इंडियन प्रीमियर लीगचा २०१६ हंगाम हा आयपीएल ९ किंवा विवो आयपीएल २०१६ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा नववा हंगाम होता. सदर स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली.
हा लेख २०१६ची आयपीएल स्पर्धा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, २०२० इंडियन प्रीमियर लीग.
स्पर्धेचे वेळापत्रक १० मार्च २०१६ रोजी जाहीर झाले. स्पर्धेत ५६ साखळी सामने आणि ४ प्ले ऑफ सामने असे एकूण ६० सामने खेळवण्यात आले.[३]
२०१६ च्या स्पर्धेत प्रथमच एलईडी यष्ट्या वापरण्यात आल्या. आयपीएल फॅन पार्कांची संख्या १६ वरून वाढवून ३६ करण्यात आली, ज्या मध्ये न्यू जर्सीमधील एका पार्काचा समावेश आहे.[४]
पार्श्वभूमी
१४ जुलै २०१५ रोजी, आरएम लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सच्या मालकांना २०१३ आयपीएल स्पर्धेतील स्पॉट फिक्सींग आणि बेटींग प्रकरणी दोन वर्षांसाठी निलंबीत केले. त्यामुळे हे दोन संघ आयपीएल २०१६ आणि २०१७ मध्ये खेळू शकणार नाहीत.[५] पुढच्या दोन आयपीएल हंगामां मध्ये दोन नवीन संघ त्यांची जागा घेतील असे बीसीसीआयने जाहीर केले.
ऑक्टोबर २०१५ मध्ये, २०१७ मध्य समाप्त होणाऱ्या पाच-वर्षाच्या करारामधून पेप्सिको कंपनीने मुख्य प्रायोजक म्हणून अंग काढून घेतले. त्याऐवजी चीनमधील स्मार्टफोन निर्माते व्हिवो इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला २०१६ आणि २०१७ चे मुख्य प्रायोजक म्हणून पुरस्कृत करण्यात आले.[६]
नोव्हेंबर २०१५, मध्ये बीसीसीआयने अज्ञात कारणांमुळे जयपूर (राजस्थान रॉयल्स) आणि कोची (रद्दबातल कोची टस्कर केरळ) या दोन शहरांना वगळून नऊ शहराची नवीन संभाव्य फ्रँचायझीच्या यादीत निवड केली.[७] निवड झालेली ९ शहरे पुढीलप्रमाणे: चेन्नई, धरमशाला, इंदूर, नागपूर, पुणे, राजकोट, रांची आणि विशाखापट्टणम्.[८] नवीन फ्रँचायझी उलट लिलाव प्रक्रियेने दिल्या गेल्या, ज्या कंपन्यानी लिलाव प्रक्रियेत केंद्रीय महसूलाचा कमीत कमी वापर केला त्याना नवीन संघांचे मालकत्व देण्यात आले.[७] ३ डिसेंबरला दिल्या गेलेल्या माहितीनुसार लिलाव प्रक्रियेसाठी १२ कंपन्याच्या निविदा घेतल्या गेल्या होत्या.[९]
८ डिसेंबर २०१५ रोजी घोषित केल्यानुसार, न्यू रायझिंग (संजीव गोएंका यांचे प्रतिनिधित्व असलेली कंपनी) आणि इंटेक्स टेक्नॉलॉजिस ह्या कंपन्यांनी नवीन संघाच्या लिलावाचे अधिकार जिंकले. न्यू रायझिंग कंपनीने पुणे स्थित संघ निवडला तर इंटेक्सने राजकोटची निवड केली.[१०] १५ डिसेंबर २०१५ रोजी दोन नवीन फ्रँचायझींनी ड्राफ्ट मधून चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स मधील प्रत्येकी ५ खेळाडूंची निवड केली. प्रत्येक फ्रँचायझीने त्यांचा ड्राफ्ट आणि लिलावामधून संघ विकत घेण्यासाठी ६६ कोटींचे वाटप केले.[९]
महाराष्ट्र पाणी संकट
महाराष्ट्रात तीन ठिकाणी होत असलेल्या २० सामन्यांवरून, ६ एप्रिल २०१६ रोजी, 'महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना आयपीएल सामन्यांसाठी पाण्याचा होत असलेला अपव्यय ही "गुन्हेगारी स्वरूपाची" बाब आहे' अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला फटकारले [११]. मुंबई, नागपूर आणि पुणे येथे खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना जवळपास ६० लाख लिटर पाणी वापरले जाणार आहे.[११] आयपीएल सामन्यांपेक्षा दुष्काळात होरपळत असलेली जनता जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे हे सामने अन्य राज्यांत का खेळवले जाऊ नयेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने सर्व संबंधित यंत्रणांना केली.[१२]
८ एप्रिल २०१६ रोजी, 'आयपीएल राज्याबाहेर गेली तरी चालेल, पण क्रिकेट सामन्यांसाठी राज्य सरकार पाणी देणार नाही' अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.[१३] ९ एप्रिल २०१६ रोजी, स्पर्धेच्या पहिल्या सामन्याला काही तास शिल्लक असताना, मुंबई क्रिकेट असोसिएशनने दावा केला की, वानखेडे मैदानासाठी जे पाणी वापरले गेले ते बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून नाही तर खासगी कंपन्यांकडून आणले गेले आहे.[१४]
दरम्यान १३ एप्रिल रोजी संबंधित प्रकरणावर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने, ३० एप्रिल नंतरचे सामने राज्याबाहेर खेळवा असे आदेश बीसीसीआय आणि आयोजकांना दिले.[१५]. या सामन्यांपैकी, आयपीएलचे चेरमन राजीव शुक्ला व मुंबई, पुण्याच्या फ्रँचाइझींशी झालेल्या बैठकीनंतर २९ मे २०१६ रोजी पुण्यातील एलिमिनेटर आणि पात्रता २ हे सामने कोलकात्याला हलवण्यात आले तर मुंबईतील वानखेडे मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बंगळूरची निवड करण्यात आली.[१६] परंतु २९ एप्रिल रोजी पुण्याचा सामना झाल्यानंतर लगेचच ३० तारखेला संघ आणि सोबतच्या पथकाला प्रवास करून पुन्हा १ तारखेला सामना खेळावा लागेल आणि प्रचंड ताण येईल, या बीसीसीआयच्या विनंतीमुळे कोर्टाने १ तारखेचा सामना पुण्यातच खेळण्याची अपवादात्मक परवानगी दिली.[१७]
उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांनी मिळून २२ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. खेळपट्टीच्या मशागतीसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याऐवजी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्यात येत असल्याचे दोन्ही असोसिएशनने आपल्या याचिकेत म्हणले होते. मुंबई इंडियन्सने त्यांच्या सामन्यांसाठी जयपूरचा पर्याय निवडला होता. परंतु राजस्थान सरकारने परवानगी दिल्यानंतर त्याविरोधात तेथील तरुणांच्या गटाने सवाई मानसिंग मैदानाबाहेर निदर्शने केली. राजस्थानातही पाण्याचा तुटवडा असताना राज्य सरकारने क्रिकेट लढतींना होकार देणे तेथील नागरिकांना पटले नाही.[१८] २६ एप्रिल रोजी सदर याचिकेवरील सुनावणी देताना महाराष्ट्रात पाणी टंचाई असताना आयपीएलचे सामने नको, भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे सामने महाराष्ट्राबाहेरच खेळवणे योग्य आहे असे सांगून याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.[१९]
२९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे मुंबई आणि पुण्याचे सर्व साखळी सामने एसीए-व्हिडीसीए मैदान, विशाखापट्टणम् येथे खेळवण्यात येतील. पुण्यात होणारे प्ले-ऑफ सामने (एलिमिनेटर आणि पात्रता२) दिल्लीत फिरोजशाह कोटला मैदानावर आणि नागपूरमध्ये होणारे किग्स XI पंजाबचे साखळी सामने मोहाली येथे होतील.[२०]
उद्घाटन सोहळा
आयपीएल २०१६चा उद्घाटन सोहळा ८ एप्रिल २०१६ रोजी १९:३० वाजता मुंबईमधील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर पार पडला.
बॉलीवूड तारेतारकांच्या दिमाखदार नृत्य सादरीकरण, वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होचा चॅम्पियन डान्स अशा नयनरम्य सोहळ्याद्वारे इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या हंगामाचे उद्घाटन झाले. या सोहळ्यात रणवीर सिंग, कतरिना कैफ, यो यो हनी सिंग, जॅकलीन फर्नांडिस यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. बॉलीवूडमधील पार्श्वगायक अंकित तिवारीसह ड्वेन ब्राव्होने चॅम्पियन गाण्यावर उपस्थितांना ठेका धरायला लावला.[२१]
स्थळे
साखळी फेरीतील सामन्यांसाठी १० स्थळे निवडण्यात आली.[२२]बंगलोरकडे पात्रता १ सामन्याचे, पुण्याकडे एलिमिनेटर आणि पात्रता २ आणि मुंबईकडे अंतिम सामन्याचे यजमानपद देण्यात आले होते.[२३] परंतु महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, १३ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रात मे महिन्यात होणारे सर्व सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश दिले.[१५] त्यानुसार १६ एप्रिल २०१६ रोजी अंतिम सामन्यासाठी बंगळूरची निवड करण्यात आली[१६] आणि पुण्यात होणारे एलिमिनेटर आणि पात्रता २ हे सामने कोलकातामध्ये हलवण्यात आले.
२९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे एलिमिनेटर आणि पात्रता २ हे सामने पुन्हा दिल्लीमध्ये हलवण्यात आले. आणि महाराष्ट्रातील १ मे नंतरचे मुंबई आणि पुण्याचे सामने विशाखापट्टणम् येथे तर पंजाबचे सामने मोहाली तेथे खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.
२ मे २०१६ रोजी जाहीर करण्यात आले की, गुजरात लायन्स त्यांचे १९ आणि २१ मे रोजी होणारे सामने कानपूर येथे खेळेल.[२४]
पावसामुळे खेळ उशिरा सुरू करण्यात आला, परंतू षटके कमी केली गेली नाहीत.
पुण्याच्या डावाच्या ११ षटकांनंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार पुण्याला विजयासाठी ११ षटकांमध्ये ३ बाद ६० धावांची गरज होती.
पुण्याच्या डावादरम्यान ८.२ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना सुमारे ५५ मिनीटे थांबवला गेला, परंतू षटके कमी करण्यात आली नाहीत.
पुण्याच्या डावादरम्यान ११व्या षटकांनंतर आलेल्या पावसामुळे पुढचा खेळ रद्द करण्यात आला आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार पुण्यापुढे ११ षटकांत ५८ धावांचे नवे लक्ष्य होते.
पावसामुळे सामना सुमारे २ तास उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी १५ षटकांचा खेळवण्यात आला.
पंजाबच्या डावादरम्यान १४ व्या षटकांनंतर पुन्हा पाऊस आल्याने सामना तेथेच थांबवण्यात आला, त्यावेळी डकवर्थ-लुईस नियमानुसार पंजाबला १४ षटकांत २०३ धावा करणे गरजेचे होते.