिली आहे. २००७ मध्ये, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने घोषणा केली की त्याच्या दोन फेलुदा कथांवर रेडिओ कार्यक्रम केले जातील.
सांस्कृतिक हस्तांतर
संपादनअमेरिकन व्यंगचित्र मालिकेतील अपू नहस्पिमापेटिलॉन या पात्राचे नाव राय यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले होते. राय आणि माधवी मुखर्जी हे पहिले भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व होते ज्यांची छायाचित्रे परदेशी टपाल तिकिटावर (डॉमिनिका देश) दिसली. राय यांच्या चित्रपटांचा उल्लेख अनेक साहित्यकृतींमध्ये करण्यात आला आहे - सोल बेलोची कादंबरी हर्झोग आणि जे.जे. एम. कोएत्झीचा युवक. सलमान रश्दी यांच्या बाल कादंबरी हारून अँड द सी ऑफ स्टोरीजमध्ये दोन माशांची नावे ‘गुपी’ आणि ‘बाघा’ आहेत.
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सत्यजित राय चे पान (इंग्लिश मजकूर)
संदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |