नवरात्र
नवरात्री [a] हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो; प्रथम चैत्र महिन्यात ( ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च/एप्रिलमध्ये) आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. नवरात्र वेगवेगळ्या कारणांसाठी आणि हिंदू भारतीय सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. [१] [२]
सैद्धांतिकदृष्ट्या, चार हंगामी नवरात्री आहेत. तथापि, व्यवहारात, पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदा नवरात्री नावाचा हा सण आहे. हा सण हिंदू कॅलेंडर महिन्याच्या अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांमध्ये येतो. [१] [३]
हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते.
- वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत.
- शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. या नऊ दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा व अर्चना केली जाते.
८/१० दिवसांच्या नवरात्री
संपादननवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ती आठ दिवसांची, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांची असू शकते. चंपाषष्ठीची म्हणजे खंडोबाची नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते.
- शारदीय नवरात्र १९६७, २०११, २०१२, या साली ८ दिवसांचे होते, २०३८ सालीही ते आठच दिवसांचे असेल; २००० व २०१६ साली ते दहा दिवसांचे होते.
- वासंतिक नवरात्र सन २००० (अष्टमी क्षय), २०१५ (तृतीया क्षय), २०१६ (तृतीया क्षय), २०१७ (प्रतिपदा क्षय) या वर्षी आठ दिवसांचे होते आणि २०१८ (नवमी क्षय), २०२५ (तृतीया क्षय), २०२६ (प्रतिपदा क्षय) या सालीही ते ८ दिवसांचे असेल. २०२९ (द्वितीया वृद्धी) या साली ते १० दिवसांचे असेल.
काही विशेष नवरात्री-
- चैत्र शुक्ल सप्तमी ते पौर्णिमा =सप्तशृंगी नवरात्र
- शारदीय नवरात्र = आश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी.
- मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी किंवा अष्टमी ते पौर्णिमा =योगेश्वरी अंबेजोगाई नवरात्र
- चंपाषष्ठीचे नवरात्र = मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. यास खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात.
- पौष शुक्ल सप्तमी/अष्टमी ते पौर्णिमा =शाकंभरी नवरात्र
देवीची नऊ रूपे
संपादनसर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.[४]
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
१. शैलपुत्री २. ब्रह्मचारिणी ३. चंद्रघंटा ४. कुष्मांडी ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.[४]
मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात सांगितले आहे - “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते. (८९.११.१२)
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.[५]
भारतातील इतर प्रांतातील नवरात्र
संपादनगुजरात
संपादनगुजरातमध्ये नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.दांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे.[६] हे समूहनृत्य विशेष करून नवरात्रात नाचले जाते. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी हे नृत्य करण्याची परंपरा आहे.
गरबा हा गुजरातमधील नवरात्री उत्सवातील पारंपरिक नृत्याचा प्रकार आहे. एका रंगीत घड्याला छिद्रे पाडून त्यात दिवा लावला जातो. या घड्याला गरबो असे म्हणतात. गरबा खेळणे म्हणजे टाळयांच्या किंवा बहुधा लाकडी दांड्यांच्या लयबद्ध गजरामध्ये देवीची भक्तिरसपूर्ण गाणी म्हणणे.[७]गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. यांच्या मध्यभागी छिद्र असलेल्या रंगीबेरंगी मातीच्या घड्यात दिवे लावले जातात आणि त्याभोवती गोलाकार नाचण्याची पद्धत आहे.
दांडियाचे उपप्रकार-
- पनघट
- पोपटीयो
- हुड्डा
- हिच
याशिवाय गुजरातमधील गावांच्या नावावरूनदेखील प्रकार आहेत जसे:
- अहमदाबादी दोडियो (अहमदाबादचा)
- बरोडो दोडियो (बडोद्याचा)
- सुरतला (सुरतचा)
- बंगाल -
इतर नवरात्रे
संपादननवरात्र साधारणपणे देवीचे असते, पण इतर देवांची नवरात्रेही असतात. तुळजाभवानीचे नवरात्र दहा दिवसांचे असते, तशीच खंडोबाचे, व्यंकटेशाचे, नरसिंहाचे, दत्ताचे अशी इतरही नवरात्रे असतात. यापैकी नरसिंहाचे नवरात्र तीन ते नऊ दिवस, खंडोबाचे पाच किंवा सहा दिवस, बालाजी (व्यंकटेशाचे) दहा दिवस, दत्ताचे नऊ ते दहा दिवस असते.
आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रींखेरीज, आश्विन शुक्ल तृतीयेपासून सुरू होणारा सप्तरात्रोत्सव, पंचमीपासून सुरू होणारा पंचरात्रोत्सव आणि सप्तमीपासून सुरू होणारा त्रिरात्रोत्सव ही कमी-अधिक दिवसांची नवरात्रे असतात.
- शाकंभरीचे (बनशंकरी देवीचे) नवरात्र - पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा या कालावधीत शाकंभरी नवरात्र असते.
- गुप्त नवरात्र : तांत्रिक मंडळीत प्रचलित असलेले हे नवरात्र आषाढ (किंवा माघ) महिन्यातल्या शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत असते. २०१८ साली हे नवरात्र १३ जुलै रोजी सुरू होऊन २१ जुलैला संपेल. या नवरात्रीतली देवीची साधना चैत्री किंवा शारदीय नवरात्रापेक्षा कठीण असते. ही आराधना गुप्त रीतीने केली जाते, म्हणून या नवरात्राला गुप्त नवरात्र म्हणतात. या नवरात्रीदरम्यान १० महाविद्यांच्या साधनेला विशेष महत्त्व असते. गुप्त नवरात्र विशेषेकरून पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व आसपासच्या प्रदेशांत साजरे होते.
- चंपाषष्ठीचे नवरात्र : मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात. या नवरात्रालाच मार्तंडभैरव षड्रात्रोत्सव म्हणतात.
- दत्ताचे नवरात्र : मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ते मार्गशीर्ष पौर्णिमा असे दत्ताचे नवरात्र असते. अबेजोगाईला संत दासोपंतांच्या वाड्यातील धाकट्या देव्हाऱ्यात हे असते. षष्ठीसह सप्तमीला नवरात्र बसते. नसता सप्तमीला बसते. नवरात्रात रोज देवाला अभिषेक असतो. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी यंत्रपूजा असते. यंत्र दासोपंतांनी तयार केलेले आहे. त्यावर मंत्र लिहिलेले आहेत. यंत्रपूजा झाल्यावर, नवरात्र असेपर्यंत यंत्राला रोज हळदीकुंकू वाहिले जाते. नवरात्र म्हणून माळ वगैरे नसते. परंतु तेलाचा एक व तुपाचा एक असे दोन नंदादीप अखंड तेवत असतात. पौर्णिमेला नवरात्राची सांगता होते, तेव्हा होमहवन, पुरणावरणाचा नैवेद्य केला जातो.
- दुर्गापूजा : बंगाल आणि त्याच्या आसपासच्या राज्यांत साजरे होणारे हे सहा दिवसांचे नवरात्र असते. ललिता पंचमीच्या दुसऱ्या दिवसापासून, म्हणजे षष्ठीपासून ते दसऱ्यापर्यंत हा उत्सव चालतो. महाअष्टमी (दुर्गाष्टमी)ला बकऱ्याचा आणि महानवमीला रेड्याचा बळी दिला जातो.
- नरसिंहाचे नवरात्र : नृसिंहाच्या सन्मानार्थ मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते.
- बालाजीचे नवरात्र : भारताच्या उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान आदी प्रदेशांतील बालाजीच्या मंदिरांत चैत्र शुक्ल प्रतिपदा ते नवमीपर्यंत हे साजरे होते.
- श्रीराम नवरात्र - चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी, म्हणजेच वासंतिक नवरात्र काळात रामभक्त हे श्रीराम नवरात्र साजरी करतात.
- बिहारमध्ये सप्तमीपासून नवरात्र सुरू होते.
- मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी किंवा अष्टमी ते पौर्णिमा =योगेश्वरी अंबेजोगाई नवरात्र
- मार्तंडभैरव षड्रात्रोत्सव = चंपाषष्ठीच्या सहा रात्री.
- रामलीला : उत्तरी भारतात नवरात्रीत प्रतिपदेपासून ते (महा)नवमीपर्यंत रामलीला चालते. हिच्यात रंगमंचावर रामायणातील प्रसंग नाट्यरूपांत सादर होतात. दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याला रावणाच्या आणि मेघनाथाच्या भव्य पुतळ्यांचे दहन होते.
- विठोबाचे नवरात्र : हे आषाढ शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत असते.
- शाकंभरीचे नवरात्र : हे पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असते. तांत्रिक लोकांमध्ये सिद्धिप्राप्तीसाठी हे नवरात्र साजरे करण्याची प्रथा आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b Encyclopedia Britannica 2015.
- ^ Christopher John Fuller (2004). The Camphor Flame: Popular Hinduism and Society in India. Princeton University Press. pp. 108–109. ISBN 978-0-69112-04-85.
- ^ James G. Lochtefeld 2002.
- ^ a b Coburn, Thomas B. (1988). Devī-Māhātmya: The Crystallization of the Goddess Tradition (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publ. ISBN 9788120805576.
- ^ कल्याणी, अपर्णा (२००७). श्री दुर्गा सप्तशती उपासना.
- ^ Sinha, Aakriti (2006). Let's Know Dances of India (इंग्रजी भाषेत). Star Publications. ISBN 9788176500975.
- ^ "Garba | dance". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2020-10-05 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.