नैवेद्याची थाळी
भारतात पूजेच्या अथवा आरतीच्या समाप्तीनंतर देवाला अर्पण केलेल्या निवेदनीय खाद्यपदार्थास म्हणजे नैवेद्य असे म्हणतात. तो देवासमोर असतो तेव्हा त्यास भोग चढवणे म्हणतात. ज्याची भक्ती केली जाते त्याच्याकडून (देवाकडून किंवा गुरूकडून) नैवेद्या घेऊन भक्तांमध्ये आशीर्वादस्वरूप वाटला जातो तेव्हा त्या नैवेद्यास प्रसाद संबोधले जाते.
नैवेद्य केवळ खाद्य पदार्थांचाच दाखवला जातो परंतु आशीर्वादस्वरूप प्रसाद हा खाद्य अथवा कोणत्याही खाद्येतर गोष्टीचाही असू शकतो. मंगल कार्यप्रसंगी प्रसाद सर्व उपस्थित-अनुपस्थतांमध्ये वाटतात. तर नैवेद्याच्या भोजनाची थाळी बहुधा विशिष्ट व्यक्तींला देतात.
व्युत्पत्ती
संपादननिवेदं अर्हतीति’ म्हणजे निवेद किंवा निवेदन याला नैवेद्य म्हणतात.[१] केतकर ज्ञानकोशानुसार यज्ञांमध्ये अर्पण केलेल्या आहुतींना हविष्(हवि) असा शब्द प्रचलित होता. यूस् अथवा यूषन् , पृषदाज्य, पुरोडाश् , करम्भ, अमिश्री, नवनीत, पयस्या, परिवाप, ब्रह्मौदन, मस्तु, यवागू , वाजिन् , सक्तु, पृषातक, गवाशिर, दध्याशिर आणि यवाशिर इत्यादी अर्पण करावयाच्यां खाद्य/पेयांची नावे वैदिक साहित्यातून वापरली गेली आहेत.[२]
प्रसाद आणि नैवेद्यांचे पदार्थ
संपादननैवेद्याचे तीन प्रकार प्रामुख्याने मानले जातात-
१. लघु नैवेद्य-दूध-साखर, पेढे, गूळ, गूळखोबरे यांना लघु नैवेद्य असे म्हणतात.
२.प्रसाद नैवेद्य-व्रतपूजा करताना दाखविल्या जाणाऱ्या नैवेद्यास प्रसाद असे म्हणतात.उदा. सत्यनारायण पूजेला संजीवक म्हणजे शिरा, सोळा सोमवार व्रताला चूर्म्क म्हणजे चुरमा,लक्ष्मीपूजन वेळी लाह्या-बत्तासे इ.
३.महानैवेद्य-भक्ष्य-पोळी, भाकरी इ. पदार्थ.
भोज्य म्हणजे भात,खिचडी इ. पदार्थ
लेह्य म्हणजे पंचामृत,चटणी इ. पदार्थ
चोष्य म्हणजे आंबा, शेवगा शेंगा इ. असलेले पदार्थ
पेय म्हणजे बासुंदी, खीर इ. पदार्थ
या सर्वांनी युक्त नैवेद्याला महानैवेद्य म्हणतात.[३]
पूजा करणारे यजमान यथाशक्ति शक्य असलेल्या पदार्थाने देवतांना नैवेद्य दाखवतात. वेगवेगळ्या देवतांना अथवा वेगवेगळ्या पूजा अथवा सण समारंभांप्रसंगी विशिष्ट पदार्थांचे नैवेद्य दाखवण्याच्या परंपराही असतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नैवेद्य दाखविण्याच्या पद्धती
संपादननैवेद्य पूजेनंतर व आरतीच्या आधी दाखवतात. वैष्णव संप्रदाय मध्ये लोकं श्री विष्णू आणि त्याचे अवतार राम आणि कृष्ण, नरसिंह इत्यादी. यांना नैवेद्य दाखवताना नैवेद्य असलेल्या थाळीत प्रत्येक पदार्थावर एक-एक तुळशी पत्र/पान ठेवतात. वैष्णव संप्रदायात अशी भावना आहे की तुळशी पत्र ठेवल्यावर भगवान श्री हरि नैवेद्य लगेच स्विकारतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सोळाव्या आणि सतराव्या शतकातील नैवेद्याच्या थाळीचे स्वरूप
संपादनसमर्थ रामदास स्वामींच्या साहित्यात रामनवमीच्या दिवशी श्रीप्रभुरामचंद्राला अर्पण करायच्या नैवेद्याबाबतचे वर्णन :
भोजनाच्या थाळीचे तीन भाग असतात :
१.भोजन करणाऱ्या व्यक्तीच्या जेवणाच्या पानाची डावी बाजू ही लवणशाखा
२.पानाचा मधला भाग हा प्रमुख अन्नभाग
३.पानाची उजवी बाजू ही शाकशाखा'(भाज्या)
कोणकोणत्या शाखेत (भागात) कोणकोणते पदार्थ वाढावयाचे त्याचे वर्णनः
लवणशाखा :लिंबाची फोड, नानाविध प्रकारची लोणची, रायती, मेतकूट, पापड, भाजणीचे वडे, कुटलेले डांगर, मिरगुंडे, सांडगे, केळे/तोंडले वा कारल्याच्या तळलेल्या काचऱ्या, चिकवड्या, [[फेण्या] ],कुरडया इत्यादी तळलेले पदार्थ, शिजवलेले सुरण/मुळा, गाजर, करवंदे, भोकर, काकडी, हिरवी मिरची, कैरी, लिंबू इत्यादींपासून बनविलेल्या कोशिंबिरी, वांग्याचे भरीत, दहीवडे, घारगे, मुरांबा, मोरावळा इत्यादी.
मधला मुख्य भाग :कणकेची सोजी, सपिटाचा वा रव्याचा शिरा, पुरण/ सांजापोळी, तेलपोळी, साधीपोळी, रांजणावर भाजलेले मांडे, तुपात तळलेल्या पुऱ्या, कानवले, करंजी, भाकरी, रोटले, धिरडी, पानवल्या, पानग्या, खांडवी, गूळवड्या, सांजावड्या, डाळीचे ढोकळे, वेगवेगळे लाडू, साधाभात, साखरभात, गूळ-नारळी भात, मसाला भात, राब-भात (तूप व मध मिसळून केलेला) असावा. मध, तूप व दुधाच्या वेगवेगळ्या वाट्या, निरनिराळ्या खिरी, शिकरणी, लोणी, घट्ट दही इत्यादी..
शाकभाग : मेथी, चाकवत, पोकळा, माठ, शेपू, चवळी, घोळ या पालेभाज्या, चवळीची उसळ, केळफूल, वांगी, पडवळ, शेगटाच्या शेंगा, घेवडा, फरसबी, तोंडली, कच्ची केळी, कोहळा, दुधी भोपळा, लाल भोपळा, हिरवा भोपळा या फळभाज्या व विविध प्रकारच्या आमट्या.
या भोजनासमवेतच, शीतल व सुवासिक पाणी, सायीच्या घट्ट दह्यात मीठ/सैंधव, वाटलेली कोथिंबीर, भाजलेली सुंठ, तळलेला हिंग टाकून व ते घुसळून केलेला मठ्ठापण असावा.
ही सुमारे ३५० वर्षापूर्वीची समर्थ/छत्रपती शिवाजी महाराजांच्याच्या काळातली नैवेद्याची संकल्पना आहे.
एकनाथी भागवतातून
संपादनसाखरमांडा, गु़ळपोळी, वेलदोडे घातलेला गुळयुक्त शिरा, केळ्यांचे शिकरण, दही-दूध-साय-साखर यांचे मिश्रण, आंब्याच्या रसाने भरलेली वाटी, ताकाची कढी, करंज्या, अमृतफळें क्षीरधारी, वळवट (वळून केलेल्या शेवया-गव्हल्यांची खीर), मधुवडा, कोरवडा, अंबवडा, तिळाच्या लाडूंची जोडी, जिरेसाळी भात, सोललेल्या मूगदाळीचे वरण, नुकतेच कढवलेल्या (गाईच्या) तुपाचा घमघमाट. आणि तुपात बनवलेले जिन्नस असा नैवेद्याच्या थाळीचा उल्लेख एकनाथी भागवतातून येतो.
झाल्या धूप दीप नीरांजन । देवासी वोगरावें भोजन ।
नानापरीचें पक्वान्न । अन्न सदन्न रसयुक्त ॥२९०॥
मांडा साकरमांडा गुळवरी । शष्कुल्या अमृतफळें क्षीरधारी ।
दुधामाजीं आळिली क्षीरी । वाढिली परी वळिवट ॥९१॥
मधुवडा कोरवडा । लाडू तिळवयांचा जोडा ।
रुची आला अंबवडा । ठायापुढां वाढिंनला ॥९२॥
पत्रशाकांची प्रभावळी । भात अरुवार जिरेसाळी ।
सूप सोलींव मुगदाळी । गोघृत परिमळी सद्यस्तप्त ॥९३॥
सांजा सडींव गुळयुक्त । एळा मिरें घालूनि आंत ।
पाक केला घृतमिश्रित । सेवितां मुखांत अरुवार ॥९४॥
कथिका तक्राची गोमटी । आम्ररसें भरली वाटी ।
शिखरणी केळांची वाढिली ताटीं । देखोनि लाळ घोंटी अमरेंद्र ॥९५॥
दधि दुग्ध साय साकर । नैवेद्या वाढिले परिकर ।
देव न पाहे उपचार । श्रद्धा श्रीधर तृप्त होय ॥९६॥
सामर्थ्य असलें करावयासी । तरी हे परवडी प्रतिदिवशीं ।
नैवेद्य अर्पावे देवासी ।ना तरी पर्वविशेषीं अर्पावे ॥९७॥