आंबा हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.

आंबा
झाडाला लागलेल्या कैऱ्या
झाडाला लागलेल्या कैऱ्या
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: Magnoliophyta
जात: Magnoliopsida
वर्ग: Sapindales
कुळ: Anacardiaceae
जातकुळी: Mangifera
L.

कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते, पण जर नसेल तर तिला खोबरी कैरी असे नाव आहे. आंबा फळाचा राजा आहे. दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत सजावटीसाठी वापरतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे.

जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशामध्ये दशेरी, लंगडा, दक्षिणेत नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त संशोधन केंद्राने दशेरी व नीलम यांच्या संकरामधून आम्रपाली आणि नीलम व दशेरी यांच्या संकरामधून मल्लिका ही जात विकसित केली आहे. कोकण विद्यापीठाने बिनकोयीची सिंधू ही जात विकसित केली आहे. पश्चिम महाराष्ट्रमध्ये केशर या आंब्याच्य जातीची लागवड वाढली आहे.

संशोधन केंद्रसंपादन करा

आंबा संशोधन केंद्र भारतामध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आणि महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथे आहे.

आंब्याचे झाडसंपादन करा

आंब्याचे झाड (Mangifera Indica) हे साधारणपणे ३५ ते ४० मीटर उंच असते. त्याचा घेर साधारणपणे १० मीटर एवढा असतो. आंब्याची पाने सदाबहार असून पाने डहाळीला एकाआड एक येतात. आंब्याचे पान १५ ते ३५ सेंटिमीटर लांब तर ६ ते १६ सेंटिमीटर रुंद असते. कोवळी असताना पानांचा रंग हा काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद लाल होतो. पाने जशी मोठी होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो. आंब्याची फुले १० ते ४० सेंटिमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलिमीटर एवढी असते. आंब्याच्या फुलांना मोहोर (हिंदीत बौर) असे म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील "अश्मगर्भी फळ" ह्या प्रकारातील असते. ह्या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कडक कवच असते आणि ह्या कवचाच्या आत फळाचे बी असते. ह्या कवचाला आंब्याची कोय असे म्हणतात. आंब्याच्या जातीप्रमाणे त्याच्या फळांच्या आकारात बराच फरक असतो. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार १० ते २५ सेंटिमीटर लांब तर व्यास ७ ते १२ सेंटिमीटर असतो. आंब्याचे फळाचे वजन ५ किलोग्रॅम पर्यंत असू शकते. कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात. कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो. पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो. ज्या बाजूस ऊन लागेल तिथे लाल छटा जास्त दिसते तर सावलीच्या बाजूस बहुतकरून जास्त पिवळी छटा असल्याचे आढळते. फळाच्या मध्यभागी चपट्या आकाराची आणि लांबट बी (कोय) असते. आंब्यांच्या जातीप्रमाणे कोयीचा पृष्ठभाग हा धागेदार अथवा सपाट असतो. कोयीचे कवच १ ते २ मिलिमीटर जाड असून त्याच्या आत अतिशय पातळ असे आवरण असते ज्यात ४ ते ७ सेंटिमीटर लांबी, ३ ते ४ सेंटिमीटर रुंदी आणि १ सेंटिमीटर जाडीचे एकच बी असते. कच्च्या कैरी चवीला आंबट असते. कैरी पिकल्यावर गोड लागते. आंबा भारतात सर्व ठिकाणी आढळून येते. त्याचा वापर विविध प्रकारे करता येतो.

आंब्याची आढीसंपादन करा

कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यास 'आंब्याचा माच लावणे' किंवा आंब्याची आढी लावणे असे म्हणतात. यासाठी एखाद्या खोलीत वाळलेले तणस वा भाताचे वाळलेले गवत (पिंजर) पसरून त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैऱ्या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे आच्छादन करतात.अशा प्रकारे साधारणतः १०-१५ दिवसात, झाकला गेल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.

हा १०-१५ दिवसाचा अवधी कमी करण्यासाठी रसायने टाकून आंबा, केळी, चिकू इत्यादी फळे पिकविण्याचे एक तंत्र आहे. त्याने ३-४ दिवसात आंबा पिकतो. कॅल्शियम कारबाईड इत्यादी रसायनांचा वापर यासाठी करण्यात येतो. या पद्धतीत रसायनांचा काही अंश फळात जातो. ते मानवी आरोग्यास घातक ठरू शकते. आंबा पिकवण्याच्या दुसऱ्या पद्धतीत आंब्याची कैरी तोडून ती १ ते २ दिवस आंब्याच्या पानांत किवा धान्यात दाबून ठेवतात.

धार्मिककार्यसंपादन करा

आंब्याला धार्मिक कार्यातही खूप मह्त्व आहे. कोणत्याही शुभप्रसंगी, मंगल कार्यात आणि सणाच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. कलशपूजन हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे. कलशात नेहमी आंब्याची पाने ठेवतात.

नक्षत्रसंपादन करा

पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

आयुर्वेदसंपादन करा

आयुर्वेदानुसार लांबट आंब्यापेक्षा गोल आंबे जास्त चांगले असतात. बिनारेषेचे, चांगले पिकलेले अधिक गर असलेले पातळ सालीचे आणि लहान कोय असलेले आंबे चांगले समजावेत.

आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि कफ पित्त दूर करणारा आहे. कैरी मध्ये आम्लता आणि क्षाराचे प्रमाण खूप आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. या साठी कैरीचे पन्हे उत्तम आहे. पन्हे प्यायालामुळे उन्हाळ्याच त्रास खूपच कमी होतो. कैरीचा कीस फडक्यात घालून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची दमणूक आणि ताण कमी होतो. आपल्याला आरोग्य देण्याच्या दृष्टीने या दिवसात कैरीची डाळ खाण्याची पद्धत आहे. कच्च्या कैरीचा गर अंगाला लावून अंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही. कैरीच्या बाठीचे चूर्ण हिरड्यांच्या तक्रारी कमी करण्यास उपयुक्त आहे. तसेच हे चूर्ण पाण्यात घालून आंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही.

आंब्याची कोवळी पाने चावून नंतर टाकून द्यावीत. त्या रसाने आवाज सुधारतो, खोकला कमी होतो आणि हिरड्यांचा पायोरीयाही कमी होतो. आंब्याच्या पानांचा चीक टाचांच्या भेगा कमी करण्यास उपयुक्त आहे. आंब्याचा गोंदाचा सांधेदुखीत खूपच उपोयोग होता. एरंडेल तेल, लिंबाचा रस, हळद आणि आंब्याचा गोंद सम प्रमाणात घेऊन ते मिश्रण शिजवून एकजीव करावे. त्याचा लेप सांधा निखळणे, पाय मुरगळणे, लचाकणे ह्यासाठी गुणकारी आहे. पिकलेला आंबा शक्तीवर्धक आणि अतिशय रुचकर आहे. आंब्याने शरीराची कांती सुधारते आणि पोषणही उत्तम होते. आंब्यात अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत. अ जीवनसत्व जंतुनाशक तर क जीवनसत्व त्वचारोग हारक आहे. त्यामुळे आंबा उत्तम आरोग्य देणारा आहे. आंबा उष्ण असल्यामुळे त्याचे अतिसेवन त्रासदायक ठरते. तसेच कैरीचे अतिसेवन पोटाचे विकार वाढवते. कैरी खाल्यावर पाणी पिऊ नये किंवा लहान मुलांना कैरीचे पन्हे जास्त प्रमाणात देऊ नये. आयुर्वेदाच्या दृष्टीने आंबा आणि दूध एकत्र करून पिणे विरुद्ध आहार मानतात.

उपयोगसंपादन करा

  • कच्च्या आंब्याचे चविष्ट लोणचे करतात.
  • पिकलेल्या आंब्याचा आमरस करतात किंवा फोडी करून खातात.
  • कारवारी लोक पिकलेल्या आंब्याची भाजी करतात. तिला साटे म्हणतात.
  • कैरीच्या (कच्च्या आंब्याच्या) फोडी उन्हात वाळवून आमटी करताना वापरतात.
  • हिरव्या कैऱ्या किसून, वळवून आमचूर करतात. हा मसाल्यासारखा वर्षभर वापरतात.
  • कैरीची आंबट-तिखट चटणी होते.
  • राजापुरी कैऱ्यांपासून मुरांबा, साखरांबा बनतो.
  • आंबापोळी ही पोळी हा आंब्याच्या रसापासून तयार करतात.
  • आयुर्वेदात, साल, पाने, फुले आणि फळांचा वापर पोट आणि त्वचेच्या अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

चित्रदालनसंपादन करा

आंब्याच्या जाती [१]संपादन करा

भारतातील आंब्याच्या काही नामांकित जाती व त्यांच्या लागवडीचे मुख्य प्रदेश
जात लागवडीचा प्रदेश
कावसजी पटेल महाराष्ट्र
कृष्णभोग बिहार
गोपाळभोग उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
गोवाबंदर आंध्र प्रदेश
चौसा उत्तर प्रदेश,पाकिस्तान,पंजाब, दिल्ली.
जमादार गुजरात
तौमुरिया उत्तर प्रदेश
दशेरी (दशहरी) उत्तर प्रदेश
नीलम आंध्र प्रदेश
पायरी महाराष्ट्र, कर्नाटक
पीटर कर्नाटक
फझरी उत्तर प्रदेश
फझली माल्डा पश्चिम बंगाल
फर्नोदीन कर्नाटक
बंगलोरा (तोतापुरी) आंध्र प्रदेश
बनारसी उत्तर प्रदेश
बेनिशान आंध्र प्रदेश
मडप्पा कर्नाटक
मलगोवा आंध्र प्रदेश
मानकुराद आंबा गोवा
मुर्शिदाबादी पश्चिम बंगाल
रुमाली आंध्र प्रदेश
लंगडा उत्तर प्रदेश, बिहार
सफेदा उत्तर प्रदेश
सिंदुराय बिहार
सुकाल बिहार
हापूस, (अल्फान्सो, Alphonso) : महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील जात. जिल्ह्यतल्या देवगड तालुक्यात होणारा हा आंबा सर्वश्रेष्ठ समजला जातो. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तमिळनाडू
हेमसागर बिहार

भोपाळच्या आम्रवनात आब्याच्या ३३ जातीची ५७५ झाडे आहेत. त्यांमध्ये उत्तरी भारतातातील आम्रपाली, कावसजी पटेल, लंगडा, सुंदरजा आणि दक्षिणी भारतातील चिन्नारसम, तोतापुरी, पिद्दारा, मँगो ग्लास आणि स्वर्णरेखा या जाती आहेत.

शिवाय,

  • आम्रपाली आंबा
  • केसर
  • जम्बो केशर
  • लाल केसर
  • चिन्नारसम
  • तोतापुरी (तोतापरी)
  • नूरजहॉं : मध्य प्रदेशातल्या अलिराजपूरच्या कट्ठीवाडा मध्येच मिळतो, एका आंब्याचे वजन एक ते पाच किलो
  • बादाम
  • बारामाही एटीएम
  • बैंगणपल्ली (आंध्रप्रदेश)
  • मल्लिका
  • मालदा (शेहरोली), उत्तरी भारत
  • रत्न
  • राजापुरी
  • रायवळ
  • शेपू आंबा : हा खाताना शेपूचा वास येतो.
  • साखरगोटी
  • सिंदुरी
  • सुंदरजा आंबा : हा गोड वासाचा आंबा मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यात होतो. ह्याच्या सालीवर पिवळे-पिवळे ठिपके असतात.
  • सोनपरी
  • स्वर्णरेखा
  • हाथीझूल आंबा
  • हिमसागर (बंगाल)

संदर्भसंपादन करा

  1. ^ "आंबा". ९ डिसेंबर २०१९ रोजी पाहिले.

हे सुद्धा पहासंपादन करा