जिम कॉर्बेट (इ.स. १८७५-इ.स. १९५५) हे नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी व लेखक होते. एकूण १९ वाघ आणि १४ बिबट्यांची शिकार जिम यांनी केली.

एडवर्ड जेम्स "जिम" कॉर्बेट
Jim Corbett.jpg
जन्म २५ जुलै १८७५
नैनीताल, संयुक्त प्रांत, ब्रिटिश भारत (सध्या भारत)
मृत्यू १९ एप्रिल १९५५ (वय ७९)
न्येरी, केनिया
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
पेशा शिकारी, लेखक

एडवर्ड जेम्स "जिम" कॉर्बेट यांचा जन्म जुलै २५, इ.स. १८७५ रोजी हिमालयाच्या कुमाऊॅं पर्वत रांगांच्या खोऱ्यात वसलेल्या नैनिताल (सध्याचे उत्तराखंड राज्य) येथे झाला. ते क्रिस्टोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचे आठवे अपत्य होते. जिमच्या जन्माआधी त्यांचे वडील क्रिस्टोफर यांना नैनिताल येथे पोस्टमास्तर म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे एक घर कालाधुंगी येथेही होते. उन्हाळी सुट्यांसाठी सर्व कुटुंबिय तेथेच वास्तव्यास असत. लहानपणापासून जिम यांना वन्यजीवांविषयी आकर्षण होते. दिवसचे दिवस ते झाडाला लटकून जंगलात घडणाऱ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी टिपत. या सवयीचा त्यांना पुढील आयुष्यात खूप फायदा झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर जिमचे मोठे भाऊ टॉम यांना नैनिताल येथील पोस्टातच नोकरी मिळाल्याने समस्त कुटुंबिय तेथेच राहिले.

जिम यांचे शालेय शिक्षण नैनितालच्या ओक ओपनिंग्स स्कूल मध्ये तर उच्च शिक्षण तेथीलच सेंट जोसेफ कॉलेजमध्ये झाले. पदवीनंतर जिम यांना बंगाल आणि वायव्य रेल्वेच्या पंजाब मध्ये नोकरी मिळाली.

मूळचे शिकारी असलेले जिम कॉर्बेट यांना लवकरच जाणवले की जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली. १९०७ ते १९३८ या काळात सुमारे १,५०० लोकांना मारणाऱ्या डझनभर वाघ आणि बिबट्यांना त्यांनी मारले. चंपावतच्या नरभक्षक वाघाने ४३६ लोक तर पानारच्या नरभक्षक बिबट्याने ४०० लोकांचे बळी घेतले होते. या आणि अशाच इतर नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली.

जिम कॉर्बेट यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात वन्यजीवांना अभयाने राहता यावे म्हणून अभायारण्ये घोषित करण्यात आली. त्यातील पहिले लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा मान जिमना मिळाला. याच राष्ट्रीय उद्यानाचे १९५७ साली कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे नामांतरण करण्यात आले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिम कॉर्बेट आणि त्यांची बहीण मॅगी केन्यातील नायेरी येथे कायमच्या वास्तव्यास गेले. जंगलात निरिक्षण करता यावे म्हणून जिम यांनी झाडावर बांधलेल्या मचाणावर दि. ५-६ फेब्रुवारी १९५२ या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी इंग्लंडची राजकुमारी एलिझाबेथ द्वितीय हजर होती. ते दोन दिवस सगळ्यांनी आनंदात घालविले. त्या दिवसांच्या आठवणींविषयी आपल्या ट्री टॉप्स या पुस्तकात जिम लिहितात, "मचाणावर चढतांना राजकुमारी असलेली एलिझाबेथ द्वितीय मचाणावरून उतरतांना इंग्लंडची महाराणी झाली". कारण इंग्लंडचे राजे जॉर्ज सहावे यांचे त्या रात्री निधन झाले.

जिम कॉर्बेट यांचा मृत्यू एप्रिल १९, इ.स. १९५५ ला केनिया मध्ये झाला. जिम कॉर्बेट यांची आठवण म्हणून १९६८ साली वाघाच्या एका उपजातीला (Indo Chinese Tiger) त्यांचे नाव Panthera tigris corbetti (Corbett's Tiger) देण्यात आले

चित्रदालनसंपादन करा

साहित्यसंपादन करा

  • मॅन-इटर्स् ऑफ कुमाऊं (Man-eaters of Kumaon) (1944)
  • दि मॅन-इटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग (The Man-eating Leopard of Rudraprayag) (1948)
  • दि टेम्पल टायगर ऍण्ड मोअर मॅन-इटर्स् ऑफ कुमाऊं (The Temple Tiger and More Man-eaters of Kumaon) (1954)
  • माय इंडिया (My India) (1952) भारतातील ग्रामीण जीवनाविषयी
  • जंगल लोर (Jungle Lore) (1953) आत्मचरित्र
  • ट्री टॉप्स (Tree Tops) (1955)

संदर्भ व टिपासंपादन करा