पुण्याचा इतिहास इ.स. ७५८पासून लिखितस्वरुपात आढळतो.

आठवे शतकसंपादन करा

आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.

सतरावे शतकसंपादन करा

१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशाहाने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये त्यांच्या पत्नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६२७ मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची 'प्रशासकीय राजधानी' बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते.

मराठा साम्राज्यसंपादन करा

 
विश्रामबाग वाडा

पुणे हे शिवाजीमहाराजांच्या जीवनपटातील व मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे. इ.स. १६३५-३६ च्या सुमारास जेव्हा जिजाबाई व शिवाजीमहाराज पुण्यास वास्तव्यास आले तेव्हापासून पुण्याच्या इतिहासातील एक नवे पर्व जन्माला आले. शिवाजीमहाराज व जिजामाता पुण्यातील लाल महाल येथे राहत असत. पुण्याचे ग्रामदैवत- कसबा गणपतीची स्थापना जिजाबाईंनी केली. १७व्या शतकाच्या प्रारंभास, छत्रपती शाहूंचे पंतप्रधान, बाजीराव पेशवे (थोरले) यांना पुणे येथे आपले वास्तव्य करायचे होते. छत्रपती शाहूमहाराजांनी त्यांना परवानगी दिली व पेशव्यांनी मुठा नदीच्या काठी शनिवारवाडा बांधला. थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांच्या काळात (इ.स. १७४०- इ.स. १७६१- कारकीर्द) पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर हिंदुस्थानचे सत्ता केंद्र बनले. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला आणि शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याच्या सुशोभिकरणाकडे लक्ष दिले, पर्वती देवस्थान व सारसबागेची निर्मिती केली. पेठा वसवल्या, हौद, वाडे, मंदिरे, रस्ते यांचा विकास केला. कात्रज तलावातून पुणे शहरासाठी पाणी आणले. (काही इतिहासकारांच्या मते पाणी पुरवठ्याचे काम बाजीरावांनी केले.) पेशवाईच्या काळातील मुत्सद्दी राजकारणी नाना फडणवीस यांचे योगदानही पुण्याच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. इ.स. १७७४ ते इ.स. १७९५ या काळात नाना फडणवीसच पेशवाईचे सूत्रधार होते. निजाम, हैदर, टिपू, इंग्रज व फ्रेंच यांच्याशी मैत्री, लढाई व भेदनीती अशी सूत्रे वापरत त्यांनी पेशवाई टिकवण्याचा प्रयत्न केला. पण इ.स. १८०० साली झालेल्या नानांच्या मृत्यूनंतर पेशवाईचे व पर्यायाने पुण्याचे वैभव ओसरत गेले. खरडा येथील ऐतिहासिक किल्ल्यात मराठे व निझामांत इ.स. १७९५मध्ये युद्ध झाले. इ.स. १८१७ला पुण्याजवळील खडकी येथे ब्रिटिश व मराठ्यांत युद्ध झाले. मराठे या युद्धात हरले व ब्रिटिशांनी पुणे ताब्यात घेतले.इ.स. १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाला. पुढील काळात शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकवला गेला. ब्रिटिशांनी पुण्याचे महत्त्व ओळखून शहराच्या पूर्वेस व खडकीत कॅंटोन्मेंट (लष्कर छावणी) स्थापन केली. इ.स. १८५८ मध्ये पुणे महानगरपालिका स्थापन झाली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात अनेक नामांकित शिक्षणसंस्था स्थापन झाल्या.

स्वातंत्र्ययुद्धसंपादन करा

 
आगाखान बंगला

भारतीय स्वातंत्र्ययुद्धात पुण्यातील नेत्यांनी व समाजसुधारकांनी महत्त्वाचे योगदान दिले. लोकमान्य टिळक आणि वि.दा. सावरकर या नेत्यांमुळे पुण्याने राजकीय पटलावर आपले महत्त्व जवळजवळ सहा दशके राखले. महादेव गोविंद रानडे, रा.गो. भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा फुले हे समाजसुधारक व राष्ट्रीय ख्यातीचे नेते पुण्याचे आहेत.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा विचार करता पुण्याचे स्थान व भूमिका महत्त्वाची होती. न्यायमूर्ती रानडेंपासून ते एस.एम. जोशींपर्यंत, तसेच लो. टिळकांपासून ते सेनापती बापट यांचेपर्यंत असंख्य स्वातंत्र्य सेनानींचे कार्य उल्लेखनीय आहे. इ.स. १८७१ ते इ.स. १८९२ या कालावधीत न्यायमूर्ती रानडे पुण्यात होते. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून (इ.स. १८७०-इ.स. १९७१) त्यांनी मवाळ व नेमस्त राजकारणाला सुरुवात केली. पुण्याचे सार्वजनिक काका (गणेश वासुदेव जोशी) यांच्या सहकार्याने न्यायमूर्ती रानडे यांनी अर्थव्यवस्था व शेती विकास, स्वदेशी पुरस्कार, राजकीय सत्तेत चंचुप्रवेश या माध्यमातून जनजागृती करण्यास पुण्यातून सुरूवात केली. अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक संस्था स्थापन करून न्यायमूर्ती रानडे यांनी संस्थात्मक जीवनाचा पाया भारतात घातला, यांतील अनेक संस्थांची स्थापना पुण्यात झाली होती.

महात्मा फुले यांनी पुणे येथे राहूनच जातिव्यवस्थेवर, ब्राह्मण्यावर कठोर प्रहार केले.सामाजिक विषमता निर्मूलनासाठी सत्यशोधक समाजाची इ.स. १८७३ मध्ये स्थापना करून बहुजन समाजाला कार्यक्रम दिला, व्यासपीठ निर्माण केले. स्त्री-शिक्षण या विषयात त्यांनी केलेले कार्य हे सर्वांत मूलभूत आणि महत्त्वाचे आहे.इ.स. १८४८ मध्ये जोतिराव फुले यांनी पुणे येथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिकवून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षिका म्हणून उभे केले. विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यांचे शिक्षण, शेती विकास या क्षेत्रांमध्येही महात्मा फुले यांनी मूलभूत कार्य केले. इ.स. १८७६ ते इ.स. १८८२ या काळात ते पुणे नगरपालिकेचे सदस्यही होते. महात्मा फुले यांच्या लेखनातून व कार्यातूनच राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुढे प्रेरणा मिळाली.

सार्वजनिक सभा या महत्त्वाच्या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार असल्यामुळे पुण्यातील गणेश वासुदेव जोशी यांचे नाव सार्वजनिक काका असे पडले होते. सार्वजनिक काकांनी स्वदेशी तत्त्वाचा प्रचार पुण्यात केला. परदेशी कापडाची होळी त्यांनी पुण्यात घडवून आणली होती. सार्वजनिक काकांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र स्वीकारण्याचे धाडस त्या काळात दाखवले होते. त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनीही स्त्री-विचारवती ही संस्था स्थापन करून महिलांचे संघटन व प्रबोधन करण्याचा प्रयत्न इ.स. १८७० च्या दरम्यान पुण्यात केला होता. भारतीय राष्ट्रवाद ज्यांनी प्रखरपणे मांडला व भारतातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याच काळात पुणे हे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे अतिशय महत्त्वाचे केंद्र बनले. वयाच्या दहाव्या वर्षापासून (इ.स. १८६६ पासून) लोकमान्य टिळक पुण्यात राहत होते. टिळकांचे शिक्षण पुण्यातीलच डेक्कन कॉलेजमध्ये झाले. लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल (इ.स. १८८०) ची स्थापना केली. पुढील काळात आगरकरांच्या सहकार्याने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची (इ.स. १८८४) व त्या अंतर्गत फर्गसन महाविद्यालयाची स्थापना केली.

टिळक -आगरकर यांनी मराठा (इंग्रजी) व केसरी (मराठी) ही वृत्तपत्रे इ.स. १८८१ मध्ये पुण्यात सुरू केली. या वृत्तपत्रांतील लोकमान्य टिळकांचे अग्रलेख वाचून अनेक तरुण देशभक्त, क्रांतिकारक बनले. या वृत्तपत्रांमुळे इंग्रजी राजवटीविरुद्धचा असंतोष वाढला. लोकमान्य टिळक व पुण्याजवळचा सिंहगड यांचेही एक अतूट नाते होते. अनेक राजकीय, सामाजिक विषयांबाबत (व गणित विषयाबाबतचे) चिंतन-मनन व अभ्यास टिळकांनी सिंहगडावर केला. केसरीतील लेखांच्या प्रेरणेतूनच चापेकर बंधू क्रांतिकारक बनले. दामोदर, वासुदेव व बाळकृष्ण चापेकर यांनी पुण्याचा तत्कालीन कमिशनर रॅंड या अधिकाऱ्याचा वध केला. इ.स. १८९७ मध्ये पुण्यात घडलेल्या या घटनेतून संपूर्ण भारतात अनेक क्रांतिकारक निर्माण झाले. पुण्याजवळ चिंचवड येथे चापेकर बंधूंच्या स्मृती स्मारकाच्या माध्यमातून जतन करण्यात आल्या आहेत. लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यामध्ये ‘सामाजिक सुधारणा आधी की राजकीय स्वातंत्र्य आधी’ असा वाद पुण्यात झाला. यातून बुद्धिप्रामाण्यवादी आगरकर टिळकांपासून वेगळे झाले. आगरकरांनी पुण्यातच ‘सुधारक’ वृत्तपत्र सुरू केले. ‘सुधारक’ मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.

क्रांतिकारी चळवळीच्या मार्गातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व हुतात्मा राजगुरू यांचे स्मरण हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा विषय आहे. वासुदेव बळवंत फडके यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूल येथे झाले होते. त्यांनी पुणे जिल्हा परिसरात क्रांतिकारकांची संघटना बांधण्याचा प्रयत्न केला होता. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या त्रिकुटातील राजगुरू हे जिल्ह्यातील खेड या गावचे. हुतात्मा बाबू गेनू यांचे मूळ (जन्म) गावही याच जिल्ह्यातील, आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ हे होय. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या राजकीय व सामाजिक चळवळी, व अनेक प्रकारच्या संस्थांची पुण्यात झालेली स्थापना यांमुळे पुण्यात १९ व्या शतकातील पिढ्या घडल्या. पुण्याने अनेक दिग्गजांना घडवले, तसेच असंख्य मान्यवरांनी पुण्याच्या लौकिकात भर घातली. म. गांधी ज्यांना आपले गुरू मानत असे नामदार गोपाळ कृष्ण गोखले इ.स. १८८५ ते इ.स. १८९५ या काळात पुण्यात वास्तव्यास होते. त्यांनी फर्गसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले, तसेच आगरकरांच्या ‘सुधारक’ वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीचे कामही काही काळ पाहिले.

थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे इ.स. १८९३ ते इ.स. १८९८ या कालावधीत पुण्यात होते. या काळात त्यांनी फर्गसन महाविद्यालयात बी.ए. व एल.एल.बी. (प्रथम वर्ष) चे शिक्षण घेतले. याच काळात त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले, त्यांच्या पुढील जीवनाक्रमाला निश्र्चित दिशा मिळाली. महर्षी शिंदे यांनी (इ.स. १९०६ मध्ये स्थापन केलेल्या )निराश्रित साहाय्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लास मिशन) या संस्थेची शाखाही पुणे येथे स्थापन केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्र्न अधोरेखित करण्यासाठी व शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक शेतकी परिषदा भरवल्या. त्यांपैकी दोन परिषदा इ.स. १९२६इ.स. १९२८ मध्ये पुणे येथे आयोजित केल्या. इ.स. १९३० मध्ये येरवडा जेलमध्ये असताना त्यांनी ‘‘माझ्या आठवणी व अनुभव’’ हा आत्मचरित्रपर पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली.

प्रामुख्याने स्त्री-शिक्षण या विषयात महान कार्य केलेले महर्षी धोंडो केशव कर्वे यांचीही कारकिर्द पुण्यातलीच. इ.स. १८९१ पासून महर्षी कर्वे फर्गसन महाविद्यालयात सुमारे २३ वर्षे प्राध्यापक होते. बुद्धिमत्ता, कष्ट, कार्यावरची अविचल निष्ठा, व आधुनिक विचार या गुणांच्या आधारे महर्षी (अण्णा) कर्वे यांनी स्त्री-शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अनाथ बालिकांचे संगोपन या क्षेत्रांमध्ये प्रचंड कार्य केले. इ.स. १९०७ पासून त्यांनी फक्त महिला व मुलींसाठी शाळा स्थापन करण्यास पुण्याजवळील हिंगणे येथून सुरुवात केली. इ.स. १९१६ मध्ये हिंगणे येथेच महर्षी कर्वे यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठाची स्थापना केली. पुढे ह्या विद्यापीठाचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) विद्यापीठ झाले. त्या काळात कर्वे यांनी गृहविज्ञान, आरोग्यविज्ञान, परिचारिका प्रशिक्षण असे विषय शिक्षणासाठी ठेवले होते हे विशेष! परिणामी आजच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत हजारो मुली शालेय शिक्षणापासून ते इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंगपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. म. कर्वे १०५ वर्षांचे कृतार्थ आयुष्य जगले. वयाच्या १०० व्या वर्षी इ.स. १९५८ मध्ये त्यांना भारतरत्नही प्रदान करण्यात आले.

थोर स्वातंत्र्यसेनानी व समाजसेवक सेनापती (पांडुरंग महादेव) बापट यांचेही शिक्षण पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्येच झाले होते. इ.स. १९२०-इ.स. १९२१ मध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे धरण व वीज प्रकल्पाचे काम चालू झाले होते. या प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जाणार असल्यामुळे सेनापती बापट यांनी इ.स. १९२१ पासून मुळशीचा सत्याग्रह सुरू केला, त्या लढ्यात त्यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. या लढ्यामुळेच त्यांना सेनापती ही पदवी मिळाली. पुण्यात त्यांनी सार्वजनिक स्वच्छतेचा प्रचार केला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ते एक महत्त्वाचे नेते होते.

स्त्री-शिक्षण, स्त्री-मुक्ती या क्षेत्रात कार्य केलेल्या पंडिता रमाबाई यांचे इ.स. १८८२ नंतर पुण्यात वास्तव्य होते. त्यांनी इ.स. १८९० मध्ये अनाथ मुली, निराधार, गरीब महिला, परित्यक्ता, विधवा यांच्या निवास-भोजन-शिक्षणासाठी ‘शारदा सदन’ ची स्थापना पुण्यात केली. पुण्याजवळ केडगाव येथेही त्यांनी मुक्तिसदन स्थापन केले होते. इ.स. १८९७ च्या दुष्काळात मुक्तिसदनात असंख्य दुष्काळपीडित स्त्रिया, मुलींना आसरा देण्यात आला होता.

इतिहासाचार्य विश्र्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म पुण्यातीलच. महाराष्ट्र व मराठी भाषा यांविषयी जाज्वल्य अभिमान असणाऱ्या या झपाटलेल्या संशोधकाने ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या विषयावरील बावीस खंड प्रसिद्ध केले. संशोधन कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी पुण्यात इ.स. १९१० मध्ये भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. प्रसिद्ध गणित-तज्ज्ञ व भारतातील पहिले रॅंग्लर- रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऱ्यांचेही शिक्षण पुण्यात झाले. पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात ते अनेक वर्षे प्राध्यपक व प्राचार्य होते. रॅंग्लर परांजपे काही काळ पुणे विद्यापीठाचे कुलगुरूही होते. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्मही पुण्याचाच.

राष्ट्रीय स्वातंत्र्य-चळवळीच्या सर्व महत्त्वाच्या आंदोलनांत पुण्यातील थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्र, तसेच आणीबाणी विरोध या आंदोलनांतही त्यांनी पुण्याचे नेतृत्व केले.पुण्यातील पर्वती देवस्थानात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी इ.स. १९२९ मध्ये सत्याग्रह केला होता. मुस्लीम सत्यशोधक हमीद दलवाई यांचेही कार्य उल्लेखनीय आहे. श्री. दलवाई यांनी मुस्लीम समाजाचा, प्रामुख्याने महिलांचा विकास या अवघड क्षेत्रात कार्य करण्याचा प्रयत्न पुण्यातून केला. तलाकपीडित मुस्लीम महिलांचे स्वावलंबन, बहुपत्नीत्वास विरोध, धर्मपरीक्षण या अनेक मुद्यांबाबत त्यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या (स्थापना : इ.स. १९७०) माध्यमातून कार्य केले. हमाल, भंगार गोळा करणारे, विविध क्षेत्रांतले असंघटित कामगार, रिक्षावाले इत्यादी दुर्लक्षित घटकांना समोर ठेवून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबा आढाव पुण्यातून आजही कार्यरत आहेत. आढाव यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ हे सूत्र चळवळीच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न केला.

ऐतिहासिकदृष्ट्या पुण्यातील येरवडा जेलचे महत्त्वही वादातीत आहे. हे जेल ब्रिटिशांनी इ.स. १८८० साली बांधून पूर्ण केले. स्वातंत्र्यापूर्वी, तसेच स्वातंत्र्यानंतर आणीबाणीच्या काळात हा तुरुंग कार्यकर्ते, नेते घडवणारे विद्यापीठच बनला होता. सप्टेंबर, इ.स. १९३२ मध्ये म. गांधी व डॉ. आंबेडकर या ज्येष्ठ नेत्यांमध्ये, या तुरुंगातच एक महत्त्वाचा करार झाला. अनेक तत्कालीन ज्येष्ठ नेत्यांच्या सह्या असलेल्या या कराराला पुणे किंवा येरवडा करार असे संबोधले जाते.