चंद्रगुप्त मौर्य

मौर्य साम्राज्याचा संस्थापक
(सम्राट चंद्रगुप्त मौर्य या पानावरून पुनर्निर्देशित)

चंद्रगुप्त मौर्य (इ.स.पू. ३४० ते इ.स.पू. २९८) हा एक भारतीय सम्राट आणि मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता. मौर्य साम्राज्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.


सम्राट चंद्रगुप्त मौर्य
सम्राट
सम्राट चंद्रगुप्त मौर्य
अधिकारकाळ इ.स.पू. ३२१ - इ.स.पू. २९८
राज्याभिषेक इ.स.पू. ३२१
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव चंद्रगुप्त मौर्य
जन्म इ.स.पू. ३४०
पाटलीपुत्र, बिहार
मृत्यू इ.स.पू. २९५
श्रावणबेलकोटा, कर्नाटक
पूर्वाधिकारी धनानंद
उत्तराधिकारी बिंदुसार
वडील सम्राट चंद्रवर्धन
आई महाराणी मुरा
पत्नी दुर्धरा,
हेलेना
संतती बिंदुसार
राजघराणे मौर्य वंश
धर्म हिंदू धर्म

जन्म -इ.स.पू. ३४० मध्ये एका क्षत्रिय कुटुंबात जन्म झाला. आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२२ ते इ.स.पूर्व २९८ पर्यंत.

राज्यकाल

संपादन

नंद घराणेशाहीची समाप्ती करून सिंहासनावर विराजमान होताच चंद्रगुप्ताने राज्याच्या सीमा वाढविण्यास सुरुवात केली व ग्रीक सम्राट सिकंदरअलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेल्युकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेला असलेली बरीच राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. हे युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या कार्नेलिया हेलेना हिचा विवाह चंद्रगुप्ताशी ठरवला आणि तह घडवून आणला. लग्नात चंद्रगुप्ताने सेल्युकसला ५०० हत्ती भेटीदाखल दिले आणि त्यानंतर चाणक्याच्या मदतीने सेल्युकसबरोबर ऐतिहासिक तह करून त्याच्या कन्येशी विवाह केला व नवीन मैत्रीचा प्रारंभ केला. या यशस्वी कारवाईनंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणि इजिप्तसिरिया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची आशिया खंडात प्रथमच स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली. ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाचा ग्रंथ लिहिला. दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज अस्तित्वात नाही . परंतु जो भाग आजही उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताच्या सामर्थ्याची व चाणक्याच्या परिणामकारक नीतीची प्रचिती येते.

संघर्ष आणि मोहीमा

संपादन

पंजाब आणि वायव्य प्रांत परकीय अधिपत्याखालून मुक्त करण्यासासठी चंद्रगुप्ताला ग्रीक सैन्याशी आणि ग्रीकांच्या क्षत्रपांशी संघर्ष करावा लागला. ग्रीक सैन्य भारतामधून हुसकावून लावल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य पंजाब, वायव्य सीमा आणि सिंध प्रांताचा स्वामी झाला.

भौगोलिक सीमा

संपादन

चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली असलेल्या प्रदेशात बलुचिस्तान, अफगाणिस्तान, गांधार, हिंदुकुश पर्वतरांग, काबूल, विंध्य पर्वताचा प्रदेश, बिहार, बंगाल, ओरिसा, दख्खन (आधुनिक महाराष्ट्र) व म्हैसूर यांचा समावेश होता. यावरून मौर्यांचे राज्य किती अवाढव्य होते याचा अंदाज येतो.

मौर्यांच्या कारकिर्दीत मगध प्रांतात मागधी प्राकृत, पाली या भाषांचे व खरोष्टी आणि ब्राम्ही अशा लिपी चलनात असाव्यात असे वाटते, पण तत्कालीन म्हणावेत व तसे सिद्ध करणारे लेख मिळत नसल्याने व्यवहार भाषा काय होती हे नक्की समजत नाही, तसेच चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य उत्तर, पश्चिम सीमांपर्यंत वाढवलेले होते, त्या भागांत पैशाचिक तसेच गांधार या परिसरातील प्राकृत सारख्या भाषा वापरात असावेत असा प्राथमिक अंदाज बांधता येतो. तसेच मौर्य साम्राज्याच्या प्रत्येक प्रांतात त्या त्या प्रादेशिक भाषांचा वापर होत असावा, तीच पद्धत पुढे सम्राट अशोकाच्या (इ.स.पू. २६९ ते इ.स.पू. २३२) कारकिर्दीत चालू ठेवली.

चित्रदालन

संपादन

कायदा व सुव्यवस्था

संपादन

कायदा व सुव्यवस्था ही चंद्रगुप्त मौर्याच्या राजवटीची खरी यशाची नांदी होती. राज्याचा राज्यकारभार संपूर्णपणे मध्यवर्ती होता व राजा हाच सर्वेसर्वा होता. नंद राजवटीखाली राज्यात बोकाळलेल्या गुन्हेगारीला व भ्रष्टाचाराला चंद्रगुप्ताने चाणक्याच्या साहाय्याने काही वर्षातच आवाक्यात आणले. चाणक्याच्या मदतीने उभारलेल्या उत्तम गुप्तचर यंत्रणेच्या जोरावर महसूल विभागातील भ्रष्टाचारास संपूर्णपणे आळा घालण्यात आला व थोड्याच दिवसात कठोर व पारदर्शक न्यायप्रणालीने चंद्रगुप्ताने आपल्या न्यायदानाबद्दल प्रजेचा विश्वास संपादन केला. "अमावास्येच्या रात्री देखील आर्य स्त्रिया तलम व रंगीबेरंगी वस्त्रे नेसून मौर्यांच्या शहरातून निवांतपणे फिरताना आढळतात" या मेगॅस्थेनिसच्या विधानावरून मौर्यांच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल कल्पना येते.

चंद्रगुप्ताचे गुप्तहेरखाते आणि सुरक्षाखाते समर्थ व सबळ असल्याचे सांगितले जाते. स्वतःच्या जिवाला अपाय होऊ नये यासाठी अंगरक्षक म्हणून त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. त्याच्या शयनगृहातही या स्त्रियांचा कडक पहारा असे. केवळ राज्यकारभाराच्या कामासाठी आणि शिकारींसाठी तो महालाबाहेर पडायचा. रात्रीच्या प्रत्येक प्रहरी तो आपले शयनगृह बदलत असे.

चंद्रगुप्ताविषयी मराठी साहित्य, चित्रपट नाटके

संपादन
 • चंद्रगुप्त (हरि नारायण आपटे यांच्या कांदंबरीचा संक्षेप; लेखक - प्र.न. जोशी, सन २०१०)
 • चंद्रगुप्त (नाटक). लेखक - नरसिंह चिंतामण केळकर
 • मुद्राराक्षस (संस्कृत नाटक; लेखक - विशाखादत्त)
 • चंद्रगुप्त (व चाणक्य) : अडीच हजार वर्षांपूर्वीचा हिंदुस्थान (पुस्तक, लेखक - हरि नारायण आपटे). या कादंबरीची संक्षिपत आवृत्ती प्र.न. जोशी यांनी बनवली आहे.
 • चंद्रगुप्त मौर्य : एक धगधगती शौर्यगाथा (पुस्तक लेखक - राजेंद्र देशपांडे)
 • संगीत चंद्रप्रिया (नाटक; लेखक-निर्माता-दिग्दर्शक चिन्मय मोघे  : या नाटकाला पुणे येथील बालगंधर्व रसिक मंडळातर्फे दिला जाणारा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार प्रदान झाला.(जुलै २०१९). चिन्मयने अवघ्या १७ व्या वर्षी या संगीत नाटकाची निर्मिती केली. संगीत रंगभूमीला दिलेल्या या योगदानाबद्दल मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे आहे. संगीत चंद्रप्रियाचे संगीतकार नाशिकचे जगदेव वैरागकर यांना भास्करबुवा बखले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १० हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप आहे. याच नाटकाचे वेशभूषाकार पुणे येथील राकेश घोलप यांना द.कृ. लेले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  नाटकाचा पहिला प्रयोग १९ जानेवारोी २०१९ रोजी पुण्याच्या 'बालगंधर्व'मध्ये झाला.
 • सम्राट चंद्रगुप्त (चरित्र, लेखक - ह.अ. भावे)
 • पाथ ऑफ ए फाॅलन डेमीगाॅड : चंद्रगुप्त (मराठी) (मराठी अनुवादक - नंदिनी उपाध्ये, मूळ इंग्रजी, लेखक - रजत पिल्लाई)
 • अशोकचरित्र - वा. गो. आपटे.

संदर्भ

संपादन

हेदेखील पहा

संपादन