हमीद दलवाई

भारतीय समाज सुधारक, विचारवंत आणि लेखक

हमीद उमर दलवाई (जन्म : मिरजोळी, चिपळूण तालुका, २९ सप्टेंबर १९३२; - ३ मे १९७७) हे समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते.

हमीद दलवाई
जन्म २९ सप्टेंबर १९३२
मिरजोळी, (चिपळूण, रत्‍नागिरी जिल्हा)
मृत्यू ३ मे १९७७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र समाजसुधारणा
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी कथासंग्रह
चळवळ मुस्लिम समाजसुधारणा चळवळ
संघटना मुस्लिम सत्यशोधक मंडळ
प्रसिद्ध साहित्यकृती इंधन, लाट
प्रभाव जयप्रकाश नारायण
वडील उमर
पत्नी मेहरुन्‍निसा दलवाई
अपत्ये इला, रुबिना
विकिस्रोत
विकिस्रोत
हमीद दलवाई हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

सुरुवातीचे आयुष्य

संपादन

दलवाई यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील शिक्षण मुंबईत रुपारेल व इस्माईल युसुफ या महाविद्यालयांत झाले. हमीद यांनी महात्मा जोतिराव फुले याच्या प्रभावामुळे संघटनेची स्थापना केली

सामाजिक कार्य

संपादन

मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९७० मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्‍न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आले आहे.[] हमीद दलवाई यांनी इ.स. १९६६ मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला. मुसलमानांमधील तोंडी तलाक, बहुपत्‍नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी हा या मोर्चाचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा पहिलाच मोर्चा असावा. महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ नावाचे पुस्तक लिहिले. हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यांसंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी. समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या कोणाही दृष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना झाला.[]

हमीद दलवाई हे रॅशनल भूमिका घेणारे कृतीशील विचारवंत होते. राष्ट्रीय एकात्मता हे अंतिम उद्दिष्ट मानणारे,मुस्लिम समाजातील सुधारणांना बळ देण्यासाठी निर्भीडपणे अनेक प्रबोधन-कृती कार्यक्रम राबविणारे सामाजिक क्रांतीिारक हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून वैचारिक लढा उभारला. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही दोन मूल्ये दलवाईंच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती. परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा पुरस्कार करणाऱ्या या मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियात त्यांना मानाचे स्थान आहे.

हमीद दलवाई यांचे प्रकाशित साहित्य

संपादन
  • इंधन (कादंबरी)
  • इस्लामचे भारतीय चित्र
  • कानोसा भारतीय मुस्लिम मनाचा
  • जमीला जावद (कथासंग्रह)
  • भारतातील मुस्लिम राजकारण (प्रकाशन दिनांक - ९ जानेवारी २०१७)
  • मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय
  • मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया
  • राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान
  • लाट (कथासंग्रह)[]

पुरस्कार

संपादन

मरणोपरान्त जीवनगौरव पुरस्कार : हमीद दलवाई यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनने २०१७ सालच्या जानेवारीमध्ये जीवनगौरव पुरस्कार दिला. हमीद दलवाई यांच्या वतीने त्यांच्या पत्‍नी मेहरुन्‍निसा दलवाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

लघुपट

संपादन

'हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट' हा हमीद दलवाई यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा लघुपट आहे.

हमीद दलवाई यांचे चरित्र

संपादन
  • हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत - लेखक प्रा. शमसुद्दीन तांबोळी

प्रेरणा

संपादन

मुस्लिम सत्यशोधक मंडळ आपल्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक सलोखा आणि महिला सबलीकरणासाठी काम केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करते. २०१९चा पुरस्कार हा प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या डॉ झीनत शौकत अली आणि लोकप्रिय लेखक-कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांना प्रदान करण्यात आला.[]बशीर मोमीन कवठेकर यांनी आपल्या साहित्यातून हुंडाबंदी, स्त्रीभूण हत्या, निरक्षरता यासारखे ज्वलंत सामाजिक विषय हाताळले असून सामाजिक परिवर्तनासाठी ग्रामीण महाराष्ट्रात पथनाट्याद्वारे जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "मुस्लिम सत्यशोधक मंडळ". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-24 रोजी पाहिले.
  2. ^ "हमीद दलवाई यांच्या जीवन व वाङ्‌मयीन कर्तृत्वाचा आढावा" (PDF). shodhganga.inflibnet.ac.in. २४ जुलै २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ "अनुक्रमणिका:लाट.pdf - विकिस्रोत" (PDF). mr.wikisource.org. 2020-06-05 रोजी पाहिले.
  4. ^ "दारू पिऊन ‘तिहेरी तलाक’ उच्चारणे कसे काय चालते?"[१] Lokamt, Published on 23-March-2019
  5. ^ “बी के मोमीन यांचे साहित्य लोकजागृती करणारे - गृहमंत्री वळसे पाटील”, "Lokmat", Pune, 22-Nov-2021.