हिरडा (इंग्लिश: Myrobalans; लॅटिन: Terminalia chebula) ही दक्षिण आशिया, आग्नेय आशिया व नैऋत्य चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील युइन्नान प्रांत या प्रदेशांत उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. हिरडा स्वास्थ्यसंवर्धक आणि रोगनाशक आहे. औषधातआरोग्य वाढविणार्‍या द्रव्यात याचे स्थान महत्त्वाचे आहे. लोक कथेनुसार एकदा इंद्र अमृत पीत असतांना त्यातील काही थेंब पृथ्वीवर सांडले. ते थेंब जेथे सांडले तेथे (त्या थेंबातून) हिरड्याची उत्पत्ती झाली. समुद्र सपाटीपासून २ हजार मी. उंची पर्यंतच्या जमिनीत हिरड्याची झाडे भारतात सर्वत्र आढळतात.

हिरडा
Harra (Terminalia chebula) leafless tree at 23 Mile, Duars, WB W IMG 5905.jpg
शास्त्रीय वर्गीकरण
Division: Magnoliophyta
जात: Magnoliopsida
वर्ग: Myrtales
कुळ: Combretaceae
जातकुळी: Terminalia
जीव: T. chebula
हिरड्याचे खोड
हिरड्याची फळे

वर्णनसंपादन करा

[१] हिरड्याला "हरीतकी" असे म्हणतात. हिरड्याची झाडे २५ ते ३० मी. उंच वाढणारी असतात. झाड झुपकेदार, पसरट व अनेक वर्षे टिकणारे असते. याचे लाकूड अत्यंत कठीण असते. खोडाची उंची ७ ते १० मी. (मध्यम जमीन) २४ ते ३० मी. (सुपीक जमीन) खोडाचे साल करड्या रंगाचे त्यावर असंख्य चीरा असतात. पाने १० ते ३० सें. मी. लांब, टोकदार, पानातील शिरा ६ ते ८ असून समोरा समोर असतात. पाने टोकाशी एकवटलेली असतात. कोवळेपणी पानांवर केस असतात.

फुले - ग्रीष्म ऋतुत येतात रंग पांढरा पिवळसर असतो. ती शाखाग्री व पानांच्या बगलेत असतात. नवीन फुलांना सुवास असतो तर जुन्या फुलांचा वास उग्र असतो.

फळ - लांबी साधारणपणे ३ ते ६ सें. मी. कोवळ्या फळांचा रंग हिरवा तर पिकलेल्या फळांचा रंग पिवळसर धूसर. आकार लंब वर्तुळाकार, प्रत्येक फळात एक बी असते, फळांवरून हिरड्याच्या अनेक जाती ओळखता येतात. बी लांबट आणि कठीण असते.

साधारण १० वर्षे वयाचे झाड झाल्यावर फळे मिळण्यास सुरूवात होते. २ ते २.५ महिन्यांच्या अपरीपक्व फळांना बाळ हिरडे म्हणतात.

हिरड्याच्या जातीसंपादन करा

फळांच्या रंगावरून हिरड्याच्या सात जाती आहेत, १) विजया, २) रोहिणी, ३) पूतना, ४) अमृता, ५) अभया, ६) जीवन्ती आणि ७) चेतकी

 • बाळ हिरडा – फळात अठळी तयार होण्यापूर्वीच आपोआप गळून पडणारे फळ, याचा औषधात विशेष उपयोग होतो. लहान बालकात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
 • चांभारी हिरडा – हिरड्याचे थोडे अपरिपक्व फळ म्हणझे चांभारी फळ, उपयोग कातडी कमविण्यासाठी होतो. मोठ्या प्रमाणात निर्यात.
 • सुरवारी हिरडा – हिरड्याचे पूर्ण पिकलेले फळ म्हणजे सुरवारी, औषधी उपयोग अनेक.
 • रंगारी हिरडा - याचा उपयोग रंगासाठी होतो.

या वनस्पतीला संस्कृत भाषेत अनेक नावे आहेत :-

 • हरीतकी - शंकराच्या घरात (हिमालयात) उत्पन्न होणारी, सर्व रोगांचे हरण करते.
 • हेमवती, हिमजा - हिमालय पर्वतावर उत्पन्न होणारी.
 • अभया - हिरड्याचे नित्य सेवन केल्याने रोगाचे भय राहत नाही.
 • कायस्था - शरीर निरोगी, धष्टपुष्ट करणारी.
 • पाचनी - पाचन करणारी.
 • प्रपथ्या - पवित्र करणारी.
 • प्रमथा - रोगांचे समूळ उच्चाटन करणारी.
 • श्रेयसी - श्रेष्ठ.
 • प्राणदा - जीवन देणारी.

महत्त्वसंपादन करा

हरीतकी मनुष्याणां मातेव हितकारणी ।
कदाचित्कुप्यते माता गोदरस्था हरीतकी॥
या वचनात हिरड्याला मातेची उपमा दिलेली आहे. हिरडा मातेसमान प्रेम करणारा आणि हितकारक आहे. आई सुद्धा काहीवेळा आपल्या मुलांवर रागवते परंतु हिरड्याचे सेवन केले असता त्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.

तसेच
यस्यां नास्ति माता, तस्य माता हरितकीः
अर्थात -
माताविहीन लहान मुलांची माता हिरडा असतो असे एक संस्कृत मधील वचन आहे. त्यावरुन याच्या उपयोगाची कल्पना येते. या झाडाचे फळ हे त्रिफळा मधील एक आहे.(हिरडा,बेहडा,आवळा)

हिरड्याचे महत्व विशारद करणारा आणखीन एक श्लोक-
हरिं हरीतकीं चैव गायत्रीं च दिने दिने।
मोक्षरोग्यतप: कामाश्चिन्तयेद भक्षयेज्ज्पेत् ॥
अर्थात-
मोक्षाची इच्छा करणार्‍याने प्रत्येक दिवशी विष्णुचे चिंतन करावे, आरोग्याची इच्छा करणार्‍याने प्रत्येक दिवशी हिरड्याचे सेवन करावे व तपाची इच्छा करणार्‍याने गायत्रीचा जप करावा.

औषधी उपयोगसंपादन करा

हिरड्यात गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट हे पाच रस आहेत. फक्त खारट रस नाही. यातील गोड, तिखट आणि तुरट रसांमुळे पित्त दोषाचा नाश होतो. कडू, तिखट आणि तुरट रसांमुळे कफ दोष दूर होतो. तर गोड आणि आंबट या रसांमुळे वात दोष दूर होतो.

हिरड्याचे लघु आणि रुक्ष असे गुण आहेत. लघु म्हणजे ज्या योगाने शरीरात हलकेपणा निर्माण होतो, उत्साह येतो. सामान्यत: लघु गुणाच्या द्रव्यांनी शरीरातील वाढलेला कफदोष कमी होतो. शरीरात ज्या ज्या ठिकाणी मलाची निर्मिती होते त्या त्या ठिकाणी या गुणाच्या औषधांचा प्रभाव होतो, हिरड्याची फळे मल दोष दूर करतात. रुक्ष म्हणजे शरीरात रूक्षपणा, कठीणपणा येतो. या गुणामुळे शरीरातील वात दोषाचे प्रमाण वाढते, कफ दोषाचे प्रमाण कमी होते. मधुमेह सारख्या रोगात याचा खूप उपयोग होतो.

अपचन, अतिसार, आंव पडणे, मूळव्याध, भूक न लागणे, अतिघाम येणे, नेत्ररोग, स्थूलता, अजीर्ण, आम्लपित्त, दाह, रक्तपित्त, कुष्ठरोग, इसब, पित्त्जशूळ, संधिवातज्वर, उदररोग, पांडुरोग ,मूतखडा, उचकी, उलटी, अशा अनेक विकारांवर हिरडा महत्त्वाचे औषध मानले गेले आहे. कुपचन रोगांत सुरवारी हिरड्याचा चांगला उपयोग होतो.अतिसार, आंव आणि आंतड्याची शिथिलता यांत चांगला गुण येतो. अर्श (मूळव्याध) रोगात हिरडा सैंधवाबरोबर देतात आणि रक्तार्शांत त्याचा क्वाथ देतात. अर्श सुजून दुखत असल्यास हिरडा उगाळून लेप देतात.

हिरडा जरी बहुपयोगी असला तरी, त्याचा वापर ऋतु प्रमाणे विविध द्रव्यांसह करावा:

 • वसंत ऋतु अर्थात चैत्र, वैशाख मध्ये मधा सोबत,
 • ग्रीष्म ऋतू अर्थात ज्येष्ठ, आषाढ मध्ये गुळा सोबत,
 • वर्षा ऋतु अर्थात श्रावण, भाद्रपद मध्ये सैंधव मिठा सोबत,
 • शरद ऋतु अर्थात आश्विन, कार्तिक मध्ये साखरे सोबत,
 • हेमंत ऋतु अर्थात मार्गशीर्ष, पौष मध्ये सुंठी सोबत, आणि
 • शिशिर ऋतु माघ, फाल्गुन मध्ये पिंपळी सोबत.

हिरडा ग्रहण करावा. [१]


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भसंपादन करा

हिरडा, हरीतकी गूण व औषधी उपयोग https://marathidoctor.com/hirada-haritaki-harad-terminalia-chebula-inknut-in-marathi.htm

बाह्यदुआसंपादन करा

https://marathidoctor.com/hirada-haritaki-harad-terminalia-chebula-inknut-in-marathi.html

 1. ^ http://hindi.webdunia.com/natural-medicine/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A4%BF-108121600022_1.htm