मुंबई उपनगरी रेल्वे

मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली

मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वेपश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभाग ती चालवते. उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन असे म्हणतात.

मुंबई उपनगरी रेल्वे
स्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
वाहतूक प्रकार सार्वजनिक परिवहन
मार्ग ३ (मध्य, हार्बर आणि पश्चिम)
मार्ग लांबी ४२७.५ कि.मी.
एकुण स्थानके १५२
दैनंदिन प्रवासी संख्या ७५ लाख
सेवेस आरंभ १६ एप्रिल १८५३

भारतीय रेल्वेची तशीच मुंबई उपनगरी रेल्वेची सुरुवात ब्रिटिशांनी भारतात व आशिया खंडात १६ एप्रिल १८५३ मध्ये बांधलेल्या पहिल्या रेल्वे मार्गावर झाली. या मार्गावर पहिली आगगाडी मुंबई पासून ३४ कि.मी. अंतरावर असलेल्या ठाणे स्थानकापर्यंत धावली.

मुंबई बेटाची पश्चिम-पूर्व रुंदी फारच कमी आहे. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या उत्तरेकडे असलेल्या उपनगरांच्या दिशेने वाढत गेली. मात्र, मुंबईतील प्रमुख व्यापारी संस्था आणि त्यांची कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. या स्थितीत या कार्यालयांत येण्याकरिता दक्षिणोत्तर धावणारी ही रेल्वेव्यवस्था लोकांसाठी जनवाहतुकीची प्राथमिक प्रणाली झाली. मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रणाली व मोनो प्रणाली बांधली आहे.

मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे सहा मुख्य मार्ग आहेत:

सेवा व सुविधा

संपादन

ह्या सेवेत एकूण ४६५ किलोमीटर लांबीचे मार्ग आहेत. डहाणू रोड ते चर्चगेट तसेच कसारा, खोपोली, रोहा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नेरूळ ते खारकोपर या मार्गांवर धावणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या गाड्या या गाड्यांच्या वर असलेल्या विजेच्या तारांमधून मिळणाऱ्या २५,००० व्होल्ट ए.सी. वीज पुरवठ्यावर चालतात. ह्या रेल्वेगाड्यांना प्रत्येकी ३ किंवा ४ ई.एम.यू. (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) जोडलेली असतात. युनिटच्या संख्येनुसार गाडीला १२ किंवा १५ डबे असतात. अशा एकूण १९१ गाड्यांद्वारे २,३४२ फेऱ्यांतून रोज सुमारे ७५ लाखांहून जास्त प्रवासी प्रवास करतात.

क्षेत्र व मार्ग

संपादन

पश्चिम रेल्वेमध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेचे दोन क्षेत्रीय विभाग ही रेल्वे प्रणाली चालवतात. सध्या मध्य व पश्चिम या दोन्ही मार्गांवर जलद उपनगरी गाड्या, मालगाड्या व दूर अंतरापर्यंत चालणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गावरच्या गाड्या एकाच रूळजोडीवर धावतात. हार्बर मार्गावरच्या सेवा मध्य तसेच पश्चिम या दोन्ही विभागांच्या लोहमार्गांवर चालवल्या जातात.

पश्चिम रेल्वे

संपादन

पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा चर्चगेट पासून डहाणू रोड पर्यंत चालवली जाते. समुद्रकिनाऱ्याला साधारणतः समांतर असे १२४ किमी ये-जा करणाऱ्या या मार्गावर दोन स्थानिक मंदगती, दोन द्रुतगती असे चार लोहमार्ग आहेत. चर्चगेट ते विरार दरम्यानच्या ६० किलोमीटर अंतरावर ई.एम.यूने ही सेवा पुरवली जाते तर विरार-डहाणू रोड मार्गावर (६४ किमी) एम.ई.एम.यू (मल्टिपल इलेक्ट्रिकल मेनलाइन युनिट किंवा मेमू) द्वारे ही सेवा पुरवली जाते. या मेमू गाड्यांच्या काही फेऱ्या डहाणू रोड पासून दिवा मार्गे रोहा लाही जातात. उपनगरी गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी महालक्ष्मी येथे कार्यशाळा आहे. शिवाय छोट्यामोठ्या दुरुस्तीसाठी तसेच रात्रीच्या मुक्कामास नेण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि कांदिवली येथे कार्यशाळा (कारशेड) आहेत. याशिवाय विरारमध्ये एक नवीन कार्यशाळा बांधली आहे. ही नवीन कार्यशाळा आशियातील सगळ्यात मोठी कार्यशाळा आहे.

पश्चिम रेल्वेच्या ई.एम.यू गाड्या १२ किंवा क्वचित १५ डब्यांच्या असतात. या गाड्या मंदगती (सगळ्या स्थानकांवर थांबणाऱ्या) किंवा जलदगती (विशिष्ट स्थानकांवरच थांबणाऱ्या) सेवा पुरवतात. उपनगरी फेऱ्या बहुधा मोठ्या व महत्त्वाच्या स्थानकांपासून तशाच दुसऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत असतात. या सेवांचे गंतव्यस्थान पहिल्या डब्याच्या दर्शनी भागात असते. हे गंतव्यस्थान रोमन लिपीतील एक किंवा दोन अक्षरांनी दर्शविले जाते.

मध्य रेल्वे

संपादन

मध्य रेल्वेची सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून उत्तरेकडे कल्याण पर्यंत (५३ कि.मी.) व त्यापुढे विभाजित होऊन ईशान्य दिशेत कसारा (६७ कि.मी.) आणि आग्नेय दिशेत खोपोली पर्यंत (६१ कि.मी) उपलब्ध आहे. यात सुद्धा सी.एस.एम.टी. ते कुर्ला ४ लोहमार्ग आणि कुर्ला ते कल्याण येथे ६ लोहमार्ग आहेत. कल्याण पुढे कसारा आणि कर्जत पर्यंत प्रत्येकी दोन तर कर्जत ते खोपोली पर्यंत १ लोहमार्ग आहे. दादर आणि परळ या दोन स्थानकांमध्ये मध्य रेल्वे वरून पश्चिम रेल्वे वर मार्गांतरण करता येते. मध्य रेल्वेवर 'धिमी' व 'जलद' अशा दोन प्रकारच्या सेवा आहेत. धिम्या सेवेतील गाड्या सर्व स्थानकांवर थांबतात. जलद गाड्या थोड्याफार फरकाने भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवर थांबतात. कल्याण पुढे गाड्या सर्व स्थानकांवर थांबतात.

हे सुद्धा पहा

संपादन