विजयादशमी

प्रभू श्री राम यांनी रावणाचा वध केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण
(दसरा या पानावरून पुनर्निर्देशित)

विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे. याला 'दसरा', 'दशहरा' किंवा 'दशैन' या नावानेही ओळखले जाते. हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील सातवा महिना असतो, जो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांत येतो. [] [] [] विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते.[]

दसरा
दुर्गापूजा
दिनांक आश्विन शुद्ध दशमीसाचा:Infobox holiday/wd
वारंवारता वार्षिक

विजयादशमी वेगवेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते आणि भारतीय उपखंडातील नेपाळी आणि भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.[][] [] [] भारताच्या दक्षिणेकडील, पूर्वेकडील, ईशान्येकडील आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये, विजयादशमीला दुर्गापूजेची समाप्ती होते. या दिवशी देवी दुर्गाने महिषासुर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते. [] [][] उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये, या सणाला दसरा म्हणतात (तसेच याला दशहरा देखील म्हणतात). या प्रदेशांमध्ये, या सणाला रामलीलाची समाप्ती होते आणि देव रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते. वैकल्पिकरित्या, हा सण दुर्गा किंवा सरस्वती सारख्या देवीच्या विविध पैलूंबद्दल आदर दर्शवतो.[] [] []

विजयादशमीच्या उत्सवात नदी किंवा महासागराच्या समोर मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत देवी दुर्गा,[] लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मातीच्या मूर्ती संगीत आणि मंत्रांसह घेऊन जातात. त्यानंतर या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात. इतरत्र, दसऱ्याच्या दिवशी, वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या भव्य पुतळ्यांना फटाक्यांसह जाळले जाते. हे रावणदहन वाईटाचा नाश असल्याचे प्रतीक मानले जाते. विजयादशमीनंतर वीस दिवसांनी साजरा होणाऱ्या दिवाळीची तयारीही या सणातून सुरू होते. दिवाळी हा दिव्यांचा महत्त्वाचा हिंदू सण आहे.[][१०] []

विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते.[११] याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांनासोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती.[११] मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.

प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता.[१२] पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत.[१३] ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी होते.[१४]

पौराणिक संदर्भ

संपादन
 
रावणाचा पुतळा

श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला.[१५]

  • या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशीही आख्यायिका आढळून येते.पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते.त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते.[१६]

विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात.[१७] ही पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत.

रामायणानुसार रावणाने सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत घेऊन गेला. भगवान रामाने रावणाला सीतेला सन्मानाने परत करण्याचे आवाहन केले. परंतु रावणाने सीतेला परत पाठवण्यास नकार दिला आणि शेवटी युद्ध सुरू झाले. रावणाला ब्रह्मदेवाकडून एक अमरत्वचे वरदान मिळाले असते. परंतु शेवटी विभीषणाच्या सल्ल्यानुसार राम रावणाचा वध केला; या दिवसाची आठवण म्हणून, सत्याचा असत्यावर विजय, न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा अनितीवर विजय म्हणून या दिवशी भारतात अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो.

रावणवध कथेचा आशय

संपादन

आश्विन शुद्ध दशमीचे दिवशी प्रभू रामचंद्रांनी दैत्य रावणाचा निःपात केला होता. या दश संख्येला धरूनच राम आणि रावणाचा उल्लेख आहे, तो असा, दाशरथी राम तर दशमुखी रावण! राम म्हणजे अतिशय आनंद देणारा आत्माराम आणि तो दाशरथी कां ? उपनिषदे त्याचे वर्णन करतात.

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु। बुद्धिं तु सारथी विद्धि मनः प्रग्रहमेव च॥ कठोपनिषद्

शरीराला रथाची उपमा दिली आहे व या रथाचा स्वामी आत्मा आहे. सारथी बुद्धी आहे तर मन लगाम आहेत. आपले शरीर दशेन्द्रियांनी युक्त असून इंद्रियांना रथाच्या घोड्यांची उपमा दिली आहे.

या दहा इन्द्रियांपैकी एकाच इन्द्रियावर संयम साधणारा साधारण साधक एकरथी तर दशेन्द्रियांवर संयम साधणारा दाशरथी, तो भगवान रामचंद्र! आणि रावण दशमुखी कां? तर रावण हा ब्राह्मण होता, चांगला विद्वान पंडीत! त्याला दशग्रंथ अगदी मुखोद्गत! म्हणून त्याला दहा तोंडे दाखविली आहेत. परंतु आपल्या ज्ञानाचा, माहितीचा त्याला अतिशय गर्व होता, अहंकार होता आणि याशिवाय त्याला जे काही माहीत होते ते सर्व लोकांना आरडाओरड करून मोठ्या तंत्राने तो सांगत असे. रवैतीति इति रावणः अशी रावण या शब्दाची व्याख्या आहे.

साधना केल्यावर जे ज्ञान प्राप्त होते, त्यामुळे साधकाला गर्व उत्पन्न होऊ शकतो. हा असुर रावण दुसरे कोणी नसून ज्ञान वा शक्तीमुळे गर्वमदान्वित झालेली साधकाची अहंकारी वृत्ती होय! सावध साधकाला म्हणजे दाशरथी रामाला आपल्या असल्या नीच प्रवृत्तीचे दमन करायचे असते. त्याशिवाय साधना पंथात तो विजयी होऊ शकत नाही. साधकाच्या स्वतःच्या असल्या असुरी वृत्तींवरील विजय म्हणजेच विजयादशमी होय! रामाने रावणाला मारले म्हणजे आपल्यातीलच अहंकारी वृत्तीला मारले व अधिक ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा केला. ज्ञानी माणसांनी, साधकांनी आपल्या ज्ञानाचा अहंकार न धरता विनम्र व लीन असावं, हा रावणवधाचा आशय आहे.

साधारण मानवाच्या मर्यादा वा सीमा उल्लंघन करून साधकाला सीमोल्लंघन करायचे असते आणि ज्ञानाचे सुवर्ण प्राप्त करून सर्वांना वाटायचे असते.

कथारूप रावणवधाचा आंतरिक आशय, वृत्तींशी व आत्म्याशी संबंधित आहे. तो पूर्णपणे आध्यात्मिक व योगशास्त्र विषद करणारा आहे.

भारतातील विविध प्रांतांतील दसरा

संपादन
 
म्हैसूर दसरा मिरवणूक
 
झेंडू फुलांची विक्री

उत्तर भारत

संपादन

उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात.[१८][१९] कुलू शहरातला दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.[२०]

सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.[२१]

छत्तीसगड

संपादन

छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते.[२०]

महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात.तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात.

घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.

 
विजयादशमी सरस्वतीपूजन

पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. लोक परस्परांना मिठाई भेट देतात.[२०]

दक्षिण भारत

संपादन

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.[२०][२२]

आंध्रप्रदेश

संपादन

आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याजोडीने दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला थेपोत्सवम असे म्हणले जाते तसेच मंदिरात आयुध पूजाही होते.[२३]

संस्थानी दसरे

संपादन

महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाई देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. येथील दसरा सोहळाही वैशिष्ट्यपूर्ण असतो. तेथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा होतो.[२४] शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होतात. संध्याकाळी भवानी मंडपातून मिरवणुकीला प्रारंभ होतो. विविध वाद्ये, तोफांचे आवाज, वाद्य पथके, सनई चौघडे, हत्ती घोडे यांची शोभायात्रा निघते. राज परिवार आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. शमीचे पूजन, मंत्रोच्चार करतात आणि शाहू महाराजांच्या पुतळ्याची पूजा करतात.[२५]

चामुंडेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाणारी मिरवणूक हे म्हैसूरच्या संस्थानी दसऱ्याचे विशेष आकर्षण आहे. देश-विदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात.संगीत, नृत्य, वाद्यवादन, हत्ती, घोडे, उंट यांची मिरवणूक हे या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे.[२६]

दसऱ्याविषयीची एक प्रसिद्ध कविता

संपादन

दसऱ्याच्या दिवशी सोन्याची (म्हणजे आपट्याच्या पानांची) देवघेव करून सायंकाळी उशिरा घरी यायची प्रथा आहे. त्यासंबंधीची एक प्रसिद्ध कविता : -

सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनि आला ।|
बहीण काशी ओवाळी मग त्याला ।|
दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा ||

हे सुद्धा पहा

संपादन

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c Encyclopedia Britannica 2015.
  2. ^ a b c d Lochtefeld 2002.
  3. ^ a b Encyclopedia Britannica Dussehra 2015.
  4. ^ Achari, Prafull (2019-09-29). नवरात्री भाग १ घटस्थापना: Navratri part 1 Ghatsthapna. prafull achari.
  5. ^ "Happy Dashain 2074". Lumbini Media. 18 September 2017. 18 September 2017 रोजी पाहिले.
  6. ^ a b c Fuller, Christopher John (2004). The Camphor Flame: Popular Hinduism and Society in India. Princeton University Press. pp. 108–109. ISBN 978-0-69112-04-85.
  7. ^ "Dussehra 2020 (Vijayadashami): Story, Ram Setu, Lord Rama & True God". S A NEWS (इंग्रजी भाषेत). 25 October 2020. 25 October 2020 रोजी पाहिले.
  8. ^ "Dussehra 2020: Date, Puja Timings, History, Significance and Importance". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 25 October 2020. 25 October 2020 रोजी पाहिले.
  9. ^ Gall, Susan B.; Natividad, Irene (1995). The Asian-American Almanac. Gale Research. p. 24. ISBN 978-0-8103-9193-2.
  10. ^ Singh, Rina (2016). Diwali. Orca. pp. 17–18. ISBN 978-1-4598-1008-2.
  11. ^ a b Sharma, Rajesh. Vrat Parva Aur Tyohar (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 978-81-7182-935-4.
  12. ^ Pathak, Dr Pramod (2014-01-26). Mahamanav Chhatrapati Shivaji Maharaj / Nachiket Prakashan: महामानव छत्रपती शिवाजी महाराज. Nachiket Prakashan.
  13. ^ भारतीय संस्कृती कोश खंड चौथा. भारतीय संस्कृतिकोश मंडळ प्रकाशन. २००१.
  14. ^ "जाणून घ्या दसऱ्याचे महत्त्व…". लोकसत्ता. 2019-10-08. 2020-10-23 रोजी पाहिले.
  15. ^ Upādhyāya, S. P. (1978). Bhāratīya parva aura tyohāra.-- (हिंदी भाषेत). Sāhitya Pracāraka.
  16. ^ Śitoḷe), Suśilādevī Ghorapaḍe (Rajmata of (1998). Rājā Śitoḷe āṇi Mahārājā Mahādajī Śinde yāñcī smaraṇagāthā. Rājamātā Suśilādevī Ghorapaḍe (Soṇḍūra).
  17. ^ Sankalit (2016-12-01). Dr. Hedgewar (हिंदी भाषेत). Suruchi Prakashan. ISBN 9789384414962.
  18. ^ PANDEY, PRITHVI NATH (2009-01-01). ACHCHHE-ACHCHHE NIBANDH (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9788173156595.
  19. ^ (Ācārya), Śrīrāma Śarmā (1972). Parva aura tyauhāroṃ kī sṃ̄skr̥tika pr̥shṭhabbūmi (हिंदी भाषेत). Yuga Nirmāṇa Yojanā.
  20. ^ a b c d Achari, Prafull (2019-09-29). नवरात्री भाग ११ संपूर्णम: Navratri part 11 Sampurnam. prafull achari.
  21. ^ Lal, R. B. (2003). Gujarat (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 9788179911044.
  22. ^ "सबसे खास मैसूर का दशहरा, जहां न राम है न रावण". Sakshi Samachar (इंग्रजी भाषेत). 2020-10-21. 2020-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-23 रोजी पाहिले.
  23. ^ Webdunia. "विजयवाड्याच्या इंद्रकिलाद्री डोंगरावरील स्वयंभू आई कनक दुर्गा देऊळ". marathi.webdunia.com. 2020-10-23 रोजी पाहिले.
  24. ^ Dasarā-Divāḷī. Mahārāshṭra Śāsana Śikshaṇa Vibhāga, Mahārāshṭra Rājya Lokasāhitya Samitīsāṭhī. 1990.
  25. ^ लिपारे, दयानंद (४. १०. २०१९). "दसरा विशेष : सोन्याहून अनमोल कोल्हापूरचा शाही दसरा". ५. १०. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  26. ^ "Mysore Dasara 2020: मैसूर दशहरा से जुड़ी परंपराएं और समारोह इस उत्सव को बनाते हैं बेहद खास, जानें शुभ तिथि, विजय मुहूर्त और महत्व". LatestLY हिंदी (हिंदी भाषेत). 2020-10-22. 2020-10-23 रोजी पाहिले.