कातकरी
कातकरी महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे. कात तयार करणे हा जुन्या काळी कातकऱ्यांचा मुख्य व्यवसाय होता. आणि त्यावरूनच त्यांना कातकरी हे नाव पडले. शिकार करणे, कोळसा बनवणे, जंगलातील लाकडे व मध गोळा करून विकणे असेही उद्योग हे लोक करतात. कातकरी लोक उत्तम शिकारी व तिरंदाजीत निष्णात असून हरणे, माकडे यांची शिकार करून त्यावर पोट भरतात. कातकरी लोक लहान लहान टोळ्या करून रानात राहतात व नेहमी वस्त्या बदलतात. त्यांच्या झोपडीत कायम एक शेकोटी पेटलेली असते तिला हे लोक परसा म्हणतात. रायगड जिल्ह्यात या लोकांची जास्त वस्ती असून तिथे त्यांच्या अनेक वाड्या आहेत. प्रत्येक वाडीचा एक नाईक किंवा पुढारी असतो. हे पुढारीपण वंशपरंपरेने चालते. नाईकाचे काम सामाजिक व धार्मिक प्रश्नांचा निवाडा देणे आणि अपराधाबद्दल दंड देण्याचे असते.
कातकरी जमातीत अथावर, धेड, सिधी, सोन व वरप असे पाच पोटविभाग असून त्यांच्यात लग्नसंबंध होत नाहीत. कातकरी जमातीत पूर्वीपासून विधवाविवाह रूढ आहे. या लोकात गांधर्वविवाहाची प्रथाही आहे. हे लोक विधीपूर्वक लग्न करतात.
कातकरी कुटुंबात स्त्रियांची हुकमत असते. या जमातीतील स्त्रिया गुंजाच्या माळा दागिने म्हणून घालतात. कानाच्या पाळ्यांना मोठी भोके पाडून त्यात त्या साखळ्याही घालतात.
लग्नविधीसंपादन करा
कातकरी सोन लोकांचा लग्नविधी जातीतील एखादा धर्मशील मनुष्य करतो. त्याला गोतर्णी म्हणतात. नवरी मुलगी मंडपाच्या दारातच वराचे स्वागत करून त्याला माळ घालते. नंतर दोघांना समोरासमोर उभे करून मध्ये अंतरपाट धरतात. गोतर्णी एका घोंगडीवर अक्षता मांडतो व मध्ये पैसा ठेवून त्यावर हातातील सुपारी टाकतो. त्यानंतर नवरानवरी मंडपाभोवती पाच प्रदक्षिणा करून घोंगडीवर ठेवलेल्या अक्षतांना डोकी लावतात. एवढे झाल्यावर लग्नविधी पुरा होतो.