दादर हे मुंबई शहर जिल्ह्यातील उपनगर आहे. दादर या शब्दाचा अर्थ जिना किंवा शिडी असा आहे. पूर्वी परळ आणि माहिम यांच्यामधे चालायचे रस्ते फार थोडे होते. इतरत्र माळरान, खाड्या आणि डबकी होती. या भागातील लोकांनी ही जागा दगड-मातीने भरली. अशाप्रमाणे दादरने सखल परळला थोड्या उंचावरच्या माहिमला जोडले. म्हणून दादर ह्या नावाने प्रसिद्ध झाले.

कबूतर खाना (दादर)

१८९९-१९०० दरम्यान दादर-माटुंगा-वडाळा-शीव हा सगळा परिसर योजनाबद्ध विकसित केलेला मुंबईतील पहिला उपनगरी भाग होता. १८९० च्या दरम्यान आलेल्या प्लेगच्या साथीमुळे शहर विकास प्राधिकरणाने मुख्य शहरामधील गजबजाट कमी करता यावा यासाठी एक विकास योजना तयार केली. त्यावेळी करण्यात झालेल्या परीक्षणा प्रमाणे दादर-माटुंगा परिसरात ६०,००० च्या आसपास, त्याच संख्येत माटुंगा-शीव परिसरात आणि ८५,००० च्या आसपास लोकांना शिवडी-वडाळा परिसरात वसवण्याचे योजले होते.

योजनेप्रमाणे बांधकामांस सुरुवात झाली. यात प्रमुख भर हा सांडपाण्याच्या व्यवस्थेवर होता. इमारतींची उंची तीन मजल्यांपेक्षा जास्त नसावी तसेच दोन इमारतींमध्ये योग्य अंतर असावे असे ठरले. या योजनेत रहिवासी इमारतीं सोबतच व्यावसायिक आणि शैक्षणिक इमारतीसुद्धा होत्या. खेळाची मैदाने तसेच उद्यानांसाठीही जागा राखून ठेवण्यात आली होती.

जवळजवळ ४४० एकर (१.८ किमी) इतकी जमीन याकरता संपादित करण्यात आली होती. या नव्याने विकसित केलेल्या परिसराचा फायदा उठवण्यासाठी पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थाची निर्मिती करण्यात आली. दादरच्या पारशी आणि हिंदू वसाहती तसेच माटुंग्याची तमिळ वसाहत या अशाच प्रकारे विकसित करण्यात आल्या होत्या.

नव्याने बांधण्यात आलेल्या मोहम्मद अली मार्गावरून प्रवास करता, दादर महात्मा फुले मंडई (तेव्हा क्रॉफर्ड मार्केट) पासून सहा मैलांवर येते. त्याच बरोबरीने ट्रामचा विस्तार या नवीन उपनगरापर्यंत करण्यात आला. फेब्रुवारी १९२५ च्या दरम्यान ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेने उपनगरी मार्गावर काम करण्यास सुरुवात केली.

शहर विकास प्राधिकरणाच्या योजनेनुसार वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था आणि राजा शिवाजी विद्यासंकुल (तेव्हा किंग जॉर्ज स्कूल) या शैक्षणिक संस्थाची दादर परिसरात स्थापना करण्यात आली. १९३५ च्या दरम्यान रामनारायण रुईया महाविद्यालय आणि १९३९ च्या दरम्यान रामनिरंजन पोद्दार या महाविद्यालयांची सुरुवात झाली. १९३७ पर्यंत शिवाजी पार्क आणि सभोवतीचा परिसर विकसित झाला.